03 June 2020

News Flash

हत्येचे गरजवंत

तळावरील इस्लामी कैद्यांना बगदादीसारख्यांनी धर्मशिक्षण दिले आणि त्याचा वापर अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांनीच इस्लामी टोळ्यांतील मध्यस्थीसाठी केला.

अबू बकर अल बगदादी

बगदादीसारख्या दहशतवाद्यांच्या अंताचा आनंद अमेरिकेच्या नादाला लागून आपल्यासह अनेक देशांनी आतापर्यंत अनेकदा साजरा केला. हादेखील शेवटचा नसेल..

अमेरिकी निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक अमेरिकी अध्यक्षास आपले नेतृत्वपौरुष दाखवून देण्याची गरज असते. गेली सुमारे सहा दशके हे असेच सुरू आहे. प्रत्येक अमेरिकी अध्यक्ष अशा कारवाईनंतर, जग सुरक्षित झाले, असा दावा करतो. तो किती हास्यास्पद; हे नंतर दिसून येते.

श्रीलंका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, स्वीडन, इंग्लंड, न्यूझीलंड, इराक, अफगाणिस्तान, अमेरिका आदी अनेक ठिकाणच्या दहशतवादी हल्ल्यांत अनेकांचे बळी घेणाऱ्या आयसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी हा अमेरिकी संरक्षण दलाच्या हल्ल्यात एकदाचा मारला गेला. याआधी दोन वेळा त्याच्या हत्येच्या बातम्या आल्या होत्या. पण तो जिवंत होता. यावेळी मात्र खरोखरच त्याची हत्या झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी तशी घोषणा केली. त्याआधी त्यांनी त्याबाबत उत्कंठा ताणली जाईल असे सूचक वक्तव्य केले आणि यथावकाश जवळपास तासभर चाललेल्या भाषणातून या कारवाईची माहिती दिली. बगदादी याच्या मरणाचा आनंद अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अवाढव्य चेहऱ्यावर मावत नव्हता. इतका नृशंस दहशतवादी मारला जाणे ही तशी स्वागतार्हच बाब. अशा दहशतवाद्यांच्या अंताचा आनंद अमेरिकेच्या नादाला लागून आपल्यासह अनेक देशांनी आतापर्यंत अनेकदा साजरा केला. हादेखील शेवटचा नसेल. तेव्हा बगदादी मृत्यूच्या निमित्ताने हे असे दहशतवादी कोणत्या परिस्थितीत आकारास येतात हे तपासून पाहायला हवे.

बगदादी हा प्रेषित मुहम्मदाच्या कुरेश जमातीत पदा झालेला. खलिफा म्हणवून घेण्यासाठी या जमातीत जन्म ही आवश्यक बाब. या जमातीतील जन्म आणि जन्मजात अल्लाभक्ती यामुळे बगदादी तरुणपणीच धर्मवेडा झाला. इस्लामी धर्माभ्यासातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि त्याच विषयातील बगदाद विद्यापीठातील डॉक्टरेट यामुळे बगदादी याच्या शब्दास तरुण वयातच धर्मवर्तुळात वजन आले. अशा धर्मवादी व्यक्ती आधुनिक शिक्षणापासून वंचित अशा समाजात नतिक आणि सामाजिक अधिकार मिळवतात. बगदादी असा अधिकारी होता. २००३ साली अमेरिकी फौजांनी बगदादमध्ये घुसून इराकी सत्ताधीश सद्दाम हुसेन याचा नायनाट केल्यानंतर त्या प्रदेशात अशा इस्लामी धर्माधिकाऱ्यांचे वजन वाढले. त्यावेळेस इराकात पाय रोवू पाहणाऱ्या अमेरिकी फौजांविरोधात या बगदादीने जमात-जैश-अल-सुन्ना-वा-अल-जमा ही संघटना स्थापन केली. इराकातील अमेरिकी फौजांवर छुपे हल्ले करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट. पुढच्याच वर्षी अमेरिकी फौजांनी फालुजा येथील कारवाईत बगदादी यास ताब्यात घेतले. त्यावेळेस भुरटय़ा हल्ल्यांसाठी पकडण्यात आलेल्या बगदादीची रवानगी बक्का येथील अमेरिकी छावणीत करण्यात आली.

आयसिस या संघटनेचा जन्म तेथे झाला असे मानले जाते. त्या तळावरील इस्लामी कैद्यांना बगदादीसारख्यांनी धर्मशिक्षण दिले आणि त्याचा वापर अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांनीच इस्लामी टोळ्यांतील मध्यस्थीसाठी केला. तथापि त्याही वेळी त्याच्याकडे अमेरिकेने दुर्लक्ष केले आणि त्यास ‘किरकोळ गुंड’ मानून दहा महिन्यांच्या तुरुंगवासानंतर त्याची सुटका केली. तोपर्यंत त्याचा लौकिक आसमंतात पसरला होता. त्यामुळे तुरुंगातून सुटका झाल्यावर ओसामा बिन लादेनच्या अल कईदाने त्याच्याशी संपर्क साधला आणि आपल्या जाळ्यात ओढले. त्यावेळेस इराकमधील अल कईदाचे नेतृत्व मूळ जॉर्डनचा अबु मुसाब अल झरकावी याच्याकडे होते. इराकात अमेरिकी फौजांविरोधातील घुसखोरी हा अल कईदाचा मुख्य उद्योग. बगदादी अशा धर्मकार्याची जबाबदारी घेण्यासाठी सज्ज होताच. अमेरिकी फौजांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचा कॅमेराबद्ध शिरच्छेद करण्याची नवीनच क्रूर प्रथा या मंडळींनी सुरू केली. त्यामुळे या संघटनेचा दरारा निर्माण झाला. परंतु २००६ साली झरकावी मारला गेला. त्यांनतर बगदादी आणि मंडळींनी ‘समविचारी’ संघटनांना एकत्र आणून इस्लामिक स्टेट ऑफ इराक, म्हणजे आयएसआय, या संघटनेची स्थापना करून इस्लामी धर्मतत्त्वावर आधारित खिलाफत स्थापनेचा पण केला.

