लोकसत्ताचे माजी संपादक, नखशिखांत ग्रंथकार आणि ग्रंथप्रेमी अरूण टिकेकर हे उदारमतवादी परंपरेचे पाईक म्हणून स्मरणात राहतील..

संपादकाने समाजात वावरताना काही नियम पाळणे आवश्यक आहे, हे टिकेकर सांगत आणि त्याचप्रमाणे ते वागत.. वैचारिक आग्रह आणि दुराग्रह, आक्रमक आणि आक्रस्ताळे यांतील सूक्ष्म भेद हरवून बसलेल्या आजच्या महाराष्ट्रात त्याचमुळे टिकेकर यांच्यासारख्यांचे अप्रूप होते.

मराठी विद्वत् जगात दोन घराणी आहेत. एक बळवंतराव टिळकांचे विचार, त्यांचे राजकारण आणि त्यांची वैचारिक मांडणी यांचे अनुकरण करते. दुसरी परंपरा गोपाळराव आगरकर यांच्याशी निष्ठा सांगते. अरूण टिकेकर हे दुसऱ्या परंपरेचे आधुनिक पाईक होते. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात आगरकरांची विचारध्वजा फडफडती ठेवणारे महंत फार उरलेले नाहीत. वरवर पाहणाऱ्यांना या परंपरेचा धागा मवाळ भासतो. टिळकानुयायांच्या तुलनेत आगरकरवादी तितके आकर्षक वाटत नाहीत. त्यामुळेही असेल आगरकरवादी कमी आढळतात. टिकेकर हे असे मोजक्यांमधलेच होते. वास्तविक टिळक यांच्याप्रमाणेच आगरकर हेदेखील बुद्धिप्रामाण्यवादीच होते. भावनेपेक्षा विचारांत बुद्धीचीच कास असावयास हवी, असाच त्यांचा आग्रह असे. समाजसुधारणा या राजकीय सुधारणांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत, असे शुद्ध आगरकरी विचारघराण्याप्रमाणे टिकेकर यांना वाटे. उभय घराण्यांतील फरक आहे तो विचारांच्या मांडणीत. आपला जो काही मुद्दा असेल तर तो संयतपणे मांडावा, ही आगरकर घराण्याची शिकवण होती. टिकेकरांकडून तिचे कधीही उल्लंघन झाले नाही. काहीही झाले तरी सभ्यपणाची कास आपणाकडून सुटणार नाही याची काळजी अस्सल आगरकरवाद्यांप्रमाणे ते सतत घेत असत. वैचारिक आग्रह आणि दुराग्रह, आक्रमक आणि आक्रस्ताळे यांतील सूक्ष्म भेद हरवून बसलेल्या आजच्या महाराष्ट्रात त्याचमुळे टिकेकर यांच्यासारख्यांचे अप्रूप होते. आवश्यक तितक्या आणि तितक्याच ठामपणाने आपले मत समोरच्यासमोर मांडले की आपली भूमिका संपली असे रास्तपणे ते मानत. आपले काम समोरच्यास योग्य काय हे सांगण्याचे आहे, त्याने ते ऐकायलाच हवे असा आग्रह आपण धरणे योग्य नाही, असे ते मानत आणि तसेच वागत.

