मोरारजी देसाई यांचे सरकार असताना आपल्या सासूबाई इंदिरा गांधी यांना जे जमले ते आपणही करू असे सोनिया गांधी यांना वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. इतिहासाची अशी पुनरावृत्ती होत नाही. झालीच तर ती शोकांतिका अथवा फार्स ठरते.
अलीकडे तुरुंगवास झाल्यास नेत्यास हायसे वाटते, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यास सत्ताधाऱ्यांस कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळते वा मारहाण झाल्यावर पत्रकारांस धन्यता लाभते. परंतु यांतून या व्यावसायिकांची तसेच समाजाचीही वाढती रोगट मानसिकताच समोर येत असून ही बाब काळजी वाटावी अशी आहे. शनिवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि चि. राहुलबाबा गांधी या मायलेकांना न्यायालयात हजर राहावे लागणार या कल्पनेनेच काँग्रेसजनांना ज्या पद्धतीने हर्षांच्या उकळ्या फुटत होत्या त्यातून याच मानसिकतेचे दर्शन घडले. या गांधी मायलेकांच्या बरोबरीने पक्षश्रेष्ठींच्या दरबारातील हुजरे यापेक्षा अधिक कोणतीही औकात असू शकत नाही असे मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस यांच्याखेरीज एके काळी एका प्रतिष्ठित साप्ताहिकाचे संपादक असलेले सुमन दुबे आणि भारतातील दूरसंचार क्रांतीचे प्रणेते सॅम पित्रोदा हेदेखील या खटल्यात सहआरोपी आहेत. परंतु काँग्रेसजनांना त्यांचे काय होते याच्याशी काहीही देणेघेणे नाही. काँग्रेसजनांच्या आशाआकांक्षाचे केंद्रिबदू आहेत सोनिया आणि चि. राहुलबाबा. त्याचमुळे गेल्या आठवडय़ात गांधी मायलेकांना न्यायालयात जातीने हजर राहावे लागेल हे स्पष्ट झाल्यापासून काँग्रेसजन मोठय़ा आशेने या सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून होते. त्यातून देशभरातील काँग्रेसजनांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय आणि सोनिया, चि. राहुलबाबा यांचे निवासस्थान येथे मोठय़ा उत्साहाने गर्दी करून शनिवारास नाकर्त्यांचा वार का म्हणतात याचे उत्तर दिले. गांधी मायलेक न्यायालयात जाण्यास निघाल्यापासून तर काँग्रेसजनांची उतावीळता सर्व टीव्ही चॅनेलांच्या पडद्यातदेखील मावेना. आपला भाऊ जणू काही कोणा रणांगणावर युद्धभूमी गाजवण्यास निघालेला आहे अशा थाटात प्रियंका गांधी वढेरा या चि. राहुलबाबा यांच्यामागे सतत उभ्या होत्या. महाभारतातील विदुराप्रमाणे आपली कारकीर्द संपवून निवृत्त झालेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हेदेखील गांधी मायलेकांच्या समवेत होते. युद्धभूमीवर निघालेल्या वीरांस निरोप देताना हातावर दहीसाखर ठेवण्याची परंपरा आहे. न्यायालयात निघालेल्या सोनिया आणि चि. राहुलबाबा यांच्याही हातावर शीला कौल आत्यांनी ही दहीसाखर ठेवली किंवा काय, हे कळावयास मार्ग नाही.
वास्तविक सोनिया वा चि. राहुलबाबा यांनी काही कोणती राजकीय लढाई जिंकली वा कोणा अन्यायास यशस्वी वाचा फोडली असे झालेले नाही. तसेच एखाद्या मुद्दय़ाच्या निमित्ताने वैयक्तिक नतिकता सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली होती असे म्हणावे तर तेही नाही. हे सगळे प्रकरण आहे हे गांधी मायलेकांनी त्यांच्या पूर्वजांनी सुरू केलेल्या नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राची संपत्ती हडप केल्याच्या आरोपाबाबत. या आरोपाची अंतिम सत्यासत्यता आणि त्यातील गांधी मायलेकांची भूमिका अद्याप स्पष्ट व्हावयाची आहे. परंतु म्हणून या प्रकरणात या दोघांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र बहाल करावे अशीदेखील परिस्थिती नाही. दोघांनी नॅशनल हेराल्डची कोटय़वधींची मालमत्ता क्षुद्र रकमेच्या बदल्यात एका नव्या कंपनीकडे हस्तांतरित केली. या नव्या कंपनीचे नियंत्रण हे गांधी मायलेकांकडे आहे आणि तिची मालकीदेखील या दोघांच्याच हाती आहे. ही बाब प्राय: मान्य झाली आहे. तेव्हा जे काही झाले तो हेतुत: केलेला गरव्यवहार होता असा आरोप असून त्याचा निकाल न्यायालयात लागेल. तसा तो लागावा यासाठी उचापतखोर सुब्रमण्यम स्वामी यांनी जंग जंग पछाडले आहे. अलीकडेच या