23 July 2019

News Flash

उडते की पडते?

या क्षेत्रात आता मध्यम आणि छोटय़ा आकाराच्या विमानांना पसंती मिळू लागली आहे.

बोइंग-७३७ मॅक्स’

अल्पावधीत अपघातग्रस्त झालेल्या ‘बोइंग-७३७ मॅक्स’ प्रकारच्या विमानावर अनेक देशांनी उड्डाणबंदी घातल्यानंतर आपल्याला जाग आली..

भारताच्या मुलकी विमान वाहतूक संचालनालयाने अखेर मंगळवारी रात्री ‘बोइंग-७३७ मॅक्स ८’ प्रकारच्या विमानांवर देशभर उड्डाणबंदी घातली. बुधवार सायंकाळपासून उड्डाणबंदीबरोबर अवकाशबंदीही जाहीर झाली आहे. थोडक्यात भारताचे आकाशही बोइंग-७३७ मॅक्स विमानांसाठी तूर्त प्रतिबंधित आहे. प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात अगदी अलीकडेपर्यंत लोकप्रिय असलेल्या या छोटय़ा विमानासाठी गेले तीन दिवस अनेक प्रतिकूल घडामोडींचे ठरले. या तीन दिवसांमध्ये १३ देशांतील २७ विमान कंपन्यांनी या विमानासाठी उड्डाणबंदी जाहीर केली. या प्रकारच्या विमानाला गेल्या सहा महिन्यांत झालेले दोन भीषण अपघात म्हणजे योगायोग नव्हते यावर जगभर विमान विश्लेषकांमध्ये मतक्य होऊ लागले आहे. ते या नवीनतम विमानाच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. बोइंग-७३७ मॅक्स हे विमान दोन वर्षांपूर्वी बाजारात आले. मात्र ऑक्टोबर महिन्यात इंडोनेशियात लायन एअर कंपनीच्या विमानाला पहिला अपघात झाला. त्यात १८९ प्रवासी मृत्युमुखी पडले. आता रविवारी इथियोपियन एअरलाइन्स कंपनीच्या विमानाला अपघात झाला, त्यात १५७ प्रवासी मृत्युमुखी पडले. इंडोनेशियन विमानाचा वैमानिक भारतीय होता. दोन्ही अपघातांमध्ये काही निवासी आणि अनिवासी भारतीय प्रवासी प्राणास मुकले. इंडोनेशियातील विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरण सुरक्षिततेच्या बाबतीत अतिशय ढिसाळ मानले जातात. इथियोपियाबाबत मात्र तशी परिस्थिती नाही. इथियोपियन एअरलाइन्सचे सुरक्षितता प्रगतिपुस्तक अतिशय नेटके आहे. म्हणूनच जगभर बोइंग-७३७ मॅक्स विमानांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले, ते या दुसऱ्या अपघातानंतर. या सगळ्या घटनांच्या केंद्रस्थानी आहे नवीन विमानातील तथाकथित सुधारणा!

बोइंग-७३७ मॅक्स विमान अत्याधुनिक करण्याच्या नावाखाली या विमानात एक प्रणाली बसवण्यात आली. उड्डाण करताना विमानाचे नाक जमिनीपासून विशिष्ट कोनातच उचलले गेले पाहिजे. हा कोन कमी राहिला, तर विमानाला आवश्यक ती ‘उचल’ किंवा लिफ्ट मिळणार नाही आणि ते समोरच्या दिशेने भरकटत जाऊन कोसळेल. याउलट, उड्डाणाचा कोन अधिक झाला, तर वेग कमी होऊन उड्डाणात अडथळे येऊन विमान अपघातग्रस्त होऊ शकते. या दुसऱ्या अवस्थेला ‘स्टॉल’ असे संबोधले जाते. ही दुसरी शक्यता अधिक साहजिक असल्याचे गृहीत धरून बोइंग-७३७ मॅक्सच्या नियंत्रण यंत्रणेमध्ये ही प्रणाली बसवण्यात आली. विमानाचे नाक प्रमाणाबाहेर अधिक उचलले जाते असे वाटल्यास ही प्रणाली ते खाली आणण्याचा प्रयत्न करते. पण याविषयीची माहिती चुकीची असल्यास गंभीर परिस्थिती उद्भवते. कारण काही वेळा नाक योग्य स्थितीत असूनही ते खाली आणले जाते आणि अशा वेळी विमानावर नियंत्रण मिळवणे हे वैमानिकासाठी अतिशय आव्हानात्मक ठरते. इथियोपियन एअरलाइन्सच्या अपघाताची चौकशी सुरूच झालेली नाही. परंतु लायन एअरच्या अपघातास बोइंग-७३७ मॅक्समध्ये बसवलेली सदोष प्रणाली काही प्रमाणात जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभर बोइंग-७३७ मॅक्सच्या नवीन यंत्रणेचे प्रशिक्षण देणारे पुरेसे प्रतिरूपक किंवा सिम्युलेटर उपलब्ध नाहीत. भारतात स्पाइस जेट आणि जेट एअरवेज या विमान कंपन्या या प्रकारची विमाने वापरतात. पण येथील वैमानिकांना भारतात नव्हे, तर सिंगापूरमधील प्रतिरूपकांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे विमानाचे नाक उड्डाण घेतल्यानंतर अचानक खाली आले, तर या आणीबाणीच्या परिस्थितीत नेमके काय करायचे याविषयीचे प्रशिक्षण फारच थोडय़ा वैमानिकांना आतापर्यंत मिळाले आहे. कोणतीही नवीन प्रणाली आणताना ती नादुरुस्त झाली किंवा अपयशी ठरली तर पर्यायी व्यवस्था काय, याविषयीची माहिती आणि प्रशिक्षण देणे हे विमान कंपनीचे आद्य कर्तव्य आहे. बोइंगसारख्या अग्रणी कंपनीकडून या आघाडीवर कुचराई झाली का, हे तपासावे लागणार आहे. ही विमाने सुरक्षित असल्याचा दावा बोइंगतर्फे केला जात आहे. पण आपली प्रणाली सदोष कशी नाही, हे त्यांनी अद्यापही सप्रमाण दाखवून दिलेले नाही. चूक कबूल केल्यास मृतांच्या नातेवाईकांकडून आणि काही सरकारांकडूनही भरपाईची मागणी होऊ शकते, ही भीती असली तरी तसे न केल्यास उद्या सर्वच विमाने उड्डाणबंदीमुळे जमिनीवर राहतील आणि एक दिवस भंगारात निघतील! ही दुसरी शक्यता बोइंगसाठी अधिक घातक ठरते.

