अधिकारपदस्थांचा अप्रामाणिकपणा आणि कर्तव्यच्युती यांतून आसारामसारखे विषाणू फोफावतात..

आसाराम बापूस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीश मधुसूदन शर्मा यांचे त्रिवार अभिनंदन. या बोगसबाबास शिक्षा व्हावी यासाठी जी तरुणी आणि तिचे कुटुंबीय ठामपणे उभे राहिले त्यांचे तर कौतुक करावे तितके कमीच. आसारामास लैंगिक अत्याचारांत मदत करणाऱ्या दोघा सहकाऱ्यांनाही न्यायालयाने २० वर्षे खडी फोडण्याची शिक्षा दिली हेदेखील फार छान झाले. या देशात अत्यंत किफायतशीर, सुरक्षित आणि बिनभांडवली असा कोणता व्यवसाय असेल तर तो बाबा, बापू, कोणती तरी माँ किंवा माताजी होणे हा. अशातीलच एक आसाराम एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी दोषी ठरवला गेला. त्याच्या अत्याचारास बळी पडलेली तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी जर कच खाल्ली असती तर आसाराम पुन्हा धर्मगुरू म्हणवून मिरवू शकला असता. ज्या अभागी बालिकेवर या आसारामाने स्वतस लादले ती या आश्रमात शिक्षणासाठी राहत होती. २०१३ सालच्या १५ ऑगस्टच्या रात्री तिला या आसारामाने आपल्या कक्षात बोलावून लैंगिक अत्याचार केले. तिला बाधा झाली आहे आणि बापूंच्या ‘खास प्रसादा’ने ती दूर होईल असे सांगत आसारामच्या महिला सहकाऱ्याने या मुलीस बाबाकडे जाण्यास भरीस पाडले. हे घृणास्पद कृत्य येथेच संपत नाही. त्यानंतर या मुलीने तक्रार दाखल करू नये म्हणून त्याने जंगजंग पछाडले. अनेकांना धमकावले, तिच्या कुटुंबीयांना दरडावले, इतकेच नव्हे तर या प्रकरणातील काही साक्षीदारांना यमसदनास पाठवले गेले. परंतु तरीही हे कुटुंब दबले नाही. ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या मुख्याध्यापकास धमकावण्यापर्यंत आसाराम आणि त्याच्या भक्तगणांची मजल गेली. या मुख्याध्यापकावर दबाव कसला? तर सदर मुलीची जन्मतारीख अशी बदलायची की ती सज्ञान ठरू शकेल. आणि तशी ती सज्ञान ठरवली गेली की अल्पवयीनांवरील अत्याचार या आरोपाचे रूपांतर दोन सज्ञानींत परस्परांच्या संमतीने झालेला व्यवहार असे करता येईल. परंतु या शाळेच्या मुख्याध्यापकांनीदेखील कच खाल्ली नाही. अशा तऱ्हेने सर्व संबंधितांच्या निर्धाराने हे प्रकरण धसास लागले आणि आसारामवरील आरोप सिद्ध झाले. या खेरीज आणखीही दोन महिलांनी आसारामवर बलात्काराचा आरोप केलेला आहे. या सगळ्यांतून आणखी एक बाब सिद्ध होते.

ती ही की, आपल्याकडील  व्यवस्था अत्यंत अशक्त.  हाती कोणतेही भांडवल नाही, कसलीही शैक्षणिक वा व्यावसायिक पात्रता नाही आणि तरीही तब्बल १० हजार कोटींची संपत्ती हा इसम अवघ्या चार दशकांत जमा करू शकला. स्थावर मालमत्तेचे मूल्य वेगळेच. ती किती ठिकाणी असावी? देशभरात साधारण ४०० इतके आश्रम या आसारामाने उभारलेले आहेत. भल्याभल्या उद्योगपतींनाही ही इतकी संपत्ती निर्मिती जमणारी नाही. आणि हा असा एकच नाही. असे रग्गड बाबा, बापू आणि माँ माताजींचे तण या देशात माजलेले आहे. कोणी आपल्या भक्तास मिठीतून प्रसाद देते, कोणी लत्ताप्रहारात आशीर्वाद देते, कोणी स्वतला कम्प्युटरबाबा म्हणून घेते, कोणी नुसताच भय्यू तर कोणी बिग बॉससारख्या भिकारोत्तम कार्यक्रमात सहभागी होत महिलांच्या अंतर्वस्त्राचा ब्रॅण्ड बाजारात आणते. एक डिस्को बाबा तर दुसरा इच्छाद्री. असे किती सांगावेत. आपल्या सामुदायिक बौद्धिक क्षमतेची आणि व्यवस्थाशून्यतेची लक्तरे तेवढी यातून वेशीवर टांगली जातात. एखाद्या प्रामाणिक करदात्याकडून कर भरण्यास प्रामाणिक विलंब झाला तरी त्याच्यावर डाफरणारी सरकारी यंत्रणा या असल्या भिकार बाबा-बापूंसमोर शेपूट घालून असते. या आसारामाने किती कर भरला, या बाबा-बापूंच्या पायावर लोळण घेणारे कोण असतात, ते इतक्या मोठय़ा देणग्या आपल्या बाबा-बापूस कशा देतात, त्यासाठी कोणत्या मार्गानी त्यांनी उत्पन्न कमावलेले असते वगैरे एकही प्रश्न आपल्या डोळ्यादेखत सर्व काही घडत असताना सरकारी अधिकाऱ्यांना पडत नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांचे हे असे का होते?

