वसुधैव कुटुंबकम्हा प्राचीन वैचारिक वारसा सांगणारे आपण राजधानी दिल्लीनजीक नायजेरियन मुलांना झालेल्या मारहाणीकडे दुर्लक्ष का करतो?

अमेरिकेत भारतीयांना भोगाव्या लागणाऱ्या द्वेषगुन्ह्यंबद्दल आपल्या संसदेत आवाज उठविला जात असेल, तर त्याचबरोबर देशातील वांशिक, जातीय वा धार्मिक विद्वेषाच्या घटनांबद्दलही आवाज उठला पाहिजे. कारण अशा घटना आणि त्यामागील विद्वेषविचार भारतीय संस्कृतीचा पायाच खिळखिळा करू पाहात आहेत.

young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक
18 month old baby head stuck in vessel viral video
पातेल्यात अडकले चिमुकल्या बाळाचे डोके!अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कसे वाचवले त्याचे प्राण, पाहा हा Video…
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

राजधानी दिल्लीनजीकच्या नोएडा या अत्याधुनिक औद्योगिक नगरीत आफ्रिकी वंशाच्या काही विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले आणि अमेरिका, ब्रिटन वा ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील भारतीय नागरिकांवर होत असलेले हल्ले यांत फरक काय आहे? तपशील वेगळे असतील, पण आशय? तो तर सगळीकडे सारखाच आहे. नोएडामध्ये ज्यांच्यावर हल्ले झाले ते नागरिक नायजेरियाचे होते. वर्णाने काळे. त्यांच्यावर संशय होता एका मुलाच्या हत्येचा. तो मुलगा गेला तो अमली पदार्थाची मात्रा जास्त झाल्याने. त्याबद्दल त्याच्याच वसाहतीत राहणाऱ्या पाच नायजेरियन विद्यार्थ्यांवर संशय घेण्यात आला. तो केवळ हत्येचाही नव्हता. तो बारावीत शिकणारा मुलगा मृत्यूपूर्वी काही काळ गायब होता. नंतर तो घरी परतला. पण त्याआधी या पाच काळ्या आफ्रिकनांनी त्याला मारून ते नरमांस खाल्ले अशी अफवा पसरली होती. अशा अफवांवर लोक विश्वास कसा ठेवू शकतात असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. परंतु त्यात काही अर्थ नाही. आपल्याकडील काही जाती या मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असतात. काही लोक हे हिंसकच असतात. काही वंश हे रानटीच असतात. अशा अनेक एकसाची टाकसाळी प्रतिमा, असे अनेक समज आपण वर्षांनुवर्षे जोपासले आहेत. आफ्रिकेतले काळे लोक हे रानटी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे, अमली पदार्थाचे तस्कर, गर्दुल्ले आणि नरमांसभक्षकही हा समज त्यातलाच. असे समज बाळगणे याचीच वंशविद्वेष, धर्मद्वेष वा जातीयवाद ही वेगवेगळी नावे. आपणांस आपल्याबाबत ती मान्य नसतात एवढेच. आपण वंशद्वेष्टे वा जातीयवादी आहोत असे कोण स्वत:हून कबूल करील? त्यामुळेच आफ्रिकी वंशाच्या लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांपासून दलितांवरील अत्याचारापर्यंतच्या अशा विविध गोष्टींना काही तरी वेगळेच कारण काढून वंश वा जातिद्वेष नाकारण्याकडे अनेकांचा कल असतो. पण तेच इतरांनी केले तर? आज पाश्चात्त्य देशांमधील अनेक गौरेतर नागरिकांना वंशविद्वेषाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत तर एका भारतीयाची त्यावरून हत्या झाली. अनेकांना सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यावरून तेथील वर्ण आणि वंशद्वेष्टय़ांना झोडून काढणारे आपण नायजेरियन मुलांना जमावाने केलेल्या मारहाणीकडे मात्र दुर्लक्ष करीत आहोत. हा सामाजिक ढोंगाचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. पण ही केवळ आपलीच मक्तेदारी आहे असे मानण्याचे कारण नाही. ती सार्वत्रिक आहे. खेदाची बाब एवढीच, की ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा प्राचीन वैचारिक वारसा सांगणारे आपण केवळ या ढोंगबाजीतच नव्हे, तर द्वेषाच्या विकृतीबाबतही जगाशी स्पर्धा करू लागलो आहोत. शुभाचे, चांगुलपणाचे, सर्वाचेच भले – स्वस्ति – व्हावे या भावनेचे चित्रप्रतीक असलेले आपले स्वस्तिक. आजही ते आपल्यासाठी पवित्र आहे. परंतु ते टाकून आता आपण जर्मन बनावटीच्या स्वस्तिकाची पूजा करू लागलो आहोत की काय असा प्रश्न उभा राहिलेला आहे. ही शंका जेवढी राजकीय आहे, त्याहून अधिक ती सांस्कृतिक आहे. भारतीय म्हणून आपण ज्या संस्कृतीचे गोडवे गातो, ती व्यक्ती वा समूह द्वेषावर आणि असहिष्णुतेवर उभी आहे की काय असा प्रश्न यातून निर्माण होत आहे आणि म्हणून ती शंका अधिक महत्त्वाची आहे.

