News Flash

तीर्थी धोंडा पाणी..

वैद्यकांनी त्या आजारांवर विजय मिळवला आणि एके काळचे जीवघेणे आजार अगदीच किरकोळ ठरू लागले.

सरकार प्रमुख वगैरेंपेक्षा खरे तर धर्ममार्तंडांनी या यात्रांच्या व्यावहारिकतेचा आता विचार करायला हवा..

तिसऱ्या जगाच्या इतिहासात देवाधर्माच्या यात्रांत जितक्यांनी प्राण गमावले तितके बळी आतापर्यंतच्या युद्धांतही गेले नसतील. तुलनाच करावयाची असेल तर आधुनिक वैद्यकाच्या जन्मापूर्वी पटकी आदी आजारांच्या साथीत माणसे अशी घाऊक प्रमाणात प्राण गमावत. वैद्यकांनी त्या आजारांवर विजय मिळवला आणि एके काळचे जीवघेणे आजार अगदीच किरकोळ ठरू लागले. त्यानंतर आता हे यात्रा/ मेळे वगैरे आले आणि माणसे पुन्हा एकगठ्ठा मरू लागली. यामागील कारणे अनेक. न आवरता येणारी गर्दी, गैरव्यवस्थापन, सामाजिक शिस्त आणि सुरक्षेचा अभाव ही प्रमुख. ती तिसऱ्या जगातील समाजजीवनात उदंड प्रमाणात दिसतात. त्यामुळे हे धर्मस्थळांचे घातपातही याच जगातील तीर्थस्थळांत घडतात. मग ते स्थळ महाराष्ट्रातील मांढरदेवी असो वा सौदी अरेबियातील मक्का/मदिना किंवा केरळातील साबरीमला असो वा अलाहाबाद वा अन्यत्र भरणारे कुंभमेळे असोत. आतापर्यंत या धर्मस्थळी असंख्यांना अकारण मोक्ष मिळाला. परंतु गेल्या दशकभरात या अनाहूत घडणाऱ्या घटनांना दहशतवादाची साथ मिळू लागली आहे. सोमवारी असेच झाले. रात्री अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत आणखी सात जणांचे प्राण गेले. इतक्या बजबजपुरीत इतक्या माणसांची गर्दी ही दहशतवाद्यांची लक्ष्य ठरू शकते याचा अंदाज बांधण्यास सुरक्षा सल्लागार वा तज्ज्ञ असण्याचीही गरज नाही. कमीत कमी श्रमांत जास्तीत जास्त जीव टिपणे हे कोणत्याही दहशतवाद्यांचे उद्दिष्ट असते. धर्मस्थळे ही या उद्दिष्टपूर्तीसाठी सहजसोपी सावजे. तरीही या यात्रा भरतात. सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले जाते. दहशतवादी हल्ले होतात. माणसे मरतात. हल्ल्याच्या गांभीर्यानुसार पंतप्रधान ते स्थानिक मुख्यमंत्री या ‘भ्याड’ (?) हल्ल्याचा निषेध करतात. संबंधित सरकारे जनतेच्या पैशातून मृतांच्या नातेवाईकांना लाखो रुपये जाहीर करतात. मग सर्व काही शांत होते. पुढच्या यात्रेत परत असे काही घडेपर्यंत.

त्यामुळे सरकार प्रमुख वगैरेंपेक्षा खरे तर धर्ममार्तंडांनी या यात्रांच्या व्यावहारिकतेचा आता विचार करायला हवा. ज्या काळात मनोरंजनाची साधने नव्हती, आयुष्यात एखादी व्यक्ती एखाद्या वेळेस फार फार तर प्रवास करीत असे, त्या काळात या यात्रांचे महत्त्व ठीक. या यात्रांच्या निमित्ताने म्हणून समाजाभिसरण होत असे. परंतु जसजशी विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली तसतशी प्रवाससाधनेही विकसित होत गेली. त्यामुळे धर्मेतर कारणांसाठीही माणसे प्रवास करू लागली. अशा वेळी केवळ धर्मकारणासाठीच प्रवास करण्याची प्रथा कमी व्हायला हवी. तसे झाले नाही. हा विरोधाभास. छपाईचे तंत्रज्ञान विकसित होण्याआधी माणसे धर्मग्रंथ मुखोद्गत करीत. परंतु छपाईचे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर त्यावर पहिले छापले गेले ते बायबल. आताही अनेक जण घरी संगणक घेतील. परंतु तो घरी आल्यावर त्याची पूजा करतील. हा विरोधाभास मानवी संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर आढळतो. कमालीचे बुद्धिमान आणि किमान बुद्धीचा अभाव अशा दोन टोकांतील अनेकांना धर्माचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. काही प्रमाणात ते क्षम्य मानता येईल. परंतु या असल्या बेशिस्त, असुरक्षित आणि अस्वच्छ यात्रांत धर्म आहे काय, याचा विचार धर्माचे नेतृत्व करणाऱ्यांकडून होणार की नाही, हा प्रश्न आहे. आताही अमरनाथ येथे जे काही घडले त्याच्या उपलब्ध तपशिलावरून दिसते ते असे की, ज्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्या बसने सुरक्षा व्यवस्थेच्या सर्व नियमांना तिलांजली दिली होती. अमरनाथ यात्रेच्या नियमावलीप्रमाणे यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी आवश्यक असते. तसेच प्रत्येक वाहनाने लष्करी सुरक्षा व्यवस्थेतील काफिल्यातूनच मार्गक्रमणा करावयाची असते. आणि मुख्य म्हणजे सायंकाळी सातनंतर प्रवास बंद. परंतु यातील एकही नियम हल्लाग्रस्त बसने पाळलेला नव्हता. ना त्यातील यात्रेकरूंची नोंदणी झाली होती ना ती बस लष्कराच्या सुरक्षेखाली होती. वेळेचीही मर्यादा संबंधित बस व्यवस्थापकाने पाळली नव्हती. पुण्यसंचयासाठी देवदर्शनाला जातानादेखील किमान नियम पाळले जात नसतील तर त्यात कोणता धर्म? कोणत्या धर्मात चवलीपावली हाती टेकवली की देवस्थानाच्या नियमांना/ रांगांना मुरड घालून थेट देवदर्शन करता येते? कोणीही कोणाचीही हत्या करणे वाईटच. कोणतीही हत्या मानवतेला काळिमाच फासणारी. मग ती गोमांस खाल्ल्याच्या वा बाळगल्याच्या संशयावरून होणारी असो किंवा अमरनाथ यात्रेकरूंची असो. परंतु प्रश्न असा की, किमान नियमदेखील आपण पाळणार की नाही? आणि हे नियम न पाळणाऱ्यांना दुर्घटनेस सामोरे जावे लागले तर त्याचा भुर्दंड जनतेने का सोसायचा? आतापर्यंत प्रत्येक यात्रा दुर्घटनेतील बळींच्या नातेवाईकांना वा जखमींना लाखो रुपयांची मदत दिली गेली आहे. त्यातून वर्तमानात आणि वृत्तीत मूलभूत सुधारणा होत नसतील तर हे पैसेवाटप म्हणजे पापच नव्हे काय? या प्रश्नांच्या बरोबरीने या धर्मयात्रांना अलीकडे आणखी एक परिमाण मिळू लागले आहे.

