19 February 2019

News Flash

एकावर बारा शून्ये!

अ‍ॅपलचे बाजारमूल्य वाढून एक ट्रिलियन डॉलरवर गेले, याचा आनंद सर्वदूर पसरू शकतो, तो ‘बाजार’ आणि ‘मूल्ये’ यांचा समन्वय अ‍ॅपलने राखला, म्हणून.. 

अ‍ॅपलचे बाजारमूल्य वाढून एक ट्रिलियन डॉलरवर गेले, याचा आनंद सर्वदूर पसरू शकतो, तो ‘बाजार’ आणि ‘मूल्ये’ यांचा समन्वय अ‍ॅपलने राखला, म्हणून.. 

अ‍ॅपल ही काही भारतीय कंपनी नाही. तेव्हा तिच्याबद्दल स्वदेशी ममत्व वाटण्याचे काहीही कारण नाही. या कंपनीने नुकताच एक ट्रिलियन डॉलर भांडवली बाजारमूल्याचा टप्पा पार केला आणि असे करणारी ती जगातील पहिलीच कंपनी ठरली. याचा नेमका अर्थ काय? हा टप्पा पार केला म्हणजे या कंपनीने नेमका कोणता इकडचा डोंगर तिकडे उचलून ठेवला? थोडक्यात सांगायचे, तर समजा अ‍ॅपल हा देश असता, तर स्वीडन, अर्जेटिना, स्वित्र्झलड, सौदी अरेबिया, तुर्कस्तान आदींच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाहून अ‍ॅपलचे बाजारमूल्य आज जास्त आहे आणि ते मॉस्को, सिंगापूर, स्पेन आदी शेअर बाजारांच्या उलाढालीहूनही अधिक आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत अशा ११ धनवंतांच्या एकत्रित संपत्तीहून अ‍ॅपलची किंमत जास्त आहे. किंबहुना ‘अ‍ॅपल’ हा देश जर असता, तर आज ही कंपनी जगातल्या पहिल्या पंधरा-सोळा श्रीमंत राष्ट्रांत गणली गेली असती. भारताच्या परिप्रेक्ष्यात सांगायचे, तर आपल्याकडील सर्वात श्रीमंत अशा ज्या दोन कंपन्या गणल्या जातात, त्यांचे बाजारमूल्यही शंभर बिलियन डॉलर एवढे आहे. असे असले, तरी या कंपनीच्या या श्रीमंतीचा आपल्याशी थेट असा काहीही संबंध नाही. अ‍ॅपलची उपकरणे वापरणे यापलीकडे या कंपनीशी आपले काहीही लागेबांधे असण्याचे कारण नाही. आणि तरीही अ‍ॅपलने हा जो विक्रम नोंदविला आहे त्याने आपल्याकडील अनेकांना नक्कीच छानसे वाटत आहे. अ‍ॅपलबद्दल कौतुकाची भावना मनात निर्माण झालेली आहे. उगाचच आनंदही वाटत आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांतून, समाजमाध्यमांतून अ‍ॅपलबाबतची गौरवगीते गायली जात आहेत. असे का व्हावे हा खरे तर समजून घेण्याचा विषय आहे.

