मावळते अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे निरोपाचे भाषणही प्रामाणिक होते, हे अधिक महत्त्वाचे..

विद्यमान अवस्थेसाठी आपल्या पूर्वसुरींच्या नावे बोटे न मोडता, अमेरिकेला ओबामांनी आर्थिक संकटातून आणि ‘अहं’च्या गर्तेतून बाहेर काढले. इराक, इराण, क्युबा यांविषयीच्या त्यांच्या धोरणांमुळे, सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा उदारमतवाद केवळ टाळीबाज न उरता अनुकरणीय ठरतो..

JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार

छाती पिटणारा राष्ट्रवाद आणि राष्ट्रउभारणी या दोन गोष्टी किती भिन्न आहेत हे ज्यांना समजून घ्यावयाचे असेल त्यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी दिलेले निरोपाचे भाषण पाहायला/ऐकायला हवे. पुढील शुक्रवारी २० जानेवारीस ओबामा आपली भरजरी अध्यक्षीय वस्त्रे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चढवतील आणि गेल्या जवळपास महिनाभराचा त्यांचा निरोप समारंभ संपुष्टात येईल. विविध नियतकालिके, वाहिन्या आदींना त्यांनी या काळात मुलाखती दिल्या. तरीही सर्वाचे लक्ष लागले होते ते त्यांच्या अखेरच्या भाषणाकडे. ते बुधवारी झाले. त्यासाठी त्यांनी आपली राजकीय कर्मभूमी शिकागो या शहराची निवड केली. असे करणे आगळे होते. याचे कारण अमेरिकेचा मावळता अध्यक्ष व्हाइट हाऊसमधील ओव्हल सभागृहातील आरामदायी वातावरणात अध्यक्षीय भाषण करतो. ओबामा यांच्या आधीचे अध्यक्ष धाकटे जॉर्ज बुश यांनी असेच केले होते आणि त्या भाषणासाठी जेमतेम २०० व्यक्ती ओव्हल सभागृहात हजर होत्या. ओबामा यांच्या या भाषणासाठी २० हजार व्यक्तींनी गर्दी केली होती आणि या सभेच्या मोफत प्रवेशिका मिळाव्यात यासाठी बर्फाळलेल्या वातावरणात मध्यरात्रीपासून लोकांनी रांगा लावल्या होत्या. इतके करूनही अनेकांची निराशा झाली. पुढे तब्बल पाच हजार डॉलर्स मोजून.. म्हणजे साधारण रु. ३५ हजार .. अनेकांनी या भाषणाच्या प्रवेशिका विकत घेतल्या. त्यामुळे या भाषणास आलेली व्यक्ती ही स्वत:हून आलेली होती आणि त्यांच्या पक्षास गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करावे लागले नव्हते. ओबामा यांचे हे भाषण हे अपेक्षेप्रमाणे उच्च दर्जाचे झाले. यात केवळ चमकदार, चटपटीत वक्तृत्वकलेचा आविष्कार नव्हता. त्या वक्तृत्वास यशापयशाच्या प्रांजळ कबुलीची जोड होती.

