17 December 2017

News Flash

वेदनेचा सल..

खड्डय़ांमुळे जीव गमावलेल्या त्या किमान २० बळींची काय चूक होती?

लोकसत्ता टीम | Updated: August 5, 2017 2:23 AM

खड्डय़ांमुळे जीव गमावलेल्या त्या किमान २० बळींची काय चूक होती? पण मग चूक कोणाची होती?

नागपूरमधील एक महिला मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाते काय, रस्त्यातील खड्डय़ामुळे बसलेल्या धक्क्याने ते बारा वर्षांचे बालक खाली पडते काय आणि मागून येणारी बस त्याला चिरडते काय.. किंवा मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीवरील एक तरुणी खड्डा चुकविण्यासाठी वळण घेते काय आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत मृत्युमुखी पडते काय.. हीच गोष्ट कल्याण-भिवंडी रस्त्यावरील भादवडची. हीच गोष्ट बारामती-जेजुरी रस्त्यावरील.. पण त्याचे काय? मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विचारतात, ‘यंदाच्या पावसाळ्यात वीसपेक्षा अधिक जणांना खड्डय़ांमुळे आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्तपत्रांतून समोर आले आहे. आता पुढील पावसाळ्यापर्यंत आणखी किती जणांचे बळी तुम्ही घेणार आहात?’ पण त्याचेही काय? पावसाळा नेमेचि येत असतो. दर पावसाळ्यात नेमेचि रस्त्यांवरील खड्डय़ांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांची पाने भरत असतात. वाचक त्या सवयीने वाचत असतात. वाचून पान उलटत असतात. ते तरी काय करणार म्हणा? कोणाकोणाच्या मरणाचा शोक करणार ते? कुठे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, कुठे शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थी मरताहेत, कुठे अंगावर झाड कोसळून एखादी महिला तडफडून मरते आहे, तर कुठे रस्त्यांवरील खड्डे येता-जाता कुणाचा बळी घेत आहेत. काय दोष असतो त्यांचा? ती मुंबईतील महिला आरोग्यदायी जगण्यासाठी म्हणून सकाळच्या शुद्ध हवेत फिरण्यासाठी बाहेर पडली होती. रस्त्याच्या कडेलाच तिचा मृत्यू दबा धरून बसलेला आहे हे तिला काय माहीत? बिचारी तिच्याच विचारांत चालली होती. अचानक बाजूचे नारळाचे झाड तिच्या अंगावर कोसळले. जीव गेला तिचा. तिची चूक काय होती? पण मग चूक कोणाची होती? आ वासून बसलेले रस्त्यांवरील खड्डे. त्यातील कोणता यमाचा दूत होऊन समोर उभा ठाकेल हे कोणालाही सांगता येणार नाही. कोणाची चूक आहे ती? बहुधा कोणाचीच नाही. असलीच तर ती त्या जीव गमावलेल्या लोकांचीच असेल. मुंबई-नाशिक मार्गावर कल्याणजवळच्या माणकोली परिसरात खड्डा चुकविताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या उल्हासनगरच्या रश्मी रोहेरा या वीस वर्षांच्या मुलीची असेल किंवा नागपूरमधील त्या बारा वर्षांच्या रितेशची किंवा दुचाकी चालवीत असलेल्या त्याच्या आईची. त्यांना नीट वाहने चालवता आली नाहीत. कदाचित रितेशच्या आईवर गुन्हाही दाखल झाला असेल, निष्काळजीपणे वाहन चालवून पोटच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल. खड्डय़ांत बळी गेलेल्यांवरही गुन्हे दाखल करावेत. पोलीस ते करणार नसतील, तर शासनाने त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांना तसे आदेश द्यावेत. अखेर प्रश्न राज्यातील कायद्यांचा आणि नियमांचा आहे. ते पाळले जात नाहीत. नागरिक निष्काळजीपणे वागतात. म्हणून तर खड्डे बळी घेतात.

