News Flash

उटपटांगांचे अंगण

उत्सवांचे आधीच सवंग झालेले स्वरूप गेल्या १५ वर्षांत अधिक बाजारू झाले,

उत्सवांचे आधीच सवंग झालेले स्वरूप गेल्या १५ वर्षांत अधिक बाजारू झाले, ते यंदाही थांबले नाहीच. उलट, मुंबईतील भाजप नेत्यांनी दहीहंडीत अधिक रस घेतला. सत्ता राबवण्यासाठी आणि राखण्यासाठी सर्वच पक्ष विधायक काम करण्याऐवजी सोपे मार्ग कसे निवडतात, ते यातून दिसते. अधिक धोकादायक आहे ती ही बाब..

उनाड, रिकामटेकडय़ांना हैदोस घालू देण्याची अधिकृत व्यवस्था हे स्वरूप गोकुळाष्टमी, गणपती उत्सव वा नवरात्र या सणांना आले, त्यास बराच काळ लोटला. या असल्या सणांपासून सर्वच सुजाण, किमान विचारी व्यक्ती चार हात दूर गेल्या त्यासही आता बरीच वष्रे झाली. परंतु राज्यातील गतवर्षीच्या सत्ताबदलाने, न्यायालयाच्या खांद्यावरून का असेना, पण या धुडगुसाला आळा घालण्याचा पहिला प्रयत्न झाला. त्यानंतर आपल्याकडे सुरू होणाऱ्या सणांच्या हैदोस मालिकेतील रविवारी साजरा झालेला गोकुळाष्टमी हा पहिला सण. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या सणाने एकाच तरुणाचा बळी घेतला, जायबंदी कमी जणांना केले आणि पोलीसही गतवर्षांच्या तुलनेत काहीसे नििश्चत आढळले. परंतु प्रश्न असा की यास प्रगती म्हणावे की अधोगती? कारण आयोजक, त्यांच्या सांस्कृतिक कल्पना आणि सामाजिक वर्तन पाहता गोकुळाष्टमीसारखा सण शांततेत पार पडणे त्यांना मानवले नसणार. गोंधळ, गदारोळ आणि हिडीसपणा जेवढा अधिक तेवढे उत्सवाचे यश मोठे. त्यामुळे आपल्या उत्सवापायी जनतेस तितकासा त्रास झाला नाही, हे ऐकणे या मंडळींना आवडणार नाही. याचे कारण या नवराजकारण्यांची पौरुषाची संकल्पनाच मुळी नियमभंगाशी निगडित आहे. नियम मोडण्याची ज्याची क्षमता अधिक तो समर्थ नेता, अशी आजची व्याख्या. त्याचमुळे आपापल्या परिसरातून ओवाळून टाकलेल्या टोळभरवांना जो जास्तीत जास्त आश्रय देतो त्याचे कौतुक होते. एरवी सभ्यांनी उभे करू नये अशा लायकीची ही मंडळी. परंतु आपली िशगे मोडून वासरात शिरलेल्या माध्यमांमुळे अशा नियमभंगीयांचे कौतुक होऊन त्यांना अलीकडे राजमान्यता मिळताना दिसते. हे वास्तविक दूरगामी धोकादायक. परंतु त्या धोक्याची जाणीव ना या माध्यमांना आहे आणि ना या नियमभंगीयांचे नियंत्रण करणाऱ्या धुरीणांना. यामुळे या अशा नियमभंगीयांची नवी पिढी आता राजकारणात स्थिरावली आहे. हे असले उटपटांगगिरी करणारे सर्वच पक्षांत आहेत आणि सर्वच पक्षांत नेतृत्वाची शिडी चढण्याचा त्यांचा वेग लक्षणीय आहे. या अशांमुळे नेमस्तपणा हा नामर्दतेशी जोडला गेला असून सर्वच पक्षांतील नेमस्तांसाठी हा संकटाचा काळ आहे. यांना सत्ता हवी असते ती आपापल्या रंगाची हुल्लडबाजी बेलाशकपणे करता यावी म्हणून. म्हणजे सत्ताप्राप्तीतून काही विधायक, रचनात्मक