कुटिलोद्योग उघड झालेच तर संबंधिताच्या राजीनाम्याने पापमुक्ती करून टाकायची असा भारतीय हिशेब ‘फोक्सवॅगन’वर अमेरिकेत झालेली कारवाई आणि पाठोपाठ या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा राजीनामा यांमागे नक्कीच नाही.. त्यामुळेच आपल्याला त्यापासून शिकण्यासारखे आहे..

वाढीची सुद्धा एक लय आणि गती असते. त्यात बदल करावयाचे झाल्यास ते सेंद्रियच असावे लागतात. तसे ते नसतील तर उत्पादनात – मग ते जैविक असो वा यांत्रिक – विकृती तयार होते आणि त्या पातकाचे प्रायश्चित्त घ्यावे लागते. हे पाप नियमनांचा आदर करणाऱ्या व्यवस्थांत घडले असेल तर प्रसंगी या पातकाची किंमत १८०० कोटी डॉलर वा अधिकदेखील असू शकते. मोटारनिर्मितीतील जगातील सगळ्यात बलाढय़ कंपनी फोक्सवॅगनचे उघडकीस आलेले पाप याचे उदाहरण ठरावे. ही कंपनी लवकरच सर्वाधिक दंड भरणारी कंपनी ठरेल. या कंपनीचे पाप गंभीर तर आहेच पण ते केल्यामुळे पर्यावरणावरील दुष्परिणामांचा विचार करून तीवर होऊ घातलेली कारवाई अधिक गंभीर आणि तरीही स्वागतार्ह आहे. फोक्सवॅगनने मोटारीतून निघणाऱ्या प्रदूषणकारी वायूंची मोजदाद होऊ नये यासाठी चलाखी केली. या कंपनीने असे सॉफ्टवेअर विकसित केले की मोटारीस प्रदूषण मोजमाप सुरू झाल्याचे कळत असे. त्यामुळे या काळात मोटारीचे इंजिन एकदम शहाण्यासारखे वागत असे आणि त्यातून कोणतेही अतिरिक्त उत्सर्जन होत नसे. हे मोजमाप बंद झाल्यावर मात्र फोक्सवॅगनच्या मोटारी आपोआप पुन्हा लबाडी सुरू करीत असत. हे सगळे बिनबोभाट सुरू होते. परंतु अमेरिकी सरकारच्या पर्यावरणरक्षण विभागातील एका अभियंत्याने ही चलाखी उघड केली. त्याने या कंपनीच्या मोटारी पर्यावरणरक्षणाचे नियम पाळत नसल्याचे सप्रमाण सिद्ध केले. त्यानंतर या कंपनीत हाहाकार उडाला असून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टनि िवटरकॉर्न यांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला आहे. परंतु आपल्या देशाप्रमाणे केवळ राजीनामा दिला म्हणून कंपनीची सुटका होणारी नाही. अमेरिकेत या कंपनीने विकलेल्या तब्बल सहा लाख मोटारी आता परत बोलवाव्या लागणार असून संबंधित यंत्रणा त्यात नव्याने बसवून द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे नुकसान केले, म्हणून एकटय़ा अमेरिकेतच फोक्सवॅगनला १८०० कोटी डॉलरची रक्कम दंड म्हणून ठोठावली जाऊ शकते. त्यात पुन्हा युरोप वा अन्य देशांनी कंपनीविरोधात कारवाईचे अस्त्र उगारल्यास ही दंड रक्कम वाढण्याचीच शक्यता अधिक. तसे झाल्यास कंपनीचा ताळेबंद रक्तबंबाळ होणार हे उघड आहे. त्याचमुळे कंपनीच्या समभागधारकांनी आपल्याकडील समभाग विकण्याचा सपाटा लावला असून आंतरराष्ट्रीय भांडवल बाजारात कंपनीच्या समभागांनी २० टक्के वा अधिकच घसरगुंडी या दोन दिवसांत अनुभवली आहे. वास्तविक कोणत्याही मोटारीतून उत्सर्जति होणाऱ्या वायूंचे प्रमाण पाहून प्रदूषणकारी वायुनिर्मितीवर नियंत्रण आणण्याचे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. त्यावर आधारित चाचण्या केंद्रे आपल्याकडेही अनेक ठिकाणी दिसू लागली आहेत. परंतु आपल्या दुय्यम आणि