‘ज्ञान श्रेष्ठ की भक्ती वरिष्ठ?’ असा, वास्तविक पाहता, बिनबुडाचा एक मुद्दा अकारणच अधीमधी उपस्थित केला जातो. ज्ञानदेवांना विचारू गेले तर त्यांच्या लेखी हा प्रश्नच निरर्थक होय. असा बखेडा उभा करणे, हेच मुळात, त्यांच्या दृष्टीने, असा प्रश्न विचारणाऱ्याच्या ठायी ज्ञान व भक्ती हे दोन्हीही अपरिपक्व असल्याचेच द्योतक ठरते. परिपूर्ण ज्ञान आणि परिणत भक्ती या दोहोंत अणुमात्रही फरक नाही, याबाबत ज्ञानदेव नि:शंकच आहेत. हें समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो। म्हणोनि भक्तांमाजीं रावो। आणि ज्ञानिया तोचि। ही ‘ज्ञानेश्वरी’च्या सातव्या अध्यायातील ओवी ज्ञानदेवांची नितळ भूमिका निरपवाद सिद्ध करते. ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ मूल्य अगर साध्य होय, असे घटकाभर गृहीत धरले तरी, त्या ज्ञानालादेखील एक विशिष्ट अधिष्ठान लाभलेले असेल तरच त्याचा महिमा उज्ज्वल ठरतो, अशी एक मेख ज्ञानदेवांनी मारून ठेवलेली आहे. व्यवहारात प्रचलित  असलेली ‘ग्यानबाची मेख’ बहुधा हीच असावी! ‘ज्ञानदेवी’च्या १३ व्या अध्यायात, एक प्रकारे, सर्वोच्च गणले जाणारे ते ज्ञान नेमके कोठे गवसते याचा पत्ताच ज्ञानदेव सांगतात आपल्याला. तरि ज्ञान गा तें एथें। वोळख तूं निरु तें। आक्रोशेंवीण जेथें। क्षमा असे। ही ज्ञानदेवांची ओवी पराकोटीची मननीय ठरते. या ठिकाणी ध्यानात घेण्याची बाब म्हणजे ‘क्षमा’ या मूल्याला ज्ञानदेवांनी बहाल केलेले ‘आक्रोशेवीण’ हे विशेषण. प्रसंगोपात्त क्षमा आपण कोणाला ना कोणाला करत असतो. मात्र, ती करतना, ‘‘अमुक व्यक्ती इतकी अमानुषपणे माझ्याशी वागली तरीदेखील तिला मी उदार अंत:करणाने क्षमा केली,’’ असे आपण जगाला सांगत राहतो. यातून खतपाणी मिळत राहते आपल्या अहंकारालाच. ज्ञानदेवांच्या लेखी आपण याबाबतीत नापास!   ‘अनाक्रोश क्षमा’ ही ज्ञानाची बैसका होय, असा सांगावा आहे त्यांचा या संदर्भात. त्यांचे व्यक्तिमत्त्व जणू या दोन शब्दांत सामावलेले आहे. ज्ञानदेवांचे उभे जीवन ‘अनाक्रोश क्षमा’ या जीवनमूल्याचे मूर्तिमंत दर्शनच. अशी अनाक्रोश क्षमा ज्याच्यापाशी नांदत असते अशा विभूतिमत्त्वापाशी कैवल्यप्राप्तीचे साधन गणले जाणारे ज्ञान वसतीला येते, असा निर्वाळा देतात ज्ञानदेव. किंबहुना, केवळ त्याचमुळे ज्ञानाचा महिमा गायला-वर्णिला जातो, असे ज्ञानदेवांचे त्या पुढील प्रतिपादन होय. हे अनाक्रोश क्षमा। जयापाशीं प्रियोत्तमा। जाण तेणें महिमा। ज्ञानासि गा। हे ज्ञानदेवांचे या संदर्भातील उद्गार कमालीचे उद्बोधक व मार्मिक ठरतात. नुसत्या ज्ञानाला, ज्ञानदेवांच्या लेखी, कणभरही महत्त्व नाही. ‘क्षमा’ या मूल्यापुढे दुर्जनांचेदेखील काही चालत नसते. वाळके गवतच नसेल पेटायला तर कितीही ठिणग्या पडल्या तरी त्या वायाच. अनाक्रोश क्षमेसारखे अमोघ शस्त्र ज्याच्या हातात आहे अशा व्यक्तीसमोर शस्त्रसज्ज दुष्टालाही पांढरे निशाण फडकवावे लागते. क्षमा शस्त्र जया नराचिया हातीं। दुष्ट तयाप्रति काय करी। अशा शब्दांत अनाक्रोश क्षमेचे व्यावहारिक अमोघत्व तुकोबाराय गर्जून सांगतात त्यांमागील रहस्य हेच नाही का! – अभय टिळक

agtilak@gmail.com