30 October 2020

News Flash

आज कल पाँव जमीं पर..

जमिनीपासून ९ फूट उंचीवर आडव्या स्थितीत रोनाल्डो उसळला आणि बायसिकल किकने त्याने गोल केला. त्याचा हा आविष्कार परग्रहावरील वाटावा असाच होता.

जमिनीपासून ९ फूट उंचीवर आडव्या स्थितीत रोनाल्डो उसळला आणि बायसिकल किकने त्याने गोल केला. त्याचा हा आविष्कार परग्रहावरील वाटावा असाच होता.

वास्तविक एक साधी लाथ ती. पण गेले चार-पाच दिवस साऱ्या क्रीडा आणि अक्रीडा विश्वाला तिने नादवून टाकले आहे. ती मारली गेली ती इटलीत टय़ुरिन या शहरात. जगातल्या सर्व सुंदर मोटारींचे डिझाइन या शहरात जन्माला आले आहे. त्या अर्थाने या शहरास कलासक्ततेचा एक वारसाच आहे म्हणायचा. तर पावसाळी सायंकाळी या शहरात दोन दिग्गज फुटबॉल संघ आटोकाट लढत होते. इटलीचा युव्हेंट्स संघ विरुद्ध स्पेनचा रेआल माद्रिद संघ. दोन भिन्न फुटबॉल शैली आणि घराण्यांतील ती लढत. एकाचा बचाव अभेद्य तर दुसऱ्याची ओळख तिखट आक्रमणासाठी. अशा खेळात कोंडी फुटण्यासाठी काही तरी अघटित घडावे लागते. रेआल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो याने तेच केले. फुटबॉल गोलपोस्टसमोर लाथाडला जात असताना आणि इटालियन्सचा बचाव घट्ट होत असताना रेआलच्या दानी कार्वाहाल याच्याकडून फुटबॉल हवेतनं रोनाल्डोसमोर आला. त्याने अक्षरश: क्षणार्धात हवेत अर्ध-कोलांटउडीसदृश झेप घेतली. दोन्ही पाय वर असतानाच त्याने उजव्या पायाने किक मारून फुटबॉल क्षणार्धात गोलजाळ्यात धाडला. घडले ते इतकेच.

पण ते इतके अद्भुत होते की जगातल्या सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक गणला जाणारा युव्हेंट्सचा गिगी बुफॉन दोन्ही पाय थिजलेल्या अवस्थेत समोरचा हा आविष्कार केवळ बघतच राहिला. गोल वाचवण्याची कोणतीही संधीच त्याला रोनाल्डोने दिली नव्हती. युव्हेंट्सच्या प्रेक्षकांनी रोनाल्डोला आणि त्याच्या अफलातून बायसिकल किकला उभे राहून मानवंदना दिली. प्रथम नि:शब्द ‘आ’ वासणे आणि नंतर कौतुकाचा धबधबा अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया रोनाल्डोची बायसिकल किक पाहून जगभरच्या चाहत्यांकडून व्यक्त झाली. हा सामना काही लाख प्रेक्षकांनी (भारतासह) टीव्हीवरून पाहिला. पण दुसऱ्या दिवशी बातमी प्रसृत झाल्यावर त्याच्यापेक्षा दसपट मंडळींनी त्या किकची व्हिडीओ क्लिप पाहिली. एका स्पॅनिश दैनिकाने अवघ्या पृथ्वीतलावरील फुटबॉलप्रेमींना रोनाल्डोविषयी वाटणारा विस्मययुक्त आदरच मुख्य मथळ्यातून व्यक्त केला. तो मथळा होता.. तू कोणत्या ग्रहावरून आलास?

बायसिकल किकचा रोनाल्डोचा आविष्कार नक्कीच परग्रहावरील वाटावा असाच होता. बायसिकल किक ही फुटबॉलमध्ये दुर्मीळात दुर्मीळ. त्यामुळेच सर्वाधिक थरारक आणि आनंददायीदेखील. रोनाल्डोची किक पाहून थक्क झालेले सगळेच खरे तर फुटबॉलप्रेमी आणि फुटबॉलज्ञाते नसतील. पण यातच त्या किकची आणि रोनाल्डोच्या लोकप्रियतेची वैश्विकता दडलेली आहे. आकडय़ांमध्ये बोलायचे झाल्यास, रोनाल्डो किक मारण्यासाठी जमिनीपासून २ मीटर ७७ सेंटिमीटर किंवा साधारण ९ फूट उंचीवर आडव्या स्थितीत उसळला! मुळात त्याची उंची सहा फुटांहून अधिक आणि ८४ किलो वजन. वय ३३ पेक्षा जरा अधिक. अशा दणकट चणीसह इतकी उंचावर उसळी मारल्यावर खाली येताना पाठीला, मानेला, कमरेला किंवा डोक्याला गंभीर इजा होण्याचा धोका असतोच. पण त्याला काहीही झाले नाही. त्याच क्षणी तो उभा होता. मानवंदना स्वीकारण्यासाठी. हेच त्याचे थोरपण. इतर कोणत्याही फटक्यापेक्षा किंवा किकपेक्षा बायसिकल किक निराळीच, कारण एक तर दोन्ही पाय हवेत असतात आणि तशा अवस्थेत फुटबॉलचा अंदाज घेऊन तो मारण्यासाठी पायाला अधिक अंतर कापावे लागते. पण त्यामुळेच पायाला अधिक बल मिळते आणि त्यामुळे फुटबॉल अधिक वेगाने एखाद्या दिशेने भिरकावला जाऊ  शकतो. या अतिरिक्त ऊर्जेमुळे असा चेंडू थोपवणे जवळपास अशक्य असते. उभ्या स्थितीत किक मारताना डोक्याची स्थिती अशी असते की चेंडूपासून गोलापर्यंतचे नेमके अंतर आणि दिशा याचा अंदाज अधिक योग्य प्रकारे बांधता येतो. याउलट बायसिकल किक मारताना सारे लक्ष जवळपास पूर्णपणे चेंडूवरच केंद्रित करावे लागते आणि केवळ अंदाजानेच चेंडू गोलजाळ्यात धाडावा लागतो. आव्हान इथेच संपत नाही. फुटबॉलमध्ये सहसा पाय कमरेच्या उंचीच्या वर उगारणे निषिद्ध मानले जाते. कारण उघड आहे. सध्याच्या काळातील फुटबॉलपटू वापरत असलेले जाडजूड बूट आणि त्याच्या तळाशी असलेले रबरी खिळे यांमुळे अन्य खेळाडूंच्या डोक्याला, चेहऱ्याला गंभीर इजा होऊ  शकते. त्यामुळेच खेळाडूंच्या गर्दीत बायसिकल किक मारता येत नाही. रोनाल्डोने त्याही दृष्टीने विचार करत प्रतिस्पर्धी गोलक्षेत्रात फारसे खेळाडू जमण्यापूर्वीच काम उरकून टाकले. ही झाली बायसिकल किक आणि रोनाल्डोच्या किमयेची तांत्रिक बाजू. तिला शब्दांत पकडणे अर्थातच सोपे. पण या लाथेतील सौंदर्यशास्त्राविषयी लिहायला गेल्यास शब्द अपुरे पडतील.

