भाजपला २०१४ इतक्याच बहुमताने पुन्हा सत्ता मिळावी असे वाटत असेल तर नवहिंदुत्ववाद्यांना आवरावे लागेल. कृष्णा यांच्या निमित्ताने ही संधी चालून आली आहे.

सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ या सुमार पुस्तकावर बंदी घालण्याच्या राजीव गांधी यांच्या पापातून अनेक चुकांचा जन्म झाला. मुसलमान मतांच्या लांगूलचालनासाठी राजीव गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी आता जनतेस सहिष्णुतेचे धडे देणाऱ्या पी चिदम्बरम यांनी केली. त्या वेळी ते गृह खात्यात मंत्री होते आणि इराणचे सर्वसत्ताधीश धर्मसत्ताप्रमुख अयातोल्ला खोमेनी यांच्याही आधी त्यांनी या पुस्तकावर भारतबंदीचा निर्णय घेतला. हा इतिहास आहे. पुढे अर्थात या बंदीची चूक त्यांनी मान्य केली. पण तोपर्यंत धर्म, कलाविष्कार आणि  अभिव्यक्तिस्वातंत्र्याला  आवळणारा राक्षस बाटलीतून बाहेर पडला. त्यास पुन्हा बाटलीबंद करणे कोणत्याही सरकारला शक्य झाले नाही. त्यानंतर नरसिंह राव यांच्यासारख्या विद्वान पंतप्रधानासही तस्लिमा नसरीन यांच्या ‘लज्जा’ या कादंबरीवर बंदी घालण्याचा मोह आवरला नाही. बाबरी मशीद पाडण्याच्या पाश्र्वभूमीवर आलेल्या या कादंबरीवरील बंदीचे कारणही मुसलमानांच्या भावना दुखावणे हेच होते. कलाविष्कारावर बंदीची ही काही पहिली उदाहरणे नाहीत. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांना बोल लावत सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांनी तर सेम्युर हर्ष याच्या ‘द प्राइस ऑफ पॉवर’ या पुस्तकावर बंदी घातली. का? तर देसाई हे अमेरिकी गुप्तहेर यंत्रणा सीआयएसाठी काम करीत असे त्यात सूचित केले होते म्हणून. वास्तविक त्याचा सणसणीत प्रतिवाद करण्याची संधी देसाई यांना होती. पण ते न करता त्यांनी बंदीचा सोपा मार्ग निवडला. देसाईदेखील मूळचे काँग्रेसचेच. या पाश्र्वभूमीवर एमएफ हुसेन यांनी काढलेल्या हिंदू देवतांच्या वादग्रस्त चित्रांवर वा वेंडी डॉनिगर यांच्या ‘द हिंदूज’ या पुस्तकावर बंदीची मागणी पुढे आली.. आणि ती अमलातही आली.. तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरणारे तिचा निषेध कसा करणार? हा प्रश्न आताच पडण्याचे कारण म्हणजे टी एम कृष्णा या कलाकाराच्या दिल्लीतील बैठकीनिमित्ताने उठलेले वादळ.

कृष्णा यांचा परिचय नव्या पिढीचा, ऐकायलाच हवा असा आश्वासक गायक इतकीच नाही. कर्नाटक संगीताच्या कर्मठ वातावरणातील संगीतास नव्या पिढीसमोर नव्या जाणिवांसह पोहोचवणारा असा हा कलाकार आहेच. पण त्याहीपेक्षा राजकीय मतांचे टोक असलेला कलाकार अशीपण त्यांची ख्याती आहे. महाराष्ट्रातील कलावर्गासाठी ही बाब दुर्मीळ अशी. कारण काही  मोजके सन्माननीय अपवाद वगळता येथील कलावृंद सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशाच मतांचा बुक्का कपाळावर लावण्यात धन्यता मानतो. खाविंदांचरणी मिलिंदायमान होणे हीच येथील कलाविश्वाची प्रमुख ओळख आणि हेच येथील महानायक, महागुरू आदींचे महानपण. अशा वातावरणात कृष्णा यांनी आपल्या टोकदार मतांची तलवार म्यान न करता पाजळत ठेवली हे त्यांचे वेगळेपण. कृष्णा कर्नाटकी संगीताचे तरुण अध्वर्यू असले तरी ते हिंदू धर्म आहे तसाच आंधळेपणाने स्वीकारणारे नाहीत. हिंदू धर्माभिमान्यांच्या सध्याच्या अतिरेकास त्यांचा आक्षेप आहे. त्याच वेळी ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मीयांतील चांगुलपणाचेही त्यांना आकर्षण आहे. अनेकांचा आक्षेप आहे तो यालाच. अलीकडच्या काळात स्वधर्माभिमान मिरवणे म्हणजे अन्य धर्मीयांचा तिरस्कार असे मानले जाऊ लागले असून ते त्यामुळे कृष्णा यांचा द्वेष करतात. त्याचमुळे कृष्णा यांच्या दिल्लीतील बैठकीसंदर्भात वाद झाला. ही बैठक शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मूलगामी आणि सातत्याने काम करणाऱ्या स्पीक मॅके या संस्थेने विमानतळ प्राधिकरणाच्या साहाय्याने आयोजित केली होती. यातील पहिल्या संस्थेविषयी धर्माभिमान्यांना काही करता येण्यासारखे नव्हते. ते त्यांनी दुसऱ्या आयोजक संस्थेवर दबाव आणून केले. विमानतळ प्राधिकरण सरकारी. तेव्हा ही सरकारी यंत्रणा हिंदू धर्माचा कथित अनादर करणाऱ्याचा कार्यक्रम कसा काय आयोजित करते, असा प्रश्न या धर्मप्रेमींना पडला. त्यातूनच समाजमाध्यमांत विमानतळ प्राधिकरणाविरोधात टीकेची यथेच्छ झोड उठवली गेली. हा रेटा इतका वाढला की कोणते तरी थातूरमातूर कारण पुढे करीत या संस्थेने आयोजनातून आपले अंग काढून घेतले. परिणामी हा कार्यक्रमच रद्द होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेर दिल्लीत सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाने पुढाकार घेतला अणि ही बैठक पार पडली. केंद्रातील सत्ताधारी भाजपसमोर यानिमित्ताने नाक खाजवायची संधी आप पक्षाला मिळाली. त्यांनी ती साधली. कृष्णा यांनी या बैठकीत हिंदू धर्मास प्रिय अशा भजनांप्रमाणेच ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मीयांचीही काही भजने म्हटली. बैठक उत्तम पार पडली. झाले ते इतकेच. परंतु त्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. त्यास भिडणे हे प्रत्येक विवेकवाद्याचे कर्तव्य ठरते.

