हेरासारखा न दिसणारा म्हणून अविश्वसनीय; पण पडद्यावरून चंगळवादाची स्वप्ने यशस्वीपणे विकणारा जेम्स बॉण्ड हा रॉजर मूर याचा होता..

‘‘जेम्स बॉण्डसारखे विनोदी पात्र शोधूनही सापडणार नाही. हा स्वत:ला गुप्तहेर मानतो. पण सारे जग त्याला ओळखते. जगाच्या पाठीवर कोणत्याही मद्यालयात हा गेला की लगेच तेथील मदनिका त्याच्या हाती मार्टिनीचा प्याला देते.. हा कसला गुप्तहेर,’’ हे मत जेम्स बॉण्ड ही अजरामर व्यक्तिरेखा एक नव्हे, दोन नव्हे तर सात एकापेक्षा एक सरस चित्रपटांत साकार करणाऱ्या रॉजर मूर यानेच आत्मचरित्रात व्यक्त केले आहे. हा बॉण्ड साकारण्याचा मला अगदी वैताग आलाय, असेही तो म्हणतो. साहजिकच आहे ते त्याला तसे वाटणे.

कारण त्याचे आणि आपलेही चित्रपटीय आयुष्य बराच काळ त्याने रंगविलेल्या इयान फ्लेमिंग या लेखकाच्या बॉण्ड या काल्पनिक व्यक्तिरेखेभोवती फिरत राहिले. चित्रपट हे मनोरंजन आहे, तेवढय़ापुरतेच त्याला महत्त्व द्यावे, हे मत तत्त्व म्हणून ठीक. परंतु ज्या जगात रोनाल्ड रेगन यांच्यासारखा चित्रपटातील देमार नायक महासत्तेचा अध्यक्ष होतो, ज्या जगात चित्रपटातील ऑड्री हेपबर्नसारखी खटय़ाळ नजरेची नायिका प्रत्येकाच्या मनामनातील हवीहवीशी स्त्री होते, ज्या जगात मर्लिन मन्रो अथवा मधुबाला जगण्याला दंश करणाऱ्या हळव्या शोकांतिका होतात आणि ज्या जगात रजनीकांतसारखा यथातथा अभिनेता राजकारण-प्रवेशाच्या धमक्या देतो त्या जगात बॉण्ड ही व्यक्तिरेखा काल्पनिक असली तरी मनातल्या मनात का असेना सत्यच असते. हे वास्तव एकदा मान्य केले की उरते ते रॉजर मूर याच्या यशाचे मोजमाप करणे आणि त्याचे वेगळेपण नोंदवणे. आतापर्यंत शॉन कॉनरी ते डॅनियल क्रेग अशा अनेकांनी बॉण्ड पडद्यावर साकारला. या सगळ्यांतील अत्यंत खोटा, अविश्वसनीय बॉण्ड हा रॉजर मूर याचा होता. हे विधान अतार्किक वाटले तरी खरे आहे. पहिला बॉण्ड शॉन कॉनरी हा धारदार होता, पिअर्स ब्रॉस्नन नाजूकनटवा वाटतो तर डॅनियल क्रेग हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासारखा कोरडा आणि थंड रक्ताचा. वास्तविक हेराच्या व्यक्तिरेखेसाठी हे सगळे जास्त योग्य होते. परंतु तरीही रॉजर मूर हा बॉण्ड म्हणून जास्त यशस्वी झाला.

