कुठलीही व्यक्ती स्वत:पुरतीच जगत असली, तरी प्रसंगी तिच्यात समाजाला, राष्ट्राला ऐतिहासिक वळण देण्याचे सामर्थ्य असते, हे टॉलस्टॉयच्या ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’चे सांगणे..

सर्व शहाणपण गैरसमजांपुढे हरते, असे म्हणतात. त्याचा प्रत्यय बुधवारी आला. नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून सध्या कोठडीत असलेले कार्यकर्ते व्हर्नान गोन्साल्विस यांच्याकडील कथित व्यवस्थाविरोधी पुस्तके आणि इतर साहित्याचा मुद्दा उच्च न्यायालयात मांडला गेला तेव्हा. यात या गोन्साल्विस यांच्याकडील कथित आक्षेपार्ह पुस्तकांची नावे फिर्यादींची- म्हणजे पोलिसांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात सांगितली. त्यावरून जे घडले, त्याचे वार्ताकन करताना माध्यमांनी रशियन लेखक लिओ टॉलस्टॉयच्या ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ या कादंबरीचा उल्लेख केला. परंतु मुळात न्यायालयात या कादंबरीचा नव्हे, तर ‘वॉर अ‍ॅण्ड पीस इन जंगलमहल’ या बिस्वजीत रॉय यांच्या पुस्तकाचा उल्लेख झाला होता, असा खुलासा दुसऱ्या दिवशी हे प्रकरण हाताळणाऱ्या न्यायाधीशांनी केला. त्यामुळे या प्रकरणी झालेल्या वार्ताकनातील गैरसमज तात्काळ निदर्शनास आला, हे बरे झाले.

परंतु यानिमित्ताने लिओ टॉलस्टॉय आणि त्याची ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ ही महाकादंबरी पुन्हा चर्चेत आली. ही कादंबरी १८६९ साली पहिल्यांदा पुस्तकरूपात आली, त्या घटनेस यंदा दीडशे वर्षे होताहेत. त्यामुळेही तिची दखल घेणे भाग आहे. सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठीय वाचनामृताला सरावलेल्यांनी ही अशी हजारांहून अधिक पृष्ठांची कादंबरी वाचणे, ही अपेक्षा अंमळ जास्तच ठरावी. पण म्हणून काही तिचे महानपण कमी होत नाही. उलट दीडशे वर्षांनंतरसुद्धा ही कादंबरी स्थळ-काळाचे संदर्भ भेदून अनेकांना दिशादर्शक वाटते. याचे कारण तिच्या कर्त्यांच्या, म्हणजे टॉलस्टॉयच्या भूमिकेत दडले आहे. माणसांची परस्परांविषयीची प्रेमभावना ही टॉलस्टॉयच्या मते कला-साहित्याची प्रेरणा. ती त्याच्या सर्वच लेखनात जशी आढळते, तशीच ती त्याच्या जगण्यातही होती. त्यामुळेच तर रशियातील अतिश्रीमंत सरदार घराण्यात जन्म होऊनही सामान्य माणूस आणि त्याचे जीवन हाच टॉलस्टॉयच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिला. मग ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ ही कादंबरी तरी त्यास अपवाद कशी असेल? एकोणिसाव्या शतकातला रशियन समाज त्यात चित्रित झाला आहे. फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्टने रशियावर लादलेले युद्ध आणि या युद्धाचे रशियन समाजावर झालेले परिणाम हे या कादंबरीचे कथासूत्र. एकीकडे खानदानी, उच्चभ्रू अशी आत्ममग्न कुटुंबे आणि दुसरीकडे देशप्रेमाने भारलेली सामान्य जनता यांचे बरेच काही या १८१२ साली झालेल्या युद्धात पणास लागले होते. रशियाचा आणि युरोपचाही पुढचा इतिहास प्रभावित केलेल्या या युद्धात रशिया यशस्वी झाला. त्यामुळे या युद्धाचे दाखले देऊन जनतेतील राष्ट्रवादी भावना कुरवाळण्याचा प्रयत्न तिथले विद्यमान राज्यकर्ते करत असतात.

पण ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ वेगळी ठरते ती इथे. सामान्य जनतेचे देशप्रेम उच्चभ्रू आत्ममग्नांपेक्षा वरचढ ठरल्याने युद्ध जिंकता आले असले, तरी हे देशप्रेम राष्ट्रवादापासून- आक्रमणाच्या आणि हिंसेच्या प्रेरणांपासून- मुक्त आहे. कुठलीही व्यक्ती स्वत:पुरतीच जगत असली, तरी प्रसंगी तिच्यात समाजाला, राष्ट्राला ऐतिहासिक वळण देण्याचे सामर्थ्य असते, हे या कादंबरीचे सांगणे. या सामर्थ्यांत मानवता अंतर्भूत असतेच, हे तर टॉलस्टॉय या कादंबरीतही आणि त्याव्यतिरिक्तही सांगत होताच. त्यामुळेच तर महात्मा गांधींपासून नेल्सन मंडेलांपर्यंत अनेकांना तो आपलासा वाटला. ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’मधले समाजचित्रणाचे असे सूक्ष्म धागे गुंफल्यामुळे अनेकांना ती पारंपरिक वळणाची वाटली. आधुनिकता किंवा आधुनिक होऊ पाहणाऱ्या समाजाच्या व्यक्तिनिष्ठ मूल्यांचा जो आविष्कार ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’मधून झाला, त्याकडे रशियन डाव्याराज्यकर्त्यांनीही दुर्लक्षच केले. याचे कारण आधुनिकतेकडे दिपून जाऊन पाहण्याची सवय. आधुनिकता म्हटले की, मोठमोठाली यंत्रे, कारखाने, इमारती, वाहने, मनोरंजनाची साधने आणि या साऱ्यांचा उपयोग करून स्वत:चे उन्नयन, असाच अनेकांचा समज असतो. काही प्रमाणात तो ठीकही आहे. पण ते तेवढेच आणि तितकेच खरे नाही. आधुनिकतेची कल्पना त्याहूनही व्यापक आहे. त्यात व्यक्तिवादाचे फायदे जसे मिळतात, तसेच विवेकनिष्ठेचे बंधनही येते. या दोन्ही बाबी असतील आणि त्या आपल्यासह समोरच्याच्या बाबतीतही असणारच आहेत याचे भान असणे म्हणजे आधुनिकता. ती असलेल्या समाजात वैयक्तिक मतांना, त्यांच्या आविष्काराला आणि त्याबद्दलच्या स्वातंत्र्याला महत्त्व असते. तर जीर्ण समाजात अशा स्वातंत्र्याला महत्त्व नसते. त्यामुळे तिथे नवे विचार प्रकटही होत नाहीत.

