News Flash

क्रांती, कॅस्ट्रो आणि जग

अमेरिकेस विरोध, म्हणजेच भांडवलशाहीस विरोध, हे त्यांच्या कथित क्रांतीचे सूत्र होते.

क्रांती, कॅस्ट्रो आणि जग

स्वत:च्या सत्तांतरात अमेरिकेचा अडथळा आहे हे लक्षात आल्यावर कॅस्ट्रो यांनी अमेरिकेच्या विरोधात आगलावी भूमिका घेण्यास सुरुवात केली..

शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेचा प्रत्येक शत्रू हा सोविएत रशियाचा मित्र मानला जात होता आणि सोविएत रशियाविरोधातील प्रत्येकास आपल्याकडे ओढण्याचा अमेरिका प्रयत्न करीत होता. या खेळात अनेक हुकूमशहांनी स्वत:चे भले करून घेतले. कॅस्ट्रो हे अशांचे शिरोमणी.

उजवीकडचे असोत किंवा डावीकडचे. आपापल्या प्रदेशांत क्रांती करून आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा दावा करणाऱ्यांत नेहमीच अनेक साम्यस्थळे असतात. त्यांची शारीरिक क्षमता दांडगी असते. ते सलग २०-२० तास काम करू शकतात. अमोघ वक्तृत्व हे अशांचे आणखी एक वैशिष्टय़. परिणामकारकता न गमावता हे सातत्याने, दिवसेंदिवस तेच तेच बोलू शकतात आणि त्यांच्या शब्दांवर जनता विश्वास ठेवू शकते. तसेच हे सगळे कथित क्रांतिकारक आपल्या खासगी आयुष्याविषयी कमालीचे साशंक असतात आणि त्याची कधीही वाच्यता होणार नाही, याविषयी दक्ष असतात. त्याचप्रमाणे आपण म्हणजेच व्यवस्था असा समज करून देण्यात हे सर्व नेहमीच यशस्वी होतात. किंबहुना आपण असताना व्यवस्थेची गरजच नाही, असा त्यांचा दावा असतो आणि तो जनतेच्या मनावर ठसवण्यात त्यांना यश येत असते. स्वत:ला नेहमीच ते व्यवस्थेच्या वर ठेवतात आणि आपण जनतेसाठी किती त्याग केला आहे, याच्या खऱ्याखोटय़ा.. बऱ्याचशा खोटय़ाच.. कहाण्या सांगून आपल्याबाबतची सहानुभूती कमी होणार नाही, याची दक्षता त्यांच्याकडून नेहमीच घेतली जाते. आपणच कसे गरिबांचे वाली आहोत आणि त्यांचे हित फक्त आपल्यालाच कसे कळते याचा बेमालूम आभास हे सर्व उत्तमरीत्या करू शकतात. अशा व्यक्ती कधीही बेसावध नसतात आणि थेट जनतेशी संवाद साधण्यातच त्यांना जास्त रस असतो. तसेच अशा नेत्यांना आपल्या नेतृत्वमंडलात दुसऱ्या क्रमांकावर कोणीही चालत नाही. तसा जरा जरी कोणी प्रयत्न केला तर नेतृत्वाची अभिलाषा बाळगणाऱ्यांना ते शांतपणे दूर करतात. ते तसे दूर झाले नाहीत तर या जगातूनच नाहीसे होतात. या सगळ्यांत आणखी एक कमालीचे साम्य म्हणजे या सर्व कथित क्रांतिकारकांचे दृश्यभान उत्तम असते आणि स्वत:ची अशी एक खास वेशशैली ते विकसित करतात. कोणताही क्रांतिकारक वैयक्तिक देहभानाबाबत कधीही बेढब आणि अजागळ नसतो. परंतु ऐतिहासिक सत्य हे की अशा कथित क्रांतिकारकांत नेहमीच एक हुकूमशहा दडलेला असतो आणि त्यांच्या डोळ्यादेखतच त्यांच्या कथित क्रांतीची अखेर होत असते. फिडेल कॅस्ट्रो यांच्याबाबत हे सर्व घडले.

