अनुभूतीपूर्ण विभूतींच्या शब्दांना ज्ञानदेव उपमा देतात सूर्यबिंबाची. संतबोल दिसतात मोटकेच, परंतु असतात मात्र असंभाव्य अर्थभरित. भल्या पहाटे उगवतीला जेमतेम बचकभर दिसणारा सूर्यगोल प्रकाशाने आसमंत अंतर्बाह््य उजळून टाकतो. अगदी तसेच असणारे शब्दांचे अपरंपार सामर्थ्य- ‘‘जैसें बिंब तरी बचकेएवढें। परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें। शब्दांची व्याप्ती तेणें पाडे। अनुभवावी।’’ अशा प्रत्ययकारी शैलीत ज्ञानदेव वर्णन करतात. ‘ताटीच्या अभंगां’तील साध्वी मुक्ताबाईंची एक ओळ अशीच प्रचंड आशयघन आहे. एका विराट तत्त्वदर्शनाच्या उपयोजनाची सघनता व सखोलता क्षणार्धात पाजळून समग्रतेने पुढ्यात मांडणारी अशी. अखिल जग हे एकाच परमतत्त्वाचे विलसन असल्यामुळे विश्वातील प्रत्येक वस्तुमात्र म्हणजे त्याच चैतन्याचा गुणाकार होय, ही जीवनदृष्टी अंगी बाणलेल्या उपासकाचे लोकव्यवहारासंदर्भातील उत्तरदायित्व मुक्ताबाई- ‘‘त्यांसी पाहिजें सांभाळिलें’’ अशा प्रगल्भ शब्दांत ज्ञानदेवांना विशद करतात. एकच तत्त्व अनेकत्वाने प्रगटलेले असल्याने संपर्कात येणाऱ्या प्रत्येक जीवमात्राचा आपल्या परीने सांभाळ करणे, हे अद्वयबोधाचे लेणे धारण केलेल्या साधकाचे अंगभूत कर्तव्यच होय, हाच सांगावा ज्ञानदेवांच्या निमित्ताने मुक्ताबाई समाजमनासाठी मुखर करतात. विश्वातील प्रत्येक जीवमात्राच्या हिताचे संवर्धन करणे, मुक्ताबाईंना या ठिकाणी अभिप्रेत आहे. समोरची व्यक्ती आपल्याशी कशीही वागली तरी अद्वयबोधाचे अधिष्ठान अंत:करणात स्थिर झालेल्या उपासकाने प्रत्येकाच्या कुशलमंगळाचाच सांभाळ केला पाहिजे, ही अपेक्षा, वाकड्या मार्गाने चालणाऱ्या बुद्धीमधून प्रसवलेल्या लोकव्यवहाराला विटून स्वत:ला खोपीमध्ये कोंडून घेणाऱ्या ज्ञानदेवांपाशी व्यक्त करतात मुक्ताबाई. विश्वावर सदोदित कृपेची असीम छाया धरणाऱ्या परमशिवाचे अनुकरण शिवबोधाचे अंतरंग हस्तगत झालेल्यांकडून होत राहिले पाहिजे, हे सूचन इथे गर्भित आहे. ‘संत’ या पदाला प्राप्त झालेल्या विभूतीसाठी आदर्श आचारसंहिताच जणू माऊली मुक्ताबाईंनी एका ओळीमध्ये चिरंतन सिद्ध करून ठेवलेली आहे. तुकोबांचा एक ‘नाट’ या संदर्भात कमालीचा उद्बोधक ठरतो. ‘‘हरि तैसे हरीचे दास। नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास। बळकट कांस भक्तीची।’’ हा त्या अभंगाचा पहिला चरण. उपासकाची जीवनरीत त्याच्या उपास्य दैवताच्या गुणमाहात्म्याबरहुकूम आखलेली असते, असा जो दाखला तुकोबा इथे देतात तो विलक्षण मननीय होय. ‘कृपा’ हा त्या परमशिवाचा स्थायिभाव, तसेच पंचकृत्यांमधील त्याचे चौथे कृत्यही तेच होय. शिवशंकराला त्याचे ‘शिव’पण ज्याने प्रदान केले, अर्जुनाला ज्याने कुरुक्षेत्रावर गीताबोध कथन केला, तेच कृष्णतत्त्व ‘विठ्ठल’ नाम धारण करत भीमेकाठी विटेवर उभे ठाकून कृपादानाचे शिवकल्याण कार्य अविरत करते आहे, ही भागवतधर्मी संतांची धारणा तुकोबांनी त्यांच्या एका ‘नाटा’मध्ये वेधकपणे मांडलेली दिसते. ‘कृपादान’ व ‘विश्वव्यापकत्व’ हे दोन गुण ‘शिव’ आणि ‘विठ्ठल’ या दोन्हींमध्ये समान असल्याचे मार्मिक प्रतिपादन- ‘‘विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा। विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेला चाळा विश्व विठ्ठलें।’’ अशा शब्दांत करत तुकोबा पंढरी क्षेत्रात साकारलेल्या महासमन्वयाकडे आपले लक्ष वेधतात.

agtilak@gmail.com