News Flash

सभ्यतेचा विजय

अमेरिकेतील अलाबामा या एका किरकोळ राज्यातील निवडणुकीचे एरवी महत्त्व ते काय?

अमेरिकेतील कर्मठ राज्य मानले जाणाऱ्या अलाबामातील पराभवाने ट्रम्पशाहीला लागलेली ओहोटी पुढल्या काळात सिनेटमध्येही दिसू शकते..

अमेरिकेतील अलाबामा या एका किरकोळ राज्यातील निवडणुकीचे एरवी महत्त्व ते काय? परंतु तरीही विद्यमान परिस्थितीत जगातील सर्व महत्त्वाच्या माध्यमांची, वर्तमानपत्रांची नजर त्या निवडणुकीकडे होती. या सर्वांनी निकालानंतर सुस्कारा सोडला असेल. याचे कारण या निवडणुकीत कोणी एक जिंकणे वा हरणे इतकाच विषय नव्हता. तर दुष्टबुद्धी सनातनी विरुद्ध सुष्ट मानवी मूल्ये, कर्मठ, कालबाह्य विरुद्ध आधुनिक कालसुसंगतता असा हा लढा होता. अमेरिकेत गतसाली राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत जे काही झाले आणि डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यानंतर जगातच सर्वत्र कर्मठतेचा प्रभाव वाढून सनातनी शिरजोर होऊ लागले. या काळात ठिकठिकाणच्या निवडणुकांतही हीच विचारसरणी विजयी होताना दिसली. एकटय़ा फ्रान्स वा जर्मनी यांचाच काय तो अपवाद. अशा वेळी अलाबामातील गव्हर्नरपदाच्या निवडणुकीस अतोनात महत्त्व आले. रिपब्लिकन पक्षाचे रॉय मूर विरुद्ध डेमोक्रॅट पक्षाचे डग जोन्स यांच्यात ही निवडणूक होती. तीत मूर यांचा पराभव झाला.

हा केवळ एका पक्षाच्या एका उमेदवाराचा पराभव नाही. ‘‘महिलांना मतदानाचा हक्क हवाच कशाला’’, ‘‘महिलांचे स्थान मुदपाकखान्यात होते तोपर्यंतच जग सुखी होते’’, ‘‘महिलांचा जनजीवनात सहभाग वाढला आणि विश्वाचा सामाजिक स्तर ढासळू लागला’’, ‘‘अमेरिकेत गुलामी प्रथा होती तोपर्यंत हा देश आनंदी होता’’, ‘‘या देशात पुन्हा एकदा गुलामी प्रथेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे’’, ‘‘इस्लाम धर्म हा मानवजातीला दिला गेलेला एक शाप आहे..’’ असे अन्य अनेक विधानांचे दाखले देता येतील. ही कोणा बेजबाबदाराची विधाने नाहीत. तर या निवडणुकीत अलाबामा राज्याचे मुख्यमंत्रिपदसदृश नेतृत्व करू पाहणाऱ्या मूर यांची आहेत आणि ती मांडण्यात काही कमीपणा आहे असेही त्यांना वाटत नाही. केवळ याचसाठी मूर यांचा पराभव व्हायला हवा होता असे नाही. तर त्यांच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्यावरचे लैंगिक अत्याचारांचे आरोप. अमेरिकेत सध्या उच्चभ्रूंच्या लैंगिक विकृतीसंदर्भात बरेच काही प्रकाशात येऊ लागले आहे. त्यात राजकारणीही अपवाद नाहीत. अशातील अग्रणी दोन. एक खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरे हे मूर. लैंगिकतेच्याबाबत हे मूर आपल्या अध्यक्षांनाही मागे टाकतील असा त्यांचा लौकिक. म्हणजे शारीरसुखासाठी ते केवळ महिलांतच रस घेत होते असे नाही. तर कोवळी बालकेही त्यांच्या विकृतीत चिरडली गेल्याचे पुरावे समोर आले. परंतु कहर म्हणजे तरीही त्यांना ट्रम्प यांनी उमेदवारी दिली. त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातील अनेकांनी मूर यांच्या उमेदवारीविरोधात बंडाचा झेंडा उभारला होता. इतकेच काय त्यांची कन्या इव्हान्का हिनेही आपल्या वडिलांच्या राजकीय निवडबुद्धीबाबत नाराजी व्यक्त केली होती. लहान मुलांवर असे अत्याचार करणाऱ्यांना फक्त नरकात स्थान असते अशा सौम्य शब्दांत ट्रम्पकन्या इव्हान्काने मूर यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. तरीही ट्रम्प बधले नाहीत. त्यांच्या मते मूर यांच्याविरोधात हे सारे कुभांड रचले गेले आणि ते जितके वाईट रंगवले जातात तितके ते तसे नाहीत.

