वैज्ञानिक संशोधनाची शिस्त न पाळता चिनी शास्त्रज्ञ जियानकुई यांनी मानवी जनुकांत फेरफार केले. चीनने तो प्रकल्प गुंडाळला, तरी प्रश्न उरतात..

चिनी शास्त्रज्ञ हे जियानकुई यांनी नुकत्याच हाँगकाँगमध्ये केलेल्या एका घोषणेमुळे विज्ञानविश्वात खळबळ उडणे स्वाभाविक आहे. जनुकीय फेरफार करून (जीन एडिटिंग) आपण दोन जुळ्या मुलींना ‘घडवले’ आणि त्या जन्मालाही आल्या आहेत असे जियानकुई यांनी हाँगकाँगमधील त्या वैज्ञानिक परिषदेत थेट जाहीरच करून टाकले. जनुकीय फेरफार या प्रक्रियेची मर्यादा काय असावी, कुठवर पोहोचले पाहिजे याबरोबरच कुठे थांबले पाहिजे याविषयी जैववैद्यक विश्वात अजूनही संभ्रम आहे. या तंत्राच्या शक्याशक्यतांबरोबरच नैतिक-अनैतिकतेची चर्चा अजूनही सुरू आहे. भविष्यात आण्विक शस्त्रांप्रमाणेच जनुक तंत्रज्ञान आणि विशेषत: जनुकीय फेरफारांबाबत एखादी र्सवकष, जागतिक, वैधानिक चौकट (फ्रेमवर्क) असली पाहिजे याबाबतही बहुसंख्य शास्त्रज्ञांमध्ये आणि सरकारांमध्ये मतैक्य आहे. ही सगळी चर्चा, आडाखे, भीती, शंका वगैरे जियानकुईंच्या प्रयोगाने शून्यात ढकलले. जनुकीय फेरफार तंत्रातून दोन जीव जन्माला आले आहेत. त्यांचे काय करायचे, हा प्रश्न आहेच. शिवाय हे जियानकुईंसारखे प्रयोग चीनमध्ये किंवा जगात इतरत्र सुरू असतील, ते थांबवणार कसे, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांची चर्चा आवश्यक ठरते. पण प्रथम थोडेसे जियानकुई यांच्या गोपनीय आणि कथित क्रांतिकारी प्रयोगाविषयी.

हे जियानकुई यांनी सीआरआयएसपीआर-कॅस ९ हे तंत्रज्ञान वापरल्याचा त्यांचा दावा आहे. या तंत्राच्या आधारे त्यांनी ३१ भ्रूणांमधील एक जनुक निकामी केले. यामुळे भविष्यात एचआयव्हीचा अधिक चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतील अशी बाळे जन्माला येतील, अशी योजना होती. यांतील दोन भ्रूणांचे एका मातेच्या गर्भाशयात आरोपणही केले गेले. त्यातूनच पुढे लुलू आणि नाना अशा दोन बालिका जन्माला आल्या. मात्र याविषयीचे संशोधन जियानकुई यांनी कोणत्याही वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध केलेले नाही. समकक्ष पुनरीक्षण (पिअर रिव्ह्य़ू) होऊ दिलेले नाही. आपल्या प्रयोगशाळेत इतर शास्त्रज्ञांना येऊ दिलेले नाही. थेट एका परिषदेत प्रयोगाची फलनिष्पत्तीच जाहीर केल्यामुळे या एकूण प्रकाराविषयी संशय वाढला. त्यात जियानकुई यांचे चिनी असणे पाश्चिमात्य विज्ञानविश्वासाठी संशयात भर घालणारे ठरले. त्यांच्या दाव्याची शहानिशा करणे क्रमप्राप्त ठरते. ते कसे होणार याविषयी सारेच अंधारात आहेत. कारण ताज्या माहितीनुसार चीनच्या सरकारनेच या वृत्ताची दखल घेऊन जियानकुई यांचा प्रकल्प गुंडाळण्याचे आदेश दिले आहेत. तरीही जियानकुई यांचे उत्तरदायित्व संपत नाही. शहानिशा करण्यासाठी प्रथम इतर शास्त्रज्ञांना संबंधित मुलींपर्यंत पोहोचावे लागेल. त्यांचा जनुकीय अनुक्रम (जिनोम सीक्वेन्स) पडताळून, संबंधित जनुक त्यांच्या डीएनएमध्ये खरोखरच अस्तित्वात नाही याची खातरजमा करावी लागेल. दुसरा पर्याय म्हणजे, जियानकुई यांनी त्यांच्या संशोधनासंबंधी कागदपत्रे, सीडी आदी साहित्य शास्त्रज्ञांच्या हवाली करणे. दोन्ही शक्यता धूसर वाटतात, कारण जियानकुई यांच्याबरोबरच चिनी सरकारही याविषयी किती माहिती उघड करण्यास उत्सुक असेल याविषयी शंका आहे. हाँगकाँगमधील त्या परिषदेस उपस्थित राहिलेल्या आणि न राहिलेल्या शास्त्रज्ञांना आता सर्वाधिक भीती त्या मुलींची वाटते. जाहीर करावेसे वाटत नाहीत असे काही तरी बेजबाबदार प्रयोग करून जियानकुई यांनी त्या मुलींच्या जिवाशी खेळ तर केला नाही ना, ही पहिली रास्त भीती. जियानकुई यांनी पुरवलेल्या स्लाइड्समधील माहिती फारच त्रोटक होती आणि त्यातही अनेक चुका आढळल्या, अशी चर्चा आहे. एखाद्या अपत्यामध्ये माता-पित्याकडून जनुकाची प्रत्येक एक अशा दोन प्रती येतात. पण संबंधित मुलींपैकी एकीच्या शरीरात सुधारित जनुकाची केवळ एकच प्रत आहे. दुसरी प्रत जुनीच आहे. अशा परिस्थितीत ईप्सित परिणाम (एचआयव्ही प्रतिकारक क्षमता) साधली जाऊ शकत नाही, असा जनुकीय शास्त्रज्ञांचा दावा आहे. जनुकीय फेरफार प्रत्येक वेळी लाभकारक ठरतोच असे नाही. या वर्षीच्या सुरुवातीला ‘नेचर’ मासिकाने एक लेख प्रसिद्ध केला आणि असा इशारा दिला, की एक जनुक निकामी केल्याचा विपरीत परिणाम संपूर्ण संरचनेवर होऊ शकतो. उदा. एड्स होऊ नये म्हणून फेरफार करताना, कर्करोगापासून प्रतिकार करणाऱ्या जनुकाला धक्का पोहोचून वेगळीच समस्या निर्माण होऊ शकते. एखाद्या जीवाला (आणि त्याच्या पुढील पिढय़ांना!) एड्सपासून सुरक्षित ठेवताना जनुकीय फेरफारामुळे त्याची साध्या फ्लूशी लढण्याची ताकद संपुष्टात येऊ शकते. हे टाळावे कसे याविषयी संशोधन सुरू आहे. हे संशोधनच इतके बाल्यावस्थेत असताना जियानकुई यांनी इतके धाडस करण्याचे कोणतेही कारण नव्हते, असे शास्त्रज्ञ समुदायाला वाटते.

त्यामुळेच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे, आपण मुळात जनुकीय फेरफार करावेत किंवा करू द्यावेत का? या तंत्राविषयी २०१२ पासून विविध देशांमध्ये चर्चा आणि संशोधन सुरू आहे. अमेरिकेतही ते वापरले गेले. २०१७ मध्ये ओरेगॉन हेल्थ अ‍ॅण्ड सायन्स विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सीआरआयएसपीआर-कॅस ९ तंत्र वापरून काही भ्रूणांमध्ये जनुकीय फेरफार केले, ज्यातून पुढे एका अनाम रोगाशी प्रतिकार करणारे जीव जन्माला येतील. फरक इतकाच की, अमेरिकी शास्त्रांनी ते भ्रूण नष्ट केले, तर जियानकुई यांनी या भ्रूणांचे एका गर्भाशयात आरोपण केले. दोन जुळ्या मुलींखेरीज आणखी एका महिलेच्या गर्भाशयात जनुकीय फेरफार केलेल्या भ्रूणाचे आरोपण जियानकुई यांनी केले असून, ती माताही लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे. या संशोधनाचा हेतू कागदोपत्री शुद्ध असला, तरी तो तसा सतत राहील याविषयी हमी कोणी देऊ शकत नाही. जियानकुई यांनी हे प्रयोग करताना आपले विद्यापीठ आणि सरकार यांना अंधारात ठेवले. असे किती जियानकुई जगाच्या कानाकोपऱ्यात नेमके काय करत असतील, ही शंका अस्वस्थ करणारी आहे. जनुकीय फेरफार करून केवळ रोगप्रतिकारक जीव निर्माण करण्यापलीकडे मजल जाऊ लागल्यास काय होईल? ‘सुधारित जीव’ बनवण्याकडे कल वाढेल. अशा अंधाऱ्या प्रयोगशाळा आणि असुरक्षित प्रयोग हुडकून काढणे ही पहिली जबाबदारी आहे. दुसरी जबाबदारी आहे याबाबत ठोस निर्णय घेण्याची. मुळात हे तंत्रज्ञान हवे आहे का, हे ठरवावे लागणार आहे. ते वाढवावे किती आणि थोपवावे किती, याची उत्तरे शोधावी लागतील. यांतील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहजसोपे नाही. भविष्यात कर्करोग, हृदयविकार, मधुमेह प्रतिकारक जीव जनुकीय फेरफाराच्या माध्यमातून बनवता येऊ शकतील. पण असे ‘डिझायनर जीव’ सर्वसामान्यांच्या आवाक्यातले नसणार. मग पुन्हा येथेही श्रीमंत वर्गच निरोगी म्हणून मिरवणार आणि गरिबांसाठी हे तंत्रज्ञान परवडणार नाही हे उघड आहे. जनुकीय फेरफार तंत्रज्ञान क्रांतिकारी असेल, पण ते सर्वसमावेशक सध्या तरी नाही. शिवाय निसर्गनियमनाचे काय? जुने किंवा व्याधीग्रस्त जीव अस्ताला जाणे हा नियम आपल्याला क्रूर वाटत असला, तरी ती निसर्गाची गरज असते. एखाद्या जीवासाठी विशिष्ट काळ पुरतील इतकेच संसाधन निसर्ग उपलब्ध करून देत असतो. मानवी इतिहासात वैद्यकशास्त्रातील संशोधनातून अनेक रोग, आजारांवर मात करता आली आणि आयुर्मान वाढले नि सुधारले. पण इतक्या मोठय़ा प्रमाणात जीववैद्यकशास्त्रात आजवर ढवळाढवळ झालेली नाही. जियानकुई प्रयोगाची एकच जमेची बाजू म्हणजे, किमान आता  काही तरी निर्णय केला पाहिजे, शास्त्रज्ञांमध्ये जबाबदारीचे जनुक रुजवलेच पाहिजे, याची जाणीव जगभर झाली आहे.