कोणत्याही व्यक्तीची कारकीर्द हे जमलेल्या आणि न जमलेल्या निर्णयांचे मिश्रण असते. या मिश्रणाचा जमाखर्च मांडला असता कोणती तागडी अधिक वजनदार यावर त्या व्यक्तीचे मूल्यमापन इतिहास करतो. ओबामा यांचेही तसेच होणार आहे. त्यामुळे त्यांचे भाषण किती प्रभावी झाले यापेक्षा ते किती प्रामाणिक होते ही बाब अधिक महत्त्वाची ठरते. या प्रामाणिकपणाच्या कसोटीवर ओबामा जगातील अनेक नेते वा नेते म्हणवून घेणाऱ्यांपेक्षा अधिक उजवे ठरतात. २००८ साली ते जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हा जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली होती. अमेरिकेत तर जणू बँका बुडण्याची साथच आली होती आणि अवघ्या आठ वर्षांत जगावर मंदीचे सावट पसरले होते. सत्ताग्रहणासाठी ही काही आदर्श अवस्था नव्हे. परंतु आपल्या विद्यमान अवस्थेसाठी आपल्या पूर्वसुरींच्या नावे बोटे मोडण्याचा लोकप्रिय आणि बिनबुद्धीचा मार्ग ओबामा यांनी निवडला नाही. येस वुई कॅन.. हा आशावाद ही त्यांची निवडणूक घोषणा होती. तीनुसार त्यांनी कमालीच्या संयमाने अमेरिकी अहं सांभाळत आपली अर्थव्यवस्था हाताळली आणि देशाला एका स्थिर पातळीवर नेले. यातील अहं सांभाळणे ही कामगिरी अधिक महत्त्वाची. याचे कारण त्यांच्या आधीचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जणू साऱ्या विश्वाचे पालकत्वच आपल्याकडे आहे अशा थाटात अनेक आघाडय़ांवर अमेरिकेस तोंडघशी पाडले होते. इराक, अफगाणिस्तान, हुआंतानामो बे असे अनेक उद्योग बुश यांनी केले होते. अमेरिकी जनतेचा राष्ट्रवादी फुगा त्यांनी नको इतका फुगवलेला होता. परिणामी अर्थव्यवस्था कोसळते की काय अशी परिस्थिती होती. ओबामा यांनी ती धीरोदात्तपणे हाताळली आणि हा अतिफुगलेला राष्ट्रवादी फुगा न फोडता आपल्या निर्णयातून त्यातील हवा काढावयास त्यांनी सुरुवात केली. त्या अनुषंगाने इराकमधून अमेरिकी सैन्य मागे घेण्याच्या त्यांच्या निर्णयाकडे पाहावे लागेल. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या ओसामा बिन लादेन याला टिपणे हीदेखील त्यांची धाडसी कामगिरी. तसेच इतके दिवस आततायी आगलावी भाषा करणाऱ्या इराणला चर्चा पातळीवर आणणे आणि अणुऊर्जा करारास भाग पाडणे ही बाबदेखील तितकीच महत्त्वाची. या दोन्ही देशांतील नेत्यांना एकमेकांच्या नावे शिमगा करण्यातच आनंद वाटत होता. तीच बाब क्युबा या देशाचीदेखील. त्या देशाशी अधिकृत राजकीय संबंध प्रस्थापित करणे हे ओबामा यांच्या शिरपेचात निश्चितच मानाचा तुरा ठरावे. तथापि याच काळात आयसिससारख्या कराल दहशतवादी संघटनेच्या निर्मितीकडे झालेला काणाडोळा हे ओबामा यांचे निश्चितच अपयश ठरेल. निर्नायकी इराक, तितकाच निर्नायकी लिबिया आणि या देशांतील श्रीमंत तेलसाठय़ांच्या मालकीतून तयार झालेली आयसिस ही ओबामा यांच्यासाठी वाहती जखम राहील.