टिकेकर ‘लोकसत्ता’चे संपादक होते इतकेच त्यांचे मोठेपण नाही. ते नखशिखांत ग्रंथकार होते. ग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते. ग्रंथांच्या सहवासात राहण्याची संधी मिळते आणि बुद्धिजीवी राहताना इतरांनाही शहाणे करून सोडता येते यासाठी ते पत्रकारितेत आले. विविध विषयांवरील ग्रंथांचे परिशीलन करावे, त्यातील उत्तमोत्तम ग्रंथांचा संग्रह करावा यावर त्यांचे विलक्षण प्रेम. टिकेकरांसाठी आयुष्यात श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही ग्रंथच होते. हे ग्रंथप्रेम त्यांना रक्तातूनच आलेले. त्यांचे वडील लेखक होते. काका श्री. वा. टिकेकर हे महाराष्ट्रातील काही अग्रगण्य विद्वानांत गणले जातात. त्यांचा उत्तम ग्रंथसंग्रह होता. मुंबई विद्यापीठास ललामभूत असणारा तेथील ग्रंथसाठा निगुतीने उभारण्यात आणि सांभाळण्यात टिकेकरांचे ज्येष्ठ बंधू अरिवद यांचा मोठा वाटा आहे. टिकेकर याच पुस्तकांच्या गावात गेले. आधी विद्यापीठ आणि पुढे एके काळी आदर्श असणारा टाइम्स समूहाचा संदर्भ विभाग टिकेकरांनी अधिक नावारूपास आणला. त्या काळी देशा-परदेशातील विद्वान अनेक स्थानिक आणि अन्य संदर्भ शोधण्यासाठी टाइम्स समूहाच्या संदर्भ विभागात येत. अशा समानधर्मीयांत राहणे टिकेकरांसाठी अवीट आनंददायी असे. डोळ्यावरती जाड काडय़ांचा चष्मा, पांढरा फुलशर्ट आणि मूठ बंद करून सिगरेटचा सणसणीत झुरका घेत हव्या त्या विषयांची माहिती देणारे टिकेकर महाराष्ट्रातील अनेक विद्वत्प्रेमींनी पाहिले असतील. तेथे असतानाच दुसरे तितकेच ग्रंथोपजीवी गोिवदराव तळवलकर यांच्या सहवासात ते आले आणि त्याचमुळे वृत्तपत्र जगतातही त्यांनी पाऊल टाकले. ‘लोकसत्ता’चे ते माजी संपादक. चांगला संपादक वर्तमानपत्रास आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चेहरा देतो. अर्थात तो संपादक लिहिता असला तरच हे शक्य होते. टिकेकर हे असे लिहिते होते आणि त्याचमुळे ते आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े ‘लोकसत्ता’शी संलग्न करू शकले. ‘लोकसत्ता’च्या शिरपेचात तुरा असणाऱ्या लोकरंग, चतुरंग आदी पुरवण्यांचे जनक टिकेकर होते. आठवडय़ाच्या प्रत्येक दिवशी विविध मान्यवरांना लिहिते करून नवनवी सदरे सुरू करण्याची कल्पनाही त्यांचीच. विजय तेंडुलकर, व्यंकटेश माडगूळकर, दिलीप प्रभावळकर आदी अनेकांना टिकेकरांनी पुन्हा वा पहिल्यांदाच वर्तमानपत्रीय लिखाणात आणले. किमान बौद्धिक गरजा असणाऱ्यांपासून ते विचक्षण वाचकांपर्यंत सर्वानाच वर्तमानपत्रातून दररोज काही ना काही मिळावयास हवे असा त्यांचा आग्रह असे आणि ते तो न चुकता पूर्ण करीत. प्रत्येक संपादकाचे स्वत:चे म्हणून काही राजकीय ग्रह असतातच. किंबहुना ते असायलाच हवेत. परंतु म्हणून भिन्न मते असणाऱ्यांना त्या वर्तमानपत्रांत स्थान नाही, असे झाल्यास ते संपादकाचे अपंगत्व असते. टिकेकरांना सुदैवाने त्या अपंगत्वाचा स्पर्शही कधी झाला नाही. उदारमतवादाची एक उच्च अशी सुसंस्कृत ब्रिटिश परंपरा आहे. महाराष्ट्रात आगरकर, न्या. महादेव गोिवद रानडे यांच्याशी या परंपरेची नाळ जुळते. टिकेकर यातील एक अग्रणी नाव. संपादक म्हणून प्रसंगोपात्त त्यांना अनेकांवर टीकेचे आसूड ओढावे लागले. परंतु म्हणून टिकेकरांनी त्यांच्या टीकेचे धनी व्हावे लागलेल्यांशी कधीही संवाद सोडला नाही वा वैयक्तिक आयुष्यात त्यांना निषेधार्ह लेखले नाही. संपादकाने समाजात वावरताना काही नियम पाळणे किती आवश्यक आहे, हे टिकेकर सांगत आणि त्याचप्रमाणे ते वागत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या वा व्यक्तीच्या व्यासपीठावर ते कधीही गेले नाहीत. संपादकपदी असताना चतुर आयोजकांकडून विविध मानमरातबांची गळ घातली जाते. हुशार संपादक आपली मान त्यात अडकू देत नाहीत. टिकेकर हे अशा संपादकांमधले होते.

