अभय टिळक

वापरून वापरून पार गुळगुळीत झालेले असले तरी काही प्रश्न कधीच अप्रस्तुत ठरत नसतात. ‘जीवनामध्ये माणसाला अपेक्षा असते सुखाची की शांतीची?’ हा असाच एक सदाहरित प्रश्न. उत्तर शोधण्यात अनंत काळ काथ्याकूट करता येईल असा. परंतु यासंदर्भात तुकोबा मात्र कमालीचे स्पष्ट व स्वच्छ आहेत. ‘शांतीपरतें नाहीं सुख। येर अवघेंचि दु:ख’ असा त्यांचा यासंबंधातील रोकडा व निरपवाद सांगावा. या कथनामध्ये अनुस्यूत असलेले तुकोबांचे तर्क शास्त्र बिनतोड दिसते. सुख मिळाले एक वेळ जरी जीवनात, तरी त्या सुखाची परिणती शांतीमध्ये होतेच किंवा होईलच याची हमी काय? आणि सुखाची निष्पत्ती जर अशांततेमध्ये घडून येणार असेल तर गोळाबेरीज काय? त्यामुळे सुखमय होण्यापेक्षाही अथवा सुखकारक होण्याबरोबरच जीवन शांतीपूर्णही असले पाहिजे, हा तुकोबांच्या कथनाचा गाभा ठरतो. पण प्रश्न असा, की शांतीकडे नेणारा हमखास मार्ग कोणता? ज्ञानदेव काय किंवा तुकोबा काय, दोघांच्याही अनुभवसिद्ध प्रतिपादनानुसार शांतीचा संबंध पोहोचतो चित्तशुद्धीशी- आणि पर्यायाने विशुद्ध बुद्धीशी. आपले जगणे शांतीला पारखे झाले आहे, कारण आपली बुद्धी मुळात अशुद्ध आहे. याबाबत ज्ञानदेवांपासून ते थेट आजच्या कृष्णमूर्तींपर्यंत सर्वांचेच एकमत आहे. आपल्या रोजच्या जगण्यातही वैराग्य व विवेक यांचा आश्रय गरजेचा ठरतो तो नेमका त्याचसाठी. विवेकरूपी प्रवाहामध्ये बुचकळून चांगली शुद्ध केलेली बुद्धी काही काळ तरी लोकसंपर्कापासून अलिप्त राखावीच लागते. असा कारणपरत्वे स्वीकारलेला अल्पकालीन एकांतवास स्वाध्यायासाठी पूरक, उपकारक शाबीत होतो. ‘कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां’ असे तुकोबांनी त्यांच्या एकांतवासातील अभ्यासासंदर्भात जे सांगून ठेवले आहे त्याचा इत्यर्थ हाच. अनुभवसंपन्न विभूतींच्या वचनांचा आरसा पुढ्यात ठेवून त्यात आपलं चरित्र बघत स्वत:त सतत सुधारणा घडवून आणण्याचा स्वाध्याय तुकोबांना या ठिकाणी ‘पाठ’ या संज्ञेद्वारे सूचित करावयाचा आहे. एकांतामध्ये स्थिर झालेला क्रमयोगीदेखील नेमके तेच करत असतो, हे ‘गुरुवाक्यें उठविला। बोधीं निश्चयो आपुला। न्याहाळी हातीं घेतला। आरिसा जैसा’ अशा शब्दांत ज्ञानदेवही विदित करतात. अशा निरंतर केलेल्या स्वाध्यायाचे फळ म्हणजे बुद्धीच्या ठायी उत्पन्न होणारे समत्व. समत्वाचे लेणे धारण केलेल्या बुद्धीमधून सर्व प्रकारचे द्वंद्व काढता पाय घेते. ‘तेधवां वैरी का मैत्रिया। तेयासि माझे ह्मणावेया। सन्माना धनंजया। उरेचि ना’ अशी त्या उपासकांची स्थिती त्या बिंदूवर बनते. हा माझा वैरी आहे आणि तो माझा प्रिय सखा होय, असा द्वैतभाव अणुमात्रही बुद्धीत उरलेला नसल्याने अपमान-सन्मानासारख्या भावभावनाही त्या क्रमयोग्याला स्पर्शत नसतात. अंतर्बाह््य एकच तत्त्व सर्वत्र, सदासर्वकाळ विलसत आहे, या जाणिवेवर मग तो उपासक पूर्णपणे स्थिर होतो. ‘आवडेल जीवां जीवाचिये परी। सकळां अंतरीं एक भाव’ असे त्या अवस्थेचे वर्णन तुकोबा करतात. रोजच्या प्रपंचातील कामे व जबाबदाऱ्या यथासांग पूर्ण करण्यापासून सुरू झालेल्या साधनाप्रवासाचा अपूर्व असा टप्पा इथे साकारतो. ‘ते शांति पैं गा सुभगा। संपूर्ण ये तयाचिया आंगा’ अशा शब्दांत ज्ञानदेव त्या टप्प्याचे वर्णन करतात. शांतीपर्यंतचा प्रवास इतका प्रदीर्घ आणि सूक्ष्म का आहे, याचा उलगडा आता व्हावा!

agtilak@gmail.com