17 February 2019

News Flash

शरपंजरी शेजारी

२५ जुलै रोजी पाकिस्तानात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका.

पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ

नियमाधिष्ठित लोकशाहीऐवजी धर्माधिष्ठित व्यवस्था राबवू पाहणारा पाकिस्तान आज तेथील लष्कराच्या मर्जीने चालतो आहे..

व्यवस्थाशून्य देशांत भ्रष्टाचार हा सोयीने वापरावयाचा मुद्दा असतो. विरोधकास नुसते आरोपांनीच घायाळ करायचे. सिद्ध तर कोणालाच काही करावयाचे नसते. अशा देशांत इतक्या वरवरपणे राजकारण चालू शकते. पाकिस्तानात ते तसे आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना तेथील भ्रष्टाचारविरोधी विशेष यंत्रणेने, नॅशनल अकौंटिबिलिटी ब्युरो (नॅब), भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले खरे. पण तसे ठरवताना त्यांच्या विरोधात पुरावा नसल्याचे स्वत:च मान्य केले. त्या देशातील व्यवस्थाशून्यता अशी की ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचा आरोप होतो त्या व्यक्तीवरच आपण निरपराध असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी असते. म्हणजे ही यंत्रणा कोणाहीवर भ्रष्टाचाराचा आरोप करणार आणि आपण भ्रष्ट नाही हे त्या व्यक्तीने सिद्ध करायचे. या प्रकरणात शरीफ यांच्यावर असा आरोप झाला तो त्यांच्या लंडनच्या आलिशान वस्तीतील चार सदनिकांमुळे. जगभर गाजलेल्या पनामा पेपर्समुळे शरीफ यांच्या मालकीच्या या सदनिका असल्याचे उघड झाले. तेवढय़ावरच शरीफ यांच्यावर आरोप झाला आणि ते दोषी असल्याचे सिद्ध न होताही त्यांना शिक्षा झाली. या चार सदनिकांची मालकी शरीफ यांचीच आहे हे आम्ही सिद्ध करू शकलो नाही, पण या घरांसाठी पैसे कोठून आणले हे शरीफदेखील सांगू शकले नाहीत, सबब ते दोषी ठरतात, असा अजब निकाल या यंत्रणेने दिला आणि शरीफ यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने शरीफ हे पंतप्रधानपदासाठी प्रामाणिक आणि विश्वासार्ह (‘सादिक’ आणि ‘अमीन’) नाहीत, असा निर्वाळा देत त्यांना पदच्युत केले होतेच. या व्यवस्थाशून्य देशाच्या घटनेतील हे आणखी एक संदिग्ध कलम. गरजेनुसार ते वाटेल त्यास सादिक आणि अमीन नाही असे म्हणू शकते.

याचा अर्थ शरीफ हे प्रामाणिक आहेत असा अजिबातच नाही. ते तसे नाहीतच. परंतु प्रश्न शरीफ यांच्या भ्रष्टाभ्रष्टतेचा नाही. तो पाकिस्तानातील सर्वशक्तिमान, सर्वव्यापी अशा लष्कराचा आहे. या लष्करामुळे त्या देशात एकही पंतप्रधान आपली पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करू शकलेला नाही. तरीही, पाकिस्तानात लष्करापेक्षा नागरी प्रशासन किती शक्तिमान आहे ते दाखवून देऊ, अशी वल्गना पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत विजयी झाल्यावर शरीफ यांनी केली होती. ती अगदीच फोल ठरली. लष्कराने त्यांच्या भोवतीचा फास आवळत आणला आणि सर्वोच्च न्यायालयास हाताशी धरून अलगदपणे शरीफ यांना दूर केले. पुढे नॅबनेही त्याच सुरात सूर मिसळत शरीफ यांना सहकुटुंब १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सर्वसाधारण प्रथा अशी की असे काही झाले की पाकिस्तानचे राजकारणी लंडन वा दुबईत मुक्काम हलवतात. शरीफ हेदेखील तसेच करतील अशी अनेकांची अटकळ होती. शरीफ तर लंडन येथेच होते. आपल्या मरणासन्न पत्नीसमवेत. त्यांना, कन्या मरियम, जावई सफदर, त्यांचा माजी खासगी सचिव यांना तुरुंगवासाची शिक्षा जाहीर झाल्यावर ते आपला लंडनमधला मुक्काम वाढवतील असेच मानले जात होते. पण ही प्रथा सोडून ते पाकिस्तानात दाखल झाले. पाकिस्तानी भूमीवर पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यांना आणि कन्येस अटक झाली आणि सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्यांना तुरुंगात डांबले गेले. हे असे होणार हे शरीफ यांनाही ठाऊक होते. तरीही ते पाकिस्तानात परतले.

