17 February 2019

News Flash

‘शहाणे’ करून सोडावे..

विशेषत: शहाणे यांचे भाषेविषयीचे काही मूलभूत विचार नोंद घ्यावी असे.

अशोक शहाणे यांच्या प्रकट मुलाखतीतील त्यांचे भाषेविषयीचे काही विचार मूलभूत आहेत, विवाद्य ठरले तरी चिंतनीय जरूर आहेत..

छत्रपती शिवाजी महाराजांवरील सर्वात उत्तम चरित्र महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे मानले जाते. कारण त्यांनी ते लिहिलेच नाही. मायकेल हेझलटाइन यांचे वर्णन ग्रेट ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असे केले जाते. कारण ते कधीही पंतप्रधान झाले नाहीत. तद्वत एकविसाव्या शतकात मराठीतील प्रतिभाशाली भाष्यकारपदाचा मान अशोक शहाणे यांना दिला जातो. कारण त्यांनी फारसे काही लिहिले नाही. शहाणे बोलतात. लेखनाचा त्यांना मनापासून कंटाळा. त्यामुळे त्यांचे बोलणे हाच दस्तावेज. वास्तविक या महाराष्ट्रात बोलघेवडय़ांची वानवा नाही. अलीकडेपर्यंत वक्त्यांचे पीकही तसे उदंडच होते आपल्याकडे. परंतु शहाणे हे अशा फडर्य़ा, बैठकजिंकू वक्त्यांत मोडत नाहीत. किंबहुना शहाणे कशातच मोडत नाहीत. तरीही त्यांची दखल घ्यावी लागते. याचे कारण त्यांची अफाट वाचनसाधना. जवळपास पन्नासच्या दशकापासून हा गृहस्थ डोळसपणे वाचत आहे. मराठी, इंग्रजी तसेच बंगाली भाषांतील उत्तमोत्तम साहित्याचे रसग्रहण ते करीत आहेत. त्यांच्यात मूलत: असलेल्या तुच्छतावादास अतिवाचनामुळे एक प्रकारची धार आलेली आहे. शहाणे ती कधीही लपवण्याच्या फंदात पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यानेसुद्धा बऱ्याच जणांच्या अंगावर ओरखडे उमटतात. काही तर रक्तबंबाळ होतात. पण शहाण्यांना त्याची फिकीर नाही. शिवाय अशी फिकीर करून बरेच काही पदरात पाडून घेण्याचा व्यावहारिक चतुरपणा त्यांच्या अंगी नसल्यामुळे त्यांचे यामुळे काही अडतही नाही. तेव्हा एवंगुणवैशिष्टय़धारी शहाणे बरेच दिवसांनी बोलते झाले. अंबरीश मिश्र यांच्यासारख्या दिलाच्या वाङ्मयप्रेमीने त्यांना ठाणे येथे जाहीर बोलते केले. अनेक चोखंदळ वाङ्मयप्रेमींप्रमाणे मिश्र यांचाही शहाणे यांच्यावर जीव आहे. प्रसंगी शहाणे कसेही फसफसतात. त्यामुळे अनवस्था प्रसंग ओढवू शकतो याची जाणीव मिश्र यांना आहे. त्यामुळे त्यांनी शहाणे यांना काळजीपूर्वक हाताळल्याने ही मुलाखत लक्षणीय ठरली.

विशेषत: शहाणे यांचे भाषेविषयीचे काही मूलभूत विचार नोंद घ्यावी असे. आपल्याकडे संस्कृतविषयी एक सतत गूढगंभीर आदर व्यक्त केला जातो. जे समजत नाही ते मोठे मानण्याच्या प्रवृत्तीतून ते होत असावे कदाचित. परंतु संस्कृत ही भाषेच्या समृद्धीची परिपूर्ती मानण्याकडेच सगळ्यांचा कल. वास्तविक कला, भाषा, संगीत अशा क्षेत्रांत अंतिम सत्य असे काही नसते. ही क्षेत्रे कायम विकसित होत असतात. परंतु संस्कृतचा संबंध आला की भल्याभल्यांचा विवेक सुटतो आणि या भाषेसमोर नतमस्तक होण्यातच धन्यता मानली जाते. काही वर्षांपूर्वी विख्यात विधिज्ञ नानी पालखीवाला यांनी ही संस्कृत ही संगणकासाठी आदर्श भाषा असल्याची एक लोणकढी ठेवून दिल्याचे अनेकांना स्मरावे. अशा वेळी संस्कृतच्या दैवतीकरणाचा बुरखा शहाणे फाडतात ते महत्त्वाचे ठरते. संस्कृत ही परिपूर्ण भाषा असती तर प्राकृत आणि नंतर त्यातून मराठीचा जन्म झालाच नसता, हे शहाणे यांचे विधान भाषाशास्त्रीयदृष्टय़ा शंभर टक्के पटणारे आहे. त्यास एक व्यापक सामाजिक संदर्भदेखील आहे. भाषा ही अभिव्यक्तीचे माध्यम असते. व्यक्तीस जे काही अभिव्यक्त व्हावयाचे असते ते ती उपलब्ध भाषेच्या साह्य़ाने व्यक्त होते. परंतु अभिव्यक्तीस उपलब्ध भाषा अपुरी ठरू लागली की नव्या भाषेचा जन्म होतो, हा शहाणे यांच्या प्रतिपादनाचा अर्थ. तो विवाद्य ठरू शकेल. परंतु तो चिंतनीय आहे हे निश्चित. या संदर्भात साधे उदाहरणच द्यावयाचे तर ‘िहग्लिश’ या नवशहरी भाषासंकराचे देता येईल. आधुनिक अर्धनागरी, अर्धसुसंस्कृत तसेच अर्धसाक्षर समाजाच्या अभिव्यक्तीसाठी ना िहदी पूर्णत: समर्थ ठरली ना इंग्रजी. म्हणूनच यातून हिंग्लिश या संकराचा जन्म झाला. संस्कृतचेही असेच झाले असावे. वाढत्या विविध वर्गीय समाजाच्या अभिव्यक्ती- गरजांसाठी ती अपुरी पडू लागल्यावर आधी प्राकृत आणि त्यातून पुढे मराठीचा उगम झाला असावा, असे मानण्यास जागा आहे. सर्व भाषा एकसारख्या असत्या तर नवीनांची निर्मितीच झाली नसती, असे सांगत शहाणे यांनी व्रज आणि तीमधून विकसित झालेल्या बंगाली भाषेचा दाखला दिला. संत ज्ञानेश्वर मराठीच्या संदर्भात अमृतातेही पजा जिंकण्याची भाषा करतात याचा अर्थ त्यांनी मराठीची बरोबरी संस्कृतशी केलेली असते, हे शहाणे यांचे म्हणणे सांस्कृतिकदृष्टय़ा अनेकांना न पेलणारे असले तरी भाषिकदृष्टय़ा त्यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी. या विधानाने ज्ञानेश्वरांनी एका फटक्यात संस्कृतच्या मर्यादा दाखवून दिल्या. या विधानाकडे केवळ तार्किकदृष्टय़ा पाहिल्यास त्याची यथार्थता लक्षात यावी. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहावी असे वाटले याचाच अर्थ त्यांना संस्कृतच्या मर्यादा जाणवल्या असा असू शकतो.

