काही विजयदेखील चिंता वाटावी असे असतात. भाजपचा ताजा विजय हा असा आहे..

विजय एकदा मिळाला की नीतिमूल्यांची कुंडली हवी तशी मांडता येते हे काँग्रेसी तत्त्व अंगीकारून भाजपने पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, अमरावती या शहरांत अनेक गणंगांना विजय-क्षमता पाहून उमेदवारी दिली. मुंबईत, शिवसेनेला वरचढ होण्याची संधी भाजपने अडीच दशकांनी मिळवली..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक अभिनंदन. राज्यातील दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांतील निवडणुकांत भाजपला जे काही यश मिळाले त्या श्रेयाचा निर्णायक वाटा निर्विवादपणे फडणवीस यांच्या पारडय़ात जातो. अपार राजकीय मेहनत आणि ती करताना प्रशासनावरची हुकमत सुटू न देण्याची जागरूकता त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिली. या निवडणुकांत जणू आपलेच स्वत्व पणाला लागले आहे अशा ईर्षेने फडणवीस यांनी या वेळी प्रचार केला. त्याचे फलित भाजपला मिळाले. तेव्हा या क्षणी फडणवीस आणि भाजप यांना या विजयाचा आनंद निर्भेळ उपभोगू देणे योग्य असले तरी या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपने जो आपल्या राजकीय स्वभावाचा नवा पैलू दाखवला आहे, त्याकडे लक्ष वेधणे आवश्यक वाटते.

या निवडणुकांसाठी भाजपचे धोरण दुहेरी होते. जेथे हा पक्ष सक्षम आहे तेथे पूर्ण ताकदीनिशी उतरणे आणि जेथे तो तसा नाही तेथे अन्य पक्षांतील दांडग्या नेत्यांना आपल्या वतीने उतरवणे. पुणे, नाशिक, उल्हासनगर आणि काही प्रमाणात अमरावती येथील पालिका निवडणुकांत हा मुद्दा प्रकर्षांने पुढे आला. पुण्यात संजय काकडे या बहुपक्षीय नामांकित अनुभवी व्यक्तीकडे भाजपची सूत्रे होती. पैशाच्या जोरावर कोणत्याही पक्षात कोणतेही पद मिळवण्याची कला ज्यांना अवगत आहे अशा महाराष्ट्रातील उच्च दर्जाच्या धनदांडग्यांत या काकडे यांचा समावेश होतो. खेरीज बहुपक्षांचा अनुभव. तेव्हा पुण्यातील संघीय भाजपने आणि मध्यमवर्गीय पारंपरिक मतदारांनी गोड मानून घ्यावे असे काकडे हे व्यक्तिमत्त्व नाही. परंतु राजकारणात विजय महत्त्वाचा. तो एकदा मिळाला की नीतिमूल्यांची कुंडली हवी तशी मांडता येते. हा काँग्रेसचा दूरदृष्टिवाद भाजपने अंगीकारला आणि अनेक गणंगांना पक्षाची दारे उघडी केली. हे सर्व मान्यवर आपापल्या भागांत आपला जम बसवून होते. अशा अनेकांना पक्षाने आपल्यात घेतले आणि वैचारिक गोमूत्राद्वारे त्यांचे शुद्धीकरण करून त्यांना निवडणुकांत सोडले. त्याचा परिणाम झाला. यातील बहुसंख्य विजयी ठरले आणि भाजपच्या खात्यात पुणे महापालिकेची नोंद झाली. एरवी गिरीश बापटांना काही हे झेपते ना. हा पुण्यातील नवनैतिक बाणा भाजपने शेजारील पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि उल्हासनगरातही दाखवून दिला. पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला. भाजपने पवार यांचे निवडक मोहरे गळाला लावले आणि निवडणुकांत उतरवले. धाकले पवार याबाबत जसे गाफील होते तसेच ते या परिसरातील लोकसंख्येच्या बदलत्या चेहऱ्याबाबतही उदासीन होते. या भागातील नवशहरी आणि नवमध्यमवर्गीयांना पवार ग्रामीण परिसरातील नागरिकांना वाटत होते तितके आकर्षक वाटेनासे झाले. भाजपने हे ओळखून आपल्या निवडणूक धोरणांत बदल केला. त्याचा फायदा झाला. गंगाकिनारी नाशकातील जवळपास सर्वच्या सर्व मनसे निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जणू दत्तकच घेतला. नाशकात सत्ता मनसेची होती. परंतु त्यांना काही भवितव्य नव्हते. ते भाजपने दिले. याचाही परिणाम झाला. नाशकात भाजपला दणदणीत विजय मिळाला. उल्हासनगरात तर भाजपने पप्पू कलानी यांच्या पक्षाशी हातमिळवणी करण्याइतकी प्रागतिकता दाखवली. एके काळी याच कलानीविरोधात युद्ध पुकारल्यामुळे आपला पक्षविस्तार झाला याकडे सोयीस्कर डोळेझाक करून भाजपने कलानी कुटुंबीयास निवडणूक गळामिठी मारली. तेथेही भाजपचा विजय झाला. नागपूर, अकोला या शहरांत भाजपला असे काही करावे लागले नाही. तेथे त्या पक्षाचा पाया चांगला होता. विजय इमारत उभारण्यास तो पुरेसा ठरला. अमरावतीत याआधीच सुनील देशमुख आदींना पक्षात घेऊन भाजपने आपले विस्तारवादी धोरण दाखवून दिले होते. तेथेही तो पक्ष यशस्वी ठरला.

