लष्करप्रमुखांची अलीकडल्या मुलाखतीतील वक्तव्ये इतक्या उच्च पदावरील व्यक्तीच्या ठायी आवश्यक असणाऱ्या मुत्सद्देगिरीचा अभाव दर्शवतात..

चुरचुरीत वक्तव्यासाठी फक्त शहाणपणा आवश्यक असतो. परंतु योग्य वेळी मौन पाळण्यासाठी शहाणपण, विवेक आणि मुत्सद्देगिरीची गरज असते, असे अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे मत होते. सध्या देशात आलेले बोलघेवडय़ांचे वेडे पीक पाहता आईन्स्टाईन यांचे निरीक्षण किती योग्य होते ते समजून येईल. बहुतेकदा बोलणे म्हणजे लक्ष वेधणे आणि आपण काही तरी भरीव करीत आहोत असे दाखवणे. या इतक्याच समजशक्तीमुळे बोलघेवडय़ांच्या पलटणी आपल्याकडे हैदोस घालू लागल्या असून तोंड बंददेखील ठेवता येते याचा जणू समाजालाच विसर पडल्यासारखे चित्र आहे. या बोलघेवडय़ांत आता आणखी एक मोलाची भर पडली आहे. ती आहे भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची. काश्मिरात लष्कराने गतसप्ताहात फारुख दार या श्रीनगरातील व्यक्तीस जीपला बांधून जमावासमोर फिरवले. हेतू हा की लष्करावर दगडफेक करणाऱ्यांची अडचण व्हावी. कारण दगड फेकायचे तर त्यांच्यातीलच एकास इजा होण्याचा धोका होता. लष्कराच्या या कृत्याने चांगलीच खळबळ उडाली आणि हे असे करणाऱ्या अधिकाऱ्याचा लष्करप्रमुखांनी गौरव केल्याने हा मुद्दा अधिकच वादग्रस्त बनला आहे. या पाश्र्वभूमीवर लष्करप्रमुख रावत यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लष्कराने जे काही केले ते किती योग्यच होते, हे सविस्तरपणे सांगितलेच. परंतु त्याचवेळी काश्मिरातील हे युवक लष्करावर हल्ला करण्यासाठी दगडांच्या ऐवजी हाती बंदुका घेतील तर बरे, म्हणजे आम्हाला योग्य ते प्रत्युत्तर देता येईल, असेही भाष्य या लष्करप्रमुखाने केले. योग्य ते प्रत्युत्तर याचा अर्थ गोळ्या घालण्याचा अधिकार. याच मुलाखतीत नागरिकांना लष्कराची भीती वाटायलाच हवी, अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली.

लष्करप्रमुखांची ही वक्तव्ये इतक्या उच्च पदावरील व्यक्तीच्या ठायी आवश्यक असणाऱ्या मुत्सद्देगिरीचा अभाव दर्शवतात. सध्याच्या वातावरणात हे असे म्हणणे हे देशद्रोहाच्या आरोपास निमंत्रण देणारे आहे, हे मान्य करूनही लष्करप्रमुखांच्या या वावदूक वक्तव्याचा समाचार घेणे आवश्यक ठरते. तूर्त, जिवंत व्यक्तीस काही काळासाठी ओलीस ठेवण्याच्या लष्कराच्या या कृत्याने देशातील उन्मादी संप्रदायास जणू हर्षांचे भरते आले असून आपल्या लष्कराच्या शौर्यदर्शनाने या सर्वाचे ऊर सामुदायिकरीत्या भरून आले आहेत. लष्करप्रमुखांनी आपल्या वक्तव्यांनी देशप्रेमाने फुगलेले हे ऊर अधिकच फुगवले. वास्तविक छाती अशी इतकी फुगवणे आरोग्यास हानीकारक असते. परंतु राष्ट्रप्रेमापोटी घरातल्या घरात का असेना, अशी छाती फुगवण्याचा धोका पत्करण्यास अनेकांची तयारी आहे. या मंडळींना सांगावयास हवे की ताकद- मग ती व्यक्तीच्या अंगातील असो वा लष्कराची- ती नेहमी प्रदíशत करण्याचा हव्यास हीनबुद्धीचा निदर्शक असतो. है कोई माई का लाल, छापाचे संवाद बॉलीवूडी चित्रपटांत ठीक. पण ते लष्करप्रमुखांसाठी नसतात. लष्करप्रमुखपदावरील व्यक्तीने संयत विवेक बाळगायचा असतो. याचे कारण या असल्या शक्तिप्रदर्शनाचा म्हणून दृश्य परिणाम होत असतो आणि त्यातून जनमत तयार होत असते. हे जनमत हिंसकच असते आणि त्यास अधिकाधिक हिंसाचार हवा असतो. अशा जनमताची भूक भागवणे हे लष्कराचे काम नाही. किंबहुना ते तसे नसायला हवे. दगडांच्या ऐवजी काश्मिरी तरुणांनी हाती बंदुका घ्याव्यात म्हणजे आम्ही काय ते पाहून घेऊ हे लष्करप्रमुखांचे विधान अधिक हिंसेची आस लावणारे आहे. ‘संपवून टाका त्या काश्मिरींना’ असे मानणाऱ्यांचे प्रमाण हल्ली देशात वाढत असून अशा नागरिकांचा आंधळेपणा भीतिदायक आहे. इतिहासात लष्करावर असा हल्ला करणारे हे दहशतवादी होते. पण आता साधे नागरिक, तरुण, इतकेच काय महाविद्यालयीन तरुणीदेखील लष्कराविरोधात संघटित होताना दिसतात. अशा वेळी इतिहासात पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांना आपल्या लष्कराने ज्या पद्धतीने हाताळले त्याच पद्धतीने भारतीय नागरिकांस सामोरे जाऊन चालणारे नाही इतकेदेखील भान आपल्या लष्करप्रमुखांस नसावे? जनतेला भारतीय लष्कराची भीती वाटायला हवी, असेही त्यांना वाटते. भीतीची भावना आदराच्या थडग्यावर उभी राहते. तसेच कोणतीही भीती ही कितीही तीव्र असली तरी कालांतराने तिचा अंमल कमी होत जातो हे वास्तव आहे. अशा वेळी ती कायम राहावी यासाठी संबंधितांस अधिकाधिक क्रूर व्हावे लागते. आपल्या लष्कराचे असे व्हावे असे त्यांच्या प्रमुखास वाटते काय? वास्तविक लष्कराची भीती ही शत्रुराष्ट्रास वाटायला हवी. ती त्यांना किती नाही याची पठाणकोट, उरी येथील उदाहरणे गेल्या दीडदोन वर्षांतील आहेत. तेथे लष्कराच्या घरांत घुसून पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी आपले नाक कापले, हे वास्तव आहे. तरीही हे कापलेले नाक वर करून लष्करप्रमुख वाटेल ते बोलू शकतात, हे आश्चर्यच.

