अमिताव घोष यांच्या गौरवामुळे ‘भारतीय भाषा’ म्हणून इंग्रजीवर ज्ञानपीठचीही मोहर उमटली, हे एक बरे झाले.

ब्रिटिश येथून गेले. पण इंग्रजी राहिली. नव्हे ती इथलीच झाली. परंतु इंग्रजी येथे राहिली, या म्हणण्याचा अर्थ इंग्रजीच्या वापरापुरताच मर्यादित नाही. तर, हा अर्थ इंग्रजीतून आलेल्या आधुनिक मूल्यांपर्यंत वाढवत नेता येतो. मात्र या अर्थव्याप्तीलाच अलीकडे अनेकांचा आक्षेप असतो. अशा आक्षेपकांसाठी भारतीय इंग्रजी कादंबरीकार अमिताव घोष यांची साहित्यिक कारकीर्द हे उत्तर आहे. देशीयता अंगी भिनवूनही खुलेपणा, सर्वसमावेशकताही कशी राखता येते, याचे ते उदाहरण आहेत. त्यामुळेच ५४ वा ज्ञानपीठ पुरस्कार अमिताव घोष यांना जाहीर होणे ही अनेक अर्थानी अभिनंदनीय बाब ठरते. पहिला मुद्दा म्हणजे, आजवर भारतीय भाषांमधीलच साहित्यिकांना ज्ञानपीठ दिले जात होते. तीन वर्षांपूर्वी ज्ञानपीठसाठी भारतीय इंग्रजी साहित्याचाही विचार होऊ  लागला आणि यंदा इंग्रजी कादंबरीकार घोष यांना तो जाहीर झाला आहे. त्या अर्थी ‘भारतीय भाषा’ म्हणून इंग्रजीवर ज्ञानपीठचीही मोहर उमटली, हे एक बरे झाले.

दुसरा मुद्दा, भारतीय इंग्रजी साहित्याच्या वाटचालीचा. अमिताव घोष ज्या प. बंगालमधून येतात, तिथल्याच ‘वंदे मातरम’कर्ते बंकिमचंद्र चॅटर्जीनी ‘राजमोहन्स वाइफ’ ही पहिली भारतीय इंग्रजी कादंबरी लिहिली. त्यासही आता दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र, इंग्रजी साहित्यातील ठसठशीत भारतीय मुशाफिरी खऱ्या अर्थाने सुरू झाली ती पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात. १९३०-४० च्या दशकांत. तोवर भारतीय प्रबोधनपर्वाचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला होता. स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. वसाहतवादविरोध हा त्याचा गाभा आणि त्याच काळात मुल्क राज आनंद, राजा राव, आर. के. नारायण प्रभृती लेखक इंग्रजीत कथात्म साहित्य प्रसवू लागले होते. पुढे १९५०-६० च्या दशकांत रूथ प्रावर झाबवाला, अनिता देसाई, नयनतारा सहगल, खुशवंत सिंग अशांचा लेखनकाळ सुरू झाला आणि १९८० च्या दशकापर्यंत भारतीय लेखकांत इंग्रजी ही ‘साहित्याची भाषा’ म्हणून अधिक ठसू लागली. या दशकाची सुरुवातच सलमान रश्दींच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन्स’ने झाली. ती किती उत्तम वा सुमार आहे, हा मुद्दा गौण. पण या कादंबरीने भारतीय इंग्रजी लेखकांना काहीएक दिशा दिली. त्याचाच एक परिणाम म्हणून भाषेच्या पातळीवरही सोपी, थेट बोलल्यासारखी इंग्रजी कादंबऱ्यांत दिसू लागली. जग जवळ येण्याची सुरुवातही याच काळात झाली आणि स्थानिक व जागतिक यांच्यातील सीमारेषाही विरळ होऊ  लागल्या. भारताच्या इतिहासालाही याच दशकापासून नवे वळण मिळाले. त्याचे कारण अस्मितांचा उदय. अस्मितावादी राजकीय पक्ष-संघटनांच्या भरभराटीचाही हाच काळ. तंत्रज्ञान क्रांतीची सुरुवात आणि उदारीकरणाचे पाऊल उचलण्याची पार्श्वभूमी ही याच दशकातली.

अशात अमिताव घोष यांची पहिली कादंबरी आली, १९८६ साली- ‘द सर्कल ऑफ रिझन’! स्थलांतराचा वेध घेते ती. पुढे दोनच वर्षांनी त्यांची ‘द शॅडो लाइन्स’ ही कादंबरी आली. शीखविरोधी दंगलींच्या पार्श्वभूमी वर. स्वदेशी चळवळीपासून दुसऱ्या महायुद्धाचा काळ, पुढे फाळणी आणि साठच्या दशकातील ढाका-कोलकात्यातील जातीय दंगलीपर्यंत इतिहासाचा आढावा घेत घोष यांनी आपला-परका हे द्वंद्व कसे आकार घेते, हे दाखवून दिले होते. किंबहुना अस्मितांचे हिंदोळे हिंसक कसे होतात, याचाच तो कथात्म वेध आहे.

