कथित भ्रष्टाचाराचा नि:पात आणि राष्ट्रवादी उन्मादाची निर्मिती या भांडवलावर क्षी जिनपिंग केवळ दुसरा कालावधी नव्हे, तर इतिहासातही स्थान मिळवतील!

मी सत्तेवर आल्यानंतर अर्थविकासातील सर्व अडथळे दूर करेन, माझी धोरणे उद्योगस्नेही असतील, माझ्या राजवटीत खासगी क्षेत्रास मुक्त वाव दिला जाईल आणि मी भ्रष्टाचार समूळ नष्ट करेन. ही आणि अशी आश्वासने आपल्या ओळखीची वाटत असली तरी ती भारतात दिली गेलेली नाहीत. ती चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सहा वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत दिली होती. ही आश्वासने ज्याप्रमाणे आपल्या परिचयाची आहेत त्याप्रमाणे त्यांचे पुढे काय होते हेदेखील आपणास ठाऊक आहे. यांतील योगायोगाचा भाग म्हणजे भारतीय नागरिकांप्रमाणे आपले शेजारी सर्वसामान्य चिनी नागरिक, उद्योजक आदी याचाच प्रत्यय सध्या घेत आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेचे – म्हणजे पर्यायाने आपलेही- पुढे काय होणार या प्रश्नाने चिंतित आहेत. या चिनी वास्तवाचा आताच वेध घेण्याचे कारण म्हणजे बीजिंग येथे बुधवारी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवार्षिक राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ झाला असून तीत अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची या पदावर फेरनिवड केली जाईल. इतकेच नव्हे तर आधुनिक चीन उभारणीत अनन्यसाधारण महत्त्व असलेले डेंग शियाओपिंग आणि सांस्कृतिक क्रांतीचे प्रणेते माओ झेडाँग यांच्या मालिकेत क्षी यांना या अधिवेशनानंतर बसवले जाईल. म्हणजेच क्षी हे चीनचे सर्वश्रेष्ठ हयात नेते ठरतील.

याचाच अर्थ क्षी जिनपिंग आणखी सहा वर्षांसाठी चीनचे सर्वेसर्वा होतील, याबाबत कोणाचेही दुमत नाही. जिनपिंग यांच्या सत्तासातत्याच्या दुंदुभी गेले काही महिने सातत्याने वाजत होत्या. जिनपिंग किती महान आहेत, जिनपिंग यांच्या काळात देशाने किती प्रगती केली आहे, जिनपिंग यांच्यामुळे चीनचे स्वत्व कसे जागे झाले आहे, जिनपिंग हे किती द्रष्टे आहेत आदी जाहिरातींचा मारा चिनी जनतेवर सातत्याने सुरू असून त्यातून जिनपिंग यांची सत्तापकड किती घट्ट आहे तेच तेवढे सिद्ध होते. आपल्या राजकीय विरोधकांना एकापाठोपाठ एक संपवणे यात जिनपिंग वाकबगार मानले जातात. सन झेंगसाई, बो झिलाई, हु चुनहुआ असे एकापेक्षा एक तगडे नेते हे चीनच्या राजकीय क्षितिजावरून अचानक अंतर्धान पावत गेले. यातील सन हे तर जिनपिंग यांचे कृषिमंत्री होते. पेशाने संशोधक असलेल्या सन यांची जनमानसातील प्रतिमाही उत्तम होती आणि देशाचा संभाव्य नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु जुलै महिन्यात सरकारी मालकीच्या पीपल्स डेली या वृत्तपत्रांत त्यांच्यावर यथेच्छ टीका केली गेली. तेथेच त्यांचा घडा भरल्याची जाणीव अनेकांना झाली. नंतर सन गायब झाले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवला गेला. काही वर्षांपूर्वी बो झिलाई यांचीही अशीच अवस्था झाली. अत्यंत कर्तबगार नेता म्हणून त्यांचा नावलौकिक होत असताना त्यांच्यावरदेखील भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले गेले आणि पाच वर्षांच्या कारावासासाठी त्यांची रवानगी तुरुंगात झाली. हु हे ग्वांगडोंग प्रांताचे तडफदार प्रमुख म्हणून ओळखले जात होते. त्यांच्यावरही पीपल्स डेलीच्या माध्यमातून टीका केली गेली. पण ते तुलनेत नशीबवान. कारण त्यांना तुरुंगवास आदी शिक्षा सहन करावी लागली नाही. केवळ पदावनतीवर त्यांची सुटका झाली. चिनी अभ्यासक याचे अनेक दाखले देतात. परंतु त्या साऱ्यांचा अर्थ एकच. क्षी जिनपिंग यांची पक्षावर आणि म्हणून प्रशासनावरही असलेली जबरदस्त पकड. त्यामुळेच आपल्याला चुकूनही आव्हान निर्माण होणार नाही याची पूर्ण शाश्वती त्यांना असून त्याच पाश्र्वभूमीवर भरणाऱ्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या या अधिवेशनात क्षी जिनपिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याखेरीज अन्य काही करण्याची मुभा यात सहभागी होणाऱ्या २२८० प्रतिनिधींना नाही. तेव्हा त्या अर्थाने ही पंचवार्षिक परिषद हा केवळ उपचार आहे. तरीही तिची दखल घ्यावी लागते.