टिकेकरांनी आयुष्यभर प्रेम केले ते फक्त ग्रंथांवर. अन्य कोणाच्याही नजरेत येण्याची शक्यता नसलेला एखादा महत्त्वाच्या विषयावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दातीत असे. त्या सुमारास त्यांची भेट झालीच तर टिकेकर आपण वाचलेल्या ताज्या ग्रंथाविषयी हरखून जाऊन बोलत. हे त्यांचे विवेचन इतके प्रभावी असे की अनेक ग्रंथेच्छुकांनी केवळ टिकेकरांकडून ऐकले म्हणून अनेक पुस्तके खरेदी केली असतील. हाताशी पुस्तके असली तर त्यांना जगाची फिकीर नसे आणि हाताशी पुस्तके नाहीत अशी वेळच येणार नाही याबाबत ते कमालीचे जागरूक असत. इतरांना न दिसणाऱ्या विषयांची मांडणी करण्यातली त्यांची हुकूमत टिकेकरांनी लिहिलेल्या ग्रंथातूनही दिसते. ब्रिटिशकालीन किंकेड पितापुत्रांवर त्यांनी लिहिलेले पुस्तक याची साक्ष देईल. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचा टिकेकर यांनी लिहिलेला इतिहास, विद्यापीठाच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान आहे. त्यांचे वेगळ्या अर्थाने चíचले गेलेले पुस्तक म्हणजे मुंबई डी-इंटलेक्चुअलाइज्ड. या महानगरीचे बौद्धिक विश्व कसे आकसत चालले आहे आणि त्याबद्दल कोणालाच कशी खंत नाही याचे बौद्धिक तरीही रसाळ विश्लेषण या ग्रंथात आहे. एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे सर्वच शहरांची व्यथा असे म्हणता येईल. संपादकपद आणि लेखक याखेरीज त्यांच्या नावावर असलेले अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे प्रमुखपद. केवळ शहर वा राज्यातीलच नव्हे, तर देशातीलही अत्यंत आघाडीची संस्था आणि सर्वात मोठे वाचनालय असलेल्या एशियाटिकच्या पुनरुज्जीवनात टिकेकरांचा वाटा मोठा आहे. सलग दोन खेपेस टिकेकर या संस्थेचे अध्यक्ष होते.

संपादक म्हणून टिकेकर उच्च आणि उदात्त ब्रिटिश परंपरेचे अनुयायी होते. संपादकाने आपले छायाचित्र आपल्याच वर्तमानपत्रांत छापू नये असा साधा नियमदेखील त्यांनी इमानेइतबारे पाळला आणि उगा जगास मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे असे मानून गावगन्ना भाषणे देत िहडणेदेखील त्यांनी टाळले. संपादकपदावरून पायउतार झाल्यानंतरचे त्यांचे वर्तन तर आदर्शवत होते. निवृत्त झालेला संपादक हा दात पडलेल्या वाघासारखा असतो. अंगी वाघपण असते, पण दात नसतात. अशा वेळी आपल्यातील व्याघ्रत्वाचा आब राखीत आपल्या गुहेत चिंतन-मनन आणि ग्रंथवाचन करीत राहण्यातच त्यांनी आनंद मानला. आज त्यांच्या या आनंदास पूर्णविराम मिळाला. बौद्धिक आणि सांस्कृतिक अवकाश झपाटय़ाने आकुंचित पावत असताना, रामदासांच्या शब्दात सांगावयाचे तर, ‘सावध, साक्षेपी, साधक’ टिकेकरांचे जाणे हे चटका लावणारे आहे. समस्त लोकसत्ता आणि एक्स्प्रेस समूहातर्फे त्यांना आदरांजली.