पुढेही घोष यांच्या साऱ्या लेखनावर या अस्मितांच्या हिंदोळ्यांचा आणि त्याच्यातून उद्भवलेल्या परिस्थितीचा प्रभाव दिसतो. इतिहासाची, भूतकाळाची सफर घडवत वर्तमानाचा आरसा दाखवणे ही त्यांची खुबी. ऑक्सफर्डमध्ये सामाजिक मानववंशशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या घोष यांना इतिहासाचे आणि त्याच्यातून प्रवाहित होत असलेल्या संस्कृतीविषयी आस्था असणे स्वाभाविकच आहे. त्यांचे हे इतिहासभान देशीयतेचे दोर पकडत जागतिक वीण गुंफत जाते. बंगालचा इतिहास, विशेषत: कोलकाता शहर हे त्यांच्या इतिहासभानाचे केंद्र. त्यांच्या कादंबऱ्या जग फिरवत कोलकात्यातच येतात, असे म्हटले जाते ते उगाच नाही. पण म्हणून काही ते ‘देशीवादा’च्या संकुचित चौकटीत येतात, असे समजणे गैर ठरेल. स्थानिक आणि छोटय़ा छोटय़ा माणसांच्या गोष्टी आणि त्यातून घडत जाणारा इतिहास हे त्यांच्या ‘देशी’ असण्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. इतिहास आणि स्मृती यांच्यातील आंतरसंबंध तपासत घोष स्थलांतराचा, जातीय दंगलींचा, अस्मितांचा आरसा दाखवत राहतात. ‘द कलकत्ता क्रोमोसोम’, ‘द ग्लास पॅलेस’ या कादंबऱ्या असोत किंवा ब्रिटन आणि चीन यांच्यातील एकोणिसाव्या शतकातील अफुयुद्धाच्या पार्श्वभूमी वर ‘आयबिस’ या जहाजाभोवती घडणारी कादंबरी-त्रिधारा (सी ऑफ पॉपिज, रिव्हर ऑफ स्मोक, फ्लड ऑफ फायर) असो, घोष यांनी हे इतिहासाचे देशी भान कायम राखले आहे.

घोष यांचे ललितेतर गद्य हेही त्यास अपवाद नाही. ‘इन अ‍ॅन अ‍ॅण्टिक लँड’ हे प्रवासवर्णनपर पुस्तक, २००२ सालचे ‘द इमाम अ‍ॅण्ड द इंडियन’ हा निबंधसंग्रह ही त्याची उदाहरणे ठरावीत. अगदी अलीकडचे ‘द ग्रेट डिरेंजमेन्ट: क्लायमेट चेंज अ‍ॅण्ड द अनथिंकेबल’ हे पुस्तक तर वातावरणीय बदलाचा आणि माणसाच्या क्षीण होत चाललेल्या विचारशक्तीचा संबंध जोडते. ‘प्रगती’च्या संकल्पनेची त्यात केलेली मीमांसा सध्याच्या काळात दिशादर्शक ठरावी. ललित लेखकास इतक्या काही अभ्यासाची गरज नसते असे एक फालतू तत्त्वज्ञान आपले ललित लेखक मांडतात. प्रतिभेच्या, कल्पनेच्या भराऱ्या आपल्या वाङ्मयास अक्षरत्व देण्यासाठी पुरेशा आहेत, असे या मंडळींना वाटते. घोष यास अपवाद. त्या अर्थाने त्यांची अनेक उत्तम पाश्चात्त्य लेखकांशी नाळ जुडते. सखोल अभ्यास असेल तर कल्पनेच्या भरारीस काही एक निश्चित आयाम येतो आणि त्यामुळे हे कल्पनेचे उड्डाण योग्य समेवर जमिनीवर येते. अन्यथा, ‘‘त्याने मारलेला स्क्वेअर ड्राइव्ह स्क्वेअर लेग अम्पायरच्या कानाजवळून सू सू करत गेला’’ अशी वाभट्र विधाने आपण आपल्या कादंबरीकारांतच पाहतोच. या मंडळींना किमान अभ्यासाचेही वावडे. त्या पार्श्वभूमी वर अमिताव घोष यांचे लिखाण उठून दिसते. ज्या विषयावर लिहायचे आहे त्या विषयाचा सर्वागाने ते अभ्यास करतात आणि अभ्यासाची निरीक्षणे कल्पनेच्या हाती देऊन आपली कलाकृती घडवतात. हा त्यांचा गुण निश्चितच अनुकरणीय.

दुसरी बाब म्हणजे त्यांची ‘‘थोडासा लोकांत, थोडासा येकांत’’ ही वृत्ती. सहा महिने ते भारतात असतात तर उरलेला काळ अमेरिकेत. आपले लिखाण सोडले तर हा माणूस आपले लेखकपण मिरवत आणि त्यापेक्षा इतरांवर लादत, रानोमाळ भाषणांचा रतीब घालत हिंडत नाही. हीदेखील तशी दुर्मीळ म्हणावी अशी बाब. त्यांची पत्नीही लेखिका आहे, हे अनेकांना माहीतही नसावे. एरवी अशा तृतीयपानी साजशृंगारास योग्य जोडप्याने साहित्यवर्तुळात किती हैदोस घातला असता. पण हे दोघेही यास सन्माननीय अपवाद ठरतात. आपण बरे आणि आपले लेखन बरे, असे त्यांचे वर्तन. माणसे सत्ता करू देते ते सर्व करतात. त्यामुळे, ‘‘आपण भारतीय मंगोल वा प्राचीन इजिप्शियन फेरोझ यांच्यापेक्षा काहीही वेगळे नाही. दोघांत फरक असलाच तर इतकाच की आपण हिंसा करतो तेव्हा ती कोणा उच्च मूल्यांसाठी केल्याचे ढोंग करतो. लक्षात ठेवा या सद्विचाराच्या ढोंगासाठी इतिहास आपणास कधीही माफ करणार नाही’’, असे (सी ऑफ पॉपीज) ठामपणे लिहिणाऱ्या घोष यांना ज्ञानपीठ मिळणे हे ते देणारी ज्ञानपीठ समिती भूतकाळातून भविष्याकडे मार्गक्रमण करू लागल्याचे द्योतक मानावे लागेल. कल्पनेच्या या अभ्यासू आविष्कर्त्यांस ज्ञानपीठ मिळणे हा समस्त अभ्यासू विश्वाचा गौरव ठरतो.