असे का व्हावे? त्यास कारण आहे. एकदा का एखादी व्यक्तिरेखा काल्पनिक म्हणूनच स्वीकारायची असेल तर ती खरी वाटणारी निवडाच का, असा हा मुद्दा आहे. शॉन कॉनरी ते क्रेग हे सगळे अभिनेते हेर म्हणून खरे वाटतात. रॉजर मूर अजिबात तसा नाही. शॉन कॉनरी ते क्रेग यांच्यासारखी दिसणारी वा त्यांच्या जवळपास जाणारी अनेक माणसे प्रत्यक्ष जगात अनेक आढळतील. रॉजर मूर याचे तसे नाही. तो प्रत्यक्ष जगण्यात काल्पनिक नंदनवनातील पुरुषत्वाचे प्रारूप असाच होता. काचेच्या ग्लासात ओतल्यावर ब्लू लगून हे जोडमद्य (म्हणजे कॉकटेल.. जोड रागासारखे जोडमद्य) जसे दिसते त्या रंगाचे डोळे, कमालीचे प्रमाणबद्ध शरीर, कोणत्याही भागावर तसूभरदेखील अतिरिक्त थराचे नसणे, जेवढय़ास तेवढी उंची, लांब हात, उजव्या गालावर नाकाच्या खाली एक हलकीशी चामखीळ आणि महत्त्वाचे काही बोलताना उजवी भुवई उंचावण्याची लकब असे त्याचे दिसणे हे स्वप्नवत होते. प्रत्यक्ष जगण्यात इतके कोणी सुंदर नसते आणि असे शारीरिकदृष्टय़ा आदर्शवत फारच कमी असतात. रॉजर मूर हा असा अत्यंत अल्पांतील होता. त्यामुळे तो अधिकच हवाहवासा वाटे. म्हणूनच वयाच्या साठीतही तो तिशीतील बॉण्डच्या भूमिका करीत होता तरीही ते कोणाच्या डोळ्यास आणि कल्पनाशक्तीस खुपले नाही. अशा स्वप्नलोकीय व्यक्तीच्या तोंडून ज्या वेळी माय नेम इज बॉण्ड.. जेम्स बॉण्ड असे लहानथोर सर्वच चित्रपट रसिकांना माहीत असलेले उद्गार निघतात तेव्हा ते अत्यंत खोटे तरीही हवेहवेसे वाटतात.

हे असे असाध्य, दुष्प्राप्य आणि काल्पनिक असण्यातच रॉजर मूर याचे यश आहे. चित्रपटीय समाजशास्त्रीचा विचार केला तरीदेखील त्याच्या हव्याहव्याशा वाटण्याची कारणमीमांसा करता येईल. आपल्याकडे ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन याचे अँग्री यंग मॅन असणे ही काळाची गरज होती, त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर जेम्स बॉण्ड याच्या असण्याची गरज होती. सामान्य नागरिक.. मग तो अमेरिकेतील असो वा अमरावतीतील.. तो जगाकडे दुष्ट आणि सुष्ट या चष्म्यातूनच पाहतो. जे दुष्ट नाहीत ते सुष्ट आणि जे सुष्ट नाहीत ते दुष्ट अशीच ही त्याची मांडणी असते. या मानसिकतेचा अत्यंत कलात्मक फायदा फ्लेमिंग याने उठवला. बॉण्ड ही व्यक्तिरेखा शीतयुद्धाच्या काळातील आणि फ्लेमिंग पाश्चात्त्य लेखक. या जगाने त्या काळी खलनायकत्व सोविएत रशियानामक गूढ देशास दिले होते. हे अगम्य भाषेत बोलणारे, चेहऱ्यावर कोणत्याही भावभावना नसणारे, उगाच गुन्हेगारी वृत्तीचे भासणारे रशियन आणि क्वचित त्यांच्या जोडीला तीच साम्यवादी विचारसरणी मानणारे चिनी खलनायक अमेरिकी अध्यक्षास पळवून नेण्याचा, अमेरिकी उपग्रह पाडण्याचा, पीकपाण्यात विष मिसळून अनेकांचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशा जगास जेम्स बॉण्ड याच्याखेरीज कोण वाचवणार? ही चलाख मांडणी होती. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत प्रत्यक्ष लष्करी सामर्थ्यांच्या जोडीला अप्रत्यक्ष मुलकी ताकद.. सॉफ्ट पॉवरदेखील महत्त्वाची असते. जेम्स बॉण्ड ही अमेरिकेची अशी सॉफ्ट पॉवर होती. बेंटलेसारख्या गाडय़ा उडवणारी, बेरेटा किंवा स्मिथ अ‍ॅण्ड वेसनसारखे छोटे पण प्रचंड श्रीमंती रिव्हॉल्व्हर बाळगणारी, घडय़ाळात फोन असणारी, हेलिकॉप्टर्स, विमाने सहज वापरणारी, प्रचंड भोगवादी व्यक्तिरेखा ही त्यामुळे दरिद्री, अभागी जगात आपोआप नायक होते. या बॉण्डने जेवढी स्वप्ने विकली असतील तेवढी स्वप्ने समस्त सोविएत व्यवस्थेने पाहिलीही नसतील. अशी चंगळवादी स्वप्ने जगाला विकणारा बॉण्ड हा अमेरिकी भांडवली व्यवस्थेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजदूत. असा एखादा नायक तयार करण्यात आलेल्या अपयशातच सोविएत युनियनच्या भविष्यातील अपयशाच्या पाऊलखुणा दडलेल्या होत्या हे लक्षात घ्यायला हवे. केवळ वाङ्मयीन मूल्याच्या मुद्दय़ावर रशियातील टॉलस्टॉय ते पास्तरनाक ते गॉर्की असे अनेक थोर लेखक पुढे सोविएत व्यवस्थेने जगभर मिरवले. क्रांतिपूर्व काळात जन्मलेल्या त्या रशियन लेखकांनी वास्तव मांडले. जे त्या वेळचे जग अनुभवतच होता. फ्लेमिंगसारख्या ब्रिटिश लेखकाचे वाङ्मय दर्जाच्या मुद्दय़ावर तत्कालीन वा वर उल्लेखलेल्या लेखकाच्या जराही जवळपास येणार नाही, हे मान्य. परंतु या फ्लेमिंग याने हपापलेल्या, दारिद्रय़ाने करपलेल्या जगाला स्वप्ने दाखवली. बॉण्डचे यश हे या स्वप्नविक्रीत आणि त्यासाठी रॉजर मूरसारखा अद्वितीय विक्रेता निवडण्यात आहे.

