शिव हे तत्त्व कल्याणदायक होय, हे नामदेवरायांचे कथन कमालीचे सूक्ष्म आणि उद्बोधक आहे. शांभवाद्वयाचे उद्गाते असणारे परमशिव कृपाळू असल्याचा दाखला काश्मिरी शैवमत देते. किंबहुना प्रत्येक भूतमात्राचे क्षेम, कुशल, हित, शुभ, कल्याण व्हावे यासाठी विश्वावर कृपेचा वरदहस्त सतत उभारून ठेवणे, हे शिवाच्या पंचकृत्यांपैकी पाचवे कृत्य असल्याचा या तत्त्वदर्शनाचा सांगावा होय. ज्ञानदेवांच्या तत्त्वपरंपरेची गंगोत्री असणाऱ्या काश्मिरी शैवमताचे अधिष्ठान असे परमशिव हे तत्त्व वैशिष्टय़पूर्ण आहे. चित्, ज्ञान, इच्छा, क्रिया आणि आनंद या पंचशक्तींनी युक्त असणारा परमशिव पाच प्रकारची कृत्ये करत असतो, असा या दर्शनाचा सिद्धान्त. मुदलातच शिव स्व-तंत्र असल्यामुळे स्वत:मध्ये सामावलेले विश्व प्रगट करण्यासाठी अथवा अभिव्यक्त झालेले विश्व पुन्हा स्वत:मध्ये सामावून घेण्यासाठी त्याला कोणत्याही बाह्य़ साधनाची निकड भासत नसते. त्याच्या इच्छेला येईल तेव्हा स्व-स्वरूपामध्ये समाविष्ट असलेले विश्व तो प्रगट करतो. नव्हे, स्वेच्छेने तोच विश्वरूपाने प्रगटतो. या अर्थाने विश्वाचे ‘सृजन’ तो घडवत असतो. ‘सृज’ म्हणजे ‘जाऊ देणे’. परमशिव स्वत:मध्ये सामावलेले विश्व बाहेर जाऊ देतो. हे झाले शिवाच्या पंचकृत्यांमधील पहिले कृत्य. त्याची इच्छा असेल तोवर तो विश्वात्मक रूपाने विलसत राहतो. म्हणजेच, दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर विश्वरूपाने प्रगट होण्याची क्रिया तो त्याच्या मनाला येईल तोवर चालू ठेवतो. या त्याच्या दुसऱ्या कृत्यालाच म्हणायचे ‘स्थिती’. विश्वरूपाने प्रगटीकरणाचा हा खेळ आवरण्याची प्रेरणा ज्या क्षणी शिवाच्या ठायी अंकुरते त्या वेळी, प्रगट केलेले विश्व पुन्हा आत ओढून घेऊन तो स्वत:मध्ये विलीन करून टाकतो. त्याच्या या तिसऱ्या कृत्यालाच म्हणायचे ‘संहार’. इथे ‘संहार’ या संज्ञेचा ‘नाश’ हा अर्थ अभिप्रेत नाही. ‘संहार’ घडणे म्हणजे ‘विलीन’ होणे. स्वत:मधूनच बाहेर जाऊ दिलेल्या विश्वाचा संहार शिव घडवून आणतो याचा अर्थ स्वत:चे विश्वात्मक रूप तो विलीन करतो. दृश्यमान बनलेले विश्व शिवाच्या ठायी लीन होते. विश्वाची उत्पत्ती-स्थिती-संहार ही जणू शिवाची अखंड चालणारी क्रीडाच. ‘‘आदि मध्य अंतीं खेळूनियां खेळ। उरलें तें निखळ अविनाश।’’ अशा अतिशय नेमक्या शब्दांत नामदेवराय शिवाच्या त्याच स्वभावाचे चित्रण करतात. शिवाचे चौथे कृत्य मात्र विलक्षणच म्हणायचे. ‘पिधान’ अथवा ‘तिरोधान’ असे त्याला नाव आहे. ‘पिधान’ अथवा ‘तिरोधान’ म्हणजे ‘झाकणे’ अथवा ‘आच्छादित’ करणे. आपले सत्यस्वरूप आच्छादित करून ठेवणे हीदेखील त्या परमशिवाची मर्जीच. हे परमशिवतत्त्व विश्वात्मक रूपाने प्रगटते त्या वेळी स्वत:चे विश्वोत्तीर्ण रूप ते झाकून ठेवते. विश्वोत्तीर्ण अवस्थेत केवळ स्पंदरूपाने नांदत असताना परमशिव त्याचे विश्वात्मक रूप अस्फुटित राखतो, हाच ‘तिरोधान’ या चौथ्या कृत्याचा इत्यर्थ. मथुरेच्या कारागृहात अवतीर्ण झालेल्या बाळकृष्णाला दुरडीमध्ये घालून वसुदेव गोकुळाकडे प्रयाण करतात तो प्रसंग नामदेवरायांनी त्यांच्या एका अभंगात रेखाटलेला आहे. कोणाच्याही नजरेला पडू नये म्हणून दुरडीमध्ये अलवार लपेटलेल्या बाळकृष्णाचे शब्दचित्रण- ‘‘आच्छादित रूप। नामा ह्मणे माझा बाप।’’ अशा नजाकतीने करत नामदेवराय शिव आणि बाळकृष्ण यांच्या एकत्वाकडे निर्देश करतात, तेव्हा स्तिमित होण्याखेरीज आपल्या हातात उरतेच काय!

– अभय टिळक agtilak@gmail.com