विशिष्ट समाजगट, जात वा धर्माच्या व्यक्तींबाबतच्या टाकसाळी प्रतिमा तयार करण्याचा उद्योग काही आजचा नाही. लोकमानसाचा विचार केल्यास तो बऱ्यापैकी स्वाभाविकही म्हणता येईल. अनुभवांचे सामान्यीकरण करणे हा व्यक्तीचा आवडता छंद म्हणावा लागेल. पण याच गोष्टीचा वापर जेव्हा एखाद्या समूहगटाकडून वा व्यक्तीकडून आपल्या स्वार्थासाठी होतो तेव्हा तो एकंदर मानवतेसाठी घातकच ठरतो. याचे सर्वपरिचित उदाहरण म्हणजे नाझी जर्मनी. द्वेष आणि त्याकरिता निर्माण केला जाणारा भयगंड हाच नाझी राष्ट्रवादाचा पाया होता. त्या द्वेषाच्या विरुद्ध बाजूला उभा होता तो विकृत वंशवाद. आर्यवंश हाच जगातील एकमेक उत्तम वंश असल्याचे मिथक हिटलरच्या प्रचारयंत्रणेने जर्मन लोकमानसात असे काही भिनवले की त्यातून निर्माण झालेल्या द्वेषाच्या ज्वालांनी आपल्यातील मानवता, सुसंस्कृतता यांची राख झाली आहे हेही त्यांना समजले नाही. लक्षात आले तेव्हा फार उशीर झाला होता. लक्षावधी ज्यू नागरिकांचे शिरकाण झाले होते. जर्मनीतील असंख्य रोमा मारले गेले होते. रोमा हे जिप्सी. मूळचे हिंदुस्थानातले. आर्यावर्तातले. परंतु हिटलरच्या शुद्ध आर्यवंशाच्या मिथकात न बसणारे. त्यामुळे त्यांतील अनेकांना छळछावण्यांत मरावे लागले. अनेकांचे खच्चीकरण करण्यात आले. त्या हत्यासत्रातून दुबळे, अपंग, आजारी जर्मन नागरिकही सुटले नव्हते हेही हिटलरवर प्रेम असणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. एखाद्याला आपला वंश, आपली जात वा आपला धर्म सर्वोत्तम वाटत असेल तर त्यात काय चूक आहे असे कोणाला वाटू शकते. अखेर प्रत्येकाच्या मनात या अस्मिता असतातच. पण या अस्मितांची पुढची पायरी ही इतरांच्या द्वेषाचीच असते. मग ती भाषिक अस्मिता असो की वांशिक. ती कोणत्या पडद्याआडून येते हे खरे तर फार महत्त्वाचे नसते. हिटलरी वांशिक अस्मितेचा मुखवटा हा राष्ट्रवादाचा होता. ज्यू हे जर्मनीचे शत्रू आहेत, राष्ट्रद्रोही आहेत म्हणून त्यांना मारले पाहिजे असे तो सांगत असे आणि आपला अ‍ॅडॉल्फ कसा सच्चा राष्ट्रभक्त म्हणून बाकीचे त्याची आरती ओवाळत असत. ज्यूंबाबत हे केवळ हिटलरनेच केले असे मानण्याचे कारण नाही. रशियातही त्यांची कत्तलच झाली होती. त्याचे कारण वांशिकविद्वेष हेच होते. तेव्हा ज्यूंकडे ज्या नजरेने पाहिले जात होते, त्याच नजरेने आज पाश्चात्त्य देशांत गौरेतर नागरिकांकडे पाहिले जात होते. फार काय, त्यांना धमकावण्यासाठी आज तेथे स्वस्तिक या चिन्हाचा सर्रास वापर केला जात आहे. लहान लहान मुले तशी स्वस्तिके आणि घोषणा रंगवताना दिसत आहेत. तुरळक म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अमेरिकेसारख्या राष्ट्रात – जे जगाचे मेल्टिंग पॉट म्हणून ओळखले जाते आणि जे स्थलांतरितांच्या रक्तघामातून उभे राहिले – तेथे आज स्थलांतरित विदेशी वंशाच्या नागरिकांबाबत ही द्वेषभावना का आणि कशा प्रकारे भडकाविली जात आहे हा वेगळा विषय झाला. पण ती आहे. शिखांना अरब समजणारे, भारत, श्रीलंकेच्या नागरिकांना पाकिस्तानी मुस्लीम समजणारे निर्बुद्ध अडाणी तेथे होतेच. अशा लोकांना आता मोकळे रानच मिळाले आहे हे मात्र खरे. याच अमेरिकेत एके काळी जर्मन नागरिकांचा द्वेष करणे हा राष्ट्रभक्ती दाखविण्याचा उत्तम मार्ग होता. त्याची जागा पुढे जपानने घेतली. त्यानंतर अरब मुस्लिमांनी. त्या वेळी जर्मन म्हणजे हुणांसारखे क्रूर किंवा सारे मुस्लीम म्हणजे अतिरेकी अशा एकसाची प्रतिमांना मान्यता देणाऱ्यांच्याही आज तशाच प्रतिमा तयार झाल्या आहेत. पुन्हा ते एकतर्फीही नाही. हिंदू मुस्लिमांबद्दल, मुस्लीम हिंदूंबद्दल अशाच टाकसाळी प्रतिमा घेऊन वावरत आहेत.

अशा परिस्थितीत कोणी कोणाला दोष द्यावा? तीन बोटे तर आपल्याकडेच वळलेली असतात. अमेरिकेत भारतीयांना भोगाव्या लागणाऱ्या द्वेषगुन्ह्यंबद्दल आपल्या संसदेत आवाज उठविला जात असेल, तर त्याचबरोबर देशातील वांशिक, जातीय वा धार्मिक विद्वेषाच्या घटनांबद्दलही आवाज उठला पाहिजे. कारण अशा घटना आणि त्यामागील विद्वेषविचार भारतीय संस्कृतीचा पायाच खिळखिळा करू पाहात आहेत. स्वस्तिक हे या संस्कृतीचे प्रतीक. पण ते कोणते? सर्वाच्या कल्याणाची आस असलेले की हिटलरी विकृत स्वरूपाचे? आपणांस कोणते स्वस्तिक हवे, हे ठरविण्याची हीच खरी वेळ आहे.