परंतु अलाबामातील नागरिकांनी ट्रम्प आणि मूर यांच्यावर काडीचाही विश्वास दाखवला नाही आणि त्यांना पराभूत केले, हे अमेरिकेचे सुदैव. या निवडणुकीचा निकाल सर्वार्थाने ऐतिहासिक आहे. याचे कारण अलाबामा हे अमेरिकेतील कर्मठातील कर्मठ राज्य. गेल्या निवडणुकीत या राज्याने ट्रम्प यांना भरभरून मते दिली. ते साहजिकही होते. ट्रम्प हे अमेरिकेतील अशा धार्मिक कर्मठांचे प्रतिनिधित्व करतात. तेव्हा त्यांच्या मागे अलाबामा उभे राहिले यात नवल नाही. इतकेच काय परंतु गेली तब्बल २५ वर्षे या राज्याने कधी डेमोक्रॅट निवडून आलेला पाहिला नाही. म्हणजे हे राज्य पारंपरिक रिपब्लिकनांचे. तरीही या निवडणुकीत अलाबामाने ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्ष यांना साथ दिली नाही, हे विशेष. ट्रम्प यांचे तितकेच मागास सहकारी स्टिव्ह बेनन यांनी या निवडणुकीसाठी जिवाचे रान केले. बेनन हे मागासमतांबाबत ट्रम्प यांच्याशी स्पर्धा करू शकतील, असे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मूर यांचा विजय व्हावा असे वाटत होते. तसे घडले नाही. वास्तविक अलाबामातील रिपब्लिकन नेत्यांनीही बेनन यांच्या हडेलहप्पी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यातूनच त्यातील काहींनी मूर यांच्या उमेदवारीविरोधात भूमिका घेतली. पण ट्रम्प यांना स्वतच्या लोकप्रियतेवर भलताच विश्वास होता. आपल्या प्रचाराने आपण आपल्या पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांना सहज धूळ चारू शकतो, याची त्यांना भलतीच खात्री होती. ती किती अस्थानी आणि अनाठायी होती हे या निवडणुकीने दाखवून दिले. त्यानंतर अमेरिकेत व्यक्त झालेली प्रतिक्रिया लक्षात घ्यायला हवी. ट्रम्प यांच्यावरून जर अलाबामाचाच विश्वास उडून जात असेल तर त्यांचे काही खरे नाही, अमेरिकेतील अत्यंत सनातनी अशा राज्यानेच जर ट्रम्प यांची साथ सोडली असेल तर अन्यत्रही त्यांचा पाठिंबा विरळ होत जाणार हे नक्की अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त झाल्या असून रिपब्लिकन पक्षातील अनेकांनी मूर यांच्या पराभवाबद्दल जाहीर आनंद व्यक्त केला आहे. तेव्हा या निकालाचे अनेक दूरगामी परिणाम संभवतात.

यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे सेनेटमध्ये आटलेले ट्रम्प यांचे मताधिक्य. आपल्या लोकसभा आणि राज्यसभा याप्रमाणे अमेरिकेतही प्रतिनिधिगृहाची दोन सदने आहेत. तेथील वरिष्ठांच्या सभागृहात ट्रम्प यांच्या मागे पुरेसे बहुमत नाही. या निवडणूक निकालाने ते आता अधिकच कमी होईल. म्हणजे ट्रम्प यांच्यामागे आता ५१ तर विरोधी डेमोक्रॅट पक्षाकडे ४९ प्रतिनिधी असतील. अमेरिकेत आपल्यासारखा पक्षादेश – म्हणजे व्हिप- असा प्रकार नाही. म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या उमेदवाराने प्रतिनिधिगृहात त्याच पक्षाची तळी उचलावी असे अजिबात बंधन नाही. तो डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूनेही प्रतिनिधिगृहात मतदान करू शकतो. याचा अर्थ यापुढे प्रत्येक निर्णयास प्रतिनिधिगृहाची मान्यता मिळवण्यासाठी ट्रम्प यांना आपल्या पक्षाच्या सर्वच्या सर्व प्रतिनिधींची मोट बांधत राहावे लागेल. अमेरिकी राजकीय व्यवस्थेत ते अशक्यप्राय आहे. म्हणजेच ट्रम्प यांना यापुढे हात बांधून काम करावे लागेल. हे इतकेच नाही. पुढील वर्षी, २०१८ साली अमेरिकी प्रतिनिधिसभेचे एकतृतीयांश सदस्य निवृत्त होत आहेत. त्यासाठी अमेरिकाभर निवडणुका होतील. अलाबामाचा कौल पाहता या निवडणुकीतही ट्रम्प यांना पराभवालाच सामोरे जावे लागेल, असे आडाखे बांधण्यास आताच सुरुवात झाली आहे. हे अंदाज चुकण्याची शक्यता कमीच.

कारण ज्या पद्धतीने ट्रम्प दिवसेंदिवस वाद ओढवून घेत आहेत ते पाहता आधीच वर्ख उडालेली त्यांची प्रतिमा यापुढील काळात अधिकच मलिन होत जाईल यात शंका नाही. या निवडणुकीच्या दरम्यानच ख्रिस्तिआन गिलिब्रान्ड या डेमोक्रॅटिक प्रतिनिधीने ट्रम्प यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर अन्य तीन महिलाही पुढे आल्या असून त्यांनी ख्रिस्तिआन यांच्याप्रमाणेच आरोप केले आहेत. या बायका पैशासाठी काहीही करतात, ही ट्रम्प यांची यावर प्रतिक्रिया. ती त्यांच्याच पक्षातील महिला व अन्य सद्गृहस्थांना आवडलेली नाही.  तेव्हा आपल्या वागणुकीत आमूलाग्र बदल केला नाही तर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला लागलेली ओहोटी काही कमी होणार नाही. या सगळ्याची लक्षणे या एका अलाबामाने दाखवून दिली. तेथे जे काही घडले ते पुरेसे सूचक ठरते. या धक्कादायक विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विजेते डेमोक्रॅट उमेदवार डग जोन्स म्हणाले : सभ्यतेचा आदर अजूनही केला जातो हे अलाबामाने दाखवून दिले आहे. म्हणून हा निकाल समजून घेणे महत्त्वाचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:48 am

Web Title: alabama election democrat jones defeats roy moore in senate upset 2
Next Stories
1 नवे निश्चलनीकरण?
2 परिघाचे केंद्र
3 कलावंत की कवडे?
Just Now!
X