गोविंदाचार्य

राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेले लाखो कारसेवक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली कारसेवेत जे कार्यकर्ते सहभागी झाले असे दोन अग्रणी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या संघर्षांला अखेर यश आले . या दोघांनी हिंदू समाजाच्या भावनांच्या रक्षणासाठी अथक प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने त्यांच्या लढाईला न्याय मिळवून दिला आहे. आता राम मंदिराकडून रामराज्य निर्माणाकडे देशाची वाटचाल व्हायला हवी.

रामराज्य याचा अर्थ मनुष्यकेंद्रित पाश्चिमात्य विचार आणि विकास नाकारून प्रकृतीकेंद्रित विकासाकडे वाटचाल. भारताला अशा रामराज्याची नितांत गरज आहे. रामराज्यामध्ये सर्व सृष्टिमात्राचे कल्याण करण्याचा विचार मांडलेला आहे. फक्त माणसाच्या विकासापुरते ते मर्यादित नाही! राम मंदिराची निर्मिती ही रामराज्याकडे होणाऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणता येईल. त्यादृष्टीने राम मंदिर बांधणे महत्त्वाचे ठरते आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक मानला पाहिजे.

या मार्गाने पुढे जात असताना देशाची संस्कृती-परंपरा यांतून मिळालेली ताकद सत्कारणी लागेल. सामाजिक, आर्थिक, राजकीय संरचनेत बदल घडवून आणण्यासाठी ही ताकद उपयोगी पडेल. ही स्वदेशी संरचना म्हणू शकतो. निव्वळ भौतिक विकास नव्हे, तर सर्वागीण विकास साधला जाऊ  शकतो. गेल्या चार-पाचशे वर्षांपासून मानवकेंद्रित विकास करण्याला प्राधान्य दिले गेले आणि त्या अंगानेच देशाची राजकीय आणि आर्थिक वाटचाल होत राहिली. हिंदुत्व ही सर्वाधिक समतावादी विचारप्रणाली आहे आणि पर्यावरणकेंद्रित विकास हा तिचा गाभा आहे. त्यामुळेच औद्योगिकीकरणोत्तर समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकासाला सामावून घेण्याची ताकद हिंदुत्वाच्या विचारप्रणालीत आहे. स्वत्वाची ओळख, नीतिमत्ता (इथॉस) आणि गरजा या तीनही बाबी विचारसरणीशी जोडलेल्या असतात. हे समजून घेतले की राम मंदिराच्या निर्मितीचे महत्त्व लक्षात येईल.

राम मंदिराच्या निर्मितीची प्रक्रिया सरकारकडून होईल. पण महंत, साधूंशी चर्चा करून, त्यांचा सल्ला घेऊन ती पूर्ण केली जावी अशी अपेक्षा आहे. त्यातही प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेचे विचार आणि अपेक्षा काय आहेत हे जाणून घेऊन, त्यांना सहभागी करून घेऊन राम मंदिर बांधले जावे.

गोविंदाचार्य हे १९९२ च्या रामजन्मभूमी आंदोलनात अग्रणी होते (शब्दांकन: महेश सरलष्कर)