29 March 2020

News Flash

खेळ हा कुणाचा..?

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल रिकाम्या मैदानांवर खेळवावी असा प्रस्ताव आहे.

संग्रहित छायाचित्र

जगभरच्या ‘गर्दी टाळा’ आवाहनामुळे क्रीडाप्रेक्षागारे रिकामी ठेवावी लागली, काही स्पर्धाच रद्द झाल्या.. त्यामुळे हा प्रश्न सामोरा येतो..

जगद्विख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे एक छायाचित्र परवा माध्यमांमध्ये झळकले. जरा विचित्रच होते. रोनाल्डोच्या चेहऱ्यावर निष्काम भाव होते आणि पाश्र्वभूमी होती रिकाम्या खुर्च्याच्या स्टेडियमची. दोन्ही थोडे विपरीतच. एक तर रोनाल्डो कधीच इतक्या रिकाम्या चेहऱ्याने खेळताना दिसत नाही. तो जेथे सध्या खेळत आहे, त्या फुटबॉलवेडय़ा इटलीतील व्यावसायिक साखळीमध्ये अशी रिकामी मैदाने सरावादरम्यानही एरवी आढळणार नाहीत. मागे अशीच एकदा रोनाल्डोवर रिकाम्या मैदानात खेळण्याची वेळ आली होती. ती परिस्थिती जरा वेगळी होती. संबंधित मैदानात त्या सामन्याआधीच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांमधून वर्णद्वेषी टोमणेबाजी झाल्यामुळे युरोपियन संघटनेने त्या क्लबच्या संघाला त्यांचे घरचे सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्याची शिक्षा दिली होती. ती कारवाई म्हणून ठीक; पण प्रेक्षकबंदी असलेल्या, भुताटकीसम मैदानांमध्ये खेळण्याची शिक्षा आम्हाला कशासाठी, असा प्रश्न त्या वेळी रोनाल्डोने उपस्थित केला होता. यंदा त्याला असा प्रश्न उपस्थित करण्याची सोय नाही. करोना विषाणूच्या अपरिमित फैलावामुळे जगभर आणि विशेषत: इटलीत उडालेला हाहाकारच इतका की, ‘गर्दीची ठिकाणे टाळा’ या सार्वत्रिक सल्ल्याचा फटका जगभरातील क्रीडास्पर्धानाही बसू लागला आहे. जगातील सर्वात महागडी क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल रिकाम्या मैदानांवर खेळवावी असा प्रस्ताव आहे. ही स्पर्धा आता १५ एप्रिलपर्यंत पुढे सरकली आहे. ती स्पर्धाच रद्द करावी, असा सूर होता. पण कबूल केलेली आणि येऊ घातलेली अजस्र माया पाहता तिच्यावर इतक्या सहजपणे पाणी सोडणे शक्य नाही. त्यामुळे आयपीएल होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतले उर्वरित दोन्ही सामने रद्द झाले. तर रणजी करंडक स्पर्धेत शुक्रवारच्या शेवटच्या दिवसाचा खेळ प्रेक्षकांविना झाला. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना किंवा येत्या काही दिवसांमध्ये होणारी इंडियन खुली बॅडिमटन स्पर्धा याही ठिकाणी प्रेक्षकांचे आवाज घुमणार नाहीत. ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना रिकाम्या मैदानांमध्ये खेळवली जात आहेच. अमेरिकेतील सर्व प्रमुख खेळांच्या साखळी स्पर्धा, युरोपात इंग्लंड वगळता इतर देशांतील फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. क्रीडास्पर्धा स्थगित कराव्या, रद्द कराव्या की रिकाम्या मैदानांमध्ये खेळवाव्यात याविषयी खल जगभर सुरू आहे. त्यातून एका नवीन मुद्दय़ाला अनाहूतपणे स्पर्श झालेला आहेच. तो म्हणजे, खेळाच्या मैदानांवर प्रेक्षकांची भूमिका काय असते आणि खरोखर ती खेळाडूंइतकीच महत्त्वाची असते का? रिकाम्या मैदानांवरील क्रीडास्पर्धा हे ‘चित्रवाणी प्रक्षेपण हक्कां’च्या काळातील एक वास्तव ठरू शकते का?

