बदलत्या युगाबरोबर नवीन युगधर्म साकारतो. नवयुगाची मूल्यचौकट निराळी असावी, हेही स्वाभाविकच. पूर्वकालीन घटनांचे बदललेल्या मूल्यचौकटीच्या आधारे केलेले मूल्यमापनही निराळेच उतरावे, हे ओघानेच येते. एकलव्याची कथाही या नियमाला अपवाद का व कशी ठरावी? एकलव्य आणि द्रोणाचार्य या गुरू-शिष्यांच्या परस्पर व्यवहाराची चिकित्सा पिढीगणिक निरनिराळ्या प्रकारेच केली जाईल, हे मान्यच करायला हवे. गुरूभक्तीखेरीज एकलव्याच्या व्यक्तिमत्त्वातील त्यामानाने चट्दिशी ध्यानात न येणारा अन्य एक देदीप्यमान गुण ठसठशीतपणे आपल्या पुढ्यात मांडतात ज्ञानदेव. ‘‘श्रीगुरुचे नि नांवें माती। डोंगरीं जयापासीं होती। तेणें कोळियें त्रिजगतीं। येकवद केली।’’ – ही ‘ज्ञानदेवी’च्या १८ व्या अध्यायातील ओवी या संदर्भात मननीय ठरते. देहधारी गुरूंचे मार्गदर्शन लाभणे शक्य नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर द्रोणाचार्यांचा पुतळा स्थापन करून त्याच्या साक्षीने एकलव्याने एकाकी साधना करून धनुर्विद्येमध्ये अतुल नैपुण्य प्राप्त केले. त्याचा निर्देश ज्ञानदेव इथे करतात. ‘येकवद’ म्हणजे दवंडी अथवा डिंडिम. गुरूभक्तीपेक्षाही ज्ञानदेवांचा कटाक्ष या ठिकाणी दिसतो तो एकलव्याच्या दृढ आत्मनिर्भरतेवर. मानवी गुरूच्या अनुपलब्धतेचा अडथळा व त्या समस्येचा बागुलबोवा नाही उभा केला एकलव्याने. त्याने बनविले स्वत:ला स्वयंपूर्ण! त्या स्वयंपूर्ण बाण्याचाच डिंडिम महाभारताच्या काळापासून त्रैलोक्यात आजतागायत दुमदुमतो आहे, हेच ज्ञानदेव मोठ्या गौरवाने नमूद करतात. भागवत धर्मविचाराचा पीळ व अद्वयदर्शनाचे मर्म आकळलेली व्यक्ती आपले जीवन कशी स्वयंपूर्ण बनवते, याचा दाखला ज्ञानदेव आपल्या पुढ्यात मांडतात. आध्यात्मिक असणे, पारमार्थिक असणे म्हणजे स्वतंत्र, स्वायत्त, स्वयंपूर्ण असणे, हेच या परंपरेस आरंभापासून अभिप्रेत आहे. ‘‘स्वातंत्र्य हा चि मोक्षु : परतंत्र तो बंधू गा :’’ या सूत्राच्या माध्यमातून महात्मा चक्रधरस्वामी त्याच सारतत्त्वाचा उद्घोष करता नाहीत का! मानवी लोकव्यवहाराचा पोत सुधारतो स्वयंपूर्णतेच्या पाठपुराव्यानेच. कारण सोपे आहे. परावलंबनाद्वारे वाव मिळतो फसवणुकीला आणि पिळवणुकीला. प्रयत्नांच्या पराकाष्ठेनेच स्वयंपूर्णता प्राप्त होते. त्यासाठी ज्याच्या-त्यालाच खस्ता खाव्या लागतात. दुसऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आपण आत्मनिर्भर होत नसतो. ‘‘अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक। तरि कां हे पाक घरोघरी।’’ असे तुकोबा जे म्हणतात ते काय उगीच! शेजारच्या घरातून दरवळणाऱ्या अन्नपूर्णेमुळे पोटे आपसूकच भरली असती तर आपापल्या घरातील चुलीमध्ये विस्तव सारण्याचा खटाटोप कोण करत बसले असते? भिक्षापात्र अवलंबणाऱ्या लाजिरवाण्या जगण्याचा उपहास तुकोबा करतात तो त्या पायीच. ‘‘जगा घालावें साकडें। दीन होऊनी बापुडें। हें चि अभाग्य रोकडें। मूळ आणि विश्वास।’’ हे महाराजांचे रोखठोक उद्गार स्वयंपूर्ण जीवनाचाच आग्रह धरतात. साधनापर्वातील पहिली संपूर्ण दहा वर्षे तुकोबांनी एकलव्य-साधनाच केली. ‘‘विष खावें ग्रासोग्रासीं। धन्य तो चि एक सोसी।’’ असे त्या सायासांचे वर्णन खुद्द तुकोबाच करतात. पारलौकिक लाभासाठीच नव्हे, तर लौकिक जीवनातही काही साध्य करायचे म्हटले तरी आत्मनिर्भरतेची कास धरावीच लागते. किंमत मोजण्याखेरीज पर्यायच नसतो अन्य काही. ‘‘तुका म्हणे न वेंचतां मोक्ष। तो हा यासि महाग विठ्ठल।’’ असे नि:संदिग्धपणे तुकोबा म्हणूनच बजावतात. – अभय टिळक

agtilak@gmail.com