संस्कृतीचे आंतरशाखीय ठिपके जोडण्याचे शहाणे यांचे कसब नेहमीच कौतुकास्पद असते. एखाद्याने का आणि कधी लिहावे या प्रश्नावर त्यांचे उत्तर : साहवेना झाल्यावर आई जशी गर्भास आपल्यापासून विलग करते, तितकी उत्कटता लेखनात हवी हे विधान मूळचे पंजाबी उर्दू लेखक राजिंदर सिंग बेदी यांचे हे ते आवर्जून सांगतात. मराठीत तुकाराम आणि स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक हे आणि इतकेच त्यांचे आवडते लेखक. अन्यांची मराठी तितकीशी त्यांना पसंत नाही. बा. सी. मर्ढेकर यांच्या अनेक कवितांतील कारागिरी त्यांना खुपते. भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या कादंबरीच्या भाषाशैलीची चिकित्सा झालेली नाही आणि ती व्हायला हवी, असे त्यांना वाटते. अर्थात मराठीत कोणी अभ्यासक शिल्लक असतील तर, असे एक खास शहाणे खुसपटही ते या संदर्भात नोंदवण्यात मागेपुढे पाहत नाहीत. वातावरणात असहिष्णुता सध्या वाढलेली आहे, हे त्यांना मंजूर नाही. ‘ती सोळाव्या शतकापासूनच होती. अन्यथा तुकारामाची गाथा बुडवली का गेली असती,’ असा त्यांचा बिनतोड प्रश्न. साठच्या दशकात ‘मराठी साहित्यावर क्ष-किरण’ लिहिल्याने शहाणे एकदम वादग्रस्त ठरले. त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ना. सी. फडके, पु. भा. भावे अशांच्या लेखनाच्या मर्यादा शहाणे यांनी त्या लेखातून दाखवून दिल्या. तो लेख प्रस्थापित मराठी साहित्य विश्वाला चांगलाच झोंबला. त्यातूनच या प्रस्थापितांचे मठाधिपती श्री. पु. भागवत आणि मौज संप्रदाय यांचे या नवलेखकांशी खटके उडाले. वयाची तिशीही न गाठलेले शहाणे, त्यांच्या आसपास असलेले भाऊ पाध्ये आदींमुळे साहित्य-वृक्षास त्या वेळी एक वेगळीच फांदी लागली. परंतु असे जरी असले तरी शहाणे स्वत:ला विद्रोही मानत नाहीत. तथापि त्या काळी त्यांनी चालवलेली लघुअनियतकालिकांची चळवळ हा एक प्रकारे पुढल्या अनेक बंडांचाच झेंडा होता.

तो शहाणे यांच्या खांद्यावरून अद्यापही उतरलेला नाही. तो उतरण्याची शक्यताही नाही. कारण त्यामागे शहाणे यांचा अभिनिवेश नाही. ते लोकाभिमुख जरूर आहेत. पण लोकानुरंजनवादी (पॉप्युलिस्ट या अर्थी) नाहीत. अशा पद्धतीने जगणाऱ्यांच्या भूमिकेस एक राजकीय रंग असतो. तो तसा असावा का? आणि मुळात लेखकाने राजकीय भूमिका घ्यावी का? घेतल्यास त्याचे लिखाण प्रचारकी होते का? यावर शहाणे म्हणाले : मुळात लिखाण ही एकान्त क्रिया आहे आणि वाचनही तसेच असते. राजकीय भूमिका वगैरे नंतर. मुदलात ते लेखन कसे आहे, हे महत्त्वाचे. परंतु मराठीचे दुर्दैव हे की इतकी उत्कटता असणाऱ्या शहाणे यांनी लिहिलेले मात्र फारसे नाही. त्यांनी लिहावे. सकल जनांना ‘शहाणे’ करून सोडणे ही लेखकाची जबाबदारी असते.

First Published on April 3, 2018 2:10 am

Web Title: ashok shahane interview marathi literature