News Flash

पंत गेले, राव चढले..

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अचानक राबवलेले स्वच्छता अभियान पाहून काहींचा गरसमज होण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने राबवलेले स्वच्छता अभियान

श्रीनिवासन यांना आयसीसीच्या पदावरून किंवा शास्त्री, गांगुली, बिन्नी, कुंबळे यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळातून दूर करणे हे खरोखरच स्वच्छतेचे पाऊल की पश्चातबुद्धीने केलेली सारवासारव? भ्रष्टाचारासाठी निरीक्षक नेमूनही त्यांना अधिकार नसणे किंवा राजीव शुक्लांना कायम सदस्यत्व, यातून यापुढील स्वच्छ कारभाराची हमी कशी मिळणार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अचानक राबवलेले स्वच्छता अभियान पाहून काहींचा गरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु क्रिकेट प्रशासकांचे झालेले हे काही हृदयपरिवर्तन नव्हे. मंडळाचे नवे अध्यक्ष शशांक मनोहर यांना वार्ताहर परिषदेत नेमका याच बाबत प्रश्न विचारण्यात आला. आज स्वच्छतेची भाषा करताना तुमच्या आसपास जे आहेत तेच इतके दिवस मंडळात कार्यरत होते, तेव्हा त्यांनी हे टाळण्यासाठी काय केले, असे मनोहर यांना विचारण्यात आले. त्याचे त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्यातील चलाख वकिली बाणा दर्शवणारे आहे. परिस्थितीच्या रेटय़ामुळे काही जणांना काही निर्णय घ्यावे लागतात. पण जे काही घडून गेले त्याची चर्चा करीत बसण्यापेक्षा भविष्याकडे पाहणे जास्त बरे, असे मनोहर म्हणाले. म्हणजे, या मंडळींनी त्या वेळी काही वादग्रस्त निर्णय घेतले, त्यामागे तत्कालीन परिस्थिती होती. आता ते काही निर्णय घेत आहेत, त्यामागे विद्यमान परिस्थिती आहे आणि उद्या त्यांनी जर काही निर्णय घेतले तर त्यामागे तेव्हाची काही परिस्थिती असेल, असे मनोहर सूचित करतात. याचा अर्थ इतकाच जे काही झाले वा होते आहे त्यामागे नतिक मूल्यांची चाड आहे, असे इतरांनी उगाच मानावयाचे कारण नाही. नतिक वागणे ही तूर्त सोय आहे. उद्या तसे वागणे गरसोयीचे ठरू लागले तर ते सोडून दिले जाईल. यास वास्तववाद म्हणता येईल. भारतीय क्रिकेट प्रशासक हे असे आदर्श वास्तववादी आहेत. त्याचमुळे क्रिकेटची मदाने सर्व प्रकारच्या साग्रसंगीत गोंधळ आणि गरव्यवहाराची गंगोत्री बनले असून केवळ माजी प्रमुख एन श्रीनिवासन यांच्या गच्छंतीमुळे हे सर्व बदलण्याची शक्यता नाही. मनोहर यांच्या समितीने मंगळवारी झालेल्या बठकीत श्रीनिवासन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रमुखपदावरून काढण्याचा निर्णय घेतला. तो योग्यच. अतिविलंबाने का होईना असे काही करावेसे वाटले, हेच मुळात क्रिकेट मंडळात धुगधुगी असल्याचे लक्षण. त्याचे स्वागतच करावयास हवे. त्याच वेळी मंडळाने व्यावसायिक हितसंबंध एकमेकांच्या आड येऊ नयेत, यासाठीही नवी नियमावली सादर केली. त्यानुसार रवी शास्त्री, रॉजर बिन्नी, सौरव गांगुली, अनिल कुंबळे आदींना आपापल्या डोक्यावरील अनेक टोप्यांपकी काही परत कराव्या लागल्या. हेही होणे आवश्यकच.

याचे कारण श्रीनिवासन यांनी आपल्या कारकीर्दीत शक्य होतील ते सर्व घोटाळे करून पाहिले. पत्रकारांना वश करणे, सचिनला कारकीर्दीतील शेवटचा सामना मुंबईत खेळता यावा यासाठी तारखांची गडबड करणे, क्रीडा मदानातील वार्ताहर कक्षातूनही अर्थसंधान साधणे, विरोधी लिहिणाऱ्यास वार्ताकनच करता येणार नाही, अशी व्यवस्था करणे, वैयक्तिक गंडासाठी दौरे बदलणे आदी अनेक भानगडी या गंधधारी श्रीनिवासनाने केल्या. त्यातही हद्द म्हणजे क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रमुखपदी असतानाही स्वत:चा वेगळा संघ त्यांनी उभारला. त्यात त्यांचे जामात भलतेच उद्योगी निघाले. इंडियन प्रीमिअर लीग नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटी कुंभमेळ्यात त्यांनी भलतीच दुकानदारी केली आणि काळ्या पशाने दुथडी भरून वाहणाऱ्या गंगेत आपले हात धुऊन घेतले. सामनानिश्चिती प्रकरणात त्यांचे नाव आल्यावर तरी श्रीनिवासन सासरेबुवांनी शहाणे होत चार हात दूर राहावयास हवे होते. तेही त्यांनी केले नाही. आपल्या नतद्रष्ट जामाताची ते पाठराखण करीत राहिलेच, पण त्याच वेळी या पापाची जबाबदारीही टाळत राहिले. क्रिकेट व्यवस्थापनाचे सर्वोच्च पदाधिकारी या नात्याने हे जे काही घडले त्याची अंतिम जबाबदारी ही श्रीनिवासन यांचीच होती. परंतु इतके सर्व होऊनही ते मात्र मी नाही बुवा त्यातला म्हणत खुर्ची सोडावयास तयार नव्हते. अखेर सर्वोच्च न्यायालयानेच दोन रट्टे दिल्यावर नाइलाजाने का होईना त्यांना क्रिकेट नियामक मंडळातून पायउतार व्हावे लागले. तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत ते होतेच. मनोहर यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने मंगळवारी अखेर त्यांची ही खुर्चीही काढून घेतली. याच बठकीत खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांचा हितसंबंधांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न मंडळाने केला.

