राज्यातील सत्ताधारी अनेक आघाडय़ांवर डळमळीत असताना विरोधी पक्षांनी ठाम राहायला हवे. ते राहिले दूरच..

काही तरी असलेल्यांपेक्षा काही नसलेलेच भांडण, कज्जेदलाली आदींत अधिक वेळ घालवतात. याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. त्यामुळेच शहरांतील धनिकांच्या इमले वसाहतींपेक्षा गरिबांच्या वाडीवस्तीत अधिक कलहकल्लोळ दिसतो. याच न्यायाने सत्ताधाऱ्यांपेक्षा सत्तेपासून वंचित असलेले विरोधी पक्षीय हे नेहमीच मतभेदाने ग्रस्त असतात. महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच जो काही दुभंग निर्माण झाला आहे, तो वरील नियमच सिद्ध करणारा आहे. राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयोजित चहापानावर तर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलाच परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे परस्परांच्या बैठकांनाही गैरहजर राहिले. यातील मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला यात काही नवे नाही. अलीकडच्या काळात तर या चहापानावर बहिष्काराची प्रथाच सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रणे धाडायची आणि विरोधकांनी ती अव्हेरायची हे इतके सर्रास आणि सरसकट होते की या दोघांतील हे लटके मतभेद प्रदर्शन लक्षात घेत सरकारने ही प्रथा तरी बंद करावी किंवा पेय तरी बदलून पाहावे. तेव्हा या बैठकीबाबत नवे असे काही नाही. प्रश्न आहे तो दुसऱ्या बैठकीचा. तीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख विरोधी पक्ष सहभागी होऊन सरकारविरोधात संयुक्त आघाडी उभारण्याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते. ते झालेच नाही. त्यामागील कारण हे वंचित कसे मतभेदग्रस्त असतात ते दर्शवणारे आहे.

वरकरणी या दोघांतील मतभेद आहेत ते एका क्षुद्र मुद्दय़ावर. महाराष्ट्र विधानसभेत गौरव करताना पहिला मान माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा की माजी संरक्षणमंत्री, राष्ट्रवादीकार शरद पवार यांचा. शिष्टाचाराप्रमाणे पहिला सन्मान इंदिरा गांधी यांचा व्हायला हवा असा काँग्रेसचा आग्रह तर पवार हे या राज्यातील दोन्ही सदनांचे सभासद होते तेव्हा पहिला मान त्यांचा असे राष्ट्रवादीचे म्हणणे. या दोहोंतील एकही पक्ष दुसऱ्याचे श्रेष्ठत्व मानण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे या दोघांनीही एकमेकांच्या बैठकांकडे पाठ फिरवली आणि वार्ताहर बैठकींसाठी दोन स्वतंत्र सवतेसुभे उभारले. परिणामी सत्ताधाऱ्यांच्या बहुमताच्या खडकावर आदळून फुटण्याऐवजी विरोधी पक्षांची नौका नांगरलेल्या अवस्थेत असतानाच एकमेकांवर आपटून जायबंदी झाली. पण हे जे काही झाले त्यामागील खरे कारण पाहू गेल्यास वेगळेच सत्य आढळेल. या सत्याची दोन टोके आहेत. एका बाजूला भाजपवासी होण्यासाठी टपून बसलेले काँग्रेसजन आणि दुसरीकडे तसे काही न करता भाजपला मदत व्हावी असे करण्यास उत्सुक असलेला राष्ट्रवादी. हे वास्तव लक्षात घेता दोन्हींचा समाचार घेणे आवश्यक ठरते.

पहिला मुद्दा काँग्रेसचा. आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वशून्य आहे. पक्षाध्यक्षपद अशोक चव्हाण यांच्याकडे आहे खरे, पण ते मनोमन धास्तावलेल्या अवस्थेत आहेत. सत्ताधारी भाजपविरोधात आपण फारच टीकास्त्र सोडीत राहिलो तर न जाणो आपला ‘छगन भुजबळ’ व्हायचा, ही ती मनोमन भीती. त्यामुळे ते भाजपविरोधात काहूर उठवण्यास काचकूच करताना दिसतात. नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुदलात काँग्रेसनिष्ठाच संशयास्पद. भाजप आधी कोणाला आपले म्हणणार ही या दोहोंतील स्पर्धा. तसा या दोहोंचाही बहुपक्षीय अनुभव तगडाच. राधाकृष्ण हे सेना-भाजपच्या काळात सत्ताकाळात मंत्रिपदी होते. तसेच एक वेळ मुख्यमंत्रिपद भोगल्यानंतर पुन्हा ते मिळण्याची शक्यता नसल्याने राणे यांनी काँग्रेसला जवळ केले. परंतु एकदा पक्षात आल्यानंतर काँग्रेसने राणे यांच्या हाती धत्तुरा दिला. त्यांना सेनेतही नव्याने काही मिळण्याची शक्यता नव्हती. आता ती काँग्रेसमध्येही नाही. त्यात परत जोडीला कर्तबगार चिरंजीवांची चिंता. यामुळे राणे भाजपचा दरवाजा किलकिला व्हावा यासाठी रवळनाथाक साकडे घालून आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांचे काँग्रेसकडे लक्ष नाही. राहता राहिले पृथ्वीराज चव्हाण. कार्यक्षमतेबाबत त्यांच्याशी स्पर्धा करेल असा नेता आज काँग्रेसकडे नाही. पण तीच त्यांची अडचण आहे. कार्यक्षमास पुढे करावे तर राजकारण मागे राहते आणि राजकारण बऱ्यापैकी जमू शकेल अशांच्या कार्यक्षमतेची बोंब ही काँग्रेसची अडचण. हे काँग्रेसचे वास्तव.

