सोवळ्याचा मुख्य आणि आत्मिक संबंध आहे तो स्वच्छतेशी आणि शुद्धतेशी. अगदी शब्दकोशात डोकवले तरी ‘शुद्ध’, ‘स्वच्छ’, ‘सुंदर’ ‘मोकळा’ हेच ‘सोवळा’ या शब्दाचे अर्थ आपल्याला तिथे दिसतात. याच्या बरोबर विरुद्ध शब्द म्हणजे ओवळा. गौरी गणपतींसारख्या धार्मिंक सणांदरम्यान अथवा होमहवनांदी विधींच्या प्रसंगी रेशमी कद अगर सोवळ्याचे माहात्म्य एकदमच वाढते. पूजापाठ अथवा होमहवनास सिद्ध होत असताना संबंधित स्थळ, पूजासाहित्य आणि मुख्य म्हणजे यजमान व्यक्ती शुद्ध, स्वच्छ असावी, ही किमान भावना सोवळ्या-ओवळ्याच्या विचार व्यवस्थेमागे असावी, हे उघड आहे. इथे शुद्धता आणि स्वच्छता अपेक्षित आहे तनमनाची. बहुतेक वेळा गंमत आणि दिशाभूल होते ती नेमकी इथेच! बाह्य स्वच्छतेचा अतोनात बडिवार माजवण्याच्या नादात आरपार विसर पडून जातो अंतर्गत शुद्धीचा. झुळझुळीत, स्वच्छ सोवळ्याइतकेच आपले मन आणि बुद्धीदेखील आपण पूजापाठास प्रवर्तित होण्यापूर्वी शुद्ध बनविलेली आहे अथवा नाही, हे तपासण्याची दक्षता घेतो का आपण? सोवळ्या-ओवळ्यापायी आणि त्या विचार व्यवस्थेद्वारे व्यवहारात प्रसवणाऱ्या बाट- विटाळाच्या संकल्पनांपायी उभे जगणे गांजून गेलेले चोखोबाराय आपले लक्ष वेधतात नेमक्या याच विसंगतीकडे. सुती धोतर सोडून रेशमी कद धारण करण्याने माणूस शुद्ध बनतो हीच मुख्य प्रचंड मोठी गैरसमजूत होय. अशा वरपंगाने उलट बोकाळते ढोंग. सोवळ्यातील माणूस स्वत:ला सतत जपत राहतो ओवळ्यापासून. कारण ओवळ्याचा होतो विटाळ! म्हणजे ‘सोवळे असणे’ या संकल्पनेचा गाभाच उमगला नसेल तर त्या गोंधळातून निपजते विधि- विषेधांचे एक भलमोठे लचांड. शुद्धतेची पार वासलात लावणारे द्वंद्व प्रसवते त्यातून. वास्तविक पाहता सगळ्यांत मोठा विटाळ कोणता असेल तर तो द्वंद्वभावनेचाच! अवघा लोकव्यवहारच पुरता नासून जातो तिच्यामुळे. ज्या सगळ्यांपायी ‘स्व’ ची संकुचित भावना परिपुष्ट बनून द्वैत- द्वंद्वाचा सुकाळ होतो, त्या त्या प्रत्येक बाबीचा विटाळच मानायला हवा. जपतां मंत्रबीजे चळाचि घाली घाला। करितां दान धर्म पुढे भोगवितो फळा। सोवळे मिरवितां विधिनिषेध आगळा । आतां हेचि धणीवरीं ध्याऊं याला वो  हे निळोबारायांचे उद्गार म्हणजे रोक डी साक्षच त्या वास्तवाची. अद्वयाच्या प्रांतात सोवळ्या-ओवळ्याचा प्रश्नच मुदलातच ठरतो सपशेल अप्रस्तुत. द्वंद्व-द्वैताला ठावच नसेल तर सोवळ्या-ओवळ्याचा सवाल येतोच कोठे? ज्या आदितत्त्वाच्या विलासाद्वारे दृश्य विश्व साकारलेले आहे ते तत्त्वच स्वरूपत: निर्द्वद्व असल्याने हा प्रश्नच पुरता निघतो निकालात. त्या तत्त्वाला नाव द्या शिव, गणेश अथवा विठ्ठल,काय फरक पडतो? स्वभावत:च सोवळे असलेल्या आदितत्त्वाचे विलसन असणाऱ्या या जगात, मग ‘ओवळे’ कोणाला म्हणायचे असा प्रश्न पडतो चोखोबांना. कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा। दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा असा निर्वाळा चोखोबाराय देतात तो अद्वयाची बैठक दृढ असल्यामुळेच. विश्वात्मक रूप धारण करुन नटलेले आदितत्त्वच सोवळे असल्याने या जगात कोणी कशाचा विटाळ कशासाठी मानायचा, असा विलक्षण मूलभूत मुद्दा  कोणासी विटाळ कशाचा जाहला। मुळींचा संचला सोंवळाची  अशा मोठय़ा मार्मिक शब्दांत उपस्थित करतात चोखोबाराय. ‘देह’ नामक उपाधी हाच सर्वात मूलभूत विटाळ असा एक युक्तिवादआहे यावर. मात्र त्यांवरही बिनतोड उत्तर तयार ठेवतात चोखोबांच्या धर्मपत्नी – सोयराबाई!

– अभय टिळक

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

agtilak@gmail.com