याचे कारण जागतिक अर्थ, राज आणि संरक्षण व्यवहारांत चीन या देशाने प्राप्त केलेले स्थान. आज अमेरिकेशी स्पर्धा करण्याची क्षमता असलेली चीन ही एकमेव अर्थव्यवस्था आहे. या दोन देशांतील अंतर आज मोठे आहे, हे कबूल. साधारण १९ लाख कोटी डॉलर इतक्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोर नऊ लाख कोटी डॉलरची चिनी अर्थव्यवस्था निम्म्यापेक्षाही कमी आहे, हे तर खरेच. परंतु तरीही तिचा वाढीचा वेग आणि क्षमता ही केवळ अतुलनीयच आहे. जागतिक ऊर्जा बाजारपेठ, जागतिक खनिज बाजारपेठ आणि जागतिक वित्तीय बाजारपेठ आदींत आज चीनला सहभागी करून घेतल्याखेरीज व्यवहार करता येणे केवळ अशक्य आहे. हे श्रेय क्षी जिनपिंग यांचे. त्यांची पूर्वसुरी हू जिंताओ यांच्या सपक आणि निष्प्रभ कार्यकालाच्या तुलनेत क्षी जिनपिंग यांच्या काळात चीनने मारलेली मुसंडी ही भल्याभल्यांच्या अचंब्यांचा आणि अभ्यासाचा विषय आहे. जागतिक पातळीवर चीन हा महासत्ता म्हणून उभा राहण्यात त्याचमुळे क्षी यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते आणि ते खरेही आहे. परंतु म्हणून त्याच वेळी त्यांनी अंतर्गत अर्थकारण आणि राजकारण यांतील त्यांचे दुष्टबुद्धी राजकारण दुर्लक्ष करण्यासारखे नाही. चिनी उद्योगविश्वास आश्वासन दिलेली मुक्तता त्यांनी अजूनही दिलेली नाही. किंबहुना त्यांच्या काळात असलेल्या स्वातंत्र्याचा संकोच होणे चिनी उद्योगविश्वाने अनुभवले. सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांना जिनपिंग यांच्या काळात सर्वाधिक प्राधान्य मिळणे ही बाबदेखील सूचक मानली जाते. यापुढच्या काळात कम्युनिस्ट पक्षाचा प्रशासन आणि उद्योगातील हस्तक्षेप अधिकाधिक वाढत जाईल, अशीही चिन्हे आहेत. या अधिवेशनात सर्वाधिक लक्ष असेल ते वँग किशान यांच्याकडे. ते जिनपिंग यांच्या कथित भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे प्रमुख मानले जातात. भ्रष्टाचार प्रतिबंधाच्या नावाखाली त्यांना प्रचंड अधिकार देण्यात आले असून काहींच्या मते तेच जिनपिंग यांचे उत्तराधिकारी असू शकतात. परंतु ती शक्यता संभवत नाही. याचे कारण त्यांचे वय. ते ६९ वर्षांचे आहेत आणि ६७ पेक्षा अधिक वयाच्या पदाधिकाऱ्यांना उच्चपदे दिली जात नाहीत, असा संकेत आहे. तसेच देशातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे श्रेय वँग यांना दिले गेल्यामुळे उलट जिनपिंग त्यांच्यावर नाराज आहेत, असे म्हणतात. आपल्यापेक्षा अन्य कोणावरही प्रसिद्धीचा झोत पडलेला त्यांना चालत नाही. त्यात न्यूयॉर्कस्थित धनाढय़ गुओ वेंगुई यांनी अमेरिकेतून कम्युनिस्ट पक्षाच्या वँग यांच्यासह सर्वच ज्येष्ठ  पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने वातावरणात अधिकच गोंधळ निर्माण झाला आहे. या उद्योगपतीच्या मागे जिनपिंग यांचाच वरदहस्त आहे किंवा काय अशीही शंका व्यक्त होते. बो झिलाई यांच्याविरोधात अचानक असेच आरोप सुरू झाले आणि नंतर त्यांच्यावर कारवाई झाली, याचेही स्मरण या निमित्ताने करून दिले जात आहे. तथापि एक मुद्दा या सगळ्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे.

तो आहे २०२२ साली तरी क्षी जिनपिंग पदत्याग करणार का? चिनी संकेतांनुसार अध्यक्षांस दुसऱ्या खेपेनंतर पुन्हा नेतृत्व करता येत नाही. परंतु रशियाच्या व्लादिमीर पुतिन यांच्याप्रमाणे क्षी जिनपिंग हे घटनेस वळसा घालून हा संकेत पाळावा लागणार नाही अशी व्यवस्था करतील, अशी दाट शंका अनेक जण व्यक्त करतात. ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने क्षी जिनपिंग यांनी आपले महत्त्व अधिकाधिक वाढेल आणि ते अबाधित राहील अशी व्यवस्था केली आहे ते पाहता त्यांची तिसऱ्या खेपेचीच तयारी आहे, असे मानले जाते. जिनपिंग यांचे दोन यशोविषय. एक म्हणजे कथित भ्रष्टाचाराचा नि:पात आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादी उन्मादाची निर्मिती. त्यांना नागरिकांत देशप्रेम निर्माण करावयाचे आहे. हे दोन्ही मुद्दे तसे आपल्या परिचयाचे. एकीकडे हिंदुत्ववादी सरकार आहे तर दुसरीकडे साम्यवादी. परंतु या दोन टोकांच्या मुद्दय़ांना जोडणाऱ्या विचारसरणींच्या पोकळ वादांतून त्यांतील निर्थक संवादीपणाच दिसून येतो. म्हणूनच कालपासून सुरू झालेले चिनी कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन आपल्याला शिकवून जाणारे आहे.