पर्ल हार्बर हल्ल्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत, दुसऱ्या महायुद्धोत्तर युगाच्या शेवटाची सुरुवात होते आहे..

इतिहासातून द्वेषाचे बाळकडू देण्याऐवजी, अशा भयंकर घटना टाळण्यासाठी काय करावे ही शहाणीव जपानने जागृत केली. वर्तमानात जगणाऱ्या अमेरिकेचीही साथ यात होती. त्यामुळे हे दोन देश कटुता कधीच विसरले होते हे खरे; पण उभय देशांच्या प्रमुखांनी एके काळच्या शत्रुराष्ट्रातील संहारस्थळी पुष्पांजली वाहणे, या कृतीस निराळे महत्त्व आहे. अर्थात, अविवेक किंवा युद्धज्वर यामुळे संपत नाही..

डोंगर आणि युद्ध हे नेहमी दुरूनच साजरे दिसतात. मागे आखाती युद्धाच्या वेळी सीएनएन या अमेरिकी वृत्तवाहिनीने युद्ध थेट दूरचित्रवाणी पडद्यावर आणल्यानंतर तर ते एक छानसे ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटकच बनले. तशा युद्धाच्या कथा नेहमीच रम्य वगैरे असत. पण या दूरचित्रवाणी पडद्याने त्या जरा अतिच रंजित बनविल्या. म्हणजे मध्यंतरी आपल्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर एका दूरचित्रवाणी वाहिनीने स्टुडिओतच युद्धाचा सेट वगैरे लावून त्याच्या बातम्या दिल्या होत्या. पण मुळात युद्ध असे नसते. ते विध्वंसक असते, विनाशकारी असते. याचा अनुभव जपानइतका अन्य कोणत्याही राष्ट्रास नसेल. तसे युद्ध लहान असो वा मोठे, त्याचा मानवी जीवनावरील दुष्परिणाम सारखाच असतो. माणसे उद्ध्वस्त होतात त्यात. तेव्हा युद्धांची तुलना करण्यात अर्थ नसतो. तरीही जपानने जे युद्ध सोसले त्याला जोड नाही. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर झाला तो जपानच्या भूमीवर. तोही एकदा नव्हे, दोनदा. दोन शहरे त्यात बेचिराख झाली. लक्षावधी माणसे भाजून, होरपळून, दगडमातीखाली गाडून मेली. काही तर नुसती हवेअभावी गेली. हा नरकभोग जपानच्या वाटय़ाला का आला, याचे साधे उत्तर आहे जपानची तेव्हाची लालसा, मग्रुरी, युद्धखोरी. त्यातून चढलेला गर्व आणि त्या माजातून अमेरिकेच्या नाविक तळावर, पर्ल हार्बरवर जपानने केलेला हल्ला. साधासुधा हल्ला नव्हता तो. दुसऱ्या महायुद्धाचा नूर पालटवला त्याने. पण त्याचे महत्त्व तेवढेच नाही. त्या एका हल्ल्याने जगाची समीकरणे बदलवली. नव्या जागतिक व्यवस्थेला वाट करून दिली. एवढेच नव्हे, तर एका नव्या जागतिक युद्धाची- शीतयुद्धाची नांदीही केली. थोडे काव्यरम्य भाषेत सांगायचे, तर त्या हल्ल्याच्या परिणामी आंतरराष्ट्रीय राजकारणाने आणि अर्थकारणाने कूस पालटली. या महिन्यात त्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

ती तारीख होती ७ डिसेंबर १९४१. दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. हिटलरची जर्मनी, मुसोलिनीची इटली युरोपात धुमाकूळ घालीत होती. आशिया खंडात जपानने फ्रेंच इंडोचायना घशात घातले होते आणि त्याची नजर आता फिलिपिन्सवर होती. त्यात अडथळा होता तो अमेरिकेचा. जपानने हे ताडले होते, की इकडच्या ब्रिटिश वसाहतींवर आक्रमण केल्यानंतर अमेरिका काही गप्प बसणार नाही. आताच फिलिपिन्सच्या संरक्षणासाठी फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे पॅसिफिक आरमार तयार ठेवले होते. या परिस्थितीत जपानपुढे दोन पर्याय होते. एक तर अमेरिकेबरोबर सुरू असलेली राजनैतिक चर्चा सुरूच ठेवायची आणि गप्प बसायचे किंवा अमेरिकेचा आशियातील काटा मोडायचा. कोणताही युद्धज्वर चढलेला देश अशा वेळी जो निर्णय घेईल तोच जपानी राज्यकर्त्यांनी घेतला. त्यांनी हवाईतील पर्ल हार्बर या अमेरिकी नौदल तळावर हल्ला करण्याचे ठरविले. त्यासाठी दिवस निवडला तो रविवारचा. त्या दिवशी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी पर्ल हार्बरवर जपानी विमानाने पहिला बॉम्ब टाकला. आणि मग एकामागोमाग एक अशा तब्बल ३५३ लढाऊ विमानांनी त्या तळावर बॉम्बगोळ्यांचा पाऊस पाडला. अपरिमित नुकसान झाले त्यात अमेरिकेचे. चार युद्धनौका बुडाल्या. चारांचे नुकसान झाले. १८८ विमाने त्या तळावर होती. ती उद्ध्वस्त झाली. आणि जीवितहानी.. तो आकडा होता दोन हजार ४०३. विसाव्या शतकातील ७ डिसेंबरला झालेले हे ‘नऊ-अकरा’च. न्यू यॉर्कमधील त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या होती दोन हजार ९७७. आजवर अमेरिका दुसऱ्या महायुद्धापासून चार हात दूरच होती. ब्रिटनला साह्य़ करीत होती, पण तेही दुरूनच. कारण बहुतांश अमेरिकी नागरिकांची तशी इच्छा होती. युद्धात प्रत्यक्ष न उतरता त्याचे सगळे लाभ मिळत असतील तर युद्धखोरीची भाषाही न करण्यात भलाई असते हे अमेरिकी व्यवस्था पूर्वीपासून जाणून आहे. परंतु फ्रान्स पडल्यानंतर त्या अलिप्ततावादी भावनेत बदल होत चालला होता आणि तशात जपानने ही आगळीक केली. त्याने अमेरिकेत संतापाचा आगडोंब उसळला. दुसऱ्याच दिवशी अमेरिका आपल्या सर्व ताकदीनिशी महायुद्धात उतरली. तसे झाले नसते, तर काय घडले असते हे सांगणे आता अवघडच आहे. कदाचित अमेरिका तरीही युद्धात उतरली असती. पर्ल हार्बरवरील हल्ल्याने ती शक्यता अधिक अलीकडे आली आणि त्याने सगळीच समीकरणे बदलली. जपान हा अमेरिकेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू बनला. अगदी अणुबॉम्ब टाकण्याएवढा मोठा शत्रू. आपल्या ऐतिहासिक परंपरा पाहता, त्या शत्रुत्वाचा ७५ वा स्मृतिदिन साजरा होणे अपेक्षित होते. या निमित्ताने अमेरिकेत पर्ल हार्बर दिन, शहीद सैनिकांना श्रद्धांजली अशा कार्यक्रमांना पूर येणे अपेक्षित होते. तिकडे जपानमध्ये त्या विजयाच्या आठवणींची ओवाळणी घडणे अपेक्षित होते. परंतु होत आहे ते उलटेच.

