News Flash

सोयरा

नामदेवरायांच्या गाथेत एक अभंग आहे. विलक्षण गोड आणि तितकाच मार्मिक

(संग्रहित छायाचित्र)

 

अभय टिळक

नामदेवरायांच्या गाथेत एक अभंग आहे. विलक्षण गोड आणि तितकाच मार्मिक. हा अभंग म्हणजे वास्तवात आहे एका संवादाचे शब्दरूप. शब्दांकन बहुधा केले असावे नामदेवरायांनीच. हा संवाद आहे दोन कुटुंबवत्सल स्त्रियांमधील. दोहोंतील एक स्त्री म्हणजे, एकंदर पंधरा सदस्यांच्या एकत्रित कुटुंबाचा उटारेटा सांभाळणारी नामदेवरायांची अर्धागिनी राजाई. तर दुसरी स्त्री म्हणजे, ‘लेकुरवाळा’ असे विशेषण आमच्या माऊली जनाबाईंनी मोठय़ा लडिवाळपणे ज्याला बहाल केले आहे त्या पंढरीनिवासी विठ्ठलाची धर्मपत्नी प्रत्यक्ष आदिशक्ती रुक्मिणी. नामदेवरायांची धर्मपत्नी आपले हृदय उघड करते आहे रुक्मिणीमातेपाशी, असा हा प्रसंग. दोघींची अगदी अंतरंग बातचीत चालू आहे. एकान्तामध्ये बसल्या आहेत उभयता त्यासाठी. पोटातील खंतवजा तक्रार राजाईंना गुदरायची आहे जगन्मातेपाशी. बरे, फिर्यादही मोठी नाजूक आणि संवेदनशील अशीच. कारण संबंधित प्रकरणात गुंतले आहेत दोघींचेही पतिराज. त्यामुळे मोठय़ाने आणि प्रगट बोलायचीही चोरी. म्हणूनच खलबतांसाठी वेळ निवडली ती दोन प्रहर रात्र ओलांडून गेल्यानंतरची. सगळीकडे निजानीज झाल्याची खात्री करून मग राजाई बोलायला सुरुवात करतात. बोलण्याचा आशय तक्रारीचा असला तरी सूर असतो विनवणीचा. तुमच्या नवऱ्याने त्याच्या नामरूपाचे माझ्या नवऱ्याला अक्षरश: वेड लावलेले असल्यामुळे घरप्रपंचाकडे माझ्या नवऱ्याचे सरसहा दुर्लक्ष होते आहे, तेव्हा तुमच्या नवऱ्याला चार शहाणेसुरते शब्द आता तुम्हीच सांगा, अशी विनवणी राजाई करतात रुक्मिणीमातेपाशी. विठ्ठलाने चित्त वेधून घेतल्याने त्याच्या चिंतनात अहोरात्र मग्न नामदेवरायांची सुटका विठ्ठलाच्या कचाटय़ातून व्हावी, ही राजाईंची अपेक्षा. व्यावहारिक कामधामाकडे पतिराजांचे दुर्लक्ष होत असल्याने लौकिक प्रपंचातील अडचणी कशा व किती वाढलेल्या आहेत, हेही राजाई पुढे विदित करतात. कुटुंबप्रमुख घरधन्यानेच उद्योगव्यवसायाची आबाळ केल्यास चौदा-पंधरा माणसांचे कुटुंब चालवावे कसे, असा प्रश्नही राजाई कळवळून विचारतात. अशा सगळ्या कथनाच्या अखेरीस मात्र राजाईंच्या बोलण्याचा नूर पालटतो. माझ्या नवऱ्यावर तुमच्या नवऱ्याने घातलेली मोहिनी जर का त्याने आवरून घेतली नाही तर माझ्याशी गाठ आहे, असा निर्वाणीचा इशाराच जणू राजाई देतात. प्रसंग संपला! अभंगही इथेच संपतो. या बिंदूवर उलगडते देव व भक्त यांच्या नातेसंबंधातील एक अनोखे परिमाण. आराध्य दैवताकडे बघण्याची केवळ नामदेवरायांचीच नव्हे तर त्यांच्या परिवारातील यच्चयावत सदस्यांची दृष्टी पठडीतील भक्तदृष्टीपेक्षा गुणात्मकरीत्या निराळी आहे. देव्हाऱ्यात विराजमान असलेले व रोजची पूजाअर्चा स्वीकारणारे विठ्ठल-रुक्मिणी इथे आपल्या पुढय़ात साकारत नाहीत. वडिलकीच्या नात्याने आपल्या घरादारावर देव-देवी नजर ठेवून आहेत, याचे सजग भान राजाईंना आहे, याची खूण हा प्रसंग पटवतो. देव आणि भक्त यांच्यादरम्यानच्या नात्याचे परंपरागत रंगरूपच राजाई आरपार पालटून टाकतात. देव्हाऱ्यातील देव त्या आणतात थेट कुटुंबात. ‘‘अहो रखुमाबाई विठोबासी सांगा। भ्रतारासी कां गा वेडें केलें।।’’ या राजाईंच्या प्रांजळ तक्रारीमध्ये स्वर आहे करुणेचा व विठ्ठलाप्रतिच्या प्रेमादराचाही. आपल्या कर्तव्याला आपण चुकूमाकू नये यासाठी ‘देव’ नावाचे आदितत्त्व आपल्या वागण्याविहरण्यावर बारीक नजर ठेवून असते, हा भाव मनीमानसी जागता राहिला तर आपल्या हातून अयोग्य वर्तन घडणारच नाही.

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 12:06 am

Web Title: soyra loksatta advayabodh article abn 97
Next Stories
1 देवासवें व्यवहारितें..
2 शिवपण एकले नांदे
3 अवघें आपण निघोटें..
Just Now!
X