07 December 2019

News Flash

आयात धोरणाचा ‘अर्थ’

भाजपच्या पाठोपाठ शिवसेनेनेदेखील काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या गाळीव रत्नांना आपल्या पक्षाचे दरवाजे उघडले आहेत..

भाजपच्या पाठोपाठ शिवसेनेनेदेखील काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या गाळीव रत्नांना आपल्या पक्षाचे दरवाजे उघडले आहेत..

सैबेरियात कडक हिवाळ्यात जगणे अशक्य झाले, की रोहित आदी पक्षी उष्णकटिबंधीय प्रदेशात स्थलांतर करतात. अशी वेळ आपल्याकडे राजकीय पक्षांवर येते. विशेषत: निवडणुकीच्या काळात. विरोधी हवामानात राहणे अशक्य झाल्याने या काळात राजकीय नेते आपल्या पिलावळीसह सत्तेची ऊब जेथे मिळायची शक्यता आहे अशा उष्णकटिबंधीय पक्षांत (पक्षी : राजकीय पक्ष) स्थलांतर करतात. यास पक्षांतर असे म्हणतात. तथापि, आकाशात उडणारे पक्षी आणि हे आपल्याकडचे जमिनीवरचे पक्षांतरित यांत एक मोठा फरक आहे. तो म्हणजे आकाशातल्या पक्ष्यांच्या स्थलांतराचे काही एक नियम आहेत आणि काही एका निसर्गतत्त्वाने ते वर्षांनुवर्षे तसेच होत असते. परंतु नियम आणि तत्त्व हे मुद्दे आपल्याकडच्या राजकीय पक्षांतरितांस लागू नसतात. चार घटका आसरा देऊन जो चार दाणे समोर टाकेल आणि पोटात असलेले काही बाहेर काढणार नाही, त्या कोणाच्याही अंगणात आपले राजकीय पक्षी मुक्काम करू शकतात. कोणतेही तत्त्व, नियम, चाड आदी मुद्दे आपल्या पक्षांतरितांच्या आड येत नाहीत. प्राधान्याने पांढऱ्या कपडय़ांतील या पक्षांतरितांचा हंगाम सध्या आपल्याकडे मोठय़ा बहरात आलेला दिसतो. मुळात या पक्षांतरितांना चेकाळण्यासाठी एक निवडणूकदेखील पुरेशी असते. पण एका डोळ्याची इच्छा बाळगणाऱ्या दृष्टिहिनास दोन डोळ्यांचा लाभ व्हावा, तद्वत सध्या आपल्या पक्षांतरितांचे झाले आहे. एकापाठोपाठ दोन निवडणुका म्हणजे त्यांच्यासाठी चंगळच. त्यामुळे यातील बहुसंख्य आपापले चंबूगबाळे बांधून पक्षांतरासाठी सज्ज आहेत.

आणि ‘लाख दुखोंकी एक दवा’ असावी त्याप्रमाणे सध्या सर्वपक्षीय पक्षांतरोत्सुकांसाठी एकच पक्ष लक्ष्य दिसतो. तो म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे सांगणारा भारतीय जनता पक्ष. ‘सर्वे गुणा: कांचनम् आश्रयन्ते’ असे भर्तृहरीच्या नीतिशतकातील एक वचन आहे. त्यात थोडा बदल करून सर्व गुण आणि अवगुणदेखील भाजपच्याच आश्रयास येतात, असे आता म्हणता येऊ शकेल. आणि तसाही भाजप हा सध्या देशातील धनाढय़ पक्ष आहेच. त्यामुळेही हे वचन भाजपस लागू पडते. तथापि भाजप जे काही करीत आहे त्यामागील कारण काय, याबाबत मात्र एक निश्चित अशी कारणमीमांसा नाही. मुदलात आपल्याच पक्षात इतके गुणवान असताना अन्य पक्षीय गुणवानांची गरजच भाजपला का वाटावी, हादेखील तसा प्रश्नच. त्याचे उत्तर, आहे त्या गुणवानांवर भाजप नेतृत्वाचा विश्वास नसावा किंवा ते गुणवानच नसावेत, असेही असू शकते. त्यामुळे अन्य पक्षांतील गुणवानांना मोठय़ा प्रमाणावर आपल्या पक्षात आयात करण्याची वेळ भाजपवर आली असावी. आपले आयात धोरण वाटेल त्यास आपल्यात घेण्याएवढे लवचीक आहे हे भाजपने याआधी ‘आणीबाणी’फेम विद्याचरण शुक्ल ते नारायणदत्त तिवारी व्हाया नारायण राणे आदींना आपले मानून सिद्ध केलेच आहे. वास्तविक काँग्रेसच्या आणीबाणीच्या कृत्याने भाजप किती दु:खी झाला होता. त्या पक्षाचे मार्गदर्शकमंडळ शिरोमणी, माजी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांना तुरुंगात डांबण्याचे दुष्टकृत्य या विद्याचरणाचेच. पण राष्ट्रहितार्थ तो अपमान गिळून भाजपच्या त्याच नेत्यांनी आपल्या उदार अंत:करणाचे दर्शन घडवत त्या विद्याचरणासदेखील आपले म्हटले होते.