म्हणूनच बॉण्डची भूमिका सोडली तर रॉजर मूर अभिनेता म्हणून तितका काही दखलपात्र नव्हता. द सेंटसारख्या मालिकेतील त्याची भूमिका सोडली तर फारसे काही उल्लेखनीय त्याच्या हातून पडद्यावर घडले नाही. त्याचे उल्लेखनीय कार्य आहे ते पडद्याबाहेरचे आणि नंतरचे. ऑक्टोपसीच्या निमित्ताने भारतात कमालीचे दारिद्रय़ पाहिलेल्या मूर याने उत्तरायुष्य संयुक्त राष्ट्र संघाचा राजदूत म्हणून घालवले. हे माझे काम जास्त महत्त्वाचे आहे, असे तो म्हणायचा. ऑड्री हेपबर्न या ब्रिटिश मैत्रीण-अभिनेत्रीमुळे तो या कामात ओढला गेला. बॉण्डपटांसाठी मी इतका हिंडलो, पण हे दारिद्रय़, दैन्य काही कधी पाहिले नाही. ते या कामामुळे अनुभवता आले, असे त्याचे म्हणणे. पण हे तेवढय़ापुरतेच. तो काही गरिबांचा कनवाळू वगैरे नव्हता. माँटे कार्लो आणि स्वित्र्झलडच्या देवभूमीत वास्तव्याला असलेला, संपूर्ण मानवी देहभोगांत अडकलेला एक माणूस होता तो. घटस्फोटित पत्नीपासून झालेल्या कन्येस कर्करोग कणाकणाने आपल्यापासून दूर घेऊन जाताना तो पाहत होता आणि नकळत स्वत:च त्या कर्करोगास आपले म्हणत होता. कर्करोगाशी त्याची ही दुसरी भेट. ती सुफळ संपूर्ण झाली आणि रॉजर मूर जेथून या भूतलावरील मर्त्य मानवांत आला होता तेथेच अखेर तो परतला. एक बॉण्ड गेला. जाताना आपल्याला बॉण्डच्या असण्याची गरजच दाखवून गेला. राजस, सुकुमार अशा या मदनाच्या पुतळ्याचे ते निळे डोळे कायमचे मिटले.