कारण २५ जुलै रोजी पाकिस्तानात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका. या निवडणुकांत शरीफ यांना पूर्णपणे पंगू करून टाकणे पाकिस्तानी लष्करासाठी आवश्यक आहे. पाकिस्तानी लष्कराच्या तालावर नाचणारे दोन पक्ष वा राजकारणी, तेथे तयार झाले आहेत. पहिला विख्यात क्रिकेटपटू इम्रान खान आणि त्यांचा ‘तेहरीक-ए-इन्साफ’ हा पक्ष. इम्रान खान हे शरीफ यांचे कडवे विरोधक. शरीफ काही प्रमाणात तरी आधुनिकतेचा आभास निर्माण करीत. इम्रान खान यांना त्याचीही गरज वाटत नाही. स्वत: वाह्य़ात आयुष्य जगलेल्या, जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी आपल्या अपत्यखुणा सोडणाऱ्या, ऑक्सफर्ड विद्याविभूषित इम्रान खान यांना पाकिस्तान मात्र इस्लामी कल्याणकारी देश व्हावा असे वाटते. यातील महत्त्वाचा शब्द इस्लामी. कल्याणकारी वगैरे शुद्ध बकवास. त्यांच्या या इस्लामधार्जिण्या भूमिकेमुळे पाकिस्तानी लष्कर आणि त्या देशातील धर्ममरतड हे त्यांच्या मागे आहेत. लष्कराच्या तालावर नाचावयास तयार असलेला, किंबहुना लष्कराची फूस असल्यानेच निर्माण झालेला दुसरा पक्ष म्हणजे मुंबई हल्ल्यातील आरोपी हफीझ सईद याचा ‘अल्ला हू अकबर तेहरीक’. त्या देशातील व्यवस्थांचे पोकळपण असे की भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शरीफ यांना दोषी ठरवणाऱ्या यंत्रणांना इम्रान वा सईद या व्यक्ती आणि त्यांचे पक्ष याविषयी काहीही दोषपूर्ण आढळत नाही. हे सर्व असे होणार याचा पूर्ण अंदाज असूनही शरीफ हे कन्येसह पाकिस्तानात परतले.

याचे कारण आपणास होणारा तुरुंगवास हा २५ जुलै निवडणुकीत आपल्या पक्षाची संजीवनी ठरू शकतो, हे त्यांचे राजकीय गणित. शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ हा पक्ष या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढतो आहे. पंजाब प्रांताचे नेतृत्व केलेले शरीफ यांचे बंधू शेहबाझ शरीफ हे नवाझ यांच्या साथीला आहेत. परंतु लष्कराची ताकदच इतकी की आपल्या भावाच्या अटकेवर त्यांना प्रतिक्रियाही व्यक्त करता आलेली नाही. अशा वेळी या निवडणुकांत काय होणार हे प्रचारसभेत झालेल्या प्रचंड बाँबस्फोटाने दाखवून दिले. जवळपास २०० जणांचा बळी या निवडणूक प्रचारसभेतल्या बाँबस्फोटात गेला. आयसिस ही संघटना त्यामागे आहे असे म्हणतात. इस्लामी धर्मातिरेक हा तिचा एककलमी कार्यक्रम. मुळात पाकिस्तानी निवडणुकांत इस्लामवादी पक्षच रिंगणात आहेत. पण आयसिस त्यांच्यापेक्षा अतिरेकी.

हे असेच होते. एकदा का अतिरेक हाच राजकीय पक्षांचा कार्यक्रम ठरला की विवेक नाहीसा होतो आणि सारी स्पर्धा अधिकाधिक अतिरेकी कोण यासाठीच सुरू राहते. त्यात पाकिस्तानात लोकशाहीच्या विवेकास लष्कराने कधीही रुजूच दिले नाही. आताही तोच प्रयत्न आहे. शरीफ यांचे पाकिस्तानात परतणे, त्यांचे राजकीय भाष्य, त्यांच्या पक्षाच्या निवडणूक प्रचारसभा आदींचे प्रसारण दूरचित्रवाणी वाहिन्यांनी करूच नये असा लष्कराचा आग्रह असून तो अमान्य करणाऱ्यांविरोधात लष्कराकडून निष्ठुर कारवाई सुरू आहे. शरीफ यांच्या पाकिस्तानातील आगमनवृत्तावर जवळपास पूर्ण बंदीच होती. ‘द डॉन’ या वृत्तपत्राने धाडसाने ती मोडून निडरपणा दाखवला तर त्या वर्तमानपत्रास जाहिराती देणाऱ्यांवर कारवाई झाली. यावरून पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांना आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडणे किती आव्हानात्मक आहे हे कळावे. एका बाजूने कडवे धर्मातिरेकी आणि दुसरीकडून त्यांनाच सामील असलेले लष्कर.

हे सगळे आपली डोकेदुखी वाढवणारे आहे. त्या देशातील अवस्था पाहून आपल्या काही धर्मप्रेमींना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी ते असमंजसपणाचे आहे. धर्माधिष्ठित व्यवस्था ही सुसज्ज नियमाधिष्ठित लोकशाहीस पर्याय असूच शकत नाही. आपल्या शेजारील देशात असे होणारे असेल तर त्या देशातील अशांतता आपल्या अंगणात सांडणार हे उघड आहे. अशा वेळी २५ जुलैच्या निवडणुकीत काय होते ते महत्त्वाचे. तुरुंगवासामुळे लोकप्रियतेत वाढ होऊन शरीफ यांच्या पक्षाच्या बाजूने जनता कौल देणार की गुलछबू इम्रान खानला पाठिंबा मिळणार? आणि मुख्य म्हणजे लष्कराचे काय? काहीही झाले तरी  हा शरपंजरी शेजारी आपल्याला शांत झोपू देणारा नाही.

First Published on July 16, 2018 4:31 am

Web Title: army play important role in pakistan government