News Flash

अंकुर

प्रगाढ आशय वाक्यातील शब्दाशब्दांत ठासून ओतप्रोत भरलेला.

विनोबाजींचे बोलणे आणि लिहिणे विलक्षणच गोळीबंद. भाषा कमालीची प्रवाही. प्रगाढ आशय वाक्यातील शब्दाशब्दांत ठासून ओतप्रोत भरलेला. ‘गुरूचा शोध घ्यायचा नसतो. प्रयत्न करायचा तो आपण सत्शिष्य बनण्याचा, किंबहुना आपण उत्तम शिष्य बनण्याचा प्रयत्न करीत राहणे याच प्रक्रियेचे दुसरे नाव म्हणणे गुरूचा शोध!’ – हे विनोबाजींचे असेच एक सणसणीत कथन. गुरू आणि शिष्य यांच्या संदर्भातील आपल्या साऱ्या चौकटबद्ध पारंपरिक धारणांना सपशेल छेद देणारे. अध्यात्माचे अथवा परमार्थाचे एक वेळ राहू द्या. तो प्रांत तर फारच दूरचा. कमालीचा सूक्ष्म. परंतु आपल्या लौकिक व्यवहारातील शिक्षणाच्या प्रांतात तरी या सूत्राचा मागमूस कोठे लागतो का? शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत शिक्षण व्यवहाराच्या क्षेत्रात उदंड प्रमाणावर बरा-वाईट ऊहापोह केला जातो. परंतु विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमतांच्या संवर्धनाचे काय? मुख्यत: विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमताच जर सदोदित कुपोषित राहिलेली असेल, तर ज्ञानाचा सत्त्वांश त्यांच्या पचनी पडावा तरी कसा? शिक्षकाने वाढलेला ज्ञानरूपी खुराक पचवावयाची ताकदच विद्यार्थ्यांत नसेल, तर उभा ज्ञानव्यवहार जरत्कारूच राहावा, यात नवल ते काय? अध्यात्माच्या प्रांतात ‘गुरू’ या अधिष्ठानाचे महत्त्व व माहात्म्य ज्ञानदेव जे वर्णून सांगतात, त्यामागील रहस्य काही असेल तर हेच. अनुभूतीसंपन्न साधूंकडून प्रसंगवशात प्राप्त होणारे बोधामृत धारण करून ते पचविण्याइतपत उपासकांचा जठराग्नी सक्षम हवा की नको? नेमकी तीच क्षमता शिष्याच्या ठायी पुरेपूर निर्माण व्हावी, यासाठीच ‘गुरू’ नामक तत्त्वाची योजना परमार्थाच्या प्रांतात केलेली आहे, असा ज्ञानदेवांचा यासंदर्भातला नितळ दाखला. ‘‘गुरू घाली ज्ञानांजन। गुरू दाखवी निजधन। गुरू सौभाग्य देऊन। साधुबोध नांदवी।’’ हे ज्ञानदेवांचे मोठे मार्मिक उद्गार या संदर्भात मननीय ठरतात. साधुबोध ‘लाभणे’ आणि लाभलेला साधुबोध ‘नांदणे’ या दोहोंत महद्अंतर आहे, याकडे ज्ञानदेव इथे सूक्ष्मपणे निर्देश करतात. लग्न होऊन सासरी आलेली नववधू क्रमाक्रमाने त्या घराशी एकरूप होऊन जाते, तसाच हा प्रकार. तिच्या त्या एकरूप होण्यातून पतीच्या घरातील तिचे नांदणे प्रतीत होते. सत्पुरुषाकडून प्रसंगवशात हस्तगत झालेला बोध उभ्या अस्तित्वाचा अभिन्न अंश बनावा, हेच ज्ञानदेवांना ‘साधुबोध नांदवी’ या शब्दकळेद्वारे अभिप्रेत आहे. बोधाची नांदणूक अविच्छिन्न राहावी यासाठी अनिवार्य असणारी गुणसंपदा शिष्याच्या ठायी निर्माण करणे, हीच ज्ञानदेवांच्या लेखी गुरुकृपा! वैराग्य हे झाले त्या गुणसंपदेचे एक अंग अथवा परिमाण. निरलस आणि निरपेक्ष कर्माचरणाबद्दल परतत्त्वाने साधकाच्या ओंजळीत घातलेला तो प्रसाद. वैराग्याद्वारे आकार घेऊ लागलेली उपासकांची क्षमता, त्याच्या जीवनात आपणहून प्रविष्ट झालेले श्रीगुरूमग अधिक सुदृढ बनविण्यासंदर्भात सक्रिय बनतात, असा दाखला ज्ञानदेव देतात. चांगले दर्जेदार बियाणे कसदार जमिनीवर पडल्यानेच केवळ पीक येत नसते; त्याला जोड लागते सिंचनाची. याच न्यायाने प्रसादरूपाने पदरात पडलेले वैराग्य चिरस्थायी बनावे यासाठी त्याला जोड पुरवावी लागते आणखी एका गुणसंपदेची. ‘‘तैसा वैराग्यलाभु जाला। वरी सद्गुरूही भेटला। जीवीं अंकुरु फुटला। विवेकाचा।।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव निर्देश करतात, त्या अन्य जोडगुणाकडे – विवेकाकडे! ‘विवेकासहित वैराग्याचे बळ’ या तुकोबांच्या अपेक्षापर वचनाचा इत्यर्थ हाच!

– अभय टिळक

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:02 am

Web Title: speech and writing are wonderfully fluent and profound language akp 94
Next Stories
1 मग श्रीगुरू आपैसा भेटेचि गा…
2 ओळखण
3 पूजा
Just Now!
X