तर राष्ट्रवादीची दुसरीच तऱ्हा. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांच्या वैयक्तिक निष्ठांविषयी आणि भाजपप्रेमाविषयी संशय घ्यावा अशी परिस्थिती. तर राष्ट्रवादी हा संपूर्ण पक्षच संशयाच्या धुक्यात. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांच्यातील सख्य आणि सौहार्द हे राजकारणातील उघड गुपित. निवडणुकांच्या हंगामात शत्रुपक्ष म्हणून दाखवण्यासाठी असलेला राष्ट्रवादी हा सत्ता मिळाल्यावर भाजपसाठी स्नेहांकित होतो हेदेखील आपल्या राजकारणाचे निखळ सत्य. त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामती सतत खुणावते आणि त्याच प्रेमापोटी मग आपण राजकारणात पवार यांचे बोट धरून आल्याचे सत्यदेखील मोदी यांना गवसते. या मैत्रीपूर्ण विरोधामुळे भाजपला राष्ट्रवादी हा प्रतिस्पर्धी वाटतच नाही. किंबहुना २०१९ साली महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिक काही खच्चीकरण करावयाची वेळ आली तर हाताशी राष्ट्रवादी पर्याय असलेला बरा असाच विचार भाजपच्या केंद्रीय वर्तुळात केला जातो. हे प्रेम दुतर्फा आहे. ते विविध मार्गानी व्यक्त होत असते. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर भाजपने २०१४ सालच्या निवडणुकांत रान माजवले त्या पाटबंधारे भ्रष्टाचाराच्या चौकशीत पवार अजित राहतील याची काळजी देवेंद्र फडणवीस घेतात ती या प्रेमापोटीच. याच्या जोडीला फडणवीस आणि भाजप नेत्यांना राष्ट्रवादीविषयी ममत्व वाटावे यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे शिवसेना. हा पक्ष केंद्रात आणि दिल्लीत दोनही ठिकाणी सत्तेत आहे. परंतु तरीही तो असमाधानी आहे. कारण भाजपकडून त्यास मिळत असलेली दुय्यम वागणूक. वास्तविक राज्यात भाजपची सत्ता सेनेच्या टेकूवर आहे. पण तरी भाजपला सेनेची जराही फिकीर नाही. गर्जेल तो बरसेल काय, या वाक्प्रचारावर भाजपचा ठाम विश्वास असल्याने रोज नवनवी बडबडगीते गाणाऱ्या सेनेस तो हिंग लावून विचारत नाही. एक तर सेना आपला पाठिंबा काढण्याचा अविचार करणार नाही यावर भाजपचा ठाम विश्वास आहे आणि समजा तो खोटा ठरलाच तर अडीअडचणीला राष्ट्रवादी आहेच. त्यामुळेही भाजपला सेनेची फिकीर नाही. यातून एक विचित्र परिस्थिती आपल्याकडे उद्भवताना दिसते. समविचारी पक्षाशी आघाडी करायची पण मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे ते विरोधी पक्षाशी. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांत आघाडी असूनही दोहोंतील संबंध तणावपूर्णच आहेत आणि दुसरीकडे भाजप आणि सेना हे युतीत असले तरी दोघांचाही परस्परांवर अविश्वासच आहे.

या अशा सार्वत्रिक अविश्वासाच्या वातावरणात नेहमी फावते ते सत्ताधाऱ्यांचेच. किंबहुना राजकीय वातावरणात असा अविश्वास भरलेलाच राहावा ही सत्ताधाऱ्यांचीच इच्छा असते. त्यामुळे महाराष्ट्रात सांप्रत काळात सत्ताधारी भाजपने चिंता करावी असे काही नाही. उलट घोर लागायला हवा तो विरोधी पक्षीयांना. डाळ खरेदी ते शेतकरी आत्महत्या ते झोपडपट्टी पुनर्वसन योजना अशा अनेक आघाडय़ांवर सत्ताधारी डळमळीत असताना विरोधी पक्षांनी ठाम राहायला हवे. ते राहिले दूरच. उलट तेच एकमेकांत डगमगताना दिसतात. ज्या काळात जोमाने काम करून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायचे त्याच काळात विरोधकांचे हे असे होणार असेल तर त्याचे वर्णन एकाच शब्दांत करावे लागेल. कर्मदरिद्री.