कोलंबियात घेतलेल्या सार्वमतात शांतता करार फेटाळला गेल्याने सांतोझ यांना धक्का बसला असला तरी नोबेलचे मोल त्याने कमी होत नाही..

या पुरस्काराने शांततेच्या राजकारणास पुन्हा केंद्रस्थानी आणले,  शांतता करारामध्ये पुन्हा धुगधुगी आणली.  सांतोझ यांना नोबेल मिळाल्याने त्यांना देशातून असलेला विरोध मावळेल अशी चिन्हे नाहीत. त्यांच्या विरोधी नेत्यांवर मात्र नक्कीच दबाव येईल..

पुरस्कार कोणताही असो, तो अंतिमत: राजकीयच असतो. त्यामागे निश्चितच देणाऱ्यांची ‘राजनीती’ असते. नोबेल पुरस्कारही त्यास अपवाद नाही. खास करून शांततेसाठीचे नोबेल. मलाला युसुफझाई, शिरीन इबादी, चीनचे लिऊ झियाबो, बराक ओबामा ही अलीकडची काही शांततेच्या नोबेल विजेत्यांची नावे. ही नावे आणि त्यांना पुरस्कार मिळाले ते वर्ष पाहिले तरी त्यामागील राजनीती स्पष्ट होते. यंदा या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत हुआन मॅन्युएल सांतोझ या नावाची भर पडली आहे. ते कोलंबियाचे अध्यक्ष. आपल्या महाराष्ट्राहून सुमारे तिप्पट आकाराचा आणि निम्मी लोकसंख्या असलेला हा लॅटिन अमेरिकेतला देश. गेली ५० वष्रे यादवी युद्धाने होरपळत असलेला. सांतोझ यांनी तेथे शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अलीकडेच एक करार केला. त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यात मौजेची बाब अशी, की ज्या शांतता करारासाठी हा पुरस्कार देण्यात आला, तो करार गेल्या आठवडय़ातच कोलंबियातील जनतेने सार्वमताद्वारे फेटाळून लावला आहे. याचा अर्थ शांततेसाठी नव्हे, तर शांततेसाठीच्या केवळ प्रयत्नांसाठी सांतोझ हे नोबेलचे मानकरी ठरले आहेत. कोणीही कोणालाही पुरस्कार देते ते त्याच्या कार्यासाठी. उत्तेजनार्थ पुरस्कार फक्त शालेय पातळीवरच असू शकतात. तेव्हा नॉर्वेतील नोबेल समितीचा हा निर्णय निश्चितच राजकीय स्वरूपाचा आहे. ते राजकारण समजून घेण्यासाठी आपणांस आधी कोलंबियातील राजकीय स्थिती समजून घेणे आवश्यक आहे.