स्वामी यांनी सत्ताधारी भाजपत प्रवेश करून त्या पक्षातील स्वामी, साधुसाध्वींत आपली भर घातली. तेव्हापासून हा खटला जणू भाजप आणि गांधी पितापुत्र यांच्यातीलच आहे, असे भासवले जात आहे. त्यात तथ्य नाही. गांधी मायलेकांना जमेल तितके उघडे पाडणे हा एककल्ली स्वामी यांचा एकपात्री कार्यक्रम आहे. त्यांचा लौकिक पाहता त्यावर अविश्वास ठेवावा असे काही नाही. परंतु या स्वामी यांचा हा एकपात्री कार्यक्रम जणू सत्ताधारी भाजप आणि नरेंद्र मोदी सरकार यांची बहुपात्री योजना आहे असे दाखवण्याचा काँग्रेसजनांचा प्रयत्न आहे. तो अगदीच हास्यास्पद ठरतो. याचे कारण तसे करण्याची मोदी सरकारला सध्या काहीही गरज नाही. राज्यसभेत काही विधेयक अडवण्याखेरीज काँग्रेस सत्ताधारी मोदी सरकारचे तूर्त तरी काहीही वाकडे करू शकत नाही. आणि त्यांच्या या गळा काढण्यास बळी पडून समजा सत्ताधारी आघाडीतील एखाददुसरा पक्ष गांधी मायलेकांचे अश्रू पुसण्याच्या मिषाने भाजपस सोडून गेला तरीही मोदी सरकारचे काहीही वाकडे होणारे नाही. केवळ स्वबळावर सरकार टिकविण्यास आवश्यक तितके संख्याबळ भाजपकडे आहे. तेव्हा काँग्रेसला संकटात आणण्यासाठी म्हणून हेराल्ड प्रकरणाचा बागुलबुवा उभा करण्याची भाजपला आवश्यकताच काय? हे प्रकरण आणि अंगभूत निष्क्रियता या मुद्दय़ांवर काँग्रेस पक्ष स्वत:समोर स्वत:हूनच सहज अडचणी निर्माण करू शकतो. काँग्रेसच्या या स्वनाशी प्रवृत्तीवर आणि क्षमतेवर शंका घेण्याचे काहीही कारण नाही. इतिहासात या पक्षाने ही आपली क्षमता अनेकदा सिद्ध केली आहे. तसेच वर्तमानात काही वेगळे असेल असे मानावे असे काही या पक्षाने केलेले नाही. तेव्हा आपल्या ऐतिहासिक पापांसाठी सत्ताधारी भाजपस बोल लावणे ही गांधी मायलेकांची कृती केविलवाणी ठरते.
चतुर काँग्रेसजनांनाही अंतर्यामी असेच वाटत असेल, याबाबत काही शंका नाही. परंतु ते अगतिक आहेत. कारण गांधी घराण्यातील कोणी ‘त्याग’ केल्याखेरीज आपणास काहीही भवितव्य नाही, हे काँग्रेसजन जाणतात. मोदी सरकारला दीड वर्ष होत असताना या हेराल्ड प्रकरणाच्या निमित्ताने असा ‘त्याग’ करण्याची गांधी कुटुंबीयांना मिळालेली संधी हा जणू आपला उत्कर्षिबदू आहे, असे काँग्रेसजनांना वाटले ते याचमुळे. अशा वाटण्यातील दुर्दैवी योगायोग म्हणजे हे फक्त काँग्रेसजनांनाच वाटले असे नाही तर खुद्द गांधी मायलेकांचीदेखील हीच भावना झाली. त्याचमुळे सोनिया गांधी यांनी आपल्या सासूबाईंच्या आठवणी जाग्या केल्या आणि चि. राहुलबाबा यांनी अन्यायाविरोधात गांधी कुटुंबीय कसे उभे ठाकते याची आरोळी ठोकण्याचा प्रयत्न केला. तो काँग्रेसजनांच्या अंगाशीच येण्याची शक्यता अधिक. याचे कारण इंदिरा गांधी यांच्याविरोधात तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारने छेडलेले सूडनाटय़ आणि विद्यमान राजकीय परिस्थिती यांत मूलभूत फरक आहे. तो म्हणजे मोरारजी सरकारप्रमाणे या वेळी गांधी मायलेकांच्या विरोधात सरकारने थेट तरी काहीही केलेले नाही. आणि दुसरे असे की तत्कालीन मोरारजी सरकार ही अनेक पक्षीय खिचडी होती. मोदी सरकार तसे नाही. तसेच मोरारजी देसाई सरकारप्रमाणे दुहेरी सदस्यत्व आदी मुद्दय़ांची डोकेदुखी मोदी सरकारला नाही. तेव्हा सासूबाई इंदिरा गांधी यांना जे जमले ते आपणही करू असे सोनिया गांधी यांना वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. इतिहासाची अशी पुनरावृत्ती होत नाही. झालीच तर ती शोकांतिका अथवा फार्स ठरते.
काँग्रेसच्या बाबतीत ती दोनही ठरण्याची शक्यता अधिक. कारण पराभव झाल्यानंतर अठरा महिने उलटून गेल्यानंतरही या पक्षासमोर काहीही कार्यक्रम नाही. सत्ताधाऱ्यांच्या चुकांची वाट पाहत राहणे हा विरोधी पक्षाचा प्रमुख.. एकमेव.. कार्यक्रम असू शकत नाही. याचे भान नसलेल्या काँग्रेसने त्याचमुळे गांधी मायलेकांचे न्यायालयी जाणे उत्साहात साजरे केले. या जामिनोत्सवातून त्या पक्षाची राजकीय दिवाळखोरीच काय ती दिसून आली. हा पक्ष असाच कार्यक्रमशून्य राहिला तर धोरणलकव्याच्या पूर्वखुणा दिसत असूनही मोदी सरकार काँग्रेसच्या तुलनेत आश्वासक वाटत राहील.