फुटबॉलचे वर्णनच मुळात केले जाते जोगो बोनितो किंवा सुंदर खेळ या शब्दांत. जोगो बोनितो हा पोर्तुगीज शब्द आणि विख्यात फुटबॉलपटू एडसन आरांतेस डो नासिमेंटो अर्थात पेले यांच्याविषयी तो पहिल्यांदा ठळकपणे वापरला गेला. पेले ब्राझिलियन पण त्यांची भाषा अर्थातच पोर्तुगीज. ब्राझील आणि सुंदर खेळ किंवा फुटबॉल यांचे नाते अतूट आणि या अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे पेले. फुटबॉल हा अतिशय स्वस्त खेळ. बहुतेक सर्व प्रमुख खेळांप्रमाणेच हा खेळही स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच वसाहतवाद्यांच्या माध्यमातून जगभर पोहोचला. खऱ्या अर्थाने वैश्विक बनला. याही खेळात इतर खेळांप्रमाणेच काही सौंदर्यस्थळे आहेत. गोल करणे हा प्रमुख उद्देश. त्यामुळे गोल कशा पद्धतीने होतात हा औत्सुक्याचा आणि कौतुकाचा मुद्दा. त्यातूनच कथा, दंतकथा जन्माला आल्या. एका स्वतंत्र अघोषित, अलिखित धर्माचा जन्म झाला. त्यातूनच पेले, बेकेनबाउर, पुस्कास, युसेबियो, प्लॅटिनी, मॅराडोना, झिदान, मेसी, रोनाल्डो अशी दैवते उदयास आली. इंग्लंडच्या अनेक तगडय़ा बचावपटूंना एकटय़ाने चकवत अर्जेटिनाच्या दिएगो मॅराडोना याने १९८६ मधील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत केलेला गोल अविस्मरणीय, अद्भुत ठरतो. अर्जेटिना आणि बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सीदेखील अशा गाोलांसाठी विख्यात आहे. ऊर्जा आणि कौशल्य यांचा सुंदर मिलाफ साधत चकवत केलेला गोल म्हणजे कोण्या चित्रकाराचे ४० हजार चौ. फुटांच्या कॅनव्हासवरील फटकारेच. पण बायसिकल किक त्याहूनही अद्भुत. चित्रकाराच्या कुंचल्यास चमकत्या तानेची जोड जणू. दुर्मीळ अशी. त्याचमुळे यशस्वी बायसिकल किकची उदाहरणे फुटबॉलमध्ये फारशी नाहीत. अ‍ॅश्ले बार्न्‍स, झ्लाटान इब्राहिमोविच, ओस्कारिन मासुलुके, झेर्डान शाकिरी, फिलिप मेक्सेस यांनीही बायसिकल किक मारल्या. पण फुटबॉल वर्तुळाबाहेर त्यांची नावे फारशी परिचित नाहीत. रोनाल्डिन्यो, रिवाल्डो या परिचित फुटबॉलपटूंनीही ती किमया करून दाखवली. पण रोनाल्डोसारखा थक्कभावनेचा भूकंप त्यांनाही घडवता आला नव्हता.

त्या अर्थाने रोनाल्डोची लाथ दैवी ठरते. कदाचित म्हणूनच फुटबॉलचे बोधचिन्ह म्हणून, जाहिरातींमध्ये, प्लेस्टेशनसारख्या डिजिटल गेम्समध्ये तिचा मुक्त वापर होतो. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एस्केप टू व्हिक्टरी’ या लोकप्रिय सिनेमात साक्षात पेलेंनी भूमिका केली आणि बायसिकल किकही मारून दाखवली. तेव्हापासून तिच्याभोवती एक प्रकारचे मिथक निर्माण झाले होतेच. तेव्हा आज कल पाँव जमीं पर नहीं पडते मेरे, बोलो देखा हैं कभी तुमने मुझे उडते हुए.. असे रोनाल्डोने विचारलेच तर उत्तर होकारार्थी द्यावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 3:57 am

Web Title: cristiano ronaldo goal surprise his fans as well as football world
Next Stories
1 वाळवंटी घाई..
2 सरकारी हमालखाने
3 तिसरी घंटा
Just Now!
X