अमेरिकेस विरोध, म्हणजेच भांडवलशाहीस विरोध, हे त्यांच्या कथित क्रांतीचे सूत्र होते. परंतु अमेरिकाविरोध हा कॅस्ट्रो यांचा सत्ता राखण्यासाठीचा देखावा होता. अमेरिकाविरोधाची जाहीर भाषा करणाऱ्या या नेत्याने मधुचंद्रासाठी अमेरिकेचीच निवड केली होती आणि त्या देशात आपल्या मित्रपरिवारासह मौज करणे त्यांना आवडत असे. परंतु पुढे स्वत:च्या सत्तांतरात अमेरिकेचा अडथळा आहे हे लक्षात आल्यावर कॅस्ट्रो यांनी अमेरिकेच्या विरोधात आगलावी भूमिका घेण्यास सुरुवात केली आणि बघता बघता ते जगातील सर्व समाजवादी, डावे यांच्या आकर्षणाचा विषय झाले. गेल्या शतकात दोन क्रांतिकारकांनी तरुणांना वेड लावले. एक चे गव्हेरा आणि दुसरे फिडेल कॅस्ट्रो. क्युबातील अध्यक्ष बातिस्ता यांची राजवट उलथून पाडण्यात कॅस्ट्रो यांना चे याची साथ होती. गनिमी काव्यासाठी चे ओळखला जात असे. तो मूळचा अर्जेटिनाचा. मेक्सिकोत त्याची आणि कॅस्ट्रो यांची ओळख झाली. दोघेही साम्यवादी विचारांचे आणि क्रांतीचे स्वप्न पाहणारे. अशाच पहिल्या क्रांतीसाठी कॅस्ट्रो यांना चे याची साथ मिळाली. १९५९ सालच्या पहिल्या दिवशी बातिस्ता यांची राजवट उलथून पाडण्यात यश आल्यानंतर दोघेही काही काळ एकत्र होते. त्या वेळी सत्ता हाती घेतल्यानंतर कॅस्ट्रो यांनी चे याच्या हाती तुरुंगाचे नियंत्रण दिले आणि चे याच्या देखरेखीखाली बातिस्ता यांचे शेकडो सहकारी फासावर लटकवले गेले. एव्हाना सत्ताधीश झालेल्या कॅस्ट्रो यांनी चे याच्याकडे क्युबाच्या बँकेचे प्रमुखपद दिले. पुढे चे लॅटिन अमेरिकेत क्रांतीचा प्रसार करण्यासाठी गेला असता बोलिव्हियाच्या जंगलात त्याची हत्या झाली. यामागे कॅस्ट्रो यांचा हात असल्याचा संशय व्यक्त झाला होता आणि त्याचे कधीच निराकरण होऊ शकले नाही. वास्तविक बोलिव्हियाच्या जंगलात सुरक्षा फौजांनी वेढल्यानंतर त्याची सुटका करण्यासाठी क्युबाच्या संरक्षण दलांची तुकडी तनात होती. परंतु कॅस्ट्रो यांनी तिला कूच करण्याचे आदेश दिले नाहीत. त्याआधी काही दिवस या दोन क्रांतिकारकांतील संपर्क तुटला होता आणि संबंधांत तणाव निर्माण झाला होता. दोन तलवारी म्यानात ज्याप्रमाणे एका वेळी राहू शकत नाहीत त्याचप्रमाणे दोन क्रांतिकारकही एकाच प्रदेशात एकत्र नांदू शकत नाहीत. चे याचा अंत झाला आणि कॅस्ट्रो यांना रान मोकळे मिळाले.

त्यानंतर अलीकडेपर्यंत, म्हणजे सलग जवळपास पाच दशकांहून अधिक काळ, कॅस्ट्रो यांची निरंकुश सत्ता अबाधित होती. या काळात अमेरिकेचे ११ अध्यक्ष होऊन गेले आणि यातील प्रत्येकाने कॅस्ट्रो यांची सत्ता उखडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. इतकेच काय, अमेरिकेने हर प्रकारे कॅस्ट्रो यांना ठार करण्याचाही प्रयत्न केला. कॅस्ट्रो यांचे सिगार व्यसन लक्षात घेता त्यात स्फोटके भरण्यापासून ते त्यांना आइस्क्रीममधून विषबाधा करण्याच्या प्रयत्नांपर्यंत अमेरिकेने त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला. यासाठी जवळपास १०० कोटी रुपये अमेरिकेने खर्च केले असे म्हणतात. परंतु ते सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. कॅस्ट्रो यांना हा आपला विजय वाटत होता. एका अर्थी तो तसा होता हे खरे असले तरी त्यामुळे क्युबाचे काही भले होत होते असे नाही. अमेरिकेच्या विरोधात म्हणून कॅस्ट्रो हे तत्कालीन सोविएत रशियाच्या कच्छपि लागले होते. परंतु तो देखावा होता. आत्ममग्न स्वघोषित क्रांतिकारी आपल्या तात्कालिक सोयीसाठी फक्त असे बहाणे करीत असतो. सोविएत युनियनवरील प्रेमनाटकाच्या बदल्यात कॅस्ट्रो यांना त्या देशाकडून अमाप पसा आणि तितकेच अमाप खनिज तेल मिळत गेले. हा शीतयुद्धाचा काळ. अमेरिकेचा प्रत्येक शत्रू हा सोविएत रशियाचा मित्र मानला जात होता आणि सोविएत रशियाविरोधातील प्रत्येकास आपल्याकडे ओढण्याचा अमेरिका प्रयत्न करीत होता. या खेळात अनेक हुकूमशहांनी स्वत:चे भले करून घेतले. कॅस्ट्रो हे अशांचे शिरोमणी. या खेळामुळे वास्तविक जग १९६२ साली तिसऱ्या महायुद्धापर्यंत येऊन ठेपले. क्युबाच्या आखातात रशियाने आपली क्षेपणास्त्रे डागली होती आणि त्यांचा रोख अमेरिकेवर होता. सुदैवाने हा तणाव निवळला आणि रशियन नौका माघारी गेल्या. यातून कॅस्ट्रो यांचा प्रभाव अधिकच वाढला. अशा प्रवृत्तीच्या हुकूमशहांना जागतिक मंचावर मिरवणे आवडते. कॅस्ट्रो त्यास अपवाद नव्हते. अमेरिकाविरोधी जगाचे ते प्रवक्ते बनले. यातून स्वार्थ साधण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. क्युबाची दरिद्री अवस्था हे त्याचे उदाहरण. ऐंशीच्या दशकाच्या अखेरी बíलनची भिंत कोसळल्यानंतर आणि त्या वेळी रशियात सत्तेवर असलेल्या मिखाईल गोर्बाचोव यांनी स्वहस्ते शीतयुद्धास मूठमाती दिल्यानंतर तर क्युबाची अवस्था अधिकच बिकट झाली. क्युबन शब्दश: अन्नाला मोताद होते. रशियाची मदत आटल्याने क्युबाची चांगलीच गळचेपी झाली. वास्तविक त्याच काळात कॅस्ट्रो यांच्या विरोधात उठाव होईल अशी अटकळ बांधली जात होती. तसे झाले नाही.

