News Flash

परवलीचे शब्द हरवले

काम करत असतानाच देह झिजावा, असे वाटो वा  न वाटो, तसे घडण्याच्या शक्यता बळावतील, हेही एक वास्तव आहे.

खासगी आयुष्याचा तोल सांभाळण्यासाठी जर आपण या स्पर्धेत हातपाय मारत असू, पण त्यातच सारी क्षमता खर्च होत असेल तर?

कलेसाठी झिजावे, कलेसाठीच जगावे आणि कलेसाठी जगताजगता कलेच्या मंचावरच एका परमोच्च समाधानाच्या क्षणी देहाचे कलेवर होऊन जावे, असे ज्यांच्या बाबतीत घडते, तो खरा कलावंत म्हणून त्याचे नावही अजरामर होते. कलेची काही क्षेत्रे सोडली तर अशी आसक्ती इतरत्र फारशी आढळत नाही. अनेकांच्या बाबतीत तर, नाइलाजाने एखाद्या क्षेत्रात ढकलले गेल्यानंतर गटांगळ्या खात असताना केवळ तरंगते राहण्यापुरते हातपाय मारण्याचीच उमेद शिल्लक राहिलेली दिसते. जीवघेणी गळेकापू स्पर्धा आणि त्यामध्ये तगून राहण्याची क्षमतेपलीकडची तगमग ही या अवस्थेची कारणे असावीत. आजकाल अशा स्पर्धा वेगवेगळ्या क्षेत्रांत सुरू असल्याने, या स्पर्धेत कोणते क्षेत्र पुढे राहते याचीही एक स्पर्धा सुरू असते आणि या स्पर्धेत आपले क्षेत्र पुढे राहिलेच पाहिजे यासाठी त्या त्या क्षेत्रातील प्रत्येकास कसून तयारी करावीच लागते. तसे झाले नाही, तर जे क्षेत्र मागे पडेल त्या क्षेत्रातील प्रत्येकाचीच ती हार ठरते. शर्यतीतला घोडा धाव घेण्याच्या क्षमतेचा उरला नाही, की त्याची कोणती गत होते, ते सर्वासच ठाऊक असते. या स्पर्धाच्या स्पर्धेत धाव घेणाऱ्या प्रत्येकाचीच अवस्था शर्यतीच्या मदानात धावणाऱ्या घोडय़ासारखीच असते आणि काहीही करून मदानावर उभे असणे ही त्याच्या अस्तित्वाची कसोटी असते. या कसोटीत कधी तरी धाप लागते, कधी जीवही घुसमटतो आणि नको ती स्पर्धा असेही वाटू लागते. तरीही त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. कारण तेथून बाहेर पडल्यानंतर ज्या दुसऱ्या मदानात जावे, तर तेथेही तशाच स्पर्धेचा सामना करावा लागणार असतो.

आजकाल कामाच्या प्रत्येक क्षेत्रात हीच स्थिती दिसते. या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी गतिमान ठरण्यातील गंमतही प्रत्येक जण अनुभवतो आणि स्वत:स सिद्धदेखील करतो. पण कलावंतांच्या कलेसाठी जगण्याच्या आणि कलेसाठी झिजण्याच्या आसक्तीचा लवलेश तेथे फारसा दिसत नाही. कारण या स्पर्धेत, कलेच्या उपासनेपेक्षा, व्यवहाराची किंमत मोठी आहे. अशी किंमत जोवर मिळते, तोवर या व्यवहारात स्वत:स गुरफटवून घेण्यात प्रत्येकास रस असतो. त्याहून मोठी किंमत मिळाली की पहिला व्यवहार गौण होतो आणि नव्या व्यवहाराच्या नव्या स्पर्धेत उतरण्यासाठी क्षमता बांधण्याची तयारी सुरू होते. अशा व्यवहाराची असंख्य क्षेत्रे आसपास असतात आणि प्रत्येक नव्या क्षेत्रात डोकावल्यावर, अलीबाबाच्या गुहेसारखा, हवे ते सारे देणारा खजिना तेथे खुणावतही असतो. केवळ, ‘तिळा उघड’ हा परवलीचा शब्द त्या क्षणी आठवला की त्या गुहेचे दरवाजे आपोआप खुले होतात. आत प्रवेश करणारा प्रत्येक जण त्या खजिन्यावर हुरळून जातो. असे अनेक जण एकदा त्या गुहेत शिरले, की आपल्या पदरात अधिकाधिक पडावे याची स्पर्धा सुरू होते आणि पुरेसे माप पदरात पडले की परतण्यासाठी मागे फिरताच, गुहेचे दरवाजे बंद झाल्याचे लक्षात येते. तरीही हेच वास्तव आहे आणि या वास्तवाचा सामना करताकरता अशा अनेक गुहांचे बाहेर पडण्याचे दरवाजे बंद झाले आहेत.

