अमित शहा यांची कामगिरी मोदी यांना त्यांच्याविषयी काय वाटते यावर नव्हे, तर जनतेला भाजपविषयी काय वाटते या आधारे मोजली जाईल..
शहा यांची निवडणूक रणनीती कधी चुकत नाही, हा भाजपचा भ्रम बिहारात मोडीत निघाला. यंदा पाच राज्यांत निवडणूक आहेच, पण त्याहीपेक्षा मोठे आहे ते पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीचे आव्हान.

गतसाली जेव्हा पहिल्यांदा अमित शहा यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा आम्ही त्याचे वर्णन ‘मोदी अँड कंपनी प्रा. लि.’ असे केले होते. ते किती रास्त होते यावर त्यांच्या फेरनिवडीने शिक्कामोर्तब केले. भाजपच्या अंतर्गत निवडणुका(?) शनिवारी संपल्या. यात अध्यक्षपदासाठी अमित शहा वगळता अन्य कोणी अर्जच न केल्याने शहा हे बिनविरोध विजयी झाल्याचे पक्षाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर त्यांना तसे रीतसर पत्र दिले गेले आणि मग सर्वानी मिळून अमित शहा यांच्या ‘निवडणुकी’चा विजयोत्सव साजरा केला. सर्व काही रीतसर काँग्रेसी पद्धतीने पार पडले आणि त्याच पद्धतीचा मान राखीत भाजपचे नवे अध्यक्ष पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या दर्शनार्थ रवाना झाले. हे ज्येष्ठ नेते म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि यशवंत सिन्हा हे होत. भाजपचे हिमाचली नेतृत्व शांताकुमार आणि बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा हेदेखील या प्रसंगी सोयीस्करपणे अनुपस्थित होते; परंतु ते ज्येष्ठ नाहीत. वरील नामावळीतील यशवंत सिन्हा हेदेखील या ज्येष्ठांत मोडत नाहीत आणि वाजपेयी रागलोभाच्या पलीकडे गेले आहेत. उरलेल्या दोघांतील मुरली मनोहर जोशी तसे पेन्शनीतच निघालेले आहेत. तेव्हा राहता राहिले अडवाणी. िहदू संस्कृती आणि परंपरा यांचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या अडवाणी यांना आपले निरुपयोगित्व उमजू नये आणि त्यांच्या मनी अजूनही निवृत्ती येऊ नये हा खरे तर या परंपरेचाच अपमान. तो अडवाणी यांच्याकडून सातत्याने होत आहे आणि तितक्याच सातत्याने भाजपचे विद्यमान नेतृत्व त्यांना अडगळीतच असल्याची आठवण करून देत आहे. तेव्हा या सगळ्यांवर मात करीत अमित शहा हे भाजपच्या पूर्णाध्यक्षपदी विराजमान झाले. माजी अध्यक्ष राजनाथ सिंग यांना मधेच पायउतार व्हावे लागल्याने शहा हे उर्वरित काळचे अध्यक्ष होते. आता ते पद शहा यांना पूर्ण काळासाठी मिळेल.
तेव्हा त्यांची आताची आव्हानेही पूर्ण आकाराची असतील, यात शंका नाही. आधीच्या मनमोहन सिंग सरकारच्या पुण्याईमुळे काँग्रेसविरोधी लाट निर्माण झाली आणि तिच्यावर स्वार होत नरेंद्र मोदी यांनी अलगदपणे दिल्ली गाठली. तेव्हा भाजपच्या यशाचे मोठे श्रेय हे मोदी वा त्यांचे सल्लागार अमित शहा यांच्याऐवजी तत्कालीन सिंग सरकारातील अनागोंदीकडे जाते, हे कडवा भाजप समर्थकदेखील अमान्य करणार नाही. आता ती परिस्थिती असणार नाही. याचे कारण आपल्याकडील मानसिकतेत सत्ताधाऱ्यांस आसमंतात घडणाऱ्या सर्व चुका आणि त्रुटींचे पालकत्व घ्यावे लागते. मग ते उत्तर प्रदेशातील दादरी असो वा हैदराबाद विद्यापीठातील रोहितची आत्महत्या. सत्ताधाऱ्यांस सर्व नकारात्मक बाबी चिकटतात. दिल्ली विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकांतून याचा प्रत्यय शाह यांना आलाच असेल. त्यातही पुन्हा या पराभवाची जबाबदारी घेण्याऐवजी विरोधकांच्या राजकारणालाच दोष देण्याचा मार्ग शहा यांनी स्वीकारला. परंतु भाजपचा पराभव झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील हे आपले विधान आततायी होते, अशी कोणत्याही प्रकारची कबुली त्यांच्याकडून आल्याचे ऐकिवात नाही. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुखास अशी भाषा करणे शोभणारे नाही. तेव्हा शहा यांची निवडणूक रणनीती कधी चुकत नाही, हा भाजपचा भ्रम बिहारात मोडीत निघाला. मोदी यांच्याप्रमाणे शहा हेदेखील एकचालकानुवíतत्व मान्य करतात. हा एक चालक म्हणजे अर्थातच पंतप्रधान मोदी. तेव्हा त्यांना हवे होते म्हणून शहा हे भाजप अध्यक्षपदी कायम राहणार हे नक्की होते. आणि मोदी यांच्यासाठी शहा ही गरज आहे. याचे कारण स्वत:चे अस्तित्व पुसून टाकून धन्यासाठी काय वाटेल ते करणारा साथीदार सरंजामशहांना नेहमीच हवा असतो. इंदिरा गांधी यांना इंदिरा इज इंडिया म्हणणारे देवकांत बरुआ मिळाले. मोदी यांना शहा. परंतु ज्याप्रमाणे बरुआ यांचे मोजमाप इंदिरा गांधी यांना त्यांच्याविषयी काय वाटत होते यावरून करता येणार नाही त्याचप्रमाणे शहा यांची कामगिरी मोदी यांना त्यांच्याविषयी काय वाटते या भावना निर्देशांकाने मोजली जाणार नाही. ती मोजली जाईल ती जनतेस सध्या भाजपविषयी काय वाटते, याच्या पाहणीतून. सध्याच्या आपल्या अध्यक्षपदाच्या कमी कारकीर्दीत शहा यांनी साडेतीन लाख किमी प्रवास केला आणि दहा कोटींहून अधिक व्यक्तींना भाजप सदस्य केले. त्यामुळे भाजप हा जगातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष बनला. यामुळे गिनीज बुकातही या पक्षाची नोंद होऊ शकते. परंतु म्हणून याचा निवडणूक निकालावर काही परिणाम होईल असे अजिबात नाही. तेव्हा शहा यांचे मोजमाप त्यांनी किती जणांना भाजप सदस्य केले यावर होणारे नाही. ते होईल निवडणुकीच्या खणखणीत निकालांत.
त्यास आता अवघ्या काही महिन्यांतच सुरुवात होईल. तामिळनाडू, प. बंगाल, केरळ, आसाम आदी राज्यांत महिनाभरात निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. यापकी आसाम वगळता अन्य राज्यांत भाजपस काहीही स्थान नाही. त्यामुळे जे काही हाती लागेल तेदेखील तो पक्ष यश म्हणून साजरे करू शकतो. राहता राहिला आसाम. त्या राज्यात सत्ता स्थापनेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपस वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. तसे होते की नाही, हेही यामुळे कळेल. परंतु ही चार राज्ये ही काही शहा यांची खरी कसोटी नाही. ती असेल उत्तर प्रदेश हे राज्य. पुढील वर्षी या राज्यात विधानसभा निवडणुका असून तेथे जर भाजपला सत्ता हस्तगत करता आली नाही तर त्याचा थेट परिणाम त्यानंतर दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर होईल. २०१४ सालातील सार्वत्रिक निवडणुकांत भाजपने उत्तर प्रदेशातील ८० पकी ७२ जागा खिशात टाकल्या. ते यश अभूतपूर्व होते. परंतु अशा ऐतिहासिक विजयाची कधी पुनरावृत्ती होत नाही. तेव्हा शहा यांच्या हाती राहते ती एकच बाब. ती म्हणजे त्या यशाच्या जास्तीत जास्त जवळ जाणे. तसे जाताना मायावती वा मुलायम या दोघांपकी कोणाचीच मदत भाजप घेऊ शकत नाही. तशी मदत घ्यावयाची वेळ आल्यास ते भाजपच्या अशक्तपणाचे निदर्शक असेल. तेव्हा उत्तर प्रदेशातील आगीतून शहा बाहेर पडतात न पडतात तोवर गुजरातच्या परीक्षेची तयारी त्यांना करावी लागेल. पुढील वर्षांच्या उत्तरार्धात गुजरातेत निवडणुका होतील. तोपर्यंत विद्यमान मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेली असेल. भाजपने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार वयाच्या पंचाहत्तरीनंतर कोणत्याही नेत्यास अशा अधिकारपदाची अपेक्षा ठेवता येणार नाही. म्हणजे आनंदीबेन यांना पर्याय शोधावा लागेल. अर्थात आनंदीबेन यांनी पंचाहत्तरी गाठली नसती तरी गुजरात भाजपच्या नेतृत्वाबाबत आनंदी राहावे असे काही नाही, हे कोणालाही पटेल. तेव्हा गुजरातची मातृभूमी ही मोदी आणि शहा दुकलीसाठी डोकेदुखी ठरणारच नाही असे नाही. अशा परिस्थितीत कोणी सांगावे गुजरातचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून शहा यांनाच पुढे करायची वेळ कदाचित मोदी यांच्यावर येऊ शकते. परंतु तसे झाल्यास राष्ट्रीय अध्यक्षपदाची खुर्ची पुन्हा उघडी पडणार.
अशा तऱ्हेने आगामी काळ हा सत्ताधारी भाजपसाठी प्रचंड आव्हानांचा असणार हे नक्की. पक्षाध्यक्ष शहा हे ती कशी पेलतात यावर त्यांचे नाव सार्थ होणार किंवा कसे ते ठरेल.