साहित्य हे अशा बाह्य़दृष्टय़ा आधुनिक दिसत असलेल्या, तरी अंतस्थ जीर्णच राहिलेल्या समाजाशी फटकून राहते. एका अर्थी ते ‘समाजा’पासून दूर राहत असते. त्यात व्यक्तीचा विवेक महत्त्वाचा असतो. त्यामुळे ‘आधुनिक’ साहित्य समाजातील वरवरच्या व्यवस्थांना नाकारते. अशा साहित्याने मग सरकार, न्यायव्यवस्था, समाजपद्धती वा अगदी राष्ट्रवाद यांकडे उपरोधाने वा प्रश्नांकितपणे पाहिल्यास नवल नसावे. विशेषत: कादंबरीसारख्या साहित्यप्रकाराने. याचे कारण जगण्याकडे सूक्ष्मतेने पाहण्याचा पैस त्यात मिळत असतो. म्हणूनच विविध सामाजिक शास्त्रे अभ्यासशाखा म्हणून स्थिरावू लागण्याच्या काळातच कादंबरी हा प्रकारही रूढ होऊ लागला, हा योगायोगही बरेच काही सांगून जातो. त्यामुळे १८१२ च्या युद्धाबद्दल इतिहासकारही जे सांगू शकले नाहीत, असे काही ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ सांगते, ते उगाच नाही.

मात्र, इथेच मेख आहे. याचे कारण आधुनिकतेत अर्धवट बुडी घेणाऱ्या समाजात हे असे काही सांगणे शिष्टसंमत नसते. अशा समाजांची लबाडी म्हणजे आधुनिकतेचे फायदे ओरबाडत राहून, व्यक्तिवाद म्हणजे आपापल्या पारंपरिक धारणा जोपासण्याचे स्वातंत्र्य एवढाच अर्थ मान्य करणे. आधुनिकतेच्या विवेकवादी जबाबदाऱ्यांना गुंगारा देणारी ही लबाडीच येथे प्रस्थापित झालेली असते. आणि त्यावर प्रश्न विचारणारे काहीही- अगदी साहित्यसुद्धा- प्रस्थापिततेला धक्का देणारे ठरते. त्यावर अशा समाजांनी काढलेली पळवाट म्हणजे अशा सांगण्याकडे दुर्लक्ष करणे. ते नाही जमले तर मग असंबद्ध टीका करून सांगणाऱ्यालाच लाज आणणे. हल्लीचे जल्पक (ट्रोल) हे त्यासाठीचे ‘आधुनिक’ साधन. यानेही ईप्सित साध्य नाही झाले, तर ती आविष्कारकृतीच बंदी वगैरे आणून मोडीत काढणे. आपल्याकडेही ‘नाइन अवर्स टु रामा’ ते ‘द सॅटनिक व्हर्सेस’ ते ‘गॉड ऑफ द स्मॉल थिंग्ज’ ते अगदी ‘वन पार्ट वुमन’पर्यंत हे सारे पाहायला मिळाले आहेच. परंतु आविष्कारावर अशी बंधने आली तरी या साहित्यकृती टिकल्याच. कारण तशी बंधने आणू पाहणाऱ्यांना जिवंत वाचनसंस्कृतीचे- म्हणजेच विवेकी ज्ञानपरंपरेचे मर्म ध्यानात आलेले नसते.

ही अशी जिवंत, प्रसन्न ज्ञानपरंपरा निर्माण करू पाहणाऱ्यांपैकी टॉलस्टॉय हा एक प्रतिभावान. त्याच्या लेखनाने ‘आधुनिक’ साहित्य जे करते ते केलेच. पण सौम्यपणे. या सौम्यतेमुळे तो अनेकांना आधुनिक वाटला नाही. लेनिनने मात्र टॉलस्टॉयच्या साहित्याला ‘क्रांतीचा आरसा’ म्हटले होते. त्यामुळे परवा जे गैरसमजनाटय़ झाले, ते पाहण्यासाठी टॉलस्टॉय आज असता तर त्याच्या त्या शुभ्र दाढीमागे नक्कीच स्मितहास्य उमटले असते.. टॉलस्टॉय आज नाही. त्याचे ते स्मितहास्य मात्र भेटते आजही अधूनमधून. समाजाला पोखरून काढणाऱ्या काळाची वेदना-संवेदना आकळून घेऊन, समंजस स्मितहास्य करणारी पुस्तके सर्व भाषांत कुठे ना कुठे दडलेली असतातच. ती कोणी शोधली आणि वाचली, तर लक्षात येते.. टॉलस्टॉयचेच स्मितहास्य हे!