द्वेषमूलक ‘क्रिया-प्रतिक्रिया-क्रिया’ ही साखळी मोडण्याच्या प्रक्रियेत साध्या, दिखाऊ वाटणाऱ्या बाबींनाही महत्त्व असते, हे अहमदच्या बाबतीत समाजमाध्यम-कंपन्यांनी आणि ओबामांनीही ओळखले..

अहमद मोहम्मद, उमर १४, रा. डलास, अमेरिका, हा बॉम्ब बनविल्याच्या आरोपाखालून बाइज्जत सुटला आहे. तो दहशतवादी नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याची सुटका झाली असून, त्याच्यावर पोलिसांनी केलेल्या या अन्यायाचे परिमार्जन म्हणून जणू आता त्याला अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये बोलावले आहे. गुगलने त्याला आपल्या विज्ञान जत्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. रेडिट, ट्विटर या कंपन्यांनी त्याला प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्याचे ठरविले आहे, तर फेसबुकचे निर्माते मार्क झकरबर्ग यांनी त्याला आपल्या कंपनीच्या मुख्यालयास भेट देण्यासाठी पाचारण केले आहे. समाजमाध्यमांनी त्याच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यातून निर्माण झालेल्या वावटळीने अखेर त्याच्यावरील आरोप धुऊन निघाले. एरव्ही आयुष्यभर त्याला कपाळावरचा हा शिक्का वागवतच फिरावे लागले असते. आता ते होणार नाही, परंतु या घटनेने त्याच्या मनावर झालेल्या आघातांचे काय हा प्रश्न मात्र कायमचा तसाच राहील. परंतु प्रश्न केवळ त्याच्या मनावरील आघातांचाच नाही, तो इतरांच्या मनोवृत्तीचाही आहे. ‘राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लीम असूनही राष्ट्रवादी होते,’ असे भारताचे सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणतात, तेव्हा हा प्रश्न, ही मनोवृत्ती किती व्यापक आणि खोल आहे याची जाणीव होते. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे रिपब्लिकन नेते पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी जिवाचे रान करीत आहेत. त्यानिमित्ताने अमेरिकेतील नवनाझी विचारांनी चांगलीच उचल खाल्लेली दिसत आहे. तशात ‘आयसिस’ नावाचा नवा भस्मासुर आता युरोपच्या डोक्यावरही हात ठेवू पाहत आहे. आज युरोपातील विविध देशांच्या दारांवर उभे असलेले निर्वासितांचे जथ्थे ही सीरिया, इराक, लिबिया या देशांतील युद्धाची आडपैदास आहे. त्या युद्धाला अमेरिकेने कसे खतपाणी घातले याच्या खोलात जाण्याची ही वेळ नाही. मात्र त्या निर्वासितांमुळे युरोप आणि अमेरिकेतील वर्ण-वंश-धर्मवाद पुन्हा डहुळून उफाळला आहे. अहमदला त्याची जाणीवही नसेल, परंतु त्याला चटका बसला तो त्याचाच. एरव्ही त्याची चूक ती काय होती?
किडकिडीत शरीरयष्टी, डोळ्यांना मोठय़ा काचांचा चष्मा, एरव्ही कोणत्याही वर्गात पहिल्या बाकावर दिसणाऱ्या हुशार मुलांपैकी एक असा हा मुलगा. टेक्सास प्रांतातील डलासच्या आयर्विन नामक एका उपनगरातील शाळेत शिकणारा. संगणक, तंत्रज्ञान या विषयात त्याला चांगलीच रुची. त्याने स्वत घरी खपून एक डिजिटल घडय़ाळ तयार केले. आपल्या शिक्षकांना ते दाखवायचे आणि त्यांची शाबासकीची थाप मिळवायची या विचाराने तो ते शाळेत घेऊन गेला. पण वर्गात शिक्षक शिकवत असताना त्या यंत्रातून बारकासा आवाज आला. शिक्षकांनी त्याला विचारले. त्याने ते घडय़ाळ दाखवले. त्यांना वाटले हा बॉम्बच. खरा किंवा बनावट. शिक्षकांनी शाळेच्या प्रशासनाला ते सांगितले. शाळेने पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्याला वर्गातून उचलले. शाळेतच त्याची दीड तास कसून चौकशी केली आणि त्याला बेडय़ा घालून गजाआड टाकले. अमेरिकी शाळांतील हिंसाचाराच्या घटना पाहता शाळा प्रशासनाची वा पोलिसांची ही कृती वावगी नव्हती असे अनेकांचे म्हणणे आहे. पण तो सगळा घटनाक्रम नीट समजून घेतला की लक्षात येते की, त्याला बॉम्ब बनविल्याच्या आरोपावरून अटक झालेलीच नाही. तो बॉम्ब आहे असा संशय शाळेला आला असता, तर अशा वेळी करायच्या सर्व कवायती शाळेने केल्या असत्या. पहिल्यांदा शाळा रिकामी केली असती. तो बॉम्ब अहमदजवळच राहू दिला नसता. तसे काहीच झाले नव्हते. बाकीचे जे झाले ते केवळ अहमदच्या नावामुळे झाले. त्याच्या वर्णामुळे झाले आणि त्याहूनही, धर्मामुळे झाले.