त्याचेही स्वागत. याचे कारण कोणतीही व्यवस्था तयार करताना हे असे हितसंबंधांचे गुंते तयारच होणार नाहीत, अशीच नियमावली केली जाणे अपेक्षित असते. मुख्य परीक्षकाने स्वत:च्या चिरंजीवांची उत्तरपत्रिका तपासू नये, हा साधा नियम झाला. परंतु मंडळाने इतके दिवस तोदेखील कधी पाळला नव्हता. त्याचमुळे ज्या संघातील निवडीत आपला सुपुत्र आहे त्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख आपण होऊ नये हे रॉजर बिन्नी यांना लक्षात आले नाही. कर्नाटकाच्या संघात धाकल्या बिन्नीस घ्यावे की घेऊ नये अशी चर्चा सुरू झाली की हे थोरले बिन्नी चर्चा कक्षातून म्हणे बाहेर जात. हा असला नतिक देखावा अगदीच हास्यास्पद. याची जाणीव अखेर मंडळाला झाली आणि थोरल्या बिन्नींस दूर केले गेले. तीच बाब सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांचीही. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली क्रिकेट प्रशासनातही होता आणि त्याच वेळी सामन्यांचे समालोचनही त्यास करावयाचे होते. अनिल कुंबळे याचेही तसेच. तांत्रिक समितीच्या प्रमुखपदी तो होताच. पण त्याच वेळी महनीय नीताभाभी अंबानींची खासगी मालमत्ता असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची चाकरीही त्यास करावयाची होती. तेव्हा या दोघांना मंडळाने एक काही तरी निवडा असे सांगितले. हे एका अर्थाने बल गेल्यावर झोपा करण्यासारखेच असले तरी भविष्यात तरी कोणी हे असले दुहेरी घरोबे करणार नाही. याच्या जोडीला मंडळाने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्या. ए. पी. शाह यांना मंडळातील तक्रारींची, गाऱ्हाण्यांची आणि तसेच गरव्यवहारांची दखल घेण्यासाठी तटस्थ परीक्षक म्हणून नेमले. मंडळाच्या या नतिक कृतीने काही भारावून गेलेले दिसतात. पण यात भारावून जाण्यासारखे काहीही नाही. न्या. शाह यांची नेमणूक हा शुद्ध देखावा आहे. याचे कारण निरीक्षक म्हणून जरी ते नेमले गेले असले तरी त्यांना स्वतंत्र निरीक्षणाचा अधिकार नाही. म्हणजे त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी विचारार्थ पाठवल्या जातील त्याचीच चौकशी न्या. शाह यांना करता येईल. याबाबतही मेख अशी की न्या. शाह यांच्याकडे कोणत्या तक्रारी पाठवायच्या, कोणत्या नाहीत आणि मुळात पाठवायच्या की नाहीत याचा निर्णय मंडळ घेणार आहे. याचा अर्थ असा की मनोहर यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने न्या. शाह यांच्याकडे एखादी तक्रार पाठवलीच नाही तर या निवृत्त न्यायाधीशास काहीही करता येणार नाही. मंडळाच्या या बठकीत सर्वच सदस्यांनी स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याची गरज व्यक्त केली, असे मनोहर म्हणाले. असेच प्रशासन देण्याचा आपला प्रयत्न असेल अशीही पुस्ती त्यांनी जोडली. परंतु प्रथमग्रासे मक्षिकापात व्हावा त्याप्रमाणे त्यांनी मंडळाच्या कायम सदस्यांत राजीव शुक्ला असतील, असे स्पष्ट केले. तेव्हा इतकी उटपटांगी व्यक्ती जर मनोहर यांच्यासाठी अपरिहार्य असेल तर भ्रष्टाचारमुक्तीची बडबड अगदीच वरवरची ठरते.
तेव्हा केवळ भ्रष्टाचाराची चाड आहे म्हणून या मनोहर मंडळींनी हातपाय हलवले हे खरे नाही. तर वाढत्या भ्रष्टाचारामुळे क्रिकेटची दुभती गाय रोडावत चालल्याने उद्या पोटावर पाय येऊ नये म्हणून तरी काही तरी करायला हवे या गरजेपोटी त्यांनी हे उपाय योजले आहेत. काहीही असो. त्याचे परिणाम सकारात्मक हवेत. अन्यथा श्रीनिवासन पंत गेले आणि मनोहरराव चढले म्हणून काहीही गुणात्मक फरक पडणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2015 5:24 am

Web Title: bcci steps to reform the body
टॅग : Bcci
Next Stories
1 ब्रह्मी बिन लादेन
2 ..पुढे अंत तो दैन्यवाणा
3 गिऱ्हाईक फसकलास आसा..
Just Now!
X