21 November 2017

News Flash

‘कुमार’संभव

अस्पृश्यता आणि जातव्यवस्था हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे.

लोकसत्ता टीम | Updated: May 10, 2017 2:02 AM

आयसीएसएसआरया प्रतिष्ठित संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेल्या कुमार यांची याआधीची मते कोठे जाणारी आहेत?

नरेंद्र मोदी हे असहिष्णुतेचा सर्वात मोठा बळी आहेत आणि ते देशाला लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, आपल्या देशात अस्पृश्यतेचा आणि जातव्यवस्थेचा प्रादुर्भाव झाला तो अरब, तुर्क आणि मोगलांच्या आक्रमणामुळे, मार्क्‍सवादी आणि पाश्चात्त्यधार्जिणे मेकॉलेवादी यांच्यामुळे भारताचे बौद्धिक अध:पतन झाले, दिल्लीस्थित जेएनयूतील विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे म्हणजे देशातील राष्ट्रभावना अशक्त करणे इत्यादी इत्यादी. ही आणि अशी मते वेळोवेळी मांडली आहेत ब्रजबिहारी कुमार यांनी. ते कोणी ऐरेगैरे नाहीत. आता भारत सरकार पुरस्कृत समाजविज्ञान संशोधन संस्थेचे नवनियुक्त प्रमुख आहेत हे कुमार. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुखदेव थोरात यांनी भूषविलेल्या पदावर अलीकडेच या कुमार यांची नेमणूक झाली. एकाच वेळी रसायनशास्त्र आणि हिंदी आणि मानववंशशास्त्र अशा क्षेत्रांतील प्रावीण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि संस्कृतिसंवर्धनासाठी स्वत:ची ‘आस्था भारती’ ही स्वयंसेवी संस्था ते चालवतात. याच संस्थेतर्फे ‘डायलॉग’ हे इंग्रजी त्रमासिक काढले जाते. वर उद्धृत केलेली मते ही या त्रमासिकांतील संपादकीयांत कुमार यांच्या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. ती संपादकीयांपर्यंत मर्यादित होती तोपर्यंत ती दखलपात्र नव्हती. परंतु कुमार आता अत्यंत प्रतिष्ठेच्या इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च- आयसीएसएसआर- या संस्थेचे प्रमुख नेमले गेल्याने त्यांचा समाचार घेणे आवश्यक ठरते. यातील पहिल्या दोन मुद्दय़ांविषयी काही भाष्य करावयाची गरज नाही. ती लेखकाची मते आहेत आणि अन्य कोणाही व्यक्तीप्रमाणे हवी ती मते व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याचा आदर राखावयास हवा. प्रश्न आहे तो अन्य मुद्दय़ांबाबत. कारण त्यात वस्तुस्थितीस सोडचिठ्ठी देण्यात आली असून हा सत्यापलाप खपवून घेतला तर या मंडळींचे धाष्टर्य़ अधिकच वाढण्याचा धोका संभवतो.

अस्पृश्यता आणि जातव्यवस्था हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. धर्माच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेतून या व्यवस्थांचाही जन्म झाला, हे सत्य आहे. त्यासाठी भारतावर आक्रमण करणाऱ्या मोगल, तुर्क वा अरबांना बोल लावावयाचे काहीही कारण नाही. देशांतर्गत व्यवस्थेतील सामाजिक अपयशासाठी आपल्याकडच्या एतद्देशीयांतील एका वर्गाने परकीय आक्रमक तसेच इंग्रज यांना बोल लावण्याचा सोपा मार्ग पत्करलेला आहे. कुमार हे या मार्गाने निघालेले दिसतात. तसे केल्याने येथील धार्मिक मुखंडांना आपल्या धर्मातील कमअस्सलाची जबाबदारी घ्यावी लागत नाही. ती घ्यावयाची नसल्याने हे कच्चे दुवे सुधारण्याचाही प्रश्न येत नाही. जातव्यवस्था आणि अस्पृश्यतेसाठी आक्रमकांना दोष देऊन कुमार हेच करीत आहेत. ते स्वत:स मानववंशशास्त्राचे अभ्यासक म्हणवतात. परंतु त्यांच्या लेखी वर्ण, मनू आणि हिंदू धर्मातील रूढी यांना काहीही महत्त्व नाही. आपल्याकडे पहिले आक्रमण झाले ११ व्या शतकात. आधी गझनीचा महंमद आणि त्यानंतर शंभरभर वर्षांनी महंमद घोरी हे आपल्यावर चाल करून आले. इस्लामचा शिरकाव या प्रदेशात यामुळे झाला, हा इतिहास. पण त्याआधी या प्रदेशात हिंदू होते आणि त्यांची जातव्यवस्थाही होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णात या जाती विभागलेल्या होत्या. युरोपियन अभ्यासकांनी त्या वेळी केलेल्या नोंदींनुसार भारतात जातींची संख्या तीन हजार वा अधिक होती. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदूंतील वर्णव्यवस्थेची सैद्धांतिक मांडणी करणारी मनुस्मृती ही या सगळ्यापेक्षा हजारभर वर्षे जुनी. काही अभ्यासकांच्या मते मनुस्मृतीचा काळ ख्रिस्तपूर्व. हिंदूंसाठीचे सामाजिक नियम म्हणजे मनुस्मृती, असे ब्रिटिश राज्यकर्त्यांनीही मानले. त्यामुळे इतिहासाभ्यसकांचा एक सोयीस्कर वर्ग हिंदू धर्मातील जातीपातींसाठी ब्रिटिशांना बोल लावतो. ही धादांत लबाडी ठरते. कारण मुळात हे सर्व मनूने लिहून ठेवले होते. राजकीय सोयीसाठी इंग्रजांनी ते अमलात आणले आणि त्याच राजकीय सोयीसाठी कुमार यांच्यासारखे इंग्रजांना आज दोष देतात.