याचे कारण प्रशासनात आपल्या समर्थकांची कॅस्ट्रो यांनी केलेली भरती. फिडेल यांचा धाकटा भाऊ राउल याच्याकडेच प्रशासनातील बरेच अधिकार होते. परिणामी फिडेल यांच्या अधिकारास वाटत होते तितके आव्हान तयार होऊ शकले नाही. यामागील आणखी एक कारण म्हणजे शेजारील व्हेनेझुएलात सत्तेवर आलेला ह्य़ुगो चावेझ हा अमेरिकाविरोधी हुकूमशहा. चावेझ आणि आशियात अमेरिकेविरोधात उभा राहू पाहणारा चीन यामुळे कॅस्ट्रो यांच्या अर्थविचारांस पुन्हा बळ मिळाले आणि त्यांना आपला गाडा अधिक पुढे रेटता आला. याच वेळी कॅस्ट्रो यांनी चातुर्याने भ्रष्टाचार विरोधाची हाक दिली आणि काळ्या पशाच्या निर्मितीसाठी शेकडोंना तुरुंगात डांबले. इतकेच काय, भ्रष्टाचार विरोधात लढण्यासाठी कॅस्ट्रो यांनी जनमानसावरील आपल्या प्रभावाचा वापर करीत तरुण स्वयंसेवकांच्या फौजा तयार केल्या. हे सर्व कॅस्ट्रोसमर्थक ठरवतील ती व्यक्ती भ्रष्टाचारी म्हणून जाहीर केली जायची आणि त्याची रवानगी तुरुंगात व्हायची. ही भ्रष्टाचारमुक्ती, काळ्या पशाचा नायनाट म्हणजेच प्रगती असे कॅस्ट्रो सांगत. परंतु यामुळे सामान्य क्युबनवासीयाच्या जगण्यात काहीही फरक पडत नव्हता. परिणामी हळूहळू जनतेचा भ्रमनिरास होत गेला. यामुळे आणि प्रशासनावरील आपली पकड अधिक सल होऊ नये या विचाराने २००६ साली कॅस्ट्रो यांनी पोटावरील शस्त्रक्रियेचे कारण पुढे करीत सत्ता आपल्या भावाच्या हाती दिली. दोन वर्षांनी हा भाऊ राउल हाच सत्ताधीश झाला.

तो पूर्णपणे फिडेल यांच्यापेक्षा वेगळा. त्याने आíथक सुधारणांचा मार्ग पत्करला आणि सामान्य क्युबन नागरिकास संपत्तीचा अधिकार दिला. हे फिडेल यांना पटणारे नव्हते. त्यात २०१४ साली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी क्युबाशी राजनतिक संबंध प्रस्थापित केले आणि थेट क्युबालाच भेट दिली. रुग्णालयात असलेल्या फिडेल यांच्या साक्षीने ओबामा यांनी क्युबावासीयांना लोकशाही मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. फिडेल अस्वस्थ झाले. पण काहीही करू शकले नाहीत. अप्रत्यक्ष निषेधाचे पत्र तेवढे त्यांनी प्रसृत केले. त्यामुळे ना त्यांच्या राजकीय प्रकृतीत सुधारणा झाली ना शारीरिक. ते होणारच नव्हते. कारण एव्हाना दोन्हीही कालबाह्य़ ठरले होते. त्यांची क्रांती एव्हाना विरली होती. आता प्रकृतीही विझली. दोन्हींचे असे होणे अटळ होते.

क्रांती आपल्या पिल्लांना खाते असे म्हणतात. ते अर्धसत्य आहे. ती पिल्लांना खातेच. पण ती अखेर आपल्या निर्मात्यालाही नष्ट करते. फिडेल अलेक्झांड्रो कॅस्ट्रो यांच्या जगण्यामरण्याचा आपल्यासाठी हा अर्थ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2016 3:06 am

Web Title: cuban revolutionary leader fidel castro
Next Stories
1 एक सुंदर घटना!
2 संघर्षांत संधी?
3 संगीताचार्य
Just Now!
X