याचेच संकेत चीनमध्ये मिळू लागले आहेत. तेथेही एका ‘अलीबाबा’ने आपल्या गुहेचे दरवाजे खुले केले आणि आतील खजिन्याच्या मोहाने अनेकांनी त्या गुहेसमोर गर्दी केली. मग परवलीचा शब्द उच्चारला गेला आणि गुहाभर गर्दी आतमध्ये जमा होताच, गुहेचे दरवाजे बंद झाले. खजिन्याच्या झगमगाटाने हुरळून गेलेल्या गर्दीला बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याचे भान उरले नाही. इथला खजिना आपल्यासाठी आहे आणि जास्तीत जास्त वाटा आपल्यास मिळावा याकरिता स्पर्धा सुरू झाली. मग अलीबाबाने या स्पर्धेला शिस्त लावण्याचे काम हाती घेतले. आता तेथील स्पर्धेला नव्या कार्यसंस्कृतीचा मुलामा चढविण्याची तयारी सुरू झाली आहे. ‘बारा तास गुणिले सहा दिवस’ या कार्यसंस्कृतीच्या विळख्यात आपण पुरते गुरफटले जाणार आणि यातून बाहेर पडण्याचे फारसे मार्ग नाहीत, हे गुहेतील गर्दीस आता जाणवू लागले आहे. ‘सकाळी नऊ ते रात्री नऊ’ या कार्यसंस्कृतीची तेथील तरुणाईच्या विश्वास फारशी ओळख नाही. कारण, कमी वेळातही भरपूर काम करून आपली क्षमता सिद्ध करता येते हे या तरुणाईने दाखवून दिल्याने, पाच दिवसांचा आठवडा, कमीत कमी कामाच्या वेळा आणि खासगी आयुष्यासाठी भरपूर सुविधा या कार्यसंस्कृतीने या पिढीवर सुरुवातीस घातलेले गारूड उतरणार याचीच चुणूक अलीबाबाने दाखविली आहे. चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील बडी असामी म्हणून – याच क्षेत्रातील स्पर्धेसाठी सळसळणाऱ्या तरुणाईच्या जोरावर- स्वत:स सिद्ध केलेल्या जॅक मा नावाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या धनवंताच्या अलीबाबा नावाच्या बडय़ा कंपनीची ही कहाणी तरुण पिढीच्या भवितव्याची अंधूकशी चाहूल देणारी ठरणार आहे. कारण, जॅक मा याने चीनमध्ये आपल्या अलीबाबाद्वारे नव्या कार्यसंस्कृतीची बीजे रोवण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि ‘बारा तास गुणिले सहा दिवस काम’ ही आजवर केवळ चच्रेत असलेली कार्यसंस्कृती आपल्या उंबरठय़ावर येऊन ठेपल्याची जाणीव या क्षेत्रातील स्पर्धेत उतरण्यास सज्ज असलेल्या प्रत्येकास होऊ लागली आहे. आठवडय़ाचे सहा दिवस, दररोज बारा तास काम करा आणि भरपूर कमवा या सिद्धान्ताचा जॅक मा याने पुरस्कार केला आणि याची तयारी असलेल्यांनाच अलीबाबाच्या गुहेचे दरवाजे खुले राहतील असेही त्याने बजावले. तंत्रज्ञान क्षेत्रात जेवढे अधिक तास काम करावे तेवढा कंपनीचा फायदा होतो, हे सिद्ध झाले असले तरी तरुणाईचे मन मोकळे करण्याची एकमेव आभासी जागा असलेल्या समाजमाध्यमांवर मात्र या कार्यसंस्कृतीविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे झाले, तर खासगी आयुष्याला वेळ कधी देणार हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण, खासगी आयुष्याचा तोल सांभाळण्यासाठी जर आपण या स्पर्धेत हातपाय मारत असू, पण त्यातच सारी क्षमता खर्च होत असेल, तर खासगी आयुष्याचे क्षण वाटय़ालाच येणार नाहीत, या भयाण वास्तवाचे भूत आता अनेकांसमोर उभे राहिले आहे.

जॅक मा यांच्या नव्या कार्यसंस्कृतीमुळे जगभरातील कार्यसंस्कृतीचा व्यापक पट आपोआप उलगडला जाऊ लागला आहे. अनेक देशांत कमी तास काम करूनही अधिकाधिक उत्पादनक्षमता सिद्ध झाल्याची उदाहरणे समोर येऊ लागली. कार्यालयांत किती तास बसता यावर नव्हे, तर किती क्षमतेने काम करता यावर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे अवलंबून असतात, असा युक्तिवाद पुढे येऊ लागला आहे.

ते काहीही असले, तरी नव्या कार्यसंस्कृतीचा जन्म होऊ घातला, हेच वास्तव असल्याने आणि त्या कार्यसंस्कृतीस सामोरे जाण्याखेरीज पर्याय नसल्याने, ती अंगी रुजविण्याची क्षमता स्वत:च्या अंगी निर्माण करण्याचे आव्हान यापुढच्या पिढीस स्वीकारावे लागणार आहे. काम करत असतानाच देह झिजावा, असे वाटो वा  न वाटो, तसे घडण्याच्या शक्यता बळावतील, हेही एक वास्तव आहे. पण असे झालेच, तर त्याची इतिहासात नोंद होईलच, असे मात्र नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 3:46 am

Web Title: alibaba chief jack ma sparks working hours debate in china
Next Stories
1 सरकारी समाराधना
2 आज रोख.. उद्याही रोखच..!
3 कण्याची कसोटी