ओबामा यांच्या या भाषणाचे मूल्यमापन करावयाचे ते या संमिश्र पाश्र्वभूमीवर. आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात ओबामा यांनी गेल्या आठ वर्षांतील जमाखर्च प्रामाणिकपणे मांडला. ज्याच्या यशात आपला काहीही वाटा नाही, ते घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही तसेच आपल्या कार्यकाळातील त्रुटींसाठी अन्यांना दोष देण्याचा राजकीय मार्गही निवडला नाही. या जमाखर्चाइतकेच त्यांनी आपल्या देशातील लोकशाही अवस्थेविषयी केलेले भाष्य अधिक लक्षणीय ठरते. जनतेतील सभ्यतेचे प्रतिनिधित्व करणारी लोकशाही हे आपले बलस्थान आहे आणि ते सशक्त आहे तोपर्यंत जगात अमेरिकी स्थानास धक्का लागणार नाही, हे त्यांचे विधान लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. यातील जनतेतील सभ्यता हा मुद्दा उल्लेखनीय. अमेरिकेस सध्या भेडसावणाऱ्या सर्व संकटांसाठी स्थलांतरित, अन्य धर्मीय आदींकडे बोट दाखवण्याचा प्रकार अलीकडे त्या देशात वाढू लागला आहे. ओबामा यांचे या संदर्भातील भाष्य सूचक म्हणावे लागेल. या देशातील अन्य धर्मीयदेखील आपल्याइतकाच देशप्रेमी आहे, हे स्थानिक अमेरिकी जनतेने विसरू नये, हे त्यांचे सांगणे त्यांच्यातील समन्वयवादी वृत्तीचे दर्शन घडवणारे आहे. गोऱ्या जनतेने येथील कृष्णवर्णीयांकडे पाहताना तो काही विशेष हक्क मागत आहे, असा ग्रह करून घेऊ नये तसेच कृष्णवर्णीयांनी प्रत्येक स्थानिक गोऱ्या व्यक्तीस सर्व गरजा भागलेला सुखवस्तू असे मानू नये, गोऱ्या नागरिकांनाही अनेक विवंचनांना तोंड द्यावे लागत आहे, याचे भान असू द्यावे हा त्यांचा सल्ला विशेष महत्त्वाचा ठरतो. जगात सर्वत्र ‘ते’ आणि ‘आपण’ असे दुभंग तयार होत असताना सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा हा उदारमतवाद केवळ स्वागतशीलच नव्हे तर अनुकरणीयदेखील म्हणावा लागेल. लोकशाहीच्या प्रभावी अमलासाठी सर्वानी एकाच सुरात गायला हवे, हा दुराग्रह किती चुकीचा आहे हा मुद्दा ओबामा यांनी मांडला. जगभरात दखल घेतलीच जायला हवी असा त्यांच्या या भाषणातील मुद्दा म्हणजे लोकशाही गृहीत धरून गाफील राहू नका, हा त्यांनी नागरिकांना दिलेला सल्ला. व्यवस्थेला अशक्त करणाऱ्या घटकांपासून सावध राहा हे त्यांचे सांगणे फारच मूलगामी ठरते. लोकशाहीस असलेल्या धोक्याचा सुगावा लागत नाही आणि म्हणून ती वाचवण्याची पुरेशी संधी मिळत नाही, हा इतिहास आहे. ओबामा यांच्या भाषणाने या धोक्याची जाणीव करून दिली. सर्व जग एकारलेले होत असताना आणि प्रत्येक देश ‘मी माझा’ अशा वृत्तीचेच प्रदर्शन घडवीत असताना ओबामा यांच्या भाषणातील हे शहाणे सूर विचारी जनांना निश्चितच सुखावणारे होते.

दु:ख इतकेच की ते लावणारी व्यक्ती ही पायउतार होत आहे. ओबामा यांच्या भाषणाआधी अनेकांनी आणखी चार वर्षे थांबा अशा स्वरूपाची गळ त्यांना घातली. कायद्याने तसे होणे शक्य नाही हे तर खरेच. परंतु अशी मागणी झाल्याने हुरळून न जाता ओबामा यांनी ती करणाऱ्यास लोकशाही मार्गाने झालेल्या सत्तांतराच्या महतीची आठवण करून दिली, हे अधिक हृद्य होते. आपल्या वाटचालीतील पत्नीच्या सहभागाची महती नमूद करताना ते काहीसे गहिवरले. पण अगदी क्षणिकच. एरवी भावनेला हात घालून जनतेच्या गळ्यात काहीही मारण्यापेक्षा त्यांच्या बुद्धीस तसेच विचारशक्तीस आवाहन करण्याचा मार्ग ओबामा यांनी निवडला ही बाब सर्वार्थाने कौतुकास्पद. त्यांची अध्यक्षीय कारकीर्द यासाठी ओळखली जाईल. त्यामुळेच काही खाचखळगे अजूनही असले तरी त्यांच्या आठवर्षीय अध्यक्षीय कारकीर्दीचे वर्णन कुसुमाग्रज यांच्या ‘तो प्रवास सुंदर होता..’  या काव्यरेखेने करावे लागेल.