केवळ निष्काळजीपणाच नाही, तर तो भ्रष्टाचारही आहे. आणि तो नागरिकांचा आहे, तुमचा-आमचा आहे. आज रस्त्यांवरील खड्डय़ांबद्दल आरडाओरडा करणारे आपण, व्यवस्थेला शिव्याशाप देणारे आपण, सरकारला दोष देणारे आपण आणि तीन-चार वर्षांपूर्वी रस्त्यारस्त्यावर मेणबत्त्या घेऊन उतरलो होतो तेही आपणच.. तेव्हा मनामनांत पेटलेल्या भ्रष्टाचारविरोधाच्या मेणबत्त्या आज अचानक कशा विझल्या? की एका जोरदार फुंकरीत विझून जायला त्या कोणाच्या वाढदिवसाच्या केकवरील मेणबत्त्या होत्या? तेव्हा व्यवस्था बदलासाठी, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी की तिसरी लढाई करीत होतो आपण? झाला का विजय त्यात? पण मग हे जीवघेणे खड्डे कोठून उगवले? कोणाच्या पापाची फळे आहेत ही? कंत्राटदारांच्या, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या? नेत्यांच्या? ते तर आहेच. खुद्द परिवहनमंत्री नितीन गडकरीच हे सांगत आहेत. डांबरी रस्ते बनावेत आणि त्यावर दरवर्षी खड्डे पडावेत ही तर नेत्यांचीच इच्छा असते, असे ते म्हणाले होते. टाळ्या पडल्या त्यांच्या त्या वाक्यावर. पण हे गोपनीय सत्य सर्वानाच ठाऊक आहे. यावर उतारा म्हणून परिवहनमंत्र्यांनी सीमेंट काँक्रीटचे रस्ते झाले पाहिजेत असे सांगितले. उत्तम पर्याय आहे तो. पण त्या रस्त्यांवरील काँक्रीटच्या दर्जाची हमी कोण देणार? आज जेथे तसे रस्ते तयार केले जात आहेत, त्यांच्या दर्जात गोलमाल होत असल्याचे बोलले जाते, त्याचे काय करणार? जेथे तेथे प्रश्न भ्रष्टाचाराचा आहे. टक्केवारीतून ओरबाडल्या जात असलेल्या समृद्धीचा आहे. नेते, अधिकारी, कंत्राटदार यांच्या मलिदाखोर साखळीचा आहे. कोठून तयार होते ही साखळी? राजकीय नेते ही भ्रष्टांची जमात म्हणून आपण सारेच त्यांना दूषणे देतो. ते समजा सुधारणेच्या पलीकडे आहेत. पण मग त्या बाकीच्या साखळीतले लोक कोण आहेत? ते तर तुमच्या-आमच्यातलेच आहेत. या देशाचे तेही नागरिकच आहेत. कदाचित यातील काही अधिकाऱ्यांची मुलेबाळेही तीन वर्षांपूर्वी मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरली असतील. त्या अधिकाऱ्यांचा, त्या कारकुनांचा भ्रष्टाचार विरोध गेला कुठे? मग मेणबत्त्या पेटवून आपण कोणता अंधार दूर केला? सारेच तर आपल्यातलेच आहेत. नेतेसुद्धा आपलेच लाडके आहेत. निवडणुकीच्या वेळी जेव्हा ते आपल्या दाढीला हात लावीत, तुमचा आमच्यावर भरोसा आहे काय असे विचारीत होते, तेव्हा आपणच जोरदार माना हलवीत त्यांच्यावर भरोसा ठेवला होता. आज तेच खड्डय़ांच्याच नव्हे, तर सर्वच भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर आपल्याला गोलगोल फिरवीत आहेत. आपला तेव्हाचा सात्त्विक संताप, तेव्हा व्यवस्थेवरचा राग याचे पद्धतशीरपणे कालवे काढून देण्यात आले आहेत, द्वेषाचे. आपण त्या द्वेषाची रक्तपंचमी खेळतो आहोत आणि भ्रष्टाचार सुखेनैव सुरू आहे. आणि हे भ्रष्टाचाराचे खड्डे साधे नाहीत. त्यावरून राजकीय कलगीतुरे सुरू आहेत. कोणी कोणाच्या कारभारात पारदर्शीपणे डोकावून पाहात आहे, तर कोणी खड्डे मोजणारे पहारेकरी झोपले काय म्हणून चिमटे काढत आहेत. हे पाहिले की वाटावे, हे राजकीय नेते की समाजमाध्यमी जल्पक? त्यांचे हे शिमगे आणि त्यासाठीची सोंगे हे नागरिकांना छान रमविणारे असते, हे खरे. पण यामुळेच मूलभूत मुद्दे बाजूला राहतात. अन्यथा, आतापर्यंत आपल्या सर्वाच्याच हे लक्षात यायला हवे होते, की हे भ्रष्टाचाराचे खड्डे आता तुमच्या-माझ्या जिवावर उठलेले आहेत. असे कदापि होऊ  नये, परंतु तुमच्या-माझ्या प्रियजनांपैकीच कोणी उद्या त्या खड्डय़ांचा बळी जाऊ  शकतो. कोणाच्या डोक्यावर रस्त्यावरचे झाड पडू शकते. कदाचित आपले राहते घरही आपले स्मशान बनू शकते. घाटकोपर दुर्घटनेने तेही दाखवून दिले आहे. त्यातही हीच स्वत:ला या राष्ट्राचे नागरिक म्हणविणाऱ्यांची बेपर्वाई, गुंडगिरी, खाबूगिरी.. सारे सारे दिसले.

खेद याचाच आहे की हे सारे माहीत असूनही कोणालाच काही माहीत नाही. सारे दिसत असूनही कोणालाही काहीही दिसत नाही. मग कोणी कोणाला दोषी धरायचे? नागपूरचा रितेश, भिवंडीतला धीरज, ती रश्मी.. ते किमान २० बळी.. त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? काँक्रीट आणि डांबरात भेसळ करणारे उत्पादक, रस्त्याच्या कामातील दर्जाबाबत तडजोड करणारे कंत्राटदार, त्यांवर नीट लक्ष न ठेवणारे अभियंते, पालिकेचे अधिकारी, नेते की त्या नेत्यांना निवडून देणारे आपण? हे सगळे आपल्यातलेच. ते अभियंते, ते अधिकारी हे तर आपल्याच वर्गातले. त्यांना जबाबदार मानायचे तर केवळ राज्ययंत्रणेलाच नव्हे, तर समाजव्यवस्थेकडेही बोट दाखवावे लागेल. ते कसे परवडायचे? मग त्या रितेशला कोणी मारले? की कोणीच मारले नाही? तसेच असेल. नो वन किल्ड रितेश. हे असेच जाहीर करायला हवे. नाही तर त्या वेदनेचा सल आपल्याला नीट जगू देणार नाही..

First Published on August 5, 2017 2:23 am

Web Title: bad roads killed people in maharashtra