ते आहे राष्ट्रवादाचे. विशेषत: जम्मू-काश्मिरातील धर्मस्थळे म्हणजे नवराष्ट्रवादाच्या शोभायात्राच. अशा दिखाऊ राष्ट्रवादांत माणसांआधी पहिला बळी विवेकाचा गेलेला असतो. म्हणूनच मुदलात अत्यंत नाजूक आणि अस्थिर अशा हिमालयाच्या डोंगरकपारीत कथित देवदर्शनासाठी लाखोंना जाण्यास उद्युक्त केले जाते. यात्रेच्या कालखंडाशिवाय ज्याने कोणी हा परिसर अनुभवला असेल त्यांस तेथील तोळामासा भौगोलिक रचनेची कल्पना येईल. हिमालय हा पर्वत तुलनेने तरुण. म्हणून तो अस्थिर आहे. तरीही हजारो वाहने त्याच्या छाताडावर नाचवली जातात आणि त्या वाहनांतून प्रवास करणारे जमेल त्या मार्गाने त्यावर आणखी पर्यावरणीय अत्याचार करतात. हे कोणते देवदर्शन? हे प्रकार टाळूनही धर्मपालन करता येतेच ना?

पण अशा शहाणपणाच्या आणि विवेकाच्या मार्गाने आपल्या भक्तांना नेणे धर्ममार्तंडांनाही नको असते. कारण त्या मार्गाने जाण्यात दुकानदारी नसते आणि म्हणून गल्लाही जमत नाही. सध्या काश्मिरातील स्थिती कमालीची नाजूक आहे. अशा वेळी या धर्माचा आदर करणाऱ्यांनी भक्तांना खरे तर सावधगिरीची आगाऊ सूचना द्यायला हवी होती. या वर्षी यात्रा झाली नाही तर काहीही बिघडत नाही, असा विचार करण्याइतका सुज्ञपणा त्यांच्याकडे असणार नाही, हे मान्य. परंतु तरीही जे कोणी जाणार आहेत त्यांना नियमभंगाची संधीच मिळणार नाही, अशीही चोख तयारी करणे अवघड नव्हते. आपल्या नियंत्रणाखाली नसलेल्या दहशतवाद्यांना आपण रोखू शकत नाही तर निदान नियंत्रणाखाली असलेल्या भक्तांना शिस्त लावण्याचे प्रयत्न व्हायला हरकत नव्हती. ते झाले नाही. म्हणून हे जीव अकारण गेले. आता मुख्यमंत्र्यांसह अन्य सर्व आपापली नियत कर्तव्ये सोडून, शुभ्र परीटघडीचे कपडे घालून ते मृतदेह स्वीकारतील आणि नातेवाईकांना लाखोंचे अनुदान देतील. हे सर्व करणे म्हणजेच पुण्यकर्म असे मानणाऱ्या या समाजास नास्तिकतेतील उत्कट, भव्य सौंदर्य कळणार नाही, हे एक वेळ ठीक. परंतु त्यांना तीर्थी धोंडा पाणी.. देव रोकडा सज्जनी असे म्हणणारा तुकारामदेखील कळू नये?

  • कोणीही कोणाचीही हत्या करणे वाईटच. कोणतीही हत्या मानवतेला काळिमाच फासणारी. परंतु प्रश्न असा की किमान नियमदेखील आपण पाळणार की नाही? आपल्या नियंत्रणाखाली नसलेल्या दहशतवाद्यांना आपण रोखू शकत नाही तर निदान नियंत्रणाखाली असलेल्या भक्तांना शिस्त लावण्याचे प्रयत्न व्हायला हरकत नव्हती. ते झाले नाही; म्हणून हे जीव अकारण गेले..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 1:37 am

Web Title: amarnath yatra terror attack 2017 pilgrim place attack
Next Stories
1 सह.. नाही तर शिवाय!
2 एबार बांगला..
3 जल्पकांविरुद्ध जर्मनी
Just Now!
X