आणि दुसरे असे की लष्करासारख्या यंत्रणांनी समाजमाध्यमांतील रिकामटेकडय़ांच्या तालावर नाचायचे नसते. त्याची एकदा का सवय लागली की या रिकामटेकडय़ांना खूश करण्याचा छंद लागतो आणि छंदाचे रूपांतर सवयीत होते. मौन पाळायचा विवेक हवा तो हे टाळण्यासाठी. परंतु सध्या त्याचाच तर मोठा बळी गेलेला दिसतो. आम्ही ब्रह्मदेशात घुसून नागा घुसखोरांवर कारवाई केली असे गृहमंत्री सांगणार आणि पाकिस्तानी सनिकांवर केलेल्या लक्ष्यभेदी हल्यांची टिमकी तर खुद्द पंतप्रधानच वाजवणार, असा हा काळ. वास्तविक या आणि अशा कारवाया याही आधी आपल्या लष्कराने केल्या होत्या. परंतु त्याची वाच्यता न करण्याचा शहाणपणा त्यावेळी दाखवला गेला. तो दाखवायचा याचे कारण शत्रूच्या प्रत्येक अपमानाची अशी ऊरबडवी जाहिरात होऊ लागली तर अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याचे दडपण शत्रूवर येते. परिणामी मुत्सद्देगिरी, चर्चा यांतून तोडगा काढण्याचा मार्ग अधिकाधिक आकुंचित होऊ लागतो. काश्मीर प्रश्नावर हे आपले असे झाले आहे. चुटकीसरशी आम्ही हा प्रश्न सोडवू या वक्तव्याची आता आठवणदेखील नको अशी अवस्था विद्यमान सत्ताधीशांची झाली असून काय करावे हेच सरकारला कळेनासे झाले आहे. अशी अवस्था प्रत्येक सरकारवर कोणत्या ना कोणत्या प्रश्नावर येतच असते. अशा परिस्थितीत किमान एक गोष्ट तरी सरकारला करता येते.

ते म्हणजे कमी बोलणे. इतके दिवस हा शाब्दिक अतिसाराचा आजार फक्त राजकारण्यांनाच ग्रासत असे. परंतु लष्करप्रमुखही त्यापासून सुरक्षित नाहीत, हे जनरल रावत यांनी दाखवून दिले आहे. तेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपीय देशांच्या दौऱ्यावर निघत असताना. इतका कुमुहूर्त शोधूनदेखील सापडणार नाही. युरोपीय देश हे मानवी हक्कांसाठी कमालीचे जागृत असतात आणि या अधिकारांचे उल्लंघन जराही सहन करीत नाहीत. नागरिकाची ढाल करण्याची भारतीय लष्कराची ही कृती ही काही भावनावीरांना देशप्रेमाची द्योतक वाटत असली तरी ती मानवी हक्कांची पायमल्ली करणारी आहे, हे निसंशय. भारतीयांना अनुकरणीय वाटणाऱ्या इस्रायली जवानांनी काही वर्षांपूर्वी पॅलेस्टिनी तरुणास अशाच प्रकारे ढाल म्हणून वापरल्याचे उघड झाल्यावर त्या लष्करी तुकडीच्या प्रमुखास इस्रायली सरकारने बडतर्फ केले आणि त्या दोन जवानांना १८ महिने गजाआड पाठवले. वास्तविक इस्रायल हा काही मानवी हक्कांचा राखणदार नाही. तरीही ही कृती त्या देशात सहन झाली नाही. आणि इथे तर आपले लष्करप्रमुख असे काही अगोचर करणाऱ्याचे अभिनंदन करतात. इतकेच काय वर ते बोलूनही दाखवतात. अशा वेळी विचारी जनांनी वर्दीतील हा वावदूकपणा रोखायला हवा.

  • शक्तिप्रदर्शनाच्या दृश्यांचा परिणाम म्हणून अधिकाधिक हिंसक झालेल्या जनमताची भूक भागवणे, हे सैन्याचे काम नाही. समाजमाध्यमांतील रिकामटेकडय़ांच्या तालावर नाचून ऊरबडवेगिरी केल्यास मुत्सद्देगिरी, चर्चा यांतून तोडगा काढण्याचा मार्ग अधिकाधिक आकुंचित होऊ लागतो..