घडवता येऊ शकते, याची जाणीव असूनही तसे करण्याची गरज या नवनियमभंगीयांना वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे अलीकडचे राजकारणही या पक्षाचे हुल्लडबाज विरुद्ध त्या पक्षाचे हुल्लडबाज असेच चालते. गतवर्षीपर्यंत शहरांपुरता राष्ट्रवादी काँग्रेस हा या हुल्लडबाजांचा राजरोस आणि राजमान्य अड्डा होता. खरे तर राज्यातील साखर कारखानदारीच्या पट्टय़ात या पक्षाची ताकद आहे, तितकी मुंबई, ठाणे, काही अंशी पुणे आदी शहरी पट्टय़ांत नाही. या पट्टय़ात साखर कारखानेही नाहीत. तेव्हा आपली विधायक बाजू दाखवण्यासाठी विध्वंसक उद्योग करण्याखेरीज या राष्ट्रवादीयांना पर्याय नाही. वास्तविक शरद पवार यांच्यासारखा उद्यमशीलतेचे महत्त्व जाणणारा नेता या पक्षाचा प्रमुख. परंतु या राजकीय वडाखाली कुत्र्याच्या छत्र्याच तेवढय़ा उगवल्या. पवारांचा दुर्गुण म्हणजे त्यांनीही या छत्री पिकाच्या बहराकडे दुर्लक्ष केले. गावाकडे या पक्षाच्या नेत्यांना सांस्कृतिक रंग उधळण्यासाठी तमाशा महोत्सव आदी मार्ग होते. शहरांत त्यांना भाव नाही. परिणामी या पक्षाच्या शहरी नेत्यांनी गोकुळाष्टमी, गणेशोत्सव अशा गोंधळास वाव मिळेल अशा सणांत लक्ष घातले. त्यामुळे हे सण हे शहरवासीयांची डोकेदुखी बनले. परंतु शहरवासीयांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीने हा असा चोरमार्ग का निवडला?
कारण या असल्या मार्गाने जनमानसात स्थान मिळवता येते हे राष्ट्रवादीआधी शिवसेनेने दाखवून दिले. मुंबईतील भणंग तरुणांना आधी भाषेच्या आणि नंतर धर्माच्या दिखाऊ कारणांखाली राजमान्यता मिळवून देण्याचा उद्योग प्रथम शिवसेनेने केला. त्यास सुरुवात झाली त्या वेळी निदान कागदावर तरी मराठी माणसाची अस्मिता नावाचा काही प्रकार होता. लवकरच तो मागे पडला आणि त्याची जागा या कथित नेत्यांच्या अस्मितेने घेतली. मराठी होती तेथेच राहिली. पण या नेत्यांची पुंडगिरी तेवढी वाढली. या नेत्यांना विरोध म्हणजे मराठी माणसाला विरोध, मराठी जनांचा अपमान वगरे बावळट युक्तिवाद केले गेले आणि मनगटशाहीच्या जोरावर ते खपलेदेखील. सत्ताधारी काँग्रेसमध्ये त्याच वेळी मराठीद्वेष्टय़ा नेत्यांचे पीक आल्याने सेनेचे फावले. किंबहुना काँग्रेसमधील मराठी नेत्यांनीच मागच्या दाराने सेना नेत्यांची भर केली, हा इतिहास आहे. या सगळ्याचा परिणाम असा झाला की ही धटिंगणशाही म्हणजे संस्कृतिरक्षण असे मानले जाऊ लागले. यातून सेनेचा पाया विस्तारला, हे नाकारता येणार नाही. अशा वेळी मुंबईत पाय रोवू पाहणाऱ्या राष्ट्रवादीस या सोप्या, लोकप्रिय आणि अंमलबजावणीत सुलभ मार्गाचा मोह पडला असल्यास नवल नाही. त्यात १९९९ साली या पक्षास सत्तेत वाटा मिळाला. त्यामुळे या असल्या धटिंगणशाहीस सत्तेतून मिळणारी रसद सहज पुरवता आली. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव वगरेस हिडीस स्वरूप येऊ लागले ते तेव्हापासून. म्हणजे सत्तेत असणारा राष्ट्रवादी सरकारी मदतीने दादागिरी करणार आणि सत्तेत नसूनही आम्ही कसे यास सामोरे जाऊ शकतो, किंबहुना राष्ट्रवादीपेक्षा कशी अधिक दादागिरी करू शकतो, हे शिवसेना दाखवून देणार. हे असे गेली १५ वष्रे सुरू राहिले.
त्यात गेल्या ऑक्टोबरात बदल झाला. कारण निवडणुकांतून मतदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घरी पाठवले आणि सेनेचे पंख कापून भाजपच्या हाती सत्तासूत्रे राहतील अशी व्यवस्था केली. त्यातही पुन्हा नेमस्त आणि वैधानिक मार्गाने आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना भाजपने मुख्यमंत्री केले. त्यामुळे एकाच वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांचेही मुसळ केरात. त्यात पंचाईत अधिक झाली ती सेनेची. दुसरा कोणता पर्याय नसल्याने त्यांना भाजपशी हातमिळवणी करावी लागली आणि मंत्रिमंडळात दुय्यम भूमिकाही घ्यावी लागली. हे असे होणे सेनेसारख्या पक्षासाठी राजकीयदृष्टय़ा अत्यंत अपमानास्पद होते आणि आहे. त्यात फडणवीस यांनी न्यायालयाच्या वहाणेने हा उत्सवखोरांचा िवचू ठेचायचा प्रयत्न केला. त्यात ते पूर्णपणे यशस्वी ठरले असते तर तो घाव सेनेसाठी वर्मी बसला असता. खेरीज, त्यात आणखी एक धोका होता. तो म्हणजे िहदू सणांविरोधात सरकार वागत असल्याची आवई काँग्रेस आणि राष्ट्रवादीस उठवता आली असती. तशी टीका झाल्यास ती भाजपला चिकटणारी नाही. परंतु सेनेस मात्र त्यामुळे कानकोंडे व्हावे लागले असते.
ते टाळण्याचा सेनेचा प्रयत्न म्हणजे गोकुळाष्टमीचा उत्सव पूर्वीसारखाच उन्मादी साजरा करणे. आम्ही आहोत तसेच आहोत, मुख्यमंत्री फडणवीस आमच्या नेत्यांना अडवू शकले नाहीत वगरे बढाया मारता याव्यात यासाठी सेना नेत्यांनी या वर्षी गोकुळाष्टमीत सहर्ष िधगाणा घातला. जे झाले ते त्यांच्या त्यांच्या राजकीय इयत्तेप्रमाणेच घडले. परंतु फडणवीस यांच्यासाठी यातील अधिक धक्कादायक बाब म्हणजे भाजप नेत्यांनी या उडाणटप्पूगिरीत घेतलेला रस. एकटय़ा मुंबईतच भाजप नेत्यांनी दीडशे दहीहंडय़ा पुरस्कृत केल्या होत्या. सत्ता आली की ती राबवण्यासाठी आणि राखण्यासाठी सर्वच पक्ष सोपे मार्ग कसे निवडतात ते यातून दिसले. अधिक धोकादायक आहे ती ही बाब. राजकारण आणि समाजकारणात जोपर्यंत प्राधान्याने बुद्धी आणि सभ्यतेस मान मिळत नाही तोपर्यंत ते असेच उटपटांगांचे अंगण राहणार.
सणांचे साजरीकरण हे याच उटपटांगगिरीचे एक अंग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 5:14 am

Web Title: bjp leaders emerge as new dahi handi kings of mumbai
Next Stories
1 ..मग ‘परिवारे’ काय केले?
2 इंद्राणीजाल!
3 विस्मृतीयोग्य स्मरणयात्रा
Just Now!
X