तशीच बाब मेकॉले आणि मार्क्‍सवादी वा पाश्चात्त्यप्रेमींना दोष देण्याची. ही भूमी महान होती, या भूमीने आर्यभट्ट दिला, जगास शून्य दिले, सुश्रुत, चरक आदी याच भूमीत निपजले आणि एकेकाळी येथे सोन्याचा धूर निघत होता वगैरे सर्व मुद्दे खरे असले तरी गेल्या दोन हजार वा अधिक वर्षांत ही भूमी मृतवत होती हेदेखील तितकेच खरे. कमालीची जातव्यवस्था, अत्यंत मागास विचारधारा आणि आधुनिक जगाचा वाराही लागलेला नसणे हे ब्रिटिशकालीन भारताचे प्राक्तन होते, हे मान्य करायला हवे. त्यामागील कारणे काहीही असोत. परंतु बव्हंशी ब्रिटिशकालीन भारत हा मागास होता. आयुर्वेदाचा जन्म या देशात झाला हे खरे. परंतु तरीही पटकी वा हगवणीच्या साथीने या देशात गावेच्या गावे नष्ट होत, हेही खरे. खगोलशास्त्र वा गणित या देशाने जगास दिले हे तर खरेच. परंतु त्याच वेळी आधुनिक नकाशे बनवण्याची अक्कल या देशवासीयांना नव्हती हेदेखील तितकेच खरे. या देशातील खगोलाभ्यासकांनी ध्रुव ताऱ्याचे अढळपण दाखवून दिले होते आणि त्याप्रमाणे मार्गक्रमणा करता येते हेदेखील सिद्ध केले होते, हे सत्यच. परंतु तरीही दर्यावर्दी वृत्ती दाखवून जग पादाक्रांत केले ते पोर्तुगीज, स्पॅनिश आदींनी, हेदेखील सत्य. वास्को द गामा वा कोलंबस जगाच्या मुशाफरीवर निघालेले असताना या देशातील हिंदू समुद्र ओलांडणे म्हणजे पाप अशीच कल्पना उराशी बाळगून होते, हे कसे नाकारणार? सध्याच्या काळात पुराणांतील आधुनिक विज्ञानाच्या खुणा टिपणाऱ्यांना पती-निधनानंतर पत्नीस केशवपन करावयास लावणाऱ्या बोडक्या प्रथा का कधी दिसल्या नाहीत? नवरा मेला म्हणून पत्नीस जिवंत जाळणाऱ्या या समाजाला आधुनिक बनवण्याचा पहिला प्रयत्न करणारे राजा राममोहन रॉय वा गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रेरणा काही वेद वा उपनिषदे नव्हती. ती होती इंग्रजी भाषेने दिलेली दृष्टी आणि ती देणारा होता थॉमस मेकॉले. या मेकॉलेने भारतात आणलेल्या इंग्रजीमुळे येथे केवळ सामाजिक सुधारणाच झाल्या असे नाही, तर नुसेरवान नामक पारसी भिक्षुकाच्या पोटी जन्मलेल्या जमशेट टाटा नामक पोरास पूजाअर्चा सोडून व्यापारउदीम सुरू करण्याची प्रेरणाही मिळाली. तेव्हा आपल्या अपयशासाठी ऊठसूट मेकॉलेच्या नावाने बोटे मोडण्यात काहीही शहाणपणा नाही. खरे तर याबद्दल लाज वाटावयास हवी. तात्या टोपे, झाशीची राणी आदींच्या बंडास दोन वर्षेही होत नाहीत तो हा मेकॉले ख्रिस्तवासी झाला होता. याचाच अर्थ सुमारे १६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या या व्यक्तीस आजच्या दुरवस्थेसाठी बोल लावणे हे बौद्धिक दारिद्रय़ाचे ठरते.

कुमार यांच्या लेखनातून या दारिद्रय़ाचा पदोपदी प्रत्यय येतो. एकीकडे देशाला आधुनिक करण्याच्या आणाभाका घ्यायच्या आणि त्याच वेळी आधी दीनानाथ बात्रा आणि आता हे असले कुमार यांना महत्त्वाच्या पदांवर बसवायचे यांत असलाच तर फक्त आणि फक्त विरोधाभासच आहे. इतिहासाचे पुनर्लेखन हे प्रत्येक सत्ताधाऱ्याचे ईप्सित असते हे मान्य. परंतु यातून इतिहासाचा नवीन अर्थ लावणे अभिप्रेत असते. आहे ते वास्तव नाकारणे वा नव्या वास्तवाचा शोध लावणे आणि सत्य दडपणे यात अनुस्यूत नसते. कुमार यांच्यासारखी मंडळी हा उद्योग करीत आहेत. तो तसाच सुरू राहिल्यास  त्या नवीन ‘कुमार’संभवातून जगास सत्ताधीशांचे वैचारिक दारिद्रय़च दिसेल.

  • देशांतर्गत व्यवस्थेतील सामाजिक अपयशासाठी आपल्याकडच्या एतद्देशीयांतील एका वर्गाने परकीय आक्रमक तसेच इंग्रज यांना बोल लावण्याचा सोपा मार्ग पत्करलेला आहे. सध्याच्या काळात पुराणांतील आधुनिक विज्ञानाच्या खुणा टिपणाऱ्यांना पती निधनानंतर पत्नीस केशवपन करावयास लावणाऱ्या बोडक्या प्रथा का कधी दिसल्या नाहीत?

First Published on May 10, 2017 1:41 am

Web Title: braj bihari kumar new icssr chief