अमेरिकेच्या इराक धोरण गोंधळामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि सौदी अरेबियातील काही घटकांची फूस यांमुळे या संघटनेचे प्राबल्य वाढत गेले. समोर रोखण्यास कोणीच नसल्याने संघटना चांगलीच फोफावली. त्यात शेजारील लिबियात कर्नल मुअम्मर गडाफी यालाही अमेरिकेने मारले आणि नंतर त्या देशातही निर्माण झालेल्या यादवीचा फायदा आयसिसला मिळाला. ही संघटना त्या देशातही पसरली. इराकप्रमाणे लिबियातही मोठय़ा प्रमाणावर तेलसाठे आहेत. आयसिसने त्यावर कब्जा मिळवला. इराकच्या दक्षिणेकडील भागांत मोठय़ा तेलविहिरी आहेत. या भागातील कुर्दशि जमाती आणि अन्य इस्लाम धर्मीय यांतील संघर्षांचा फायदा उठवत आयसिसने त्या भागातही चांगलाच जम बसवला. या दोन्ही ठिकाणचे मुबलक तेलसाठे हाती आल्याने या संघटनेस साधनसंपत्तीची ददात नव्हती. परिणामी सुरुवातीच्या काळात या संघटनेस मोठेच यश मिळाले. या संघटनेने मोठी ‘झेप’ घेतली ती सीरियात. तेथील धार्मिक आणि राजकीय विद्वेषामुळे सीरियात या संघटनेचा प्रभाव चांगलाच वाढला. त्यामुळे या संघटनेची दहशतही निर्माण झाली. सद्दाम हुसेन याचे एकेकाळचे निष्ठावान या संघटनेस येऊन मिळाल्यानेही तिचे प्रभावक्षेत्र वाढले. त्यानंतर गेली साधारण १२ वष्रे या संघटनेचा हिंसक नंगानाच जगभर सुरू होता. तालिबानचा झालेला पाडाव, २०११ साली ओसामा बिन लादेन याची झालेली हत्या यामुळे आयसिसचे चांगलेच प्राबल्य निर्माण झाले. अशा या संघटनेचा प्रमुख बगदादी याच्या हत्येने तीस खीळ बसेल असे मानले जाते.

पण ती तात्पुरतीच. अशीच कोणी अन्य संघटना अथवा नवा कोणी बगदादी वा ओसामा जन्मास येईपर्यंत हा बगदादीच्या हत्येचा ‘आनंद’ अमेरिका वा अन्य कोणी साजरा करू शकतील. निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक अमेरिकी अध्यक्षास आपले नेतृत्वपौरुष दाखवून देण्याची गरज असते. गेली सुमारे सहा दशके हे असेच सुरू आहे. १९६० च्या दशकात अमेरिकी अध्यक्ष आयसेनहॉवर यांना ‘मुस्लीम ब्रदरहूड’ची गरज लागली. त्यांच्याच काळात इराणचे पंतप्रधान महंमद मोसादेघ यांची राजवट उलथून पाडली गेली. त्यानंतर झालेला तेल बाजाराचा उदय, इराणात आयातुल्ला खोमेनी यांना अमेरिकेची फूस, सुन्नी सौदी अरेबियास पर्याय म्हणून शिया खोमेनी यांना पुढे करणे, १९७९ साली सोविएत रशियाच्या फौजांचे अफगाणिस्तानात घुसणे, त्यास तोंड देण्यासाठी अमेरिकेने ओसामा लादेन यास पोसणे, नंतर याच ओसामाने अमेरिकेविरोधात उभे रहाणे, मग अमेरिकेने त्यास मारणे, अमेरिकी आणि जागतिक तेल कंपन्यांनी तालिबानला सांभाळणे आणि २००१ सालच्या ९/११ नंतर त्यांच्या जिवावर उठणे आणि आता या बगदादीस मारणे. हा या खेळाचा पुढचा अंक.

यात बदल होतो तो फक्त अमेरिकी अध्यक्षांत. आयसेनहॉवर, जिमी कार्टर, बुश पितापुत्र, काही प्रमाणात बराक ओबामा आणि आता हे ट्रम्प. यातील एक ओबामा सोडले तर अन्य सर्व रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि त्यांची काहीएक विशिष्ट धार्मिक विचारसरणी आहे. यातील ओबामा वगळता अन्य सर्व हे विविध तेल कंपन्यांशी संबंधित. त्यामुळे त्या अर्थानेही त्यांचे हितसंबंध या सगळ्यांत असतात. प्रत्येक अमेरिकी अध्यक्ष अशा कारवाईनंतर, अशा कोणास ठार मारल्यानंतर आनंद साजरा करतो आणि जग आता कसे सुरक्षित झाले, असा दावा करतो. तो किती हास्यास्पद असतो हे नंतर दिसून येते. आताही काही वेगळे होईल असे नाही. ते काय असेल हे कळेपर्यंत तूर्त बगदादी हत्येच्या आनंदात सहभागी व्हावे हे बरे. अशा बगदादींची निर्मिती आणि नंतर यथावकाश त्यांची हत्या ही सत्ताधीशांची गरज असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2019 1:39 am

Web Title: america election end of the terrorists akp 94
Next Stories
1 दिवाळी कशाला हवी..
2 निम्म्याच्या मर्यादा
3 जमिनीवर या..
Just Now!
X