केवळ नफ्यातील काही हिस्सा नव्हे, मालकीचे भागभांडवल समाजकार्यासाठी देऊन अझीम प्रेमजी यांनी एक पायंडा पाडला आहे..

विप्रो उद्योगसमूहाचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनी विप्रो कंपन्यांतील त्यांच्या वाटय़ाचे भागभांडवल अझीम प्रेमजी फाऊंडेशनला जनहितार्थ दान केल्यामुळे त्यांची गणना वॉरन बफे आणि बिल गेट्स यांसारख्या बडय़ा उद्योगपतींमध्ये होऊ लागली आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे, भारतीयांना अजूनही एखाद्या उद्योगपतीच्या दातृत्वाचे नावीन्य आणि कौतुक आहे. यात वरकरणी गैर काही नाही. ‘दानवीर’, ‘दानशूर’ अशा शब्दांनी देणाऱ्या हातांना गौरवण्याची या देशातली संस्कृती. परंतु येथील दातृत्व हे स्वाभाविक आणि सार्वत्रिक नसते म्हणूनच त्याची नवलाई. जणू दातृत्व हा पराक्रमच. म्हणून ते करणारा शूर किंवा वीर! खरे म्हणजे या देशात श्रीमंत आणि गरिबांमधील दरी भयानक आहे आणि अजूनही आर्थिक-सामाजिक वंचितांच्या मोठय़ा वर्गापर्यंत सरकारी योजना आणि अनुदाने पोहोचलेली नाहीत. अब्जाधीशांच्या यादीमध्ये जगात अमेरिका आणि चीन यांच्यापाठोपाठ भारताचे स्थान तिसरे आहे. पण याच देशात जगातील सर्वाधिक कुपोषित माता आणि बालकेही आहेत. बालमृत्यूंचे प्रमाण लक्षणीय आहे. बेरोजगारी आणि प्रौढ निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. व्यापक लोकसंख्येपर्यंत प्राथमिक आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत अतिश्रीमंतांचे दातृत्व हा वंचितांच्या उत्थानाचा एक स्रोत ठरू शकतो, हे विशेषत: अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये दिसून आलेले आहे. अझीम प्रेमजी यांच्या विप्रोतील संपूर्ण ३४ टक्के भागभांडवलाचे विद्यमान बाजारमूल्य ५२ हजार ७५० कोटी रुपये (साधारण ७५० कोटी डॉलर) इतके आहे. त्यांनी यापूर्वीही स्वत:च्या मालकीचे विप्रोतले काही भागभांडवल आणि इतर मत्ता विक्रीस काढून तो निधी अझीम प्रेमजी फाऊंडेशनकडे वळवला होताच. ताज्या निर्णयामुळे प्रेमजी यांनी आजवर केलेल्या दाननिधीची रक्कम १.४५ लाख कोटी रुपयांवर (२१०० कोटी डॉलर) गेली आहे. आजवर जगभरात केवळ वॉरन बफे आणि बिल गेट्स यांनीच प्रेमजी यांच्यापेक्षा अधिक रक्कम जनहितार्थ दान केलेली आहे. दातृत्वाच्या क्षेत्रात प्रेमजी यांनी जॉर्ज सोरोस यांनाही मागे सोडले आहे.

या मोठय़ा योगदानाबद्दल अझीम प्रेमजी यांचे कौतुक करत असताना, या देशात आणखी अझीम प्रेमजी का निर्माण होऊ शकत नाहीत हा प्रश्न उपस्थित होतोच. गेल्या चार वर्षांत १० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या दाननिधीमध्ये अझीम प्रेमजी यांचा हिस्सा ८० टक्के आहे, असे बेन या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले. मात्र प्रेमजी हे अपवादच. याच काळात भारतातील अतिश्रीमंतांनी (अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स – ज्यांचे निव्वळ मूल्य २५ कोटी किंवा अधिक आहे) दिलेल्या दाननिधीमध्ये चार टक्क्यांची घटच झालेली आढळते. याउलट अतिश्रीमंतांची संख्या १२ टक्क्यांनी वाढलेली आहे आणि २०२२ पर्यंत अशा व्यक्तींची संख्या आणि त्यांचे मूल्य दुप्पट होण्याची चिन्हे आहेत. प्रेमजी यांच्या पूर्वी विशेषत: टाटा आणि गोदरेज या उद्योगसमूहांनी समाजहितैषी भूमिका घेऊन बऱ्यापैकी दानयज्ञ केला. अझीम प्रेमजींप्रमाणेच अलीकडे एचसीएल समूहाचे संस्थापक शिव नाडर यांनीही प्रामुख्याने शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या उत्पन्नातील मोठा निधी दिलेला आहे. पण ही उदाहरणे थोडकीच. ही मंडळी वगळता अन्यांसाठी दातृत्वाची परिमाणे आणि महत्त्व विस्तारलेले नाही. सन २०१४ मध्ये कंपनी कायद्यात दुरुस्ती करून कॉर्पोरेट सामाजिक दायित्वासाठी (सीएसआर) काही रक्कम बाजूला ठेवणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतरही ‘सीएसआर’साठी अशी किती रक्कम बाजूला ठेवावी याविषयी खल होतात. त्याला किती प्रसिद्धी मिळेल, यावर लक्ष केंद्रित केले जाते. यातून ‘सीएसआर’ म्हणजे खरोखरीचे सामाजिक दायित्व न समजता, त्याद्वारे मिळणाऱ्या प्रसिद्धीतून कंपनीची प्रतिमाच कशी उजळेल, यावरच बहुतेक कंपन्यांनी भर दिला. अगदी अलीकडेपर्यंत प्रसिद्धीलोलुप स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्य काय केले, यावर गरीब वस्त्यांमध्ये वह्य़ावाटप केले असे उत्तर द्यायचे! ‘सीएसआर’ योजना अजूनही त्याच छापाच्या आहेत. ‘सीएसआर’च्या माध्यमातून जवळपास ५० हजार कोटी रुपये निधी उभा राहिला, असा एक अंदाज आहे. हा निधी म्हणजे कायदा पाळण्यासाठी असंख्य कंपन्यांनी उभे केलेले पैसे आहेत. यात उत्स्फूर्तता नाही आणि दिशाही नाही. त्यामुळे परिणामांनाही मर्यादा आहेत. यासाठीच अझीम प्रेमजींसारख्या अधिकाधिक उद्योगपतींनी पुढे येऊन त्यांच्या ताब्यातील भागभांडवल निधीमध्ये परिवर्तित करणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