कारण त्यांच्यातील वातकुक्कुटतेचा गुणधर्म. आपल्या सरकारी यंत्रणेचा नूर हा बहुतेकदा वाऱ्याच्या दिशेप्रमाणे बदलतो. आपल्याला चारा घालणाऱ्यास जे वंदनीय ते ते दुर्लक्षणीय हे या सरकारी अधिकाऱ्यांचे तत्त्व. हे चारा घालणारे म्हणजे राजकारणी. त्यातही विशेषत सत्ताधारी. ते ज्याच्या पायावर डोके ठेवतात त्या पायांना सरकारी अधिकारी कधीही वेसण घालण्यास जात नाहीत. त्यामुळे या बाबा-बापूंचे आश्रम उभे राहतात, ते अमाप संपत्ती गोळा करतात आणि राजकीय आशीर्वादाच्या जोरावर वाटेल ते उद्योग करतात. तरी सरकार त्यांना हात लावत नाही. अलीकडेच वादग्रस्त ठरलेल्या, गुरमीत बाबा रामरहीम असे टिनपाट बॉलीवूडी नाम धारण करणाऱ्याकडे आणि या आसारामाकडे आशीर्वादासाठी गेलेला नाही असा राजकीय नेता अभावानेच आढळेल. आता या नेत्यांनी बाबाचरणी डोके ठेवले त्याच्या ध्वनिफिती समाजमाध्यमांत वाऱ्यासारख्या फिरत आहेत. त्या पाहिल्या की कोणाही सदसद्विवेकबुद्धी जागरूक  असणाऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कोणी यास युगपुरुष म्हणाले तर अन्य कोणी आपल्या अडचणीच्या काळात आसारामाने कसा पािठबा दिला याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कोणालाही उत्तरदायी नाही अशी व्यवस्थेबाहेरील अधिकारकेंद्रे आपल्याकडे तयार होतात, हे लाजिरवाणे आहे. हे असे होते याची प्रमुख कारणे दोन.

पहिले म्हणजे अशक्त राजसत्तेला ही अशी बेगडी धर्मसत्ता आधार पुरवते आणि एकमेकांच्या पािठब्यातून दोघांचेही भले होत राहते. त्यामुळे त्यांना कोणतीही आडकाठी आणली जात नाही. आणि दुसरे म्हणजे अधिकृत व्यवस्था या संवेदनाहीन आणि अशक्त दोन्ही असल्यामुळे सामान्य माणसास वाली नाही. मानसिकदृष्टय़ा पिचलेला, गोंधळलेला लाखोंचा समाज या असल्या बेगडी बाबांच्यामागे जातो कारण त्यास अधिकृत व्यवस्थेकडून कसलाच आधार मिळत नाही. कोणत्याही मानसिक आजाराची संभावना वेडा अशा शब्दांत करणाऱ्यांचा हा समाज वर्तमानातील हालअपेष्टांसाठी पूर्वजन्मातील पापास दोष देण्याचा भोंगळ मार्ग पत्करतो म्हणून अशा बाबांचे फावते. अशा वेळी समाजास बुद्धीचा, तर्काचा विवेकी मार्ग दाखवण्याची गरज असते. ते राहिले दूर. विज्ञानवादाची कास धरण्याऐवजी आपण पुराणातील वानग्यांनाच वंदनीय मानू लागलो असून या असल्या भोंदूंना अधिकृत मंत्रिपदाचा दर्जा देण्यापर्यंत अधोगती करून बसलो आहोत. याचा परिणाम असा की बाबा-बापूगिरी केल्याने मंत्रिपद मिळू शकते असाच संदेश सरकारकडून गेला असल्याने त्याच्या इच्छुकांची संख्या कमी होण्याऐवजी उलट वाढणारच. सर्व पर्यावरणीय संकेतांना धाब्यावर बसवल्यानंतरही देशातील सर्वोच्च सत्ताधीश अशाच कोणा बाबा-बापूस राजमान्यता देत असेल तर ते कसले द्योतक असते? देशापुढील अत्यंत जटिल अशी काश्मीर समस्या, राजकीय रंगात रंगलेला अयोध्येतील मंदिर-मशीद वाद आदींतून मार्ग काढण्याची जबाबदारी राजकीय सत्तेपेक्षा कोणती तरी बोगस धर्मसत्ताच स्वतच्या शिरावर घेणार असेल तर ते काय दर्शवते? या प्रश्नांना भिडण्याइतका प्रामाणिक विवेक आपल्याठायी आहे का हा खरा प्रश्न आहे.

आणि नाही हे त्याचे उत्तर आहे. या असल्या बाबा-बापूंची वाढ निर्वात पोकळीत होत नाही. अधिकारपदस्थांचा अप्रामाणिकपणा आणि कर्तव्यच्युती यातून हे असले विषाणू फोफावतात. ‘हे असे राम की ज्यांच्या हजार सीता’, असे कवी सुरेश भट एका रामाविषयी म्हणाले होते. शिक्षा झालेला आसाराम यातलाच एक. त्यांची पदास रोखायची असेल तर शुद्ध विज्ञान आणि विवेकाची कास धरायला हवी. त्याची सुरुवात सत्ताधाऱ्यांपासून होते.