एक व्यक्ती म्हणून समोरच्या माणसाला समजून घेणे ही तशी बुद्धीला ताण देणारीच घटना असते. त्याऐवजी माणसांच्या जुडय़ा बांधून त्यांचा एकत्रित विचार करणे सोपे असते. प्रत्येक धर्म, जात, वंश यांच्यावर ठोकळेबाज शिक्के मारणे ही म्हणूनच एक लोकप्रिय विचारपद्धत आहे. अहमद बळी पडला तो त्याला. प्रत्येक मुस्लिमाकडे तो दहशतवादीच आहे अशा पद्धतीने पाहणे हे चूकच. परंतु ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर चेतविण्यात आलेल्या कडव्या राष्ट्रवादी भावनेने अनेक अमेरिकी नागरिकांची ही समज हरवली. मुस्लिमांचा जिहाद आणि ख्रिश्चनांची क्रूसेड्स यांची इतिहास परंपरा असलेला हा समाज आहे हे लक्षात घेतले की अशी समज हरवणे हे किती सहजसोपे आहे हे लक्षात यावे. आणि हे केवळ एका बाजूनेच होते असे मानण्याचेही काही कारण नाही. मुस्लीम समाजातील अनेकांना आजही तलवारीच्या जोरावर जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पडतच असतात. मुस्लीम ब्रदरहूडपासून आजच्या इस्लामी खिलाफतीपर्यंतच्या विविध अतिरेकी, दहशतवादी संघटनाच नव्हे, तर मुस्लीम समाजातील फतवेबाज मुल्लामौलवींनाही हे जग मुस्लीम करून सोडायचे आहे. पुन्हा मुस्लीम हेही एक राष्ट्र म्हणवून स्वतला मिरवत असले, तरी त्यांच्यातही तीव्र पंथभेद आहेत आणि त्यांतील दहशतवादी एकमेकांना गोळ्या घालत असतात. अशा शक्तींना निपटून काढणे हे सर्वच नागरी समाजांचे कर्तव्य ठरते. मात्र मुस्लीम समाजात अशा दहशतवादी संघटना आहेत म्हणून प्रत्येक मुस्लिमाकडे संशयाने पाहणे हे आपल्या समाजाच्या एकसंधतेवर आपलाच विश्वास नसल्यासारखे आहे. यावर ‘प्रत्येक मुस्लीम हा दहशतवादी नसतो, परंतु प्रत्येक दहशतवादी हा मुस्लीमच कसा असतो’, असा एक प्रश्न केला जातो व हा अत्यंत बिनतोड युक्तिवाद असल्यासारखी मांडीवर थाप मारली जाते. खरे तर त्यात बिनतोड काहीही नाही. हिंदू, मुस्लीम, इसाई अशा सर्वच धर्मात असे ‘मारो काटो का पंथ’ आहेत. फक्त लेबल लावायची वेळ येते तेव्हा बिगरमुस्लिमांना ते लावायचे नसते, असा जणू नियम झाला आहे. वस्तुत तेही चूक आणि हेही गैर. परंतु धार्मिक द्वेषाची इंगळी डसली की माणसांचे मेंदू काम करेनासे होतात आणि मग शिखांच्या दाढीमध्ये ओसामा बिन लादेन दिसू लागतो. अमेरिकेत गेल्या काही वर्षांत अरब वा मुसलमान समजून शिखांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे हा या बौद्धिक अंधत्वाचाच परिणाम. अहमदच्या अटकेच्या निमित्ताने हे अंधत्व अधिक उजळून निघाले इतकेच.
मात्र त्याचबरोबर हे विद्वेषाचे धर्मकारण अमान्य असणाऱ्यांची अजूनही बहुसंख्या आहे हेही या निमित्ताने समोर आले. ओबामा यांनी त्या मुलाला व्हाइट हाऊसमध्ये पाचारण करणे या गोष्टीचे तात्पर्य हे आहे. अशा गोष्टी म्हटले तर प्रतीकात्मकच. इफ्तारच्या मेजवानीत फरच्या टोप्या घालून सामील होणे किंवा ‘व्हाइट हाऊस’मध्ये दिवाळी साजरी करणे यासारखेच हे. परंतु त्यांतून जो सहिष्णुतेचा संदेश दिला जातो तो अधिक महत्त्वाचा असतो. आजच्या धार्मिक संघर्षांच्या काळात या बाबी किरकोळ वाटतीलही. धार्मिक कट्टरतावादाला मूठमाती हाच त्यावरचा जालीम उपाय आहे. परंतु द्वेषमूलक ‘क्रिया-प्रतिक्रिया-क्रिया’ ही साखळी मोडण्याच्या प्रक्रियेत अशा साध्या दिखाऊ बाबींनाही महत्त्व असते. ओबामाच नव्हे तर तेथील उद्योजकांनीही हे ओळखले ते बरेच झाले. प्रत्येक अहमदला प्रत्येक वेळी ‘माझे नाव अहमद आहे, पण मी दहशतवादी नाही’ असे सांगण्याची आवश्यकता नाही हेच अमेरिकेतील बहुसंख्यांची ही कृती दाखवून देते. तुमचा वर्ण, वंश, धर्म कोणताही असला, तरी तुमच्या काळाबरोबर चालणाऱ्या घडय़ाळांमधूनच अमेरिकेचा भविष्यकाळ घडणार, हेच या सकारात्मक कृतीचे सांगणे आहे.