अझीम प्रेमजी फाऊंडेशनची प्रमुख गुंतवणूक शिक्षण क्षेत्रात आहे. यातून त्यांनी महागडय़ा शाळा काढलेल्या नाहीत. तर सरकारी शाळांनाच विविध मार्गानी पाठबळ कसे मिळेल, यावर लक्ष केंद्रित केले आहे. केवळ कर्नाटक नव्हे, तर उत्तराखंड, राजस्थान, पुदुच्चेरी, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये त्यांचे काम सुरू आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी बेंगळूरुत स्वतंत्र विद्यापीठही प्रेमजींच्या नावे सुरू झाले आहे. मात्र त्यांच्याइतके दातृत्व इतरांनी दाखवलेले दिसत नाही. मुकेश अंबानींनी आतापर्यंत शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास क्षेत्रात ४३७ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. परंतु हे प्रमाण त्यांच्या एकूण मालमत्ता मूल्याच्या ०.१ टक्के इतकेच आहे. याउलट चीन आणि अमेरिकेतील परिस्थिती तपासणे अप्रस्तुत ठरणार नाही. गेल्या वर्षी चीनमधील १०० अतिश्रीमंतांनी २३० कोटी रुपये दाननिधी म्हणून दिले. यात १३ महिलांचा समावेश आहे. अमेरिकेत गेल्या वर्षी अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांनी सर्वाधिक दाननिधी दिला. ही रक्कम जवळपास २०० अब्ज डॉलरच्या घरात होती. तरीही वॉरन बफे, बिल गेट्स यांच्या पंक्तीत अद्याप बेझॉस यांची गणना केली जात नाही. उलट गेट्स (३७ टक्के), बफे (३६ टक्के), मायकेल ब्लूमबर्ग (१३ टक्के), मार्क झकरबर्ग (४ टक्के) यांच्या तुलनेत बेझॉस यांचे संपत्ती-दान गुणोत्तर फारच कमी म्हणजे ०.०९ टक्के इतके अत्यल्प असल्याची टीका त्यांच्यावर होते. भारतात केवळ प्रेमजी आणि नाडर यांनी स्वतंत्र विद्यापीठे काढली. पण न्यूयॉर्कचे माजी महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाला १८० कोटी डॉलरची घसघशीत देणगी दिली, जी अमेरिकन विद्यापीठाच्या इतिहासात विक्रमी ठरली. भारतात आपापल्या नावाने स्वतंत्र विद्यापीठे काढण्यापेक्षा मरणासन्न वा डबघाईला आलेल्या विद्यापीठांना देणगी देण्याची गरज बहुतेक उद्योगपतींना वाटलेली नाही. नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, किरण मुझुमदार-शॉ यांनी देणगी व दाननिधीच्या दिशेने काही आश्वासक पावले टाकलेली आहेत. परंतु पारंपरिक उद्योगपतींचे दातृत्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे यांच्यापलीकडे जात नाही. एका जुन्या उद्योगसमूहाने देशभर उत्तमोत्तम मंदिरे उभारून त्यालाच समाजसेवा मानले! निव्वळ सरकारी अनुदानांतून गरिबी निर्मूलन, बेरोजगारी निर्मूलन, आरोग्य सेवांचे व्यापक जाळे उपलब्ध होणे शक्य नाही असा साक्षात्कार अमेरिकेत नवअर्थव्यवस्थेतील धुरीणांना काही वर्षांपूर्वी झाला. त्यासाठी आपल्याकडील अफाट अतिरिक्त निधी समाजकार्याला दिला पाहिजे, अशी भावना वाढीस लागली. त्यातूनच उद्योजक गेट्स, गुंतवणूकदार बफे, तंत्रउद्यमी झकरबर्ग यांच्यातून खऱ्या अर्थाने ‘दानवीर’ उदयाला आले. त्यांच्या पुढील पिढय़ांसाठी या मंडळींनी जुजबी खर्च आणि राहणीमान भागवण्यापलीकडे काही ठेवलेले नाही. आपल्याकडील उंची घरे, प्रासाद, विमाने, नौका, घरातले महागडे आणि महोत्सवी लग्न समारंभ यांचे प्रदर्शन त्यांना करावेसे वाटत नाही. दातृत्व हे दाखवण्याचे दात असे मानले जाते आहे, तोवर समाजाला त्याचा उपयोग अल्पच.