तितक्याच अप्रामाणिक व्यवसायसंस्कृतीमुळे आपल्याकडील ही व्यवस्था प्राधान्याने नावापुरतीच आहे. याचा अर्थ या प्रदूषण चाचण्या करणाऱ्या आपल्या अनेक प्रयोगशाळा हातावर चिरीमिरी ठेवली की हवा तो अहवाल देण्यास तयार असतात. परंतु अमेरिकेसारख्या व्यवसायजागरूक व्यवस्थेत ही लबाडी पकडली जाते आणि ती करणाऱ्यास यथासांग शासनही होते. फोक्सवॅगनवरील ही कारवाई म्हणजे आपल्या फायद्यासाठी व्यवस्था, पर्यावरण नीतिनियमांना खुंटीवर टांगू पाहणाऱ्या कंपन्यांसाठी मोठा धडा आहे. अर्थात तो शिकवायचा वा शिकवावयाचा झाल्यास काही किमान नेकीने व्यवसाय करण्याची वृत्ती हवी आणि ती ज्यांची नसेल त्यांना शासन करण्याइतकी िहमत आणि प्रामाणिकपणा त्या त्या शासनांत हवा. अमेरिकेत अर्थातच हे दोन्ही आहे. म्हणूनच जगातील या सर्वात मोठय़ा मोटारकंपनीवर हवालदिल होण्याची वेळ आली आहे.
पण अशी वेळ आलेली फोक्सवॅगन ही काही पहिलीच कंपनी नव्हे. या आधी जेपी मॉर्गन चेस या बँकेस अर्थघोटाळ्याप्रकरणी १३०० कोटी डॉलरचा दंड द्यावा लागला. तो एक उच्चांकच. फोक्सवॅगन बहुधा तो मागे टाकेल. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या समुद्रात तेलगळती झाली यासाठी आणि त्यातून नक्की किती तेल वाया गेले त्याची खरी माहिती दडवली यासाठी अमेरिकी व्यवस्थेने ब्रिटिश पेट्रोलियम या कंपनीस अलीकडेच ४०० डॉलरचा दंड ठोठावला. ग्लॅक्सो-स्मिथक्लाइन या औषध कंपनीने पुरेशा चाचण्या न घेता औषध विकले म्हणून ३०० कोटी डॉलर, दक्षिण अमेरिकेतील अमली पदार्थ व्यापाऱ्यांना आपल्या शाखांतून अर्थव्यवहार करून दिले म्हणून बलाढय़ अशा हाँगकाँग अ‍ॅण्ड शांघाय बँक कॉर्पोरेशन- म्हणजे एचएसबीसी- बँकेस असेच १२५ कोटी डॉलर दंडात भरावे लागले. असे अनेक दाखले देता येतील. यातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या वा अशा दंडनीय कृत्यांतील फारच थोडय़ा कंपन्या अमेरिकी आहेत. वर उल्लेखलेल्यांतील जेपी मॉर्गन चेस वगळता अन्य कंपन्या ब्रिटन, स्वित्र्झलड आदी देशांतील आहेत. तरीही अमेरिकी व्यवस्थेने त्यांना नमवले आणि नियमभंगांबद्दल त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात कोणतीही हयगय केली नाही. आताही पर्यावरणीय पापकृत्यांत सापडलेली फोक्सवॅगन ही कंपनी अमेरिकन नाही. जर्मन आहे. परंतु या कंपनीवर कारवाई केल्यास अमेरिका-जर्मनी यांच्यातील संबंध बिघडतील आदी भारत सरकारला भेडसावणाऱ्या कारणांनी अमेरिकी व्यवस्थेस त्रस्त केले नाही. त्या व्यवस्थेने आपल्या नियमांप्रमाणे कारवाई केली आणि ती तडीस जाईल याचीही व्यवस्था केली. त्याचमुळे फोक्सवॅगन कंपनीस आपल्या उत्पन्नातील तब्बल ६०० कोटी डॉलरचा वाटा दंड भरण्यासाठी आताच वेगळा काढून ठेवावा लागला आहे. फोक्सवॅगन कंपनीस वाढीची घाई झाली होती. वर्षांला एक कोटी मोटारी निर्मितीचे या कंपनीचे लक्ष्य होते. आकाराने आणि आíथक ताकदीने ही इतकी बलाढय़ कंपनी. तरीही तिच्यावर कारवाईचा बडगा उभारताना अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांचे हात थरथरले नाहीत, की काही तोडपाणी करून मामला मिटवावा असे कंपनीस सुचले नाही.
हा सगळा तपशील पाहून आपली मान शरमेने खाली जावयास हवी. याचे कारण त्यामुळे आपल्या व्यवस्थाशून्य अवस्थेची जाणीव होऊ शकेल. कालबाहय़ होऊन दशके उलटली तरी चालवल्या जाणाऱ्या, काळ्या-पांढऱ्या धुरांचे ढग ओकीत रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारी वा बसगाडय़ा, ट्रक आपणास नवीन नाहीत. त्यांची प्रदूषणनिर्मिती इतक्या राजरोसपणे होत असताना त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्नही आपल्याकडे होत नाही. इतकेच काय आपल्याकडे इंधनात सर्रास भेसळ होते. गरिबांसाठी म्हणून स्वस्त दरात राखून ठेवले जाणारे केरोसीन चोरटय़ा मार्गाने पेट्रोल वा डिझेल भेसळीसाठी वापरले जाते. पेट्रोलपंप वजनात मारतात. इतके दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील – म्हणजे टॅक्सी वा रिक्षा चालवणारे – बनावट परवाने बाळगत. तो काळदेखील मागे लोटला. आता तर विमाने चालवणाऱ्या पायलटांचे परवानेही बोगस निघतात. मॅगी नूडल्समधील घटक घातक आहेत की नाहीत यावर प्रयोगशाळांचे अहवाल निरनिराळे येतात. औषधांत भेसळ होते. ती देणारा डॉक्टर बनावट पदवी मिळवून राजरोस वैद्यकी करू शकतो. वैद्यकीय महाविद्यालये काढणारे किमान प्रयोगशाळेशिवायसुद्धा वैद्यकांना सामावून घेऊ शकतात. अशा बनावट वैद्यकाच्या आधारे कोणाचा जीव गेला तर तो पांढऱ्या जाकीट कुर्त्यांखालील देहाच्या अगडबंब ताकदीने सुखरूप राहू शकतो. हे असले काही कुटिलोद्योग उघड झालेच तर संबंधिताच्या राजीनाम्याने पापमुक्ती होऊ शकते. असा राजीनामा द्यावा लागणाऱ्यांचे कालांतराने पुनर्वसनदेखील करता येऊ शकते. आपला लोकशाही हक्क वापरून जनतादेखील अशा व्यक्ती पुन्हा निवडून येतील याची तजवीज करू शकते.
सध्या सणासुदीचा काळ आहे. या काळात आपण किती प्रदूषण करावे याचे काही नियम आहेत. परंतु त्यांचे किती सर्रास उल्लंघन होते हे आपण सारेच अनुभवत आहोत. तरीही कोणाहीवर कारवाई झाल्याचे वृत्त नाही की गतवर्षी याच पापांसाठी झालेल्या दंडाची वसुली नाही. अशा वेळी फोक्सवॅगन प्रकरण लक्षात घ्यावयास हवे. ते लक्षात घेतल्यास भारताच्या भिकारतेची कारणे आणि त्यावरील उपाय लक्षात येतील.