वैमानिकांविषयी एक वाक्य प्रचलित आहे. ते म्हणजे, कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाविषयी हा समुदाय अंगभूत संशयी असतो! हा संशय निराधार नाही. विशेषत: प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात जवळपास प्रत्येक दशकात नवीन प्रकारची विमाने आणि त्यांच्या बरोबरीने नवीन तंत्रज्ञान बाजारात येत असतात. या तंत्रज्ञानाविषयी, विमानांविषयी वा विमानांतील बदलांविषयी जो सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे, अशा वैमानिकांच्या मताला नगण्य किंमत असते. वैमानिक उड्डाणांविषयीचे तज्ज्ञ असतात, पण ते तंत्रज्ञ नव्हेत असा एक युक्तिवाद याबाबत मांडला जातो. बोइंग-७३७ मॅक्स विमान हे छोटय़ा प्रवासी जेट विमानांच्या क्षेत्रात अत्यंत अत्याधुनिक मानले जाते. सध्या जगभर या विमानाची स्पर्धा एअरबस कंपनीच्या ए-३२० निओ विमानाशी आहे. मागणी नोंदणीच्या बाबतीत ए-३२० निओने बोइंग-७३७ मॅक्सवर मोठी आघाडी घेतलेली आहे. या क्षेत्रात आता मध्यम आणि छोटय़ा आकाराच्या विमानांना पसंती मिळू लागली आहे. भारतासारख्या देशात तर देशांतर्गत विमानसेवेचे जाळे वाढवण्यासाठी ‘उडान’सारखी योजना जाहीर झाली आहे. चीन, इंडोनेशिया, ब्राझील या देशांमध्येही विमान वाहतुकीची मागणी वाढत आहे. या बाजारपेठांवर लक्ष ठेवून असलेल्या विमान कंपन्या अद्ययावत विमाने बाजारात आणत असल्याचा दावा करत आहेत.

या जीवघेण्या स्पर्धेत प्रवाशांच्या सुरक्षेविषयी तितकीच खबरदारी बाळगली जाते का, याचा शोध घ्यावा लागेल. जगभर विमानांसाठी ग्राहक वाढत असले, तरी विमाने बनवणाऱ्या प्रमुख कंपन्या दोनच आहेत. बोइंग आणि एअरबस. याचा एक दुष्परिणाम म्हणजे, काही वेळा आहे त्या दोषासह किंवा पुरेशा चिकित्सेपूर्वीच विमाने स्वीकारावी लागतात. बोइंग-७३७ मॅक्सचे स्पर्धक असलेल्या ए-३२० निओ या विमानात इंजिन गरम होण्याची समस्या उद्भवते. भारतात अनेकदा या समस्येमुळे उड्डाणे प्रलंबित झालेली आहेत. पण याबाबत फार काही करता येत नाही, कारण बाजारपेठेची गरज भागवू शकतील अशी इतर विमानेच उपलब्ध नाहीत. जगभरच्या अनेक विमान कंपन्यांनी बी-७३७ आणि ए-३२० खरीदणे थांबवून त्यांची अधिक आधुनिक भावंडे ताफ्यात घेतली. या दोन्ही आधुनिक विमानांमध्ये समस्या उद्भवलेल्या आढळतात. या क्षेत्रातील द्वैमक्तेदारीची म्हणजे डय़ुऑपॉलीची ही दुखरी बाजू स्वीकारण्यावाचून सध्या तरी गत्यंतर नाही.

या संदिग्धतेमध्ये एक बाब मात्र स्पष्ट आहे. भारताच्या मुलकी विमान वाहतूक संचालनालयाने विमानांवर उड्डाणबंदी करण्यात दाखवलेली कुचराई. मंगळवारी अनेक देशांनी उड्डाणबंदी सुरू केल्यानंतर आपल्याला जाग आली. विमाने खरेदी करण्यातला आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाते, पण विमान वाहतूक सुरक्षा निकषांविषयी आपला देश खूपच मागे आहे. तो का, ते आपल्या संचालनालयाकडे पाहून पटते. रविवारचा अपघात झाल्यानंतरही सुरुवातीची संचालनालयाची भूमिका ‘थांबा आणि वाट पाहा’ अशीच होती, जी जीवघेणी ठरू शकते. यात सुधारणा झाली नाही तर हे विमान उडते नभांतरी या आपल्या काव्यपंक्तीत उडते ऐवजी पडते म्हणावे लागेल.

First Published on March 14, 2019 1:01 am

Web Title: boeing 737 max 8 india bans boeing 737 max aircraft