टीव्हीच्या प्रभावामुळे आणि पुरस्कर्त्यांच्या मातब्बरीमुळे गेल्या दशकभरातच मैदानावर येणाऱ्या प्रमुख खेळांमध्ये मुख्य संघांच्या बाबतीत प्रेक्षकांकडून खरीदलेल्या तिकिटांतून मिळणारे उत्पन्न एकूण उलाढालीच्या तुलनेत अल्पच ठरू लागले आहे. भारतात आयपीएलसारख्या स्पर्धासाठी येणारा मोठा प्रेक्षकवर्ग बहुश: फुकट पासावर चन करण्यासाठी येतो. इतर सामन्यांसाठीही सर्वाधिक किमतीची तिकिटे हितसंबंधींना आणि राजकारणी व पुरस्कत्रे या निर्णायक दबावघटकांना सन्मानिका म्हणून फुकटात वाटली जातात. तात्पर्य, ज्याला गेट-रिसीट किंवा तिकीटबारीवर मिळणारे उत्पन्न म्हणतात, त्याचा टक्का बऱ्याच प्रमाणावर घसरू लागला आहे. त्यामुळे आर्थिक गणितात तरी मैदानावरील प्रेक्षक या घटकाचे माहात्म्य प्रमुख खेळांच्या बाबतीत ओसरलेले आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये तिकिटे महाग असल्याची ओरड तेथील फुटबॉलप्रेमी करू लागले आहेत. जर्मन लीगमध्ये प्रेक्षकच अनेकदा क्लबचे भागभांडवलधारक असल्यामुळे विशिष्ट मर्यादेच्या वर तिकिटांची किंमत वाढवता येत नाही. तेथेही तिकिटांतून मिळणारे उत्पन्न इतर स्रोतांच्या तुलनेत खूपच कमी असते. प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे किंवा त्यांच्या प्रतिसादामुळे ऊर्जेचा, स्फूर्तीचा आणि पर्यायाने खेळाचा दर्जा उंचावतो असे अनेक वलयांकित खेळाडू सांगतात. ‘सचिन.. सचिन’ असा नाद छाती दडपणारा नव्हे, तर स्फूर्तिदायक वाटायचा असे सचिन तेंडुलकरने म्हटलेलेच आहे. रोनाल्डो, मेसी, फेडरर, नडाल, लुइस हॅमिल्टन, लेब्रॉन जेम्स आज मैदानावर, कोर्टवर किंवा रेस ट्रॅकवर येतात, तेव्हा प्रेक्षक त्यांचा खेळ पाहण्यासाठीच नव्हे, तर नायकासमान असणाऱ्या खेळाडूंना ‘याचि देही’ पाहण्यासाठीही गर्दी करत असतात. पण खरोखरच हे खेळाडू इतके महान बनतात, ते केवळ प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे की खेळावरील त्यांच्या श्रद्धेमुळे, निष्ठेमुळे?

इंग्लंडची राष्ट्रीय आणि व्यावसायिक फुटबॉलपटू एनी आलुकोने नुकताच ‘द गार्डियन’मध्ये लिहिलेला लेख लक्षणीय ठरतो. ती लिहिते, ‘प्रेक्षकांविना मैदानांचा जरा अतिच बागुलबुवा केला जातो, असे मला वाटते. आम्ही जवळपास संपूर्ण कारकीर्द रिकाम्या मैदानांवर किंवा तुरळक प्रेक्षकांसमोरच खेळलो. प्रेक्षकांना आमच्याविषयी काय वाटते हे महत्त्वाचे नाही. आम्हाला खेळात किती नपुण्य दाखवता येते, खेळावर आमचे किती प्रेम आहे, तंदुरुस्ती कितपत आहे हेही महत्त्वाचे. या तिन्हींपैकी एक बाजू जरी लंगडी असली, तरी लाखभर प्रेक्षकही आमची कामगिरी उंचावू शकत नाहीत! तेव्हा प्रेक्षकांमुळेच कामगिरी उंचावते हा दावा खेळाडूंव्यतिरिक्त आणखी कुणी तरी सर्वप्रथम केलेला असावा!’ ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे की, रिकाम्या मैदानावरील खेळाचा सामना म्हणजे खेळ आहे, पण ‘इव्हेंट’ नाही. हे वास्तव जगभरातील प्रमुख खेळांना लागू पडतेच. हल्लीच्या आयपीएल संघांना खेळाडू आणि प्रशिक्षक, सहायकांप्रमाणेच ‘चीअरलीडर्स’चीही भरती करावी लागते. खरे तर आजही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत या प्रमुख देशांतील स्थानिक क्रिकेट सामन्यांना प्रेक्षक तुरळक असतात. अव्वल दर्जाचे वलयांकित क्रिकेटपटू तरीही तयार होतातच. याचे कारण म्हणजे अव्वल दर्जाच्या क्रीडापटूंचे खेळावरील प्रेम आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारीही अव्वल दर्जाची असते. प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळो वा न मिळो, खेळाडूंचा प्रवास सुरूच असतो. तेव्हा आलुको म्हणाली त्याप्रमाणे प्रेक्षकांचा प्रभाव हा मुद्दा खेळाडूंनी कधीच आणलेला नव्हता. आता फ्रँचायझीकरणाच्या युगात बहुतेक खेळाडूंचे बोलविते धनी वेगळेच असतात. त्यामुळेही प्रेक्षकांच्या प्रभावाविषयी जरा अतिरंजित दावे केले जातात. येत्या काही दिवसांमध्ये युरोपातील फुटबॉल सामने, आयपीएलचे भारतातील क्रिकेट सामने, अमेरिकेतील व्यावसायिक बास्केटबॉल आणि बेसबॉलचे सामने रिकाम्या मैदानांमध्ये खेळवले जातील. खेळाडू, संघटक, पुरस्कर्त्यांसाठी तो सर्वस्वी वेगळा अनुभव असेल. त्यातून काही नवीन प्रारूपे निर्माण होऊ शकतील. ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलनाचा पवित्र सोहळा नुकताच अथेन्समध्ये पार पडला. जगभर दाखवण्यात आलेल्या या सोहळ्यासाठी मैदानात एकही प्रेक्षक आमंत्रित नव्हता. रोनाल्डोचा सुरुवातीला उल्लेख झाला तो सामना कारकीर्दीतला हजारावा सामना होता. त्याचा निकाल काय लागला, याहीपेक्षा तो रिकाम्या मैदानात खेळवला गेला ही बाब त्याच्या चटकन विस्मरणात जाण्यासारखी नाही. शेवटी खेळ हा कुणाचा, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षक असे असू शकत नाही, हे या दिवसांमध्ये उमगले तरी पुरेसे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 2:09 am

Web Title: coronavirus outbreak sports events will be played without crowds because of coronavirus zws 70
Next Stories
1 भयाच्या भयीं काय..
2 महागडी स्वस्ताई
3 कर्मदरिद्री
Just Now!
X