जपान आणि अमेरिका या देशांतील नागरिकांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषभावना नव्हतीच असे म्हणणे अयोग्य ठरेल. आजही काही प्रमाणात ती नकारात्मकता कायम असल्याचे अमेरिकी अभ्यासक सांगत आहेत. परंतु ती भावना या दोन देशांच्या संबंधांच्या आड कधी आली नाही. याचे कारण या देशांना असलेली फारसे मागे वळून न पाहण्याची सवय. जपान हा तर आपला इतिहास आणि परंपरा गौरवाने मिरवणारा देश. पण इतिहासाच्या तुताऱ्या फुंकत बसण्यापेक्षा ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ हाच पाठ त्यांनी अधिक गिरवल्याचे दिसते. त्यासाठी त्यांना इतिहासाचे पुनर्लेखनही करावे लागले नाही. तेथील शालेय इतिहासातून हिरोशिमा आणि नागासाकी वगळावेही लागले नाही. त्यांनी एवढेच केले की इतिहासातून द्वेषाचे बाळकडू देण्याऐवजी, अशा भयंकर घटना टाळण्यासाठी काय करावे ही शहाणीव जागृत केली. अमेरिका हा तर वर्तमानात जगणारा देश. पर्ल हार्बर हा तेथील तरुणाईसाठी केवळ इतिहासाचा, ज्यावर चित्रपट वगैरे काढतात, असा भाग. अशा वैचारिक पर्यावरणामुळेच गेल्या मेमध्ये जेव्हा बराक ओबामा यांनी हिरोशिमा येथील स्मृतिस्थानास भेट देऊन अणुबॉम्बबळींना आदरांजली वाहिली तेव्हा अमेरिकेतील काही अतिरेकी राष्ट्रवादी वगळता कोणीही त्यांना विरोध केला नाही. येत्या २७ डिसेंबर रोजी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे पर्ल हार्बरला जाऊन जपानी हल्ल्यात बळी पडलेल्यांपुढे नतमस्तक होतील. त्यांच्या या घोषणेवरही जपानमध्ये टीका झालेली नाही. उलट तेथील उजव्या विचारांची माध्यमेही त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. याचे कारण यातून विजेते विरुद्ध पराजित या दुविधेपलीकडे- ‘बायनरी’पलीकडे – जाता येईल असा विश्वास तेथील जाणत्या जनांना वाटत आहे. एका अर्थी, ओबामा यांच्या हिरोशिमा भेटीनंतर आता होणारी शिंझो आबे यांची पर्ल हार्बर भेट हा महायुद्धोत्तर युगाच्या शेवटाची आशादायक सुरुवात ठरणार आहे. मात्र ती केवळ आभासी असेल काय ही शंका तरीही उरतेच. दोन जुन्या शत्रुराष्ट्रांमध्ये सामंजस्याचा सूर्योदय होत असतानाच अन्य कुठे अंधारून येणारच नाही याची खात्री कोण देणार? खुद्द अमेरिकेतही ही सामंजस्याची, विवेकाची भावना टिकून राहील का याबद्दल शंका निर्माण व्हावी अशा घटना घडत आहेत. ट्रम्प यांचा विजय ही त्यातीलच एक. एक मात्र खरे, की सर्वत्र ट्रम्प प्रवृत्ती विजयी होत असताना पर्ल हार्बर बळींना जपानच्या पंतप्रधानांनी आदरांजली वाहण्यास जावे ही घटना मिट्ट काळोखातील प्रकाशाच्या तिरिपेसारखी आहे..