हे संपत्तीबद्दलच्या आकर्षणातून होत आहे काय? तसे नसावे. फोर्बस् हे मासिक दरवर्षी जगातील सर्वाधिक धनवंतांची एक यादी जाहीर करीत असते. तिच्या बातम्या लोक आवडीने, कुतूहलाने वाचतात. अनेकांच्या मनात त्या धनिकांबद्दल कौतुक असते. कधी कधी हेवा आणि असूयाही. परंतु त्यातही एक सूक्ष्मसा फरक असतो. त्या यादीतील सर्वाबद्दलच तसे वाटत नसते. जगाला मुठीत ठेवू पाहणाऱ्या, कवेत घेऊ पाहणाऱ्या त्या थोडय़ांच्या श्रीमंतीविषयी तिरस्काराची भावनाही असते अनेकांच्या मनात. याचे कारण संपत्तीविषयी कितीही आकर्षण असले, तरी त्याच मनात साधनशुचितेची एक विवेकनिष्ठ कसोटीही दडलेली असते. त्या कसोटीवर आपण संपत्तीसंचय आणि तो करणारे श्रीमंत यांना घासून पाहत असतो. त्या कसोटीवर त्या संपत्तीची सन्माननीयता आपण ठरवीत असतो. त्या श्रीमंतीला आपण जुलमाचा रामराम करू नाइलाजाने. पण तिला आदर मात्र कधीही देणार नाही. तद्दन मध्यमवर्गीय विचार म्हणून याची खिल्ली उडविणे सोपे आहे. परंतु साधनशुचितेचे हेच विचार समाजाचा तोल राखत असतात. हे जे व्यक्तींबाबत, तेच कंपन्यांबाबत. अ‍ॅपल या कंपनीने अनेकांच्या मनातील ही आदरभावना कमावली आहे. ही बाब जाहिरातींतून, प्रचारातून होत नसते. प्रचाराला लोक प्रारंभी भाळतातही. परंतु पुढचा संसार हा प्रचारी घोषणांवर चालत नसतो. तेथे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हाच रोकडा व्यवहार असतो. तेथे उत्पादनांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता हेच महत्त्वाचे ठरत असते. अ‍ॅपलने या कसोटीवर स्वतस सिद्ध केले आहे हे दिसतेच आहे. परंतु गुणवत्ता आणि कार्यक्षमता याबाबत अ‍ॅपलच्या उत्पादनांशी स्पर्धा करू शकतील अशी अन्य कंपन्यांची उत्पादने बाजारात आहेतच. तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की, मग अ‍ॅपलला हे जे यश आणि लौकिक मिळाला त्याचे नेमके रहस्य काय? ते दडले आहे या कंपनीच्या आणि तिचे एक संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या मूल्यविचारांमध्ये. आज अ‍ॅपलच्या आर्थिक यशाने अनेकांच्या मनात उमटणारी समाधानाची भावना ही त्या मूल्यांना दिलेली पावती आहे.

स्टीव्ह जॉब्ज हे औद्योगिक युग आणि माहिती-तंत्रज्ञानाचे युग यांच्या मीलनरेषेवरील पिढीचे प्रतिभावंत अपत्य आहे. त्याच्या संपूर्ण मूल्यविचारांवर या गोष्टीचा मोठा पगडा आहेच. काही काळ तो भारतात राहून गेला होता. येथील बौद्ध आणि जपानी झेन विचारांनी तो प्रेरित झाला होता. या सर्व बाबींनी त्याचा उत्पादनांबाबतचा दृष्टिकोन घडविला आहे. औद्योगिक युगात जन्मास आलेला सौंदर्यविचार घेऊनच तो त्याच्या उत्पादनांकडे पाहत होता. उपयुक्ततावाद ही त्यातील कळीची बाब होतीच, परंतु उपयुक्तता हे तत्त्व सौंदर्याला छेद देणारेच असते असे नव्हे. आणि याची उलट बाजू म्हणजे सुंदरसा अभिकल्प – डिझाइन, म्हणजे उपयुक्ततेशी तडजोड असेही नसते. पुन्हा या सगळ्याच्या तळाशी बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून आलेला साधेपणा हे मूलभूत तत्त्वही होते. अजूनही आहे. अ‍ॅपलचे कोणतेही उत्पादन घ्या, त्यात ते दिसणारच. या तत्त्वांवर जॉब्ज एवढा ठाम होता की, एकदा अ‍ॅपलचे कोणतेही उत्पादन बाजारात गेले की त्यात कोणालाही छेडछाड करण्याची संधीच मिळता कामा नये असा त्याचा आग्रह असे. याला जॉब्ज यांची अहंमन्यता असेही कोणी म्हणू शकेल. परंतु त्या अहंमन्यतेमागे आपल्या उत्पादनांच्या दर्जाबाबतचा, त्यांच्या सौंदर्यपूर्ण अभिकल्पाबाबतचा प्रचंड आत्मविश्वास होता. म्हणूनच जॉब्जचा अ‍ॅपल उत्पादनांबाबतचा अभिजनवाद शोभूनही दिसला आणि लाखो ग्राहकांना भावलाही. अ‍ॅपलच्या उत्पादनांचे एक स्वतंत्र विश्वच निर्माण झाले आहे. स्वयंपूर्ण असे. त्या जगात अन्य कोणालाही प्रवेश नाही. अर्थात छोटय़ा छोटय़ा गोष्टींत सौंदर्य, गुणवत्ता आणि ग्राहकांची गरज यांचा समन्वय जर येथेच मिळणार असेल, तर अ‍ॅपलच्या खासगी बागेत अन्य कोणाला कोणी घुसू तरी का देईल? अत्यंत निष्ठावंत ग्राहकांचा वर्ग अ‍ॅपलला मिळाला तो या कंपनीच्या या छानशा मिजासखोरीमुळेच. अ‍ॅपलच्या यशाचे रहस्य आहे ते यात. त्याला अर्थातच आणखीही एक महत्त्वाची किनार आहे. ती म्हणजे अमेरिकेच्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेची.