या विजयांना अपवाद फक्त मुंबई आणि ठाणे या शहरांचा. या दोन्ही शहरांत शिवसेनेची मुळे आहेत. ते उखडून टाकण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे भाजपकडून सुरू आहे. वास्तविक अडीच दशके मुंबईत भाजपची शिवसेनेशी युती असली तरी ती सोयीची शय्यासोबत होती. भाजपला स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या संधीची गरज तेवढी होती. ती उद्धव ठाकरे यांनी आनंदाने पुरवली. वास्तविक या निवडणुकीत युतीसाठी भाजपने शंभरभर जागांची मागणी केली होती. ती सेनेने अव्हेरली. वर पुन्हा, ४० जागाही देण्याची भाजपची औकात नाही, अशा प्रकारची दर्पोक्तीही केली. सेना आणि भाजप हे राज्यात आणि दिल्लीत सत्तेवर आहेत. तरीही या दोघांनी हे वास्तव विसरून एकमेकांचे कपडे फाडण्याचा उद्योग केला. विशेषत: आमचे मंत्री राजीनामा खिशात घेऊनच फिरतात, भाजप सरकारला आमची नोटीस आहे वगैरे वल्गना उद्धव ठाकरे यांनी केल्या. त्या पोकळ होत्या. कारण सत्तेशिवाय राहण्याची सेनेची हिंमत नाही, हे या शहरांतील मतदार जाणून होते. तेव्हा शिवसेनेच्या या धमक्यांना कोणीही भीक घातली नाही. तसेच, शिवसेना हा किती भ्रष्ट आहे, या भाजपच्या टीकेकडेही मतदारांनी दुर्लक्ष केले. अर्थात यामागे शिवसेना भ्रष्ट नाही, असे कोणाचेच मत नाही. मुंबईतील खड्डेयुक्त रस्ते आणि शहराचे हेतुपूर्वक गचाळ प्रशासन यावरून ४० हजार कोट रुपयांचा अर्थसंकल्प कोठे मुरतो हे समजून घेणे अवघड नाही. परंतु शिवसेना भ्रष्ट असेल तर गेली २५ वर्षे भाजप त्या पक्षाशी सत्तासंगत साधून आहे. तेव्हा भाजपला इतकी वर्षे सेनेचा भ्रष्टाचार का आणि कसा दिसला नाही, हे प्रश्नही मतदारांना पडत होते. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिवापाड मेहनत करूनही भाजपला मुंबईत हवे तितके यश मिळू शकले नाही आणि भाजपच्या विरोधात टोकाची भूमिका घेऊनही उद्धव ठाकरे यांना एकहाती विजय मिळवता आलेला नाही. दोन्हीही पक्षांना समसमान मते देऊन मतदारांनी एक प्रकारे दोघांनाही एकाच तागडय़ात मोजले आहे. अर्थात यात भाजपच्या मतांत जवळपास तिप्पट वाढ झाली, हे सत्य असले तरी मुंबईची सत्ता एकहाती द्यावी इतकी ताकद हा पक्ष दाखवू शकलेला नाही, हेदेखील तितकेच सत्य आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांचे भुईसपाट होणे हे या निवडणुकांत समोर आलेले आणखी एक सत्य. २०१४ साली काँग्रेसची जी घसरगुंडी सुरू झाली आहे, ती काही थांबायची लक्षणे नाहीत. लातूरसारख्या जिल्हा परिषदांत काँग्रेस नामोहरम होते, याचा तोच अर्थ आहे. पक्षातील ज्येष्ठांची न उतरलेली सुस्ती आणि अजूनही रक्तात असलेली राजकीय मस्ती यामुळे काँग्रेसचे पुनरुत्थान अजूनही दूरच भासते. मुंबईत या पक्षाचे हे दुर्गुण विशेषत्वाने दिसून आले. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम हे एकटेच धावपळ करताना दिसत होते. गुरुदास कामत ते नारायण राणे हे पक्षाचे ज्येष्ठ रुसव्याफुगव्यांतच मग्न होते आणि पक्षाच्या यशापयशाविषयी त्यांना काहीही फिकीर नव्हती. काँग्रेसला पुन्हा धुगधुगी निर्माण करण्यासाठी हे असले नेत्यांचे प्रश्न पहिल्यांदा मिटवावे लागतील. या पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाचा नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. शरद पवार यांच्या पुण्याईवर किती काळ काढणार हा या पक्षापुढील मोठा प्रश्न असायला हवा आणि त्याचे उत्तर शोधताना नव्याने आणि वेगळेपणाने राजकीय मार्ग चोखाळायची इच्छाशक्ती त्यांच्यात दिसायला हवी. राज ठाकरे यांच्या मनसेबाबतही असेच म्हणावे लागेल. नाशकात त्यांनी काम केले, हे खरेच. पण निवडणुकीत त्या कामाची दामदुप्पट वसुली करण्यासाठी माणसे लागतात आणि त्यासाठी पक्ष उभारावा लागतो. तेव्हा आहे त्यापेक्षा आणखी वाताहत होऊ नये असे वाटत असेल तर राज ठाकरे यांना कामाला लागावे लागेल.

महाराष्ट्रातील ताज्या निकालाचा हा अर्थ आहे. काही पराजय जसे काळजी करावे असतात तसेच काही विजयदेखील चिंता वाटावी असे असतात. भाजपचा ताजा विजय हा असा आहे. घाऊक पक्षांतरे, गुंडपुंडांची सरबराई आणि पायदळी तुडवली गेलेली नीतिमूल्ये यांची काजळी या विजयाला नसती तर तो अधिक आनंददायी ठरला असता. पक्षाला आणि राज्यालाही.