कोणत्याही विचारसरणीस मानणाऱ्या सरकारच्या काळात राजापेक्षा राजनिष्ठ अशा प्रकारचा समुदाय तयार होत असतो. तूर्त आदीहिंदुत्ववाद्यांपेक्षाही कडवा असा हिंदुत्ववाद्यांचा समुदाय उदयास आला असून रा. स्व संघाला मान खाली घालावयास लावेल असे त्यांचे वर्तन आहे. हे नवहिंदुत्ववादी हे सत्ताधारी भाजपसमोरील खरे आव्हान. गोमांस भक्षणाच्या संशयावरून हिंसा करणे, अन्य धर्मीयांविरोधात टोकाची भूमिका घेणे आदी उद्योग या नवहिंदुत्ववाद्यांकडून सुरू असतात. समाजमाध्यमांत तर त्यांचेच राज्य असल्यासारखी परिस्थिती आहे. हे असे प्रत्येक टप्प्यावर होत असते आणि अशा अगोचरांना आवरणे ही सत्ताधीशांची जबाबदारी असते. कारण यामुळे धर्म जसा आणि जितका बदनाम होतो त्यापेक्षाही अधिक बदनामी त्या धर्माचे प्रामाणिक आणि सुसंस्कृत पालन करणारे आणि तत्कालीन सत्ताधीश यांचीच होत असते. या न्यायाने या नवहिंदुत्ववाद्यांच्या कृत्यांचे शिंतोडे सत्ताधारी भाजपच्या अंगरख्यावर उडणारच उडणार. अशा वेळी त्यांचा आणि आमचा संबंध नाही, अशी सोयीची बोटचेपी भूमिका घेऊन चालत नाही. तसे केल्यास उपद्रवी मंडळींना अधिकच चेव येतो आणि ते अधिकच टोकाची भूमिका घेऊ लागतात. या संदर्भात कडव्या इस्लामधर्मीय महंमद बिन इब्न सौद या सौदी अरेबिया संस्थापकाने काय केले ते पाहणे उद्बोधक ठरेल. सौद यास सत्तेवर येण्यासाठी कडव्या इस्लामी इखवान पंथीयांची मोठीच मदत झाली. परंतु सत्ता मिळाल्यावर हे इखवान मोकाट सुटून आपल्यासमोरच आव्हान निर्माण करीत असल्याचे इब्न सौद यास दिसून आले. यामुळे आपल्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यावर या धर्माभिमानी राजाने स्वत:हूनच इखवान पंथीयांना आवर घातला. विद्यमान सत्ताधारी भाजपला २०१४ इतक्याच बहुमताने सत्ता मिळावी असे वाटत असेल तर असेच काही करावे लागेल. कृष्णा यांच्या बैठकीच्या निमित्ताने ही सुसंधी समोर चालून आली आहे.

ती वाया घालवल्यास काय होईल? तरीही जे पारंपरिक मतदार आहेत ते भाजपला मतदान करतीलच. तथापि धर्माच्या पलीकडे विचार करून त्या वेळी ज्यांनी भाजपस पाठिंबा दिला, त्यांच्या मनात स्वत:च्या निर्णयाविषयी प्रश्न निर्माण होईल. जे भाजपच्या परिघाबाहेरचे आहेत ते याबाबत विचार करू लागतील. तसे झाल्यास ते भाजपच्या स्वप्नपूर्तीतील अडथळा ठरेल हे निश्चित.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर बिस्मिल्ला खान यांना विचारले गेले की तुम्ही नव्या इस्लाम धर्मीयांच्या देशात जाणार काय? त्यांनी नकार देताना प्रतिप्रश्न केला : वहाँ विश्वनाथजी कहाँ है? म्हणजे पाकिस्तानात काशी विश्वनाथ नाही. त्या वेळी बिस्मिल्ला खान यांच्यावर ना कोणी इस्लामी धर्मगुरूंनी टीका केली, ना हिंदू धर्मीयांना त्यात काही आक्षेपार्ह वाटले. बिस्मिल्ला खान यांचा सनई रियाजच मुळात गंगाकिनारी पेशव्यांनी उभारलेल्या बालाजी घाट मंदिरात झाला. सध्या गंगा स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. संस्कृतीस त्या गंगेप्रमाणे मानले तर तिच्या प्रवाहातील अडथळेही दूर व्हायला हवेत. ‘डाव्या’ किंवा ‘उजव्या’ घाटांच्या अतिक्रमणामुळे संस्कृतीचा प्रवाह अडणार नाही याची काळजी विवेकवाद्यांना घ्यावी लागेल.