News Flash

प्रवृत्ती-निवृत्ती

मुळात भगवान श्रीकृष्णांचे अवघे जीवनचरित्र म्हणजेच प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुयोग्य, समधात संयोग होय, हेच ते उत्तर.

श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत हे भागवत धर्माचे दोन अधिष्ठान ग्रंथ. उभय साहित्यकृतींचा आदिबंध संवादाचा. कुरुक्षेत्रावर कृष्ण-अर्जुनांदरम्यान साकारलेल्या सुखसंवादाचे महर्षी व्यासकृत शब्दरूप म्हणजे गीता. तर, मुख्यत: कृष्ण व उद्धव आणि त्यांसह नारद व वसुदेव, यदु व दत्तात्रेय अशा विविध संवादांचे सत्यवतीपुत्र व्यासांनीच केलेले शब्दांकन म्हणजे श्रीमद्भागवत. ‘‘आणि कृष्णार्जुनीं मोकळी। गोठी चावळिली जे निराळीं। ते श्रीव्यासें केली करतळीं। घेवों ये ऐसी।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव विदित करतात कथा गीतेच्या सिद्धतेची. भागवताच्या निर्मितीमागील कार्यकारण तर अधिकच रोचक. आपल्या अखिल कुळाच्या समूळ नाशाची कहाणी ‘जय’नामक ग्रंथात अक्षरांकित केल्यानंतर स्मृतिकातर आणि शोकविव्हळ बनलेल्या व्यासांच्या तप्तदग्ध अंत:करणावर शांतीचा शिडकावा करण्यासाठी भगवंताचे गुणगायन करण्याबाबत ब्रह्मर्षी नारदांनी दिलेला सल्ला अमलात येण्याद्वारे श्रीमद्भागवताची रचना साकारली. तर पैठणवासी नाथरायांच्या प्रतिपादनानुसार, भगवान महाविष्णूंनी स्वमुखाने ब्रह्मदेवाला चार श्लोकांच्या माध्यमातून केलेल्या सूत्रमय उद्बोधनाचा व्यासांनी घडवून आणलेला रसमय विस्तार म्हणजे श्रीमद्भागवत. म्हणजेच, या दोन्ही अक्षरलेण्यांचे निर्मिक होत भगवान श्रीकृष्ण. भागवत धर्माने प्रवर्तित केलेले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि त्या तत्त्वज्ञानातून उमलणारी जीवनविषयक दृष्टी प्रवृत्ती आणि निवृत्ती या मानवी व्यवहाराची जडणघडण करणाऱ्या उभय धारणांचा संतुलित समन्वय का व कशी साधते, याचे उत्तर या वस्तुस्थितीत दडलेले आहे. मुळात भगवान श्रीकृष्णांचे अवघे जीवनचरित्र म्हणजेच प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुयोग्य, समधात संयोग होय, हेच ते उत्तर. ‘‘ऐसा जनमनमोहन रंजवणा। गुणीं गुणातीत नंदाचा पोसणा। करु नि अकर्ता हा सृष्ट्यादि रचना। विश्वीं विश्वातीत अलक्ष देखणा वो।’’ हे तुकोबाशिष्य निळोबारायकृत कृष्णवर्णन त्या संतुलित समन्वयाचे स्पष्ट सूचन घडविते. भागवत धर्मविचाराचे अधिष्ठान ग्रंथ असणाऱ्या गीता-भागवताचे उद्गाते भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोहोंच्या समसमा संयोगाद्वारे उमलणाऱ्या जीवनपद्धतीचे उद्बोधन या दोन्ही तत्त्वज्ञानकृतींद्वारे घडावे, हे सहज स्वाभाविकच ठरते. ‘‘नारायणपरो धर्म: पुनरावृत्तिदुर्लभ:।। प्रवृत्तिलक्षणश्चैव धर्मो नारायणात्मका:।।’’ अशा शब्दांत महर्षी व्यासांनी ‘महाभारता’च्या शांतिपर्वातील नारायणीय उपाख्यानात भागवत धर्माचे गाभालक्षण विदित करावे, यांतच सर्व काही आले. मोक्षदायक असणारा नारायणीय भागवत धर्म प्रवृत्तिपरही असून, धर्माच्या या दोन्ही अंगांचे सम्यक् ज्ञान ज्याला असेल तोच सर्वज्ञ, तोच सत्यनिष्ठ आणि तोच शुचिर्भूत… इतक्या नि:संदिग्ध शब्दांत खुद्द व्यास आपल्या मुलाला, म्हणजेच शुकदेवांना, भागवत धर्माचा असाधारण विशेष उलगडून सांगतात. भागवतधर्मी संतविचारातील ऐहिकतेच्या प्रवाहाची गंगोत्री म्हणजे हीच व्यासोक्ती. मानवी जगण्याच्या ऐहिक आणि पारलौकिक अशा उभय अंगांची याप्रकारे समसमा जोपासना करणारे तत्त्वज्ञान श्रीकृष्णोक्तीद्वारे वेचून प्रगट करणे हे तर व्यासांचे उभ्या मानवी संस्कृतीवरील अक्षय उपकारच गणायला हवेत. मेरू शिखरावर महासमाधीत शुकदेव प्रविष्ट होत असताना मी तेथेच होतो, असे- ‘‘जाऊ नियां तेणें साधिली समाधी। तुका म्हणे तधीं होतों आम्ही।’’ इतक्या नि:संदिग्ध शैलीत तुकोबा विदित करतात ते का, हे आता ध्यानात यावे! – अभय टिळक

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:09 am

Web Title: propensity retirement akp 94
Next Stories
1 संग- नि:संग
2 जल-तरंग
3 कूळ-सूत्र
Just Now!
X