– अभय टिळक

स्पर्धेच्या आजच्या युगात अतोनात महत्त्व प्राप्त होते ते पुढे जाण्याला आणि सतत आघाडीवर राहण्याला. हेही पुरेसे नसते. केवळ बिनीवर राहून भागत नसते, तर प्रत्येकाला गाठायचे असते अव्वल स्थान. सर्वोच्च पदावर केवळ एकच जण विराजमान होऊ शकतो. तिथे पोहोचण्यासाठी गरज असते ती सर्वोत्कृष्ट पात्रता सिद्ध करण्याची. गुणांकन हे पात्रता सिद्ध करण्याचे साधन. सर्वाधिक गुण पदरात पाडून घेण्याची असोशी त्यांपायीच. परीक्षा, गुण आणि बुद्धिमत्ता यांचे साहचर्य जुळून येते ते या कार्यकारणसंबंधाद्वारे. बुद्धिमत्तेचा कस ठरतो गुणांकनावर. परीक्षेत गुण जितके अधिक, तितके संबंधित छात्राचे बुद्धिवैभव अधिक, हे व्यावहारिक समीकरण बहरते या प्रक्रियेमधून. अद्वयाच्या प्रांतातील गणिते मात्र निराळीच. ‘बुद्धिवैभव’ या संकल्पनेची अद्वयविश्वातील व्याख्या ज्ञानदेवांनी सिद्ध करून ठेवलेली आहे ती त्यांच्या ‘हरिपाठा’मध्ये. ‘बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें। एक्या केशीराजें सकळ सिद्धी’ ही ज्ञानदेवकृत व्याख्या ‘बुद्धिवैभव’ या संकल्पनेची. ‘केशव’ हे विष्णूचे एक नाव. व्यापनशील असल्याने विश्वात्मक रूप धारण करून विनटलेल्या केशवराजाशी स्थिर होणे, ‘विष्णू’तत्त्वाशी समरस होणे हीच बुद्धीच्या वैभवाची परिसीमा होय, हाच ज्ञानदेवांचा सांगावा. ‘सत्य’ या संकल्पनेची सांगड घातली जाते त्रिकालाबाधित्वाशी. ‘सत्य’ ही संकल्पना निर्देश करते चिरंतनाचा. जे काल होते, आज आहे आणि उद्याही असणार आहे असे तत्त्व ‘सत्य’ म्हणून संबोधले जाते. ‘सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला’ असे तुकोबा विठ्ठलाला उद्देशून जे म्हणतात, त्यातील गर्भितार्थ हाच. ‘सत्य’ या पदाचा तुकोबा इथे करत असलेला त्रिवार उच्चार द्योतन घडवतो काळाच्या तीन पदरांचे. दृश्य विश्व म्हणजे याच ‘सत्’वस्तूचे प्रगटन असल्याने त्या सद्वस्तूशी एकरूप झालेली वैभवशाली बुद्धीही सात्विकच बनते. इथे महत्त्व प्राप्त होते ते अशा सात्विक बुद्धीच्या पोताला. तिच्या आकारमानाला नव्हे. ‘जैसी दीपकळिका धाकुटी। परी बहु तेजातें प्रगटी। तैसी सद्बुद्धी हे थेकुटी। म्हणों नये’ असे ज्ञानदेव आवर्जून बजावतात त्याचे गमक हेच. बुद्धीमध्ये हा गुणात्मक बदल घडवून आणायचा तरी कसा, हाच इथे मग कळीचा प्रश्न बनतो. अस्थिर असणारी बुद्धी अनंत प्रांतांमधून सतत भटकत असल्याने त्या- त्या प्रांतांतील प्रेरणांचे रंगलेपन होऊन ती मलीन बनत राहते, की मुळात अनेक भल्याबुऱ्या वृत्ती-प्रवृत्तींची पुटे एकावर एक चढून मळलेली असल्यामुळेच बुद्धी सद्वस्तूशी स्थिर होत नाही, हा दुसरा यक्षप्रश्न प्रगटतो पहिल्या प्रश्नाच्या पोटातून. म्हणजे प्राधान्य बुद्धीच्या स्थैर्याला द्यायचे की शुद्धीला, याचा क्रम ठरवणे आता क्रमप्राप्त बनते. ‘क्रमयोगा’ची प्रक्रिया उलगडून मांडताना ‘ज्ञानदेवी’च्या १८ व्या अध्यायात ज्ञानदेव त्यांचा कौल देताना दिसतात तो शुद्धीच्या पक्षाला. ग्रहणकाळातील छायेपायी प्रभाहीन झालेले चंद्रबिंब छायेचे पटल दूर हटताच पुन्हा तेजाळून उठते, त्याच न्यायाने नाना अध्यासांच्या आघातांनी मळलेली बुद्धी एकदा का शुद्ध झाली की स्थिरतेच्या दिशेने करावयाच्या प्रवासाचा पहिला टप्पा पार होतो, असा निवाडा ‘मग राहूनें उगळिली। प्रभा चंद्रें आलिंगिली। तैसी शुद्धते जडली। आपणयां बुद्धि’ या शब्दांत ज्ञानदेव करतात. बुद्धी विमल करण्याचे उपाय कोणते, या प्रश्नाकडे वळायचे ते आता याच टप्प्यावर…

agtilak@gmail.com