‘राजकारण करू नका’ असे आपल्याला सांगणारे सत्ताकारणी हे खरे तर, आपल्या प्रश्नांपासून त्यांचा स्वत:चा बचाव करीत असतात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राजकारण बहुत करावे’ हे समर्थवचन. तसे समर्थानी सांगितले नसते, तरी राजकारण करणे का कोणी सोडले असते? ते तर पाचवीलाच पुजलेले असते आपल्या. जगात पाऊल ठेवल्याबद्दल एकदा टँहॅ फोडून झाल्यानंतर मनुष्याच्या पिल्लास आपोआपच ही समज येत असावी, की येथे जगावयाचे असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नाही. ती समज आली की त्याचे जाणता-अजाणता जे सुरू असते ते राजकारणच. कळपात आपले अस्तित्व टिकविणे ही प्रत्येक प्राणिमात्राची स्वाभाविक प्रेरणा. त्यासाठी जे केले जाते ते राजकारण. वर्चस्वसंपादन हा त्यापुढचा भाग. तत्पूर्वी टिकणे महत्त्वाचे. त्यासाठीच आपल्या सर्वाचे राजकारण सुरू असते. एकदा टिकणे साधले की मग पुढे सत्ता, अधिकार यांचा ओढ निर्माण होते. कुटुंबात, कचेरीत, मित्रांच्या टोळक्यात, व्यवसायात आपलेच नाणे चालावे अशी इच्छा निर्माण होते मनात. त्यासाठी जमेल तसे प्रयत्न सुरू होतात. परंतु त्यातील मौज अशी, की त्या प्रयत्नांना कोणी राजकारणाचे नाव देत नाही. ‘राजकारण बहुत करावे, परंतु कळोच नेदावे’ हा समर्थउपदेश. तो याबाबतीत सारेच अमलात आणतात. किंबहुना अनेकांचा असाच भ्रम असतो, की आपण कधीही राजकारण करीत नाही. अनेक जण वर नाक करून तसे म्हणताना दिसतात. वस्तुत: हे आढय़ताखोर विधान म्हणजे राजकारणात अपयशी ठरल्याचा कबुलीजबाबच. त्यापरते त्यास मूल्य नाही. कारण आपण राजकारण करीत नाही या विधानाचा भावार्थ हाच असतो, की सत्तास्पर्धेत जिंकण्याचे कर्तृत्व आपल्यात नाही. तेथील अतुर्बलींपुढे आपले राजकारण कमी पडते. असे विधान केले जाते. याचे दुसरे कारण म्हणजे राजकारण या शब्दाचा आपण घेतलेला संकुचित अर्थ. तो अर्थ लक्षात घेतला, की मग ‘याचे राजकारण करू नका, त्याचे राजकारण करू नका’ अशा सल्ल्यांमागील राजकारणाचा उलगडा होईल.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A rape is a rape there should be no politics over issue
First published on: 21-04-2018 at 03:42 IST