परंपरेचा अभिमान प्रत्येकालाच असतो. साहजिकच, परंपरेचे जतन करण्याची ऊर्मी प्रत्येकाच्या मनात तेवत असते. अंमळ गडबड होते ती इथेच. परंपरा जपायची म्हणजे नेमके काय करायचे? ‘परंपरा’ नावाची चीज प्रवाही असते की स्थितीशील, या कळीच्या मुद्द्याचे आकलन समाजमनाला कितपत विशुद्ध आहे, त्यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून राहते. ते जर अचूक गवसले तर – परंपरेची चिकित्सा करावयाची किंवा नाही, या आणखी एका संलग्न प्रश्नाचे उत्तर आपसूकच हाताशी येते. चिकित्सा करायची तर सारासारविवेकाचे उपकरण चांगले घासून-पुसून तयार ठेवावे लागते. अद्वयबोधाचे पाथेय जतन करणाऱ्या भागवत धर्मविचाराला अपेक्षित आहे ती परंपरेची, पूर्वसंचित ज्ञाननिधीची विवेकशील चिकित्साच. किंबहुना, विवेकी व ज्ञानी व्यक्तींची ती जबाबदारीच होय, असा या विचाराचा खणखणीत सांगावा होय. या जीवनदृष्टीचा आद्य उद्गार आढळतो ‘ज्ञानेश्वरी’च्या दुसऱ्या अध्यायात. परंपरेने अपौरुषेय मानलेली वेदविद्या आणि वेदविहीन जीवनपद्धती अपरिवर्तनीय मानून तशीच्या तशी अंगीकारायची की वेदांद्वारे प्रगटलेल्या अक्षरसंभाराची समकालीन पार्श्वभूमीवर चिकित्सा करावयाची, या त्या काळात विलक्षण संवेदनशील गणल्या जाणाऱ्या पैलूचा ऊहापोह ज्ञानदेव पराकोटीच्या मार्मिकपणे करतात. त्यासाठी ज्ञानदेव योजतात दोन अमोघ दृष्टान्त. ‘‘जैसा प्रगटलिया गभस्ती। अशेषही मार्ग दिसती। तरी तेतुलेही काय चालिजती। सांगें मज।’’ हा झाला त्या दोहोंतील पहिला. अरुणोदय झाला की जगातील यच्चयावत रस्ते-वाटा उजळून निघाव्यात हे तर स्वाभाविकच. पण म्हणून आपण सगळ्या रस्त्यांनी चालत सुटतो का, असा सूचक सवाल शिष्योत्तम अर्जुनाचे सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण पहिल्या दृष्टान्ताद्वारे विचारतात. आपल्याला इच्छित स्थळी नेऊन पोहोचविणारी वाटच आपण पकडतो, हे या प्रश्नाचे अध्याहृत उत्तर. ‘‘कां उदकमय सकळ। जºही जाहलें असे महीतळ। तरी आपण घेपें केवळ। आर्तीचजोगें।’’ हा झाला ज्ञानदेवांचा दुसरा दृष्टान्त. अवघी पृथ्वी पाण्याने भरून गेली म्हणून ते सगळेच्या सगळे पाणी आपण पिऊन टाकणार नाही, तर आपली तहान भागेल इतकेच पाणी आपण प्राशन करू, हे तरी तुला पटते आहे ना, हा दुसरा प्रश्न अर्जुनाला इथे विचारतात भगवान श्रीकृष्ण. हे दोन दृष्टान्त दिल्यानंतर, ‘‘तैसे ज्ञानीये जे होती। ते वेदार्थातें विवरिती। मग अपेक्षित स्वीकारिती। शाश्वत जें।’’ असा शेवटचा षटकार मग ज्ञानदेव मारतात! दिसणाऱ्या प्रत्येक रस्त्याने आपण चालत सुटत नाही, उपलब्ध असणारे सगळेच्या सगळे पाणी आपण पिऊन टाकत नाही; अगदी त्याच न्यायाने, अपौरुषेय गणल्या जाणाऱ्या वेदांचा अर्थ काळानुरूप तारतम्याने लावणारे ज्ञानी प्रथम त्या अक्षरसंभारातील कालबाह््य अंश बाजूला काढतात आणि उरलेल्या शाश्वत भागातीलही, प्रचलित लोकव्यवहाराची निरामयता जपण्याच्या दृष्टीने सयुक्त असणारा अंश तेवढाच स्वीकारतात, हे ज्ञानदेवांचे मार्मिक कथन आहे १३व्या शतकातील. पारंपरिक धारणा, संचित ज्ञान यांची अशी निर्मम चिकित्सा करण्याचे धाडस २१व्या शतकात तरी आपल्यापाशी आहे का?

– अभय टिळक

agtilak@gmail.com