News Flash

विष्णुमय

ज्ञानदेवांचे परमगुरू असणाऱ्या गहिनीनाथांचा भर विष्णुसहस्रानामावर प्रकर्षाने राहिला अशी साक्ष परंपरा देते

(संग्रहित छायाचित्र)

 

विष्णुमय

विष्णुसहस्रानामात पहिल्या स्थानावर असलेल्या ‘विश्व’ या परतत्त्वाच्या आद्य नामरूपानंतर त्याच परतत्त्वाचे ‘विष्णू’ हे अभिधान दुसऱ्या स्थानावर यावे यात कार्यकारणभावाचे सूचन घडते. या ठिकाणीही पुन्हा नाथ संप्रदायाचा धागा जोडलेला दिसतो. ज्ञानदेवांचे परमगुरू असणाऱ्या गहिनीनाथांचा भर विष्णुसहस्रानामावर प्रकर्षाने राहिला अशी साक्ष परंपरा देते. श्रीकृष्ण म्हणजे अखिल ब्रह्मांडाचे आदिकारण असणाऱ्या ब्रह्म तत्त्वाचेच ज्ञानयुक्त सगुण प्रगटन असल्याचा निर्वाळा गहिनीनाथ देतात. ‘ब्रह्म’ या मूळ कारणवस्तूचेच ‘श्रीकृष्ण’ हे कार्यात्मक रूपांतर, असा हा कार्यकारणभाव. परब्रह्माचे श्रीकृष्ण रूपातील प्रगटन म्हणजे, मूळ तत्त्वाचे रूपांतर असल्याने, पारंपरिक परिभाषेनुसार ‘श्रीकृष्ण’ ब्रह्माचे विवर्तन ठरते. ‘विवर्त’ म्हणजे ‘बदल’ अथवा ‘रूपांतर’. इथे मोठी गंमत आहे. सत्-चित्-आनंदस्वरूप असणाऱ्या  परमात्म तत्त्वाचे दृश्यमान स्वरूपही सत्-चित्-आनंदमयच होय वा असते, असे गहिनीनाथ आवर्जून कथन करतात. या न्यायाने, ‘श्रीकृष्ण’ हे परतत्त्वाचे अनध्यस्त विवर्तरूप शाबीत होते. हेच गेल्या शतकात श्रीगुलाबराव महाराज सातत्याने मांडत राहिले. हाच श्रीकृष्ण परमात्मा आणि पर्यायाने श्रीविष्णू पंढरी क्षेत्रामध्ये विठ्ठलरूपाने विराजमान आहे, ही भागवत धर्माची धारणा. विष्णू या तत्त्वाची सारी गुणसंपदा श्रीविठ्ठलाच्या ठायीदेखील प्रतीत व्हावी, हे मग सहज-स्वाभाविक ठरते. मुळात, परमतत्त्वाचे ‘विष्णू’ हे नामच  व्यापकत्वाचे सूचन घडवते. या संज्ञेतील ‘विश्’ हा मूळ धातू तोच विस्तारक्षमतादर्शक होय. व्यापक असणारे परमेश्वर तत्त्व म्हणजे विष्णू. क्रियाशील असणे हा अर्थांतराचा आणखी एक पदरही ‘विष्णू’ या अभिधानाला लगडलेला आहे. म्हणजे, व्यापकत्व, विस्तारक्षमता आणि क्रियाशीलता हे या तत्त्वाचे गाभा गुण ठरतात. यामुळेच, ‘विठ्ठल विस्तारला जनी। सप्त ही पाताळें भरूनी। विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं। विठ्ठल मुनिमानसीं’ या अचूक शब्दकळेद्वारे विष्णू आणि विठ्ठल यांचे एकरूपत्व तुकोबा विदित करतात. भगवान विष्णूंचे ‘शिपिविष्ट’ हे अभिधान त्यांच्या ठायी वसणाऱ्या सर्जनशीलतेचे बोधन घडवते. व्यापकत्व, क्रियाशीलता आणि निर्मितीक्षमता ही तिहेरी गुणसंपदा शिव आणि विष्णू या उभय तत्त्वांच्या ठायी समसमान आहे ती अशी. विष्णुतत्त्वाचे आद्य प्रगटन असणारे हे विश्व आणखी एका बाबतीत मोठे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. जगदाकार असणारे विष्णू हे तत्त्व विश्वरूपाने प्रगट झाले इतकेच केवळ नाही तर, व्यक्त झालेल्या प्रत्येक रूपात ते अंतर्बाह््य भरूनही राहिलेले आहे. म्हणजेच, विश्वाच्या  निर्मितीबरोबरच विष्णू या तत्त्वाचा निर्मितीच्या क्षणापासूनच त्यात प्रवेशही अंतर्भूत आहे. पारमार्थिक परिभाषेत या प्रक्रियेस ‘अनुप्रवेश’ असे संबोधतात. ‘निर्मितीसहच प्रवेश’ हा ‘अनुप्रवेश’ या संज्ञेचा अर्थ. बीजामधून महाकाय शाल्मली वृक्षाची निर्मिती होते, तोच हा प्रकार. स्वत: अंतर्धान पावून बीजच वृक्षरूपाने पुन्हा प्रगटते. ‘एकीं एकपणाचा घेऊनियां त्रास। जाला नानाकार स्वरूपें बहुवस। म्हणोनि दुसरेंचि नाढळे वो यास। जयातयामाजी याचाचि रहिवास वो’ हे निळोबारायांचे कथन याच वास्तवाचे अधोरेखन करते.‘नामा म्हणे सर्व आहे हाचि देव। उदार माधव सर्वांभूतीं’हे नामदेवराय  सांगतात त्याचा इत्यर्थ हाच. जग ‘विष्णुमय’ होय, असा दाखला तुकोबाही देतात!

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 12:01 am

Web Title: loksatta vishnumaya advayabodh article abn 97
Next Stories
1 विश्वरूप
2 त्यांसी पाहिजें सांभाळिलें…
3 ‘पंचकृत्य’कारक शिव
Just Now!
X