सीरियातून आलेला अब्दुलफताह जंदाली नामक मुस्लीम स्थलांतरित हा ज्याचा जन्मदाता, कामगारवर्गातील दाम्पत्याने ज्याचे पालनपोषण केले, तारुण्यासोबत येणारे सगळे रंगढंग ज्याने केले, अमली पदार्थाचे व्यसन केले, तेव्हाच्या हिप्पी तरुणांप्रमाणे श्रेयस आणि शांतीच्या शोधात ज्याने धार्मिक तत्त्वज्ञानाचीही भेट घेतली, त्या स्टीव्ह जॉब्ज नामक अवलिया प्रतिभावंताची ही कंपनी. घरातील वाहनगृहातून व्यवसायाला सुरुवात केली होती त्याने. आज ती जगातील आर्थिकदृष्टय़ा सर्वात प्रबळ कंपनी आहे. हे घडू शकले याचे कारण अमेरिकेत व्यक्ती असो वा संस्था वा कंपन्या यांच्या वाढीस मिळू शकलेला अवकाश. एका वाढणाऱ्या झाडामुळे बाकीच्या रोपांना प्राणवायू आणि सूर्यप्रकाश कमी मिळेल या भयाने त्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे कुडमुडे साम्यवादी उपद्व्याप करण्याऐवजी सर्वानाच तो कसा मिळेल याची काळजी घेणारी ती व्यवस्था. अशाच व्यवस्थेत स्टीव्ह जॉब्ज फुलू शकतात आणि अ‍ॅपल बहरू शकते. असंख्य भारतीय आज स्वप्न पाहत आहेत ते या अवकाशाचेच, या व्यवस्थेचेच. अ‍ॅपलने एक ट्रिलियन म्हणजे एकावर बारा शून्ये डॉलर म्हणजे सुमारे ६८ लाख कोटी रुपये एवढा मोठा बाजारमूल्याचा टप्पा गाठला, याने समाधानाची सुंदरशी भावना आपल्याकडेही अनेकांच्या मनात निर्माण झाली ती काही उगाचच नव्हे.. अखेर मूल्यांच्या जपणुकीतूनही यश मिळू शकते या स्वप्नावरचा विश्वास वाढविणारी अशी ही एकावरची बारा शून्ये आहेत.

First Published on August 4, 2018 2:36 am

Web Title: apple becomes worlds first trillion dollar company