तोच उदार आणि विशाल दृष्टिकोन अलीकडे भाजप वारंवार दाखवू लागला असून त्याचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी विविध पक्षीय आतुर झाले आहेत. जे जे उदात्त त्यावर प्रेम करावे, या राजकीय पक्षांच्या दृष्टिकोनाचाच हा परिपाक. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी भाजपच्या या उदार दृष्टिकोनास भुलणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होईल. भाजपच्या या विनासायास मुक्त आयात धोरणात अडथळा आलाच तर तो फक्त एकाकडून येण्याची शक्यता आहे. तो म्हणजे शिवसेना. हा पक्ष भाजपच्या आघाडीतील. भाजप राष्ट्रवादाने भारलेला, तर हा पक्ष महाराष्ट्रवादाने पेटलेला. अर्थात, त्या कथित पेटलेपणाचा प्रकाश आणि त्या कथित आगीची धग मातोश्रीच्या पलीकडे अद्याप कोणास जाणवलेली नाही, ही बाब अलाहिदा. तीकडे दुर्लक्ष करणे योग्य. ज्या रीतीने भाजपचे ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे विधान जनतेने अतिशयोक्ती अलंकाराचे सवरेत्कृष्ट उदाहरण असे मानले, त्याच रीतीने जनतेने शिवसेनेचा महाराष्ट्रवाद गोड मानून घेतला.

परंतु यात अडचण ही की, राष्ट्रीय हिताचा विचार करावा लागल्यामुळे गेल्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रवादासमोर सेनेच्या महाराष्ट्रवादास शरणागती पत्करावी लागली. तोंड दाबून बुक्क्याचाच मार तो. पण वेदना दाखवण्याची सोयही महाराष्ट्रवादासमोर राहिली नाही. वेदना दाखवणार कशी? मर्द मराठीजन माघारीच्या वेदनेने कळवळतात हे पाहून महाराष्ट्रास काय वाटले असते, असा विचार करून माघार घ्यावी लागली तरी महाराष्ट्रवादी शिवसेनेने आपल्या वेदना गिळून टाकल्या. कडू औषध साखरेच्या पाकात घोळवून द्यावे त्याप्रमाणे शिवसेनेने राष्ट्रवादासमोर माघार घ्यावी लागल्याचे दु:ख सत्तेत सहभागी होऊन गिळले. त्यातही परत मर्द मराठी चातुर्य असे की, सेना सत्तेतही आहे आणि विरोधी पक्षातही आहे. असे एकाच वेळी दोन ठिकाणी असण्यासाठी फारच मोठे आध्यात्मिक सामथ्र्य लागते. ते शिवसेनेने बऱ्याच कष्टाने मिळवले. त्यात त्या पक्षाच्या पथ्यावर पडले ते विरोधी पक्षाचे नसणे. आणि विरोधी पक्षात असणार तरी कोण? विरोधी पक्षात राहून आपला ‘छगन भुजबळ’ करून घेण्यापेक्षा ‘नारायण राणे’ होणे केव्हाही अधिक शहाणपणाचे, हे आपल्या राजकीय नेत्यांनी कधीच ताडले. त्यात अमित शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताची हाक दिलीच होती. ती पडत्या फळाची आज्ञा ध्यानात घेऊन त्यातले बरेचसे भाजपवासी झाले. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही ठिकाणी वास करणे शिवसेना पक्षास शक्य झाले.

आता त्याचीच पुढची तयारी शिवसेनेने सुरू केलेली दिसते. ती म्हणजे काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या गाळीव रत्नांना आपल्या पक्षाचे दरवाजे सताड उघडणे. म्हणजे थोडक्यात, भाजपप्रमाणे मुक्त आयात धोरण राबवणे. परत शिवसेनेस भाजपसारखी ‘पार्टी विथ डिफरन्स’ वगैरे दाव्यांची चिंता नाही. अनेक गुणसंपन्नांना सेनेने ‘आपले’ म्हटल्याचा जाज्वल्य इतिहास आहे. ‘काँग्रेसचा दाऊद, तर आमचा अरुण गवळी’ अशा स्पष्टोक्तीतून सेनेने आपली तेजपूजकता आधीही दाखवलेली आहेच. आता त्याच दिशेने जात सेनेच्या पुढच्या पिढीने नवनव्या प्रतिभावंतांना जवळ करायला सुरुवात केली असून असे काही मोहरे सेनेत डेरेदाखल झालेदेखील. लवकरच या पुरुषोत्तमांची रांगच सेनाभवनच्या परिसरात दिसू लागेल, यात शंका नाही. मोठे मनोहारी दृश्य म्हणायचे हे. दक्षिण मुंबईत ‘योगक्षेमं वहाम्यहम्’च्या साक्षीने राजकीय आयुर्विमा काढू पाहणाऱ्यांची एक रांग भाजपच्या कार्यालयासमोर आणि दुसरीकडे दुसरी रांग शिवतीर्थी सेना कार्यालयासमोर. पण यात एक मेख आहे.

ती म्हणजे मुख्यमंत्रिपदाची. तूर्त हा मुद्दा मांडणे सगळ्यांसाठी अडचणीचे. पण म्हणूनच तो मांडणे हे आमचे कर्तव्य. हा मुद्दा असा की, या सध्याच्या आयात धोरणाच्या पलीकडे भाजप वा सेना यांच्यात खरी ईर्षां आहे ती मुख्यमंत्रिपदाची. ते हवे तर त्यासाठी आपल्या जोडीदारापेक्षा एक तरी आमदार जास्त निवडून आणणे उभयतांना आवश्यक. तेव्हा या निवडणुकीत खरी लढत होईल ती राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रवादी यांच्यात. दोन्ही पक्षांच्या मुक्त आयात धोरणाचा तो अर्थ आहे.

First Published on July 29, 2019 12:08 am

Web Title: bjp shiv sena ncp congress party election 2019 mpg 94
Just Now!
X