आपण या देशाला ओळखतो ते सर्वसाधारणत: अमेरिकी मसाला चित्रपटांतून. तेथील अमली पदार्थाचा उद्योग, त्यातील पाब्लो एस्कोबारसारखे कुख्यात टोळीप्रमुख, अमेरिकेतील कायदा-सुव्यवस्था यंत्रणांबरोबरचा त्यांचा लढा या चित्रपटीय प्रतिमासृष्टीने कोलंबियाची एक विचित्र गुन्हेगारीप्रधान देश अशी ओळख तयार केली आहे. मात्र त्या प्रतिमेच्या पडद्याआड कोलंबियातील सामाजिक विषमतेचा अत्यंत गडद असा काळोख आहे. हा अमेरिकेच्या परसदारातला देश. मुळात कृषीप्रधान. नसíगक साधनसंपत्तीने संपन्न. अशा सगळ्याच देशांमध्ये जमीनधारणा आणि वाटप यांचा मोठा प्रश्न असतो. औद्योगिकीकरणाच्या लाटेत जसजशी शहरी अर्थव्यवस्था प्रबळ होत गेली, तसतसे लोकांचे शेतीवरील अवलंबित्व कमी झाले, मात्र जल-जंगल-जमीन यांना महत्त्व आले. कोलंबियातील संघर्षांची मुळे आहेत ती या समस्येत. तिला उत्तर त्या काळात दोन प्रकारच्या विचारधारांत शोधले जाई. एक म्हणजे अिहसेचा गांधीवादी मार्ग आणि दुसरा साम्यवाद्यांचा हिंसक मार्ग. कोलंबियातील शेतकऱ्यांनी साम्यवादाचा आसरा घेतला. त्यांच्यापुढे क्युबाचा आदर्श होताच. तो काळ अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा. आपल्याच परसात अशा प्रकारे साम्यवादी चळवळ फोफावत आहे हे पाहिल्यानंतर अमेरिकेसारखी महासत्ता गप्प बसणे शक्य नव्हते. कोलंबियाच्या राजकारणात अमेरिकेचा हस्तक्षेप सुरू झाला. सुरुवातीला तो साम्यवादविरोधाच्या नावाखाली होता. नंतर तो अमली पदार्थाविरोधातील लढय़ाचा भाग होता आणि आता जागतिक दहशतवादाविरोधातील युद्धाच्या नावाखाली सुरू आहे. अमेरिकेच्या मदतीमुळे प्रबळ झालेली कोलंबियातील राजकीय व्यवस्था, त्यांचे लष्कर आणि या व्यवस्थेने तयार केलेल्या, आपल्याकडील सलवा जुडूमसारख्या, सशस्त्र टोळ्या विरुद्ध ग्रामीण कोलंबियातून उभ्या राहिलेल्या – आपल्याकडील नक्षलवाद्यांसारख्या – साम्यवाद्यांच्या विविध सेना असा तो हिंसक संघर्ष होता. ‘फार्क’ अर्थात कोलंबियन क्रांतिकारी सशस्त्र सेना ही त्यातील सर्वात मोठी संघटना. आपल्याकडील नक्षलवादी ज्या विचारसरणीचे पाईक आहेत त्याच मार्क्‍सवादी-लेनिनवादी विचारांवर ही संघटना उभी आहे. कोणताही संघर्ष आíथक मदतीविना चालत नसतो. सरकारकडे महसूलवसुलीचे नाना मार्ग असतात. सरकारने मद्यातून महसूलवसुली केली तरी तिला कायदेशीर वैधता असते. सरकारविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या दहशतवादी वा बंडखोरांकडे महसूलवसुलीचे वैध मार्ग असूच शकत नाहीत. या संघटना खंडणी, अपहरण, अमली पदार्थाचा व्यापार अशा मार्गाने पसे मिळवत असतात. फार्कचाही कमाईचा हाच मार्ग होता. कोलंबियाचे वातावरण कोको या पिकास अनुकूल. त्यापासून बनविलेल्या अमली पदार्थासाठी अमेरिका नावाचा महाबाजार जवळच होता. त्यामुळे फार्क आणि इतर सर्वच संघटनांनी या व्यवसायात आपले पाय पसरले. या पशांतून त्या शस्त्रास्त्रे खरेदी करीत. जागतिक दहशतवादाशी सोयरसंबंध जुळवण्याचा तो राजमार्गच. अमेरिकेला चिंता होती ती त्याची. त्यामुळेच अमेरिका कोलंबियाच्या लष्करावर डॉलर ओतत होती. पण त्यातही मौज अशी की ज्या अमली पदार्थाच्या उद्योगाचा नाश करण्यासाठी अमेरिका जिवाचे रान करीत होती, त्या उद्योगात कोलंबियातील लष्करी अधिकारी आणि सरकारपुरस्कृत सेनांचाही समावेश होता. या सगळ्यात भरडला जात होता तो कोलंबियातील ग्रामीण भाग. तेथे बलात्कार, अत्याचार हे रोजचे जगणे झाले होते. शहरांत दहशतवादविरोधाच्या नावाखाली सर्वसामान्य लोक, उदारमतवादी लेखक-कलावंत-पत्रकार यांचे जिणे हराम करण्यात आले होते, स्वातंत्र्याला लगाम घालण्यात आले होते. या संघर्षांने दोन लाख वीस हजार जणांचा बळी घेतला. ५० लाखांहून अधिक विस्थापित झाले. तरीही फार्कला पाठिंबा कायम राहिला. त्याचे कारण हे कोलंबियन नक्षलवादी जनहितरक्षक होते म्हणून नव्हे, तर फार्क नावाची ही वीट लष्कर आणि सरकारसमर्थक उजव्या टोळ्यांच्या दगडांहून अधिक मऊ होती म्हणून. क्लिंटन सरकारने मधल्या काळात कोलंबियन सरकारला दिलेला १.३ बिलियन डॉलर एवढा प्रचंड निधी आणि अन्य साह्य़ामुळे फार्कची ताकद कमी होत गेली. आज ही संघटना शांतता करारासाठी उभी राहिली ती त्यामुळेच.

गेली चार वष्रे हुआन सांतोझ या करारासाठी झटत होते. फार्कला शस्त्रसंधीसाठी त्यांनी राजी केले. माजी राष्ट्राध्यक्षांसह अन्य विरोधकांचा नकार दुर्लक्षून त्यांनी शांतता करारही केला. जमीनवाटपाचा प्रश्न सोडविणे हा त्यातील महत्त्वाचा भाग. ग्रामीण जनतेसाठी तो जीवनमरणाचाच प्रश्न. त्यामुळेच या जनतेने सार्वमतात या कराराच्या बाजूने भरभरून मते दिली. त्याला विरोध करून तो हाणून पाडला तो शहरी जनतेने. दहशतवादी कारवाया, खंडणीखोरी आणि अपहरण यांसारख्या घटना शहरांत घडत असल्या, तरी युद्ध सुरू नव्हते. ते कोलंबियातल्या शेतात, डोंगरदऱ्यांत सुरू होते. त्यात मरत होती ग्रामीण जनता. शहरी भागातील जागतिकीकरणपोषित मध्यम आणि उच्चमध्यमवर्गासाठी तोही समाजमाध्यमांतून साजरा करण्याचा एक उत्सवच होता. त्यांना न्याय हवा होता, तो त्या ‘गुन्हेगारा’ला फासावर चढवून. ‘युद्धगुन्हेगारां’ना माफी देणारा करार त्यांना मान्य होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी बहुमताने तो धुडकावून लावला. सांतोझ यांची सगळी मेहनत त्यामुळे पाण्यात गेली. लोकांनी हे सार्वमत दिल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशी त्यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले ते त्यामुळेच महत्त्वाचे आहे. याचे कारण या पुरस्काराने शांततेच्या राजकारणास पुन्हा केंद्रस्थानी आणले. त्या करारामध्ये पुन्हा धुगधुगी आणली. तो व्हावा यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरूच होते. कारण कोलंबियातील यादवीतून निर्माण झालेल्या अमली पदार्थ व्यापाराच्या आडपदाशीने अमेरिकेच्या नाकीनऊ आणले आहेत. सांतोझ यांना नोबेल मिळाल्याने त्यांना देशातून असलेला विरोध मावळेल अशी चिन्हे नाहीत. त्यांच्या विरोधी नेत्यांवर मात्र नक्कीच दबाव येईल. सध्या तरी या पुरस्काराची किंमत एवढीच आहे. आणि ती बरीच